वेदनेचे भूत होते... (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar

बेनामसा ये दर्द ठहर क्‍यूँ नही जाता
जो बीत गया है वो गुजर क्‍यूँ नही जाता
-निदा फाजली, (1938-2016)

एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर अवघं आयुष्य असं वेदनामय होतं.
एरिकची जगावेगळी गोष्ट सांगणारा चित्रपट "द रेल्वेमॅन' सन 2013 मध्ये येऊन गेला. अद्भुत अभिनय आणि वेगळाच आशय असलेला हा चित्रपट एकदा तरी बघावाच असा आहे. चित्रपटदिग्दर्शनाच्या आणि पटकथालेखनाच्या अभ्यासकांनी हा चित्रपट मुद्दाम पाहावाच.

==================

वेदना ही मोठी फसवी आणि गुंतागुंतीची गोष्ट आहे. तिला भूतकाळ असतो; पण स्मृती फारशी नसते. असलीच तरी अगदी धूसर...जाणिवेपुरती. वेदना तशीच्या तशी जपून ठेवण्याची मेंदूमध्ये सोयच नसते म्हणे. तेही एक बरंच. तीव्र वेदना वारंवार भोगण्याची ताकद आहे कुणाच्यात? पण हेसुद्धा सरसकट खरं नाही. काही वेदना आपलं मन वर्षानुवर्षं जपून ठेवतं. नको म्हटलं तरी ती झटकून टाकता येत नाही. खूप वर्षांपूर्वी उपटलेलं नागिणीचं दुखणं पुढं बरीच वर्षं अधूनमधून आठवण करून देत राहतं तसं. क्षुल्लक वेदना विरून जातात; पण जिव्हारी लागलेलं कसं विसरायचं?
एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर अवघं आयुष्य असं वेदनामय होतं. त्यावर त्यानंच मुक्‍तीचा मार्ग शोधला. हा मार्ग सूडाचा होताच, असं नाही. सूडकथा म्हणण्यापेक्षा त्याला शूलकथा म्हणायला हवं. मांसात खोल रुतलेला काटा उपसून फेकून देण्याचा प्रयत्न होता तो. एरिकची जगावेगळी गोष्ट सांगणारा चित्रपट "द रेल्वेमॅन' सन 2013 मध्ये येऊन गेला होता. अद्भुत अभिनय आणि वेगळाच आशय असलेला हा चित्रपट एकदा तरी बघावाच असा आहे.
* * *
एकविसाव्या वर्षी उमेदीचं आयुष्य मागं ठेवून युद्धावर जाणं तसं अवघडच; पण एरिक नावाच्या ब्रिटिश सैनिकाला ते करावं लागलं. दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं होतं. सिंगापूरमध्ये त्याची पलटण लढत असताना सन 1942 मध्ये जपान्यांनी तुफानी आक्रमण करत ब्रिटिश फौजांची दाणादाण उडवली. सिंगापूर आणि आसपासचा बराचसा परिसर गिळंकृत केला. "ब्रिटिश साम्राज्यावरचा सर्वात मोठा आघात' असं वर्णन तेव्हा तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी केलं होतं, तो हा जपान्यांचा हल्ला. या हल्ल्यात शेकडो सैनिक बॉम्बस्फोटात आणि बंदुकीच्या गोळ्यांमुळे कामी आले. हजारो युद्धकैदी झाले. एरिक हा त्यापैकी एक.
एरिक तसा बंदूकवाला, दिलेर वगैरे कधी नव्हताच. किडकिडीत, चष्मिष्ट आणि अभ्यासू पोरं जशी असतात तसाच होता. सरकारी आदेशानुसार युद्धावर जाणं अनिवार्य होतं म्हणून गेला. लष्करानंही त्याची नियुक्‍ती सिग्नल कोअरमध्येच केली. संदेशांची देवाणघेवाण, शत्रूच्या संदेशांचा माग काढणं, त्यांची संदेशयंत्रणा निकामी करण्याचे उद्योग करणं, असली कामं सिग्नल कोअर करत असे. तिथं थोडं डोकेबाजांचं काम होतं. एरिक त्या कामात तरबेज होता. रेडिओ उलगडून त्याचे सुटे भाग दुरुस्त करून तो पुन्हा जुळवणं हा त्याचा छंदही होता. त्याला आणखी एक छंद होता. छंद कसला, वेडच म्हणायचं. -रेल्वे! लोहमार्गाचं जाळं, त्याचं कामकाज, वेळापत्रकं, सिग्नल-यंत्रणा, तऱ्हेतऱ्हेची इंजिनं या सगळ्याची माहिती जमा करणं त्याला भलतंच आवडत असे. रेल्वेचा चालता-बोलता कोशच तो. त्याचे दोस्त गमतीनं त्याला "रेल्वेमॅन' म्हणायचे.
साधंसं व्यक्‍तित्व लाभलेल्या या एरिकची ही असामान्य गोष्ट आहे.
* * *
ते वर्ष होतं बहुधा 1980. साठीच्या घरातल्या एरिकनं भराभरा चालत स्टेशन गाठलं. त्याला लवकर घरी जायचं होतं. इंग्लंडातल्या बेरिक-अपॉन-ट्‌वीड या छानदार गावात तो राहायचा. त्याची बेरिकला जाणारी गाडी चुकली होती, हरकत नाही. क्रू जंक्‍शनला उतरून घराकडं जाणारी गाडी मिळेल, हे त्याला तोंडपाठ होतं.
गाडीत त्याच्या समोरच एक हसरी बाई बसली होती. तिला कॅनडाला जायचं होतं. एरिकनं लक्ष दिलं नाही. तो संकोचला. आधीच एकांड्या स्वभावाचा. त्यातून आता साठी उलटलेली. अर्थात हीदेखील चाळिशीपार दिसतेच आहे. पण जाऊ दे...आपल्याला काय करायचंय? तिच्या हातात इंग्लिश रेल्वेचं टाइमटेबल होतं आणि एरिकच्या रूपानं समोर एक बसलंच होतं!
""मिस्टर...तुम्ही चुकीच्या गाडीत बसलेले आहात!'' तिकिट तपासनिसानं सांगितलं.
""माहितीये मला; पण मध्येच क्रूला उतरून मी बेरिकला जाणारी गाडी पकडीन,'' मान वर न करता एरिकनं उत्तर दिलं.
बोलघेवड्या पॅट्रिशियाचे डोळे चमकले. तिच्या लक्षात आलं की गडी घुम्या दिसतोय. तिनं उगीचच संभाषण छेडलं. बोलता बोलता एरिक खुलत गेला.
""मला बुधवारपर्यंत परत यायचंय...याच गाडीनं!'' ती सहज म्हणाली. एरिक त्याच्या स्टेशनला उतरून गेला; पण पॅटनं त्याच्या मनात घर केलं होतं. त्यानं लक्षात ठेवून बुधवारी तिला स्टेशनातच गाठलं.
""ओह, काय योगायोग!'' समोर उभा राहत तो म्हणाला.
""ओह, व्हॉट अ सरप्राइज!'' ती म्हणाली. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या. बोलता बोलता एरिकनं त्याचं मन हलकेच खुलं केलं.
""मी इथं येणं, हा अगदीच काही योगायोग नव्हता...'' तो म्हणाला.
""वेल्‌...ते तसं सरप्राइजही नव्हतं माझ्यासाठी!'' खुदकन हसून ती म्हणाली.
...या घटनेनंतर तीनच आठवड्यांनी निवृत्त लष्करी अधिकारी एरिक लोमॅक्‍स आणि ज्येष्ठ नर्स पॅट्रिशिया वॉलेस हे विवाहबद्ध झाले.
उष्ण श्‍वासोच्छ्वासांची वादळं निमाली नव्हती. प्रणयाच्या लाटा अजून ओसरल्या नव्हत्या. देहाचे शिंपले पुरतेपणी मिटले नव्हते, तेवढ्यात निळ्याशार समुद्रातून अफाट वेगानं एखादं ओंगळ, अभद्र अस्तित्व उसळावं आणि त्यानं अवघा शुभ्रकिनारा गिळंकृत करावा...तसं काहीसं घडलं. भूतकाळातल्या भयाण स्मरणपिशाच्चांनी अचानक हल्ला करून एरिकच्या व्यक्‍तित्वाचा अक्षरश: चोळामोळा केला. "नको, नको, मला मारू नका, प्लीज...प्लीज थांबा...तुमच्या पाया पडतो...हा हा हा हा...' जमिनीवर पिळवटून पडलेल्या एरिकच्या अनाकलनीय आकांतानं थक्‍क होत पॅट बघत राहिली. एरिक मात्र स्मृतींचा राकट, दुष्ट हात पकडून भूतकाळात ओढला जात होता...
* * *
...थायलंडच्या भूमीतलं जंगल निबिड होतं. सिंगापूरवर निकराचा हल्ला करून जपान्यांनी ब्रिटिश सैन्याची धूळधाण उडवली होती. शरण आलेल्या हजारो युद्धकैद्यांमध्ये एरिक होता. युद्धकैद्यांची रवानगी दूर थायलंडमध्ये झाली. कांचेनपुरा किंवा असंच काहीसं त्या बंदितळाचं नाव होतं. तिथल्या केम्पेईताई म्हणजे जपानी गेस्टापोच्या हाती हे युद्धकैदी सोपवण्यात आले. थायलंड ते बर्मा असा 257 किलोमीटरचा रेल्वेमार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी जपानी लष्कर तेव्हा धडपडत होतं. आयते मजूर हाताला लागले होते. हा मार्ग कमालीचा दुर्गम, निबिड अरण्यानं भरलेला. कित्येक कैदी तर निव्वळ जुलाब होऊन मेले. काहींना विषारी माश्‍या चावल्या. काहींना साप...जे जगले ते दुर्दैवी म्हणायचे. कारण त्यांचा जपान्यांनी अनन्वित छळ केला.
फिनली, ब्रॅडली, मॅक्‍निल...अशा साऱ्या सोबत्यांसकट एरिकसुद्धा रेल्वे लाइनच्या कामात अडकला. त्याची प्रकृती तोळामासा होती, तरीही तो तसाच दामटून काम करायचा. कारण, आजारी कैदी पोसत बसण्याची जपान्यांची तयारी नव्हती. आजाऱ्याला एकाच गोळीचा उपाय ः बंदुकीची गोळी. दिवसेंदिवस छळ वाढत गेला, सुटकेची आशा अंधूक होत गेली. मुळात आपण इथं अडकलो आहोत, हे तरी ब्रिटिश सैन्याला माहीत असेल का, हा सवाल हतबल करत असे. संपर्काचं काहीही साधन नव्हतं.
"'थायलंड ते बर्मा रेल्वेमार्ग हे अवघड प्रकरण आहे. ब्रिटिशांनी जे टाळलं, ते हे जपानी करू पाहत आहेत...'' एरिक चष्मा सावरत एकदा म्हणाला.
"" का? ब्रिटिशांना तर हवी होती की रेल्वे!'' कुणीतरी शंका काढली.
"" या भागात कामासाठी माणसांची नव्हे, गुलामांची गरज लागते. आपण गुलाम आहोत जॅक!'' एरिक म्हणाला. या प्रस्तावित रेल्वेमार्गाचा नकाशाच त्यानं काढून दाखवला. बाहेर संपर्क साधण्यासाठी म्हणा किंवा निव्वळ सोबत्यांचा हुरूप वाढवण्यासाठी म्हणा, एरिकनं नवीन आयडिया काढली. स्वत:चा रेडिओ बनवला तर बाहेरच्या बातम्या तरी समजतील...
भंगार मोटारीची बॅटरी, चोरलेल्या वायरी, काही पाइप आणि स्क्रू अशी सामग्री चोरट्या मार्गानं गोळा करत त्यानं खरंच एक दिवस रेडिओ तयार केला आणि "बीबीसी'च्या बातम्या ऐकल्या. दोस्त फौजांची सरशी काही ठिकाणी होत असल्यानं काही काळात आपलीही सुटका होईल, असं तो सोबत्यांना सांगायचा; पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
...एक दिवस त्याचा रेडिओ, रेल्वेचा नकाशा अशी सामग्री जपानी अधिकाऱ्यांच्या हाती लागली. एरिक आणि त्याची "टोळी' क्षणार्धात जेरबंद झाली.
* * *
""तुझ्याकडं रेल्वेचा नकाशा कसा आला?'' जपानी केम्पेइताईनं कठोर चेहऱ्यानं त्याच्या भाषेत विचारलं दुभाष्यानं प्रश्‍न एरिकच्या पारड्यात टाकला.
""कसा म्हंजे? मी रेल्वेची माहिती जमवतो पहिल्यापासून...म्हणून!''
""रेल्वेची माहिती? उगीचच?''
""मला रेल्वे आवडते...''
दुभाष्याचं नाव ताकाशी नागासे असं होतं. राजापेक्षा राजनिष्ठ असलेल्या या नागासेनं स्वत:ची मर्यादा सोडली. लष्करी अधिकाऱ्यापेक्षा तोच जास्त बोलायला लागला. हे चांगलं लक्षण नव्हतं. एरिकचा प्रचंड छळ सुरू झाला.
""हे रेल्वेमॅन, नीट उत्तरं दे...नालायक किडेमकोडे...असली औलाद पैदा केल्याबद्दल तुमच्या देशाला लाज वाटायला हवी. मी जर तुझ्याजागी असतो तर सरळ आत्महत्त्या केली असती'' नागासे बरळला.
""मग ती संधी तुला लवकरच मिळेल!'' घायाळ देहानं; पण चिवट मनानं एरिक ओरडला.
छोट्या बांबूच्या पिंजऱ्यात अंग मुडपून बंद ठेवणं, डोक्‍यावर फडकं टाकून त्यावर पाणी ओतणं, नडगीवर फटके मारणं, पाशवी बलात्कार...छळाचे अनन्वित आणि "कल्पक' प्रकार सुरू होते. नागासेसारखा दुभाष्या... खरं तर तो सोल्जरसुद्धा नाही; पण त्याच्याही मनात इतका तिरस्कार का? इतका की माणसाचा धर्म विसरावा एखाद्यानं? एरिकचं मनही बधीर होत गेलं.
असे कित्येक दिवस गेले. मग आठवडे. मग महिने.
* * *
दोस्तांनी अनपेक्षित हल्ला करून थायलंडमधला आपला भूभाग परत मिळवला. युद्धकैदी सोडवले. त्यात एरिक घरी परत आला. आल्यानंतर तो पार बदलला होता. कुणाशी मिसळणं नाही, हसणं-बोलणं नाही. फिनली, ब्रॅडलीसारखे काही निवृत्त सैनिक होते, त्यांच्यासोबत "व्हेटरन्स क्‍लब'मध्ये अधूनमधून वेळ घालवणं इतकंच त्याचं सामाजिक जीवन उरलं होतं.
भूतकाळ त्याला छळत असे. याला मानसशास्त्रात पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर असं म्हणतात. भूतकाळ हेसुद्धा एक भूत असतं. एखाद्या काळोख्या रात्री पावलं न वाजवता येऊन समोर उभं राहातं आणि दचकवतं. एरिक असाच दचकत दचकत जगत होता. थायलंडच्या कांचेनपुऱ्याच्या युद्धतळावरच्या आठवणी त्याच्या मनाच्या चिंध्या करत. ताकाशी नागासे नावाच्या माणसाच्या रूपातल्या हैवानाची छबी त्याच्या डोळ्यासमोरून हलत नसे.
...आणि एक दिवस त्याला पॅट्रिशिया भेटली. मग तो भूतकाळाचा हल्ला घडला.
आपल्या धडधाकट नवऱ्याचा असा पाचोळा का होतोय, याचा छडा पॅटनं लावलाच. फिनलीनंच तिला सांगितलं. थायलंडमधला युद्धतळ. यातना. छळ. मृत्यूचं सावट. वगैरे. पॅट नर्स होती. धीराची बाई होती ती. ओळखीचे चार डॉक्‍टर होते. या धक्‍क्‍यातून एरिकला बाहेर काढायचंच असा तिनं चंग बांधला; पण काय करायला हवं नेमकं?
एक दिवस फिनलीनं बातमी आणली की ताकाशी नागासे हा अजूनही जिवंत असून कांचेनपुऱ्याच्या जंगलातच आता युद्ध संग्रहालय आहे, तिथं तो गाइडची नोकरी करतो. येणाऱ्या पर्यटकांना तिथल्या कहाण्या सांगून पोट जाळतो. इतका नतद्रष्ट हैवान जिवंत राहिला? कसं शक्‍य आहे हे? त्याला अटक कशी झाली नाही? त्यानं काही भोगलंच नाही?
...हा धक्‍का सहन न होऊन फिनलीनं नदीच्या पुलावर स्वत:ला गळफास लावून घेतला. पॅट्रिशिया हादरली. आपल्या नवऱ्याचं असं काही होऊ नये म्हणून तिनं त्याला शांतपणे सुचवलं.
""एरिक, मला वाटतं की तू थायलंडला जा. त्या नागासेला भेट. तुझी मळमळ ओक त्याच्यासमोर. तुला जे ठीक वाटतं ते कर...पण मनातून हा सल काढून टाक. या आठवणी आपल्या संसारात नकोत!''
...हो-ना करता करता एरिक तयार झाला आणि एक दिवस थायलंडमध्ये पोचला.
* * *
""बुद्ध हे नाव नाही. ती एक उपाधी आहे...इथं तुम्हाला बुद्धाच्या अनेक प्रतिमा दिसतील. जगाला शांती आणि करुणेचा संदेश देणाऱ्या या अवताराला आम्ही मनोभावे पूजत असतो...'' पर्यटकांच्या टोळक्‍याला माहिती देणाऱ्या नागासेला एरिकनं स्वप्नात तर नक्‍कीच ओळखलं असतं; पण इथंही ओळखलं. तो त्याच्या मागं मागं गेला.
जिथं एरिक आणि अन्य युद्धकैद्यांचा छळ झाला, तिथं आता संग्रहालय होतं. छळ कसा होत असे, हे नागासे त्रयस्थपणे पर्यटकांना सांगत असे. अंगणातले ते चिमुकले बांबूचे पिंजरेही तसेच होते. कैद्यांना फोडून काढण्यासाठी ठेवलेलं भक्‍कम मेजही तसंच होतं. शिवाय काही फोटोही होते. संग्रहालय बंद होतं. नागासेनं पर्यटकांना तिथून परत पाठवलं. तो इमारतीत शिरला. त्याच्या पाठोपाठ एरिक होता.
""संग्रहालय बंद झालं आहे मिस्टर... तुम्हाला उद्या यावं लागेल!'' नागासे म्हणाला.
""तेवढा वेळ नाहीए माझ्याकडं...आणि मिस्टर नागासे तुमच्याकडंही. ओळखलं मला?'' ठाम आवाजात एरिक म्हणाला. त्याच्या मनातून ज्वालामुखी उसळून वर आला.
""लोमॅक्‍स...?''नागासे म्हणाला.
...त्या क्षणाला घटितं आणि अघटितांचं एक वर्तुळ पूर्ण झालं होतं.
** *
एरिकनं नागासेचा सूड घेतला? तो कसा? त्यानं नागासेचे तस्सेच हाल केले की त्याला सोडून दिलं हे पडद्यावर पाहणंच योग्य. एरिक लोमॅक्‍स या खऱ्याखुऱ्या ब्रिटिश सैनिकानं लिहिलेल्या "द रेल्वेमॅन' या आत्मकथेवर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाचा वेग बराच संथ आहे. पुऱ्या दोन तासांचाही चित्रपट नाही; पण तरीही तो लांबलेला वाटतो इतका संथ आहे. अर्थात चित्रपटासाठी आत्मकथेत बरेच बदल करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ ः एरिक 1980 पर्यंत अविवाहित नव्हता. 1945 मध्ये त्याची थायलंडमधून सुटका झाल्यानंतर तो मायदेशी येऊन सेटल झाला होता. विवाहानंतर त्याला तीन मुलंही झाली होती. 1980 मध्ये पॅट त्याला भेटली, तेव्हा त्यानं आपला पहिला संसार सोडला होता.
कॉलिन फर्थ या बेजोड ब्रिटिश नटानं एरिकच्या उतारवयातली भूमिका केली आहे तर जेरेमी आयर्विननं तरुणपणीचा, युद्धतळावरचा एरिक साकारला आहे. दोघंही अफलातून आहेत आणि विशेषत्वानं लक्षात राहातं ते त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वातलं असाधारण साम्य. कॉलिन फर्थचा आवाज, त्याच्या नजरेत साकळलेले दु:खाचं सावट हे सारंच अद्भुत आहे. शेक्‍सपीरिअन रंगभूमीचा अनुभव पदरी असलेला कॉलिन फर्थ सध्याचा बेस्ट ब्रिटिश नट म्हणावा लागेल. स्टेलन स्कार्सगार्डनं साकारलेला फिनली लक्षात राहातो. पॅट्रिशियाची भूमिका आघाडीची अभिनेत्री निकोल किडमननं केली आहे.

सतत दोन पातळ्यांवरून या चित्रपटाची कथा फिरत राहते. वर्तमान बघतानाही भूतकाळ डोकावत असतो आणि फ्लॅशबॅकमध्ये वर्तमानाचा धागा सुटत नाही. हे गुंतागुंतीचं चित्रकथन पेललं ते दिग्दर्शक जोनाथन टिप्लीट्‌झकी यांनी. गेल्या वर्षी यांनी दिग्दर्शित केलेल्या "चर्चिल'नं ऑस्करवारी गाजवली होती. चित्रपटदिग्दर्शनाच्या आणि पटकथालेखनाच्या अभ्यासकांनी हा चित्रपट मुद्दाम पाहावाच.
"द रेल्वेमॅन'चं जाणकारांनी खूपच चांगलं स्वागत केलं. अर्थात त्याला ऑस्करबिस्कर मिळण्याची शक्‍यता नव्हतीच; पण महोत्सवांमध्ये हा चित्रपट खूप नावाजला गेला.
खरा ताकाशी नागासे आणि एरिक लोमॅक्‍स वार्धक्‍यानं आठ-दहा वर्षांपूर्वी निवर्तले. अर्थात आपापल्या मायदेशी. मात्र, मरणापूर्वी त्यांच्यामध्ये पसरलेल्या अफाट समुद्रात उसळणारं तिरस्कार, घृणा, हिंस्रतेचं जनावर कायमचं नामशेष झालं होतं. भूतकाळ खोलवर गाडून दोघंही मित्र झाले होते. समुद्राचं पाणी पुन्हा संथ, निळंशार झालं होतं. खरा युद्धविराम हा असा असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com