शतजन्म शोधिताना... (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar

चिरंजीवित्वाचा शाप लाभलेल्या अश्‍वत्थाम्याचं महाभारतातलं मिथक कमालीचं गूढ आहे. बारा वर्षापूर्वी अशाच एका अश्‍वत्थाम्याची कहाणी सांगणारा चित्रपट येऊन गेला होता. त्याचं नाव होतं ः "द मॅन फ्रॉम द अर्थ'... पृथ्वीवरचा माणूस. चमत्कारिकच नाव! हा पृथ्वीवरचा माणूस आहे, तर मग आपण कोण आहोत? चित्रपटाचा फार बोलबाला झाला नाही. विद्वज्जनांमध्ये या चित्रपटानं चिक्‍कार चर्चा घडवल्या. इंटरनेटनं मात्र या चित्रपटाला तारलंच. "टॉरेंट' आणि तत्सम चित्रपटांना वाहिलेल्या संकेतस्थळांवर "द मॅन फ्रॉम द अर्थ' चक्‍क गाजला. या आगळ्यावेगळ्या चित्रपटाविषयी...

मध्य प्रदेशात बुऱ्हाणपुराजवळ असीरगढचा किल्ला आहे. त्या किल्ल्यात पुरातन शिवमंदिर आहे. गुप्तेश्‍वर महादेवाचं. त्या भोलेनाथाच्या शिवशंभोच्या पायातळी एक हिरवंचार तळंही दिसतं. ते उन्हाळ्यातही आटत नाही म्हणे. पडका किल्ला. प्राचीन दगडी भिंताडांवर उगवलेली झुडपं. अवचित उडणाऱ्या पाकोळ्या. एक स्वयंसिद्ध शांतता आहे तिथं.

...पहाटे तिथल्या मंदिरातल्या शिवलिंगावर ताजी फुलं वाहिलेली दिसतात. महाभारत काळात चिरंजीवित्वाचा शाप लाभलेला अश्‍वत्थामा भळभळत्या भाळानिशी तिथं येऊन पूजा करून जातो म्हणे. त्याला कुणी कुणी पाहिलंयसुद्धा. आसपासच्या गावपाड्यात तो ""थोडी हळद आणि तेल देता का हो,'' अशा विनवण्या करतो अधूनमधून. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघणारा आयुष्यभरासाठी भ्रमिष्ट होतो...म्हणजे अशी आख्यायिका आहे.

महाभारतात पराभवाचं दान पदरी पडल्यावर दुर्योधनाच्या वधानं बेभान झालेल्या अश्‍वत्थाम्यानं द्रौपदीच्या उदरी जन्मलेल्या पाच उपपांडवांना मारून टाकलं. अर्जुनावर ब्रह्मास्त्र उगारलं; पण त्याचं चिरंजीवित्व अबाधित आणि शापित राहील, असं युगंधर कृष्णानं बघितलं. तेव्हापासून तो असा रानोमाळ भटकतो आहे म्हणे.
महाभारतातलं हे मिथक कमालीचं गूढ आहे... पण खरंच कुणी असं चिरंजीव असतं का? अर्थात नसतंच. "एक दिन जाना रे भाई' हेच खरं. कल्पनाशक्‍ती ताणली की ध्यानी येतं, खरोखर असं अफाट, अथांग आयुष्य जगणं हा शापच असणार.
बारा वर्षापूर्वी अशाच एका अश्‍वत्थाम्याची कहाणी सांगणारा चित्रपट येऊन गेला होता. त्याचं नाव होतं ः "द मॅन फ्रॉम द अर्थ'... पृथ्वीवरचा माणूस. चमत्कारिकच नाव! हा पृथ्वीवरचा माणूस आहे, तर मग आपण कोण आहोत? चित्रपटाचा फार बोलबाला झाला नाही. काही मोजक्‍या थिएटरात लागला, लगेच उतरला. पुरस्कारांची झड लागली असंही नाही. विद्वज्जनांमध्ये या चित्रपटानं चिक्‍कार चर्चा घडवल्या. इंटरनेटनं मात्र या चित्रपटाला तारलंच. "टॉरेंट' आणि तत्सम चित्रपटांना वाहिलेल्या संकेतस्थळांवर "द मॅन फ्रॉम द अर्थ' चक्‍क गाजला. आजही "अमेझॉन प्राइम'वर हा चित्रपट पाहता येतो.

या चित्रपटाची पटकथा तब्बल चाळीसेक वर्षं लिहिली जात होती, हे आणखी एक विचित्र होतं. ड्रेक्‍सेल जेरोम लुईस बिक्‍सबी हे तसे नामचिन अमेरिकन लेखक होते. "स्टारट्रेक' मालिका, "ट्‌वायलाइट झोन', "मिरर, मिरर'सारख्या कथा किंवा "फॅंटास्टिक व्हॉयेज'सारखा चित्रपट लिहिणाऱ्या बिक्‍सबीसाहेबांना "द मॅन फ्रॉम द अर्थ'ची कथाकल्पना साठीच्या दशकातच सुचली होती. थोडी थोडी लिहून ठेवत होते ते...पण ती पूर्ण झाली 1998 मध्ये! तेव्हा ते मरणशय्येवर होते आणि आपली पटकथा मुलग्याला- इमर्सन बिक्‍सबी यांना- डिक्‍टेट करत होते. चित्रपट लिहून पुरा झाला, तो पडद्यावर आला थेट 2007 मध्ये.

साध्या कॅमकॉर्डरवर, एका घराच्या खोलीत, आणि थोडाफार आवारात चित्रित झालेला हा चित्रपट, लौकिकार्थानं चित्रपट नाहीच. ती एक गूढ, गहन चर्चा आहे. शब्द हेच त्याचं माध्यम आहे. त्याचा चित्रपट व्हावा, असं बिक्‍सबीसाहेबांना का वाटलं, हे आणखी एक गूढ आहे. एका खोलीत घडणारा हा चित्रपट दीडपावणेदोन तासाची महाजांभई मात्र नाही. सुजाण प्रेक्षक त्यात असा काही गुरफटत जातो की बस्स. हे गुरफटणं घंट्या-दोन घंट्यांचं नाही, पुढं कित्येक दिवस छळत राहतं. हा चित्रपट बघितला, की जन्म-मृत्यू, देव, धर्म, नातीगोती, या साऱ्या गोष्टी किती कालसापेक्ष आहेत, याचं खडखडीत भान येतं. जळमटं स्वच्छ धुऊन निघतात.
***

विद्यापीठात छान रमलेल्या प्राध्यापक जॉन ओल्डमननं अचानक राजीनामा दिला. का? माहीत नाही. आता कुठे जाणार? माहीत नाही. प्राध्यापकमजकूर गावदेखील सोडताहेत. सामानसुमान बांधायला घेतलंसुद्धा त्यांनी. इतकी काय घाई? पण ते काही बोलायला तयार नाहीत. नुसतं गोड हसतात. मान हलवतात. "सावकाश भेटू पुन्हा' असं म्हणतात.
विद्यापीठातले त्यांचे सहकारी हैराण झाले आहेत. रोज मस्त स्टाफरूममध्ये चहागिहा पीत गप्पा मारणारा हा प्रसन्नचित्त, तरणाबांड सहकारी असा भस्सकन्‌ जातोच कसा? त्यांच्या मित्रांनी निरोप देण्यासाठी घर गाठलं, तेव्हा प्रोफेसरसाहेब ट्रकमध्ये आपलं किडूकमिडूक सामान भरत होते.
...हे पाहा, जीवशास्त्राचे प्राध्यापक हॅरी येऊन पोचले. मानववंशशास्त्र शिकवणारा हा डॅन आला. जॉन ओल्डमनची सहकारी इडिथ तणतणत आली. ती कमालीची भाविक आणि सरळ आहे. तिला जॉनचं असं वागणं बिलकुल आवडलेलं नाही. बघा, ही सॅंडीदेखील आलीच पाठोपाठ. ती विद्यापीठात इतिहास शिकवते, आणि उरलेल्या वेळात जॉन ओल्डमनवर एकतर्फी प्रेम करते. तो पाहा, मोटरसायकलवरून आर्ट आला. लांब केसांचा आर्ट रॉकस्टार वाटतो; पण त्याला पुरातत्त्वशास्त्र शिकवावं लागतं, हा भाग वेगळा. प्राचीन वस्तूंचा अभ्यास असलेल्या आर्टला मैत्रीण मात्र नेहमी नवीन लागते. विद्यार्थिनी असेल तर अधिक बरं! लिंडा त्याच्या मागच्या सीटवर बसूनच आली आहे. हा अकस्मात अंगलट आलेला निरोप समारंभ आहे, हे जॉन ओल्डमननं ओळखलं. किंचित अवघडून तो सामान ट्रकमध्ये चढवत राहिला.
""ओह, हे काय? व्हॅन गॉगचं पेटिंग? तुझ्याकडे कसं? ओरिजिनल आहे?'' इडिथ ओरडली. तिनं वाकून बघितलं. खरंच व्हॅन गॉग...माय गॉड! ""ओरिजिनल नसावं...माझ्या मित्रानं मला दिलं होतं मागे,'' जॉननं खुलासा केला. पेंटिंगच्या मागं "टू माय फ्रेंड जेक्‍स बॉर्न' असं लिहून व्हॅन गॉगनं सही केली होती. जॉननं घाईघाईनं पेंटिंग ट्रकमध्ये टाकलं.

""का जातोयस?,'' सॅंडी मर्फीनं कळवळून विचारलं. ""झाली की दहा वर्ष...आणखी किती राहणार एका गावात?,'' जॉन अवघडून म्हणाला.
...सगळ्यांनाच हा प्रश्‍न पडला होता. रिकाम्या घरात मित्रांचं कोंडाळं बोलावत शेवटी उरलेली एकमेव मद्याची बाटली जॉन ओल्डमननं उघडली. पार्टी सुरू झाली. जॉनचं असं एकाएकी जाणं कुणालाच पटत नव्हतं.
""अरे, एकतरी सयुक्‍तिक कारण सांग...खोटं सांग, पण सांग!'' डॅन वैतागलाच. "'मी एक मूर्ख वाटणारा प्रश्‍न विचारू तुम्हाला?'' - बरेच आढेवेढे घेतल्यानंतर अखेर जॉन म्हणाला. ""आम्हीही शिक्षक आहोत, जॉन. मूर्ख प्रश्‍नांची उत्तरं द्यायला सरावलो आहोत...बोल आता!,'' हॅरी म्हणाला.
""ओके...मानवप्राणी गुहेत राहत होता, त्या काळापासून आजपर्यंत जगलेल्या माणसाला तुम्ही काय म्हणाल?,'' जॉन ओल्डमननं प्रश्‍न केला. ""म्हणजे पॅलिओलिथिक कालखंडापासून? बाप रे...!'' डॅननं विचारलं. जॉन ओल्डमन बहुधा पुस्तकाची तयारी करतोय, असं त्याच्या मनात आलं.
""करेक्‍ट...क्रो मॅग्नॉन माणूस...अपर पॅलिओलिथिक कालखंड...उत्क्रांतीच्या टप्प्यावर होमो सेपियन झाल्यानंतर मानव गुहेत वास्तव्य करू लागला. दगडाच्या हत्यारांनिशी शिकार करू लागला, त्या काळापासून..'' जॉननं तपशील दिला.
""काहीतरीच...'' इडिथ म्हणाली.
""काहीतरीच नाही... मी तो माणूस आहे! मी चौदा हजार वर्षांपासून या पृथ्वीवर असाच हिंडतोय, इडिथ!,'' जॉन ओल्डमनच्या दुखऱ्या आवाजातील त्या गौप्यस्फोटानंतर सगळे स्तंभित झाले.
* * *

""काहीतरी भंकस करू नका राव... वेळ घालवायचा म्हणून काहीही लपेट्या मारायच्या का? विद्यापीठात नाहीतरी काय करतो आपण? ह्यॅह्यॅह्यॅ..,'' आर्ट खिदळला. जॉन ओल्डमन सरळसरळ सगळ्यांची फिरकी घेत होता, हे दिसत होतं. किंवा डॅन म्हणतो त्याप्रमाणं त्याला एखादी विज्ञान काल्पनिका लिहायची असणार, असंही असेल. कादंबरी असल्यानं तो प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन करत असावा...जॉनच्या त्या कल्पनेच्या खेळात मग हळूहळू सगळेच सहभागी झाले. गप्पांमध्ये रंग भरला; पण जॉन हसत नव्हता बिलकुल. तो उत्कटतेनं सांगू लागला...
""दर दहा वर्षांनी मला जागा बदलावी लागते. माझं वय वाढत नाही, हे लोकांच्या लक्षात यायला लागलं, की मी गाव बदलतो. गेली हजारो वर्ष चाललीये ही पायपीट..,''काहीशा थकलेल्या आवाजात जॉन म्हणाला.
दोस्तांना आता जॉनच्या गोष्टीत गंमत वाटत होती. बरंय हे यार! आपल्यासारखाच हाडामांसाचा, दोस्तान्यातला इसम सांगतोय, की मी अमर आहे म्हणून...भले!! जॉन मात्र गंभीर होता...
""मला आठवतंय, प्रागैतिहासिक काळात हा खंड-उपखंड असा नव्हता. हवा वेगळी होती. वनस्पती थोड्या वेगळ्या होत्या. खूप चालायचो आम्ही...''
""तुझे वडील काय करायचे रे जॉन?,'' डॅननं मुद्‌दाम तिढा टाकला. ""वडील...अं...आठवत नाही. एक सावलीसारखी आकृती तेवढी स्मरणात आहे. तेव्हाचं आता फारसं काही आठवतही नाही. पंधराव्या शतकात कोलंबसाबरोबर समुद्र ओलांडल्याचं आठवतंय..,'' जॉन म्हणाला.
""क्‍काय?'' हॅरी ओरडला.
""हो- पण मी तेव्हाही फारसा धाडसी वगैरे नव्हतो. पृथ्वी गोल असावी असं वाटायचं; पण कधीकधी एखाद्या ठिकाणावरून धाडकन पडू, असंही वाटत राहायचं...'' जॉन स्वत:शीच बोलल्यागत म्हणाला. ""आम्ही आत्ताच पडलोय लेका!,'' आर्ट ओरडला. ""...आणि इडिथ, ते पेटिंग मला खुद्द व्हॅन गॉगनंचं दिलं होतं. टाकवलं नाही माझ्याच्यानं!,'' जॉननं आणखी एक विजेचा झटका दिला.
""इसवीसन 1292 मध्ये तू कुठं होतास, सांग बरं?'' इडिथ भडकलीच होती. ""गेल्या वर्षी याच तारखेला तू कुठं होतीस...आठवतंय?,'' जॉननं तिला निरुत्तर केलं.
जॉनच्या डोक्‍यावर परिणाम तर नाही ना झाला? इतका सशक्‍त, तरुण माणूस आपलं वय चौदा हजार वर्षाचं आहे असं सांगायला लागला, तर काय रिऍक्‍शन द्यायची असते? प्रकरण झपाट्यानं गूढ आणि गुंतागुंतीचं व्हायला लागलं. आर्टनं घाईघाईनं फोन करून डॉ. विल ग्रबर यांना बोलावून घेतलं. ते नावाजलेले ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ होते. तेसुद्धा तातडीनं आले.
""आय लव्ह यू जॉन...पण हे काय चाललंय?,'' अंगणात नेऊन सॅंडीनं भरल्या डोळ्यांनी जॉनला विचारलं. "" आय लव्ह यू टू, सॅंडी...मी हा असा न मरणारा माणूस...कसं होणार आपलं?,'' त्यानं प्रतिप्रश्‍न केला. अमर माणसांना हृदय नसतं?
...एक छोटासा ब्रेक झाल्यानंतर जॉन ओल्डमननं आपली कहाणी पुढे सुरू केली.
***

""मला आठवतंय, त्याप्रमाणं दोन हजार वर्षांपूर्वी मी सुमेरियन संस्कृतीत रमलेलो होतो..,'' जॉन म्हणाला. सुमेर संस्कृती फळली फुलली युफ्राटिस आणि तैग्रिसच्या खोऱ्यात. आत्ताच्या दक्षिण इराकच्या मुलखात. इराणच्या आसपास. सुमेर संस्कृती किती प्रगत आणि संपन्न होती, याचे प्राचीन अवशेष आजही तिथं सापडतात.
""...मग बॅबिलोनियात पुढली काही शतकं काढली,'' जॉन शांतपणे तपशील सांगत होता. खिस्तपूर्व 1894च्या सुमारास इराकमध्येच बॅबिलोनियन संस्कृतीनं सम्राट हाम्मुराबीच्या कालखंडात भाषा, संस्कृती, कलेची भरभराट साधली. आजही बगदादनजीक त्याच्या साम्राज्याचे काही अवशेष पर्यटक तिकीट काढून पाहतात.
""नंतर भटकतभटकत समुद्र ओलांडला. थेट भारतात पोचलो. तिथं एक महान मनुष्य भेटला. गौतम बुद्ध...'' जॉनच्या शतका-शतकाच्या झेपांनी श्रोत्यांचे श्‍वास अडकत होते. काळाला हुकवून जगलेला हा माणूस अशा काही गोष्टी थंडपणे सांगत होता, की ऐकणाऱ्याचा श्‍वास कोंडावा. या माणसानं बुद्ध पाहिलाय?
""बुद्धांकडे राहून मी अगदी साध्या गोष्टी शिकलो. त्या साध्या होत्या; पण मला अंतर्बाह्य बदलून गेल्या. पुढं बुद्धही गेले. दोनेकशे वर्ष भारतात काढून मी परत आलो,'' जॉनच्या कहाणीनं सगळ्यांच्या झोपा उडवल्या होत्या. बाहेर काळोख पडू लागला होता.

""तू जे काही सांगतोयस, ते सगळं टेक्‍सबुकातलं आहे, जॉन!,'' आर्टचा संयम आता सुटला. ""मी कुठे म्हणतोय नाही म्हणून...सगळं सलग कसं आठवेल मला? मी दीर्घायुषी आहे आर्ट. खूप जगल्यामुळे माणूस जिनिअस होत नाही. मी एक साधा माणूस आहे; पण जाम जगलोय एवढंच!,'' जॉन म्हणाला.
"" जॉन, झालं तेवढं पुष्कळ झालं. तू एक तर मूर्ख आहेस, वेडा आहेस किंवा डॅम्बिस आहेस...काहीही असलं तरी तुला उपचारांची गरज आहेच. मी आत्ता तुला गोळी घालून मारलं तर?...'' डॉ. विल ग्रबरनी खिशातून पिस्तूल काढून सरळ जॉनवर रोखलं. ""मी मरेनसुद्धा कदाचित...पण तुम्ही चौदा हजार वर्षाच्या माणसाचा खून करून काय साधाल?,'' जॉननं शांतपणे विचारलं.
...परिस्थिती तंग झाली. कुणी कुणाशी बोलेना. उठूनच जावंसं वाटत होतं; पण रात्र काळीकुट्‌ट होत चालली होती. तेवढ्यात इडिथनं डाव साधून मनात केव्हापासून साचलेला प्रश्‍न विचारला... ""बायबलमधल्या कोणत्या व्यक्‍तीला भेटला होतास, ते सांग...मोझेसला भेटलास?''
* * *

वळण धर्मचर्चेकडे लागतंय हे बघून जॉन सावध झाला. पुढली वाट भयंकर होती, हे त्याला दिसत होतं; पण खरं सांगून टाकावं, असंही वाटत होतं.
""तुझा देवावर विश्‍वास आहे?'' डॅननं विचारलं. ""तुम्ही म्हणता तसा नाही...म्हणजे काहीतरी सुपरएनर्जी असावी असं वाटतं; पण कधी पाहिली नाही. बायबलमधल्या व्यक्‍तीबद्दल मी थोडक्‍यात काही सांगीन. अधिक नाही...'' जॉन म्हणाला. ""डोंट वरी! "टेन कमांडमेंट्‌स'बद्दल मी दहा शब्दांत सांगू शकतो! डोंट, डोंट, डोंट, डोंट, डोंट, डोंट, डोंट, डोंट, डोंट आणि डोंट..!,'' हॅरीच्या विनोदानं ताण थोडा हलका झाला इतकंच.
""मी बुद्धांची शिकवण इथं सांगावी, म्हणून आलो. तशी सांगितलीही. मला काही राजा वगैरे व्हायचं नव्हतं...पण लोकांनी खिळे ठोकले. वेदना सहन करणं बौद्धा भिक्‍खूंकडून शिकलो होतो. तशा त्या केल्या. पुढलं ते पुनरुत्थान वगैरे काही खरं नाही. चर्चेसची मुजोरीही मला कधी अभिप्रेत नव्हती...'' जॉन अत्यंत जपून बोलत होता.
""यू व्हॉट? तू जीझस आहेस?,'' इडिथ आता चवताळलीच.
""होतो...'' जॉन म्हणाला.
...हा माणूस भोंदू आहे भोंदू. उचलली जीभ लावली टाळ्याला! जीझस म्हणे! लाज वाटत नाही याला असं सांगायला? डॉ. ग्रबर आता निर्धारानं उठलेच. ते म्हणाले ः ""तू अमर आहेस, असं सांगून आमचा आधीच अपमान केला आहेस. त्यात हे! बऱ्या बोलानं तू माफी माग...हे सगळं कपोलकल्पित आहे, असं सांगून टाक!''
...पण एव्हाना तिथं उपस्थित असलेल्या काही जणांना त्याची स्टोरी कुठेतरी अपील होत होती. मुळात जॉन ओल्डमन हा सद्‌गृहस्थ इतका चांगला, तो असं कशाला बोलेल?
...अखेर पहाट फुटायच्या वेळेला जॉन ओल्डमननं सांगितलं ः ""ओके. हा एक खेळ होता. मी एका कल्पनेशी खेळत होतो. त्यात तुम्हाला ओढलं इतकंच. जरा जास्तच ओढलं, त्याबद्दल सॉरी!''
...पण जॉन ओल्डमनची ही कबुली खरंच कबुली होती? तो आधी खोटं बोलत होता की आत्ता बोलतोय? मुळात तो खोटं बोलतोय का? हे सगळं कहाणीच्या अखेरच्या वाक्‍याला कळून येतं. ते पडद्यावर बघावं.
* * *

एका मध्यम आकाराच्या खोलीत अठरा तासांचं हे नाटक आहे. होय, नाटकच. कारण या चित्रपटात ठळक घटनाच नाही. जे काही आहे ते संवादमय आहे. कथालेखक जेरोम बिक्‍सबींबद्‌दल आधी सांगितलं होतंच. दिग्दर्शक रिचर्ड शेंकमननं त्यांच्या पटकथेला अप्रतिम न्याय दिला आहे. बिथोवनची जुनी सिंफनी वगळता पार्श्‍वसंगीतही फारसं नाही. डेव्हिड ली स्मिथ या अभिनेत्यानं साकारलेला जॉन ओल्डमन (हे नावही सूचक आहे...) खरोखर विश्‍वसनीय वाटतो. शेंकमन यांनी नंतर याच पटकथेचं नाटकात रूपांतर केलं. नंतर "द मॅन फ्रॉम द अर्थ : होलोसीन' नावाचा त्याचा सिक्‍वेलही त्यांनी दोन वर्षांपूर्वी आणला होता. विशेष म्हणजे तो इंटरनेटवरच रिलीज झाला. हल्ली जॉन यंग या नावानं कुठल्या तरी विद्यापीठात प्रोफेसरकी करणाऱ्या जॉन ओल्डमनला ध्यानी यायला लागतं, की तो हळूहळू म्हातारा होत चालला आहे. त्याच्या चार विद्यार्थ्यांनाही त्याचा संशय येतो, आणि नवं नाट्य घडतं, असं "होलोसीन'चं कथासूत्र आहे.

चौदा हजार वर्षांची उमर असलेल्या गृहस्थाची ही कहाणी नसून मानवजातीच्या बदलणाऱ्या मूल्यांची कहाणी आहे, हे चित्रपट बघताना जाणवू लागतं. चित्रपटाचा उद्देशच वेगळा आहे, हे कळलं की अजूनच मजा येते. जातपात, धर्म, स्पर्धा, जीवनकलह, नात्यागोत्यांचे ताणेबाणे हे सगळं काळाला बांधलेलं असतं. काळाची ही मोजपट्टी गेली, की हे सगळं फिजूल...हेच हा चित्रपट प्रभावीरित्या सांगतो.
...चित्रपट संपल्यावर आपोआप आपल्या भारतीय मनाच्या दारात, भळभळती जखम घेऊन अश्‍वत्थामा दाणकन्‌ येऊन उभा राहतो. वेदनांनी पिळवटलेल्या चेहऱ्यानं थोडं तेल मागतो. त्याला मनाबाहेर करताकरता अचानक ओठांवर गाणं येतं : "शतजन्म शोधिताना, शतआर्ती व्यर्थ झाल्या, शतसूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या...'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com