मेरे यार जुलाहे... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 2 जुलै 2017

नात्यागोत्यांच्या तिढ्यावर आजवर चिक्‍कार कादंबऱ्या आल्या, चित्रपट आले. त्यातला एक मजेदार चित्रपट म्हणजे ‘द इंटर्न.’ इंटरनेटच्या युगातली आधुनिक तरुणाईही किती लोभस आणि प्रसंगी प्रगल्भ वागू शकते, हे कळून घेण्यासाठी हा चित्रपट मदत करतो. कुठंही रडारड नाही. जड बोजड इमोशनलगिरी नाही. सगळं काही तरुणाईच्या भाषेत. ढंगात. रंगात...पण तरीही रंगतदार. वार्धक्‍य ही एक जिवंत शहाणीव असते. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा ‘बुजुर्ग यार जुलाहा’ असावा. त्याच्यामुळं आपली बुनाई साफसुथरी राहते, हे सांगणारा हा चित्रपट.

नात्यागोत्यांच्या तिढ्यावर आजवर चिक्‍कार कादंबऱ्या आल्या, चित्रपट आले. त्यातला एक मजेदार चित्रपट म्हणजे ‘द इंटर्न.’ इंटरनेटच्या युगातली आधुनिक तरुणाईही किती लोभस आणि प्रसंगी प्रगल्भ वागू शकते, हे कळून घेण्यासाठी हा चित्रपट मदत करतो. कुठंही रडारड नाही. जड बोजड इमोशनलगिरी नाही. सगळं काही तरुणाईच्या भाषेत. ढंगात. रंगात...पण तरीही रंगतदार. वार्धक्‍य ही एक जिवंत शहाणीव असते. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा ‘बुजुर्ग यार जुलाहा’ असावा. त्याच्यामुळं आपली बुनाई साफसुथरी राहते, हे सांगणारा हा चित्रपट.

मुझको भी तरकीब सिखा दे
मेरे यार जुलाहे...
...मैंने तो इक बार बुना था, एकही रिश्‍ता
लेकिन उसकी सारी गिरहें
साफ नजर आती है...मेरे यार जुलाहे
मनावर बारीकसा चरा उमटवणारी ही गुलजारसाहेबांची जुनी कविता. हा विणकर (जुलाहा) मोठा इल्लमबाज आहे. तो यार आहेच; पण त्यानं विणलेल्या वस्त्रात कुठंही गाठी-गुठळ्या नाहीत. साफसुथरी बुनाई; पण आपण एक रिश्‍ता बुनायला जावं, तर त्यात कितीतरी गाठी.

दोन्ही बाजूंना चिनार वृक्षांनी कमान धरल्यागत जाणारा रस्ता. मधूनच दिसणारं निळंभोर आभाळ. त्यात तुरळक शुभ्र ढग. शंभर व्हायोलिनच्या ऑब्लिगातोसारखी संथपणे उडत जाणारी बगळ्यांची माळ. लांबवर दिसणारी साजरी हिमशिखरं...आणि सोबत्याचा हात आपल्या हातात. कॅलेंडरमध्ये शोभाव्या अशा दृश्‍यावर एक बारीक तरंग उठतो, तेव्हा कळतं...अरेच्चा, ही तर पाण्यावरची रांगोळी होती! आता हे चित्र पुन्हा नीट कसं करायचं? तसं ते पुन्हा नीट होतं?

नात्यागोत्यांच्या तिढ्यावर आजवर चिक्‍कार कादंबऱ्या आल्या, चित्रपट आले. त्यातला एक मजेदार चित्रपट म्हणजे ‘द इंटर्न.’ नॅन्सी मेयर्स या दिग्दर्शिकेनं हाच तिढा सांगण्यासाठी तद्दन आधुनिक सेटअप उचलला. त्यात हा तिढ्याचा रंग घातला. जुनीच कहाणी नव्या रंगात रंगवली. काही वर्षांपूर्वी ‘डेव्हिल विअर्स प्राडा’ नावाचा एक मस्त चित्रपट येऊन गेला होता. त्याचा सिक्‍वेल वाटावा, असा हा ‘इंटर्न.’ अर्थात तो सिक्‍वेल नाही. स्वतंत्रच आहे; पण त्यातले बरेच धागे ‘डेव्हिल विअर्स प्राडा’च्या उरलेल्या लोकरगुंड्यातून घेतलेले जाणवतात. ‘द इंटर्न’ टीव्हीवर अधूनमधून लागतोच. वेळ मिळाला, तर आवर्जून बघावा, असा आहे. त्यात ग्रेट काहीच नाही; पण इंटरनेटच्या युगातली आधुनिक तरुणाईही किती लोभस आणि प्रसंगी प्रगल्भ वागू शकते, हे कळून घेण्यासाठी ‘द इंटर्न’ मदत करतो.
* * *

बेन व्हिटॅकरचा संसार संपला. चाळीस वर्षं हातात हात घालून जिच्यासोबत वाटचाल केली, ती पुढं निघून गेली. निवृत्त बेनला कंटाळा येत चालला आहे. दिवसभर करायचं काय? त्याच्या अगदी उलट आयुष्य सुरू झालंय ज्यूल्स ऑस्टिनचं. तरुण मुलगी. प्रेमात पडली. लग्न केलं. झटक्‍यात एक चिमुरडीही आली. नवरा-मॅट, छान नोकरीत रमलेला. तिला ड्रेस डिझायनिंगचं वेड आहे; पण नुकत्याच बालवाडीत जायला लागलेल्या पोरीचं-पेजचं, आणि नवऱ्याचं ‘हवं-नको’ बघण्यात तिचं वेड मागं पडलं होतं. एक दिवस किचनमध्ये बसल्या बसल्या तिनं इंटरनेटवर ‘उद्योग’ सुरू केला, आणि बघताबघता ‘अबाऊट द फिट’ हे तिच्या ऑनलाइन ड्रेस डिझायनिंग अणि विक्रीचं स्टार्टअप धडाक्‍यात वाढत गेलं. किचनमध्ये सुरू झालेलं हे स्टार्टअप अवघ्या १८ महिन्यांत सव्वादोनशेच्या स्टाफची ऑनलाइन रिटेलिंग कंपनी बनली.
आयुष्याचे रूळच बदलले. नवऱ्याला म्हणजेच मॅटला बायकोच्या कर्तृत्वाचं कौतुक होतं. नुसतं कोरडं कौतुक नव्हे, त्यानं चक्‍क नोकरी सोडली. ‘पेजला सांभाळायला मी घरात राहतो, तू उद्योग सांभाळ. गो अहेड!’ असं त्यानं सांगितलं. मॅट ‘होममेकर’ झाला, ज्यूल्स उद्योजक. रोल बदलले झपाट्यात.

ज्यूल्स आहेच मुळी तशी. मनात आलं की शिंग रोखून त्या दिशेनं धावलीच म्हणून समजा. क्रिएटिव्हसुद्धा आहे. चोवीस तास तिच्या डोक्‍यात ‘अबाऊट द फिट’ असतं.
लांब उपनगरात तिनं एक अवाढव्य गोडाऊन भाड्यानं घेऊन तिथं मस्त अमेरिकन ऑफिस थाटलंय. सगळ्यांना काट्यावर ठेवते बया. अवाढव्य गोडाऊनवजा ऑफिसात ती वेळ वाचवण्यासाठी चक्‍क सायकल वापरते! तिची केबिन म्हणजेही एक डायनिंग हॉल टाइप आहे. मोठंच्या मोठं टेबल, खुर्च्या...चहूबाजूंनी काचा. तिचं सगळ्यांवर लक्ष असतं म्हणे. नाही म्हटलं, तरी ज्यूल्स ऑस्टिन ही एक यशस्वी उद्योजिका आहे. तरुण आहे. तडफदार आहे. तिरसट असतातच अशी माणसं. आपलं तेच खरं करणारी. परखड वगैरे. त्यांच्या आयडियाज क्‍लिअर असतात. ‘अबाऊट द फिट’चा एकखांबी तंबू तिच्याचमुळं तर उभा आहे. गुंतवणूकदार थैल्या घेऊन दारात उभे आहेत. आणखी काय हवं?
थोडा वेळ मिळाला तर हवा आहे...खरं तर!
या स्टार्टअपनं सगळं आयुष्यच खाल्लं. घरासाठी काही करता येत नाही. समाजासाठी वेळ कुठून काढणार? तरीही एका कार्यक्रमात तिनं ‘सिनियर सिटिझन हेसुद्धा एक ॲसेट आहे. त्यांच्या अनुभवाचा वापर करून घ्यायला हवा. मला शक्‍य झालं, तर मी खरंच काही ज्येष्ठ नागरिकांना माझ्या कामात ओढीन,’ असं सांगून टाकलं होतं. नंतर ते भाषण ती विसरलीसुद्धा; पण ज्येष्ठांना हातभार देणाऱ्या एनजीओ कशाला स्वस्थ बसतायत? तिला शब्द पाळावा लागला. ‘अबाऊट द फिट’च्या इंटर्नशिप प्रोग्रॅममध्ये काही ज्येष्ठांना तिनं मुलाखतीला बोलावलं. तिनं म्हणजे तिच्या व्यवस्थापकांनी.
इथं बेन व्हिटॅकरचा प्रवेश झाला. वय वर्षं सत्तर. विधुर.
* * *

बेनला हे सगळं नवीन होतं. ऑफिसभर तरुण मुलं. कुठंकुठं गोंदवून घेतलेली, नाकं टोचलेली. सगळ्यांची टेबलं कागदांनी भरभरून वाहताहेत. सगळ्यांच्या नजरा ज्यूल्सच्या कॅबिनकडं...किंवा तिचा मूड कसा आहे, त्याकडं. वासरांच्या धांगडधिंग्यात ‘बुढा’? बेन गांगरला. पहिला आठवडा त्याला खुद्द ज्यूल्सबरोबर काम करायचं होतं. तिला ‘हवं-नको’ ते बघायची ड्युटी. सत्तरीचा असला, तरी बेन शेवटी जस्ट एक इंटर्न आहे- शिकाऊ उमेदवार! ऑफिसच्या पेकिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात खालचा. महत्प्रयासानं त्याला पाच मिनिटं बॉसची भेट मिळाली.
‘‘डोळ्यांच्या पापण्यांची उघडमिट करत बोल. पापण्या न मिचकवणारी माणसं ज्यूल्सला बेभरवशी वाटतात. ओके? गो...’’ मोलाची टिप देऊन ज्यूल्सच्या सेक्रेटरी पोरीनं त्याला पिटाळलं. ‘आत्ता तरी माझ्याकडं काही काम नाही. वाटलं तर सांगीन,’ असं सांगून ज्यूल्सनं त्याची दहा सेकंदांत बोळवण केली;
पण बेन स्वभावानं जुना होता. गोड होता. त्यानं पोरांच्या कोंडाळ्यात जम बसवला. रोज एकेक तास थांबून सगळ्यांची टेबलं आधी रिकामी आणि स्वच्छ केली. ‘प्रपोज करायचं असेल, तर थेट करून टाकावं,’ असे सल्ले दिले. एकंदर बेनकाका रमले. काही आठवड्यांनी त्यांच्याकडं ज्यूल्सचं पहिलं काम आलं. ‘‘हे ड्यूड, ज्यूल्सनं तिच्या कोटावर सोया सॉस सांडून घेतलंय. तिला दुपारी मीटिंगमध्ये तोच कोट घालायचाय. तो ड्रायक्‍लीन आणि इस्त्री करून आण.’
बेन थेट तिच्या खोलीत गेला. तिथं चर्चा चालू होती.
‘अबाऊट द फिट’चा व्याप प्रचंड वेगानं वाढत असल्यानं ज्यूल्सवर खूप प्रेशर आहे. व्यवसायात आणखी वृद्धी होणार, हे दिसत असल्यानं ज्यूल्सनं आता सीईओ नेमावा आणि स्वत: थोडा श्‍वास घ्यावा, असं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. ज्यूल्सला एकीकडे हे पटतंय, दुसरीकडं वाटतं आहे, की हे सगळं मीच तर सुरू केलं. सहजासहजी दुसऱ्या कोणाच्या हाती सत्ता द्यायची? नामधारी व्हायचं? मग काय उपयोग एवढ्या मरमरीचा?
...बेननं काही काळ थांबून तिला कोट मागितला. तो गेला.
* * *

ज्यूल्सचा ड्रायव्हर निराशेनं ग्रासला आहे. काहीतरी खासगी भानगड. त्याचं पिणं वाढलंय. एक दिवस तर तो ड्युटीवरच प्यायला. बेननं त्याला बाजूला केलं. स्वत: गाडी चालवत ज्यूल्सला मीटिंगसाठी नेलं. घरी नेऊन सोडलं. गाडीत डुलक्‍या काढणं हा ज्यूल्सचा एक विरंगुळा आहे.
‘‘मी घोरले का?’’
‘‘छे...अजिबात नाही!’’ बेन शांतपणे म्हणाला.
ज्यूल्स नुसती घोरत नाही...घोरडते! म्हणजे ओरडण्याच्या लेव्हलचं घोरते. ते तिला माहीत आहे.
बेननं मग तिला घरी जाऊन पिकअप करणं, सोडणं सुरू झालं.
ज्यूल्सची आई महा कटकटी आहे. तिचं आईशी अजिबात जमत नाही. आईला शिव्या देणारा एक मेल टाइप करून तिनं नवऱ्याला पाठवला. दुर्दैव! तो चुकून आईलाच गेला. आता संपलंच सगळं; पण बेननं एक टीम हाताशी धरून चक्‍क तिच्या आईचं घर फोडलं. टेबलावरच्या लॅपटॉपमधून मेल गायब केली.
बऱ्याच छोट्या-मोठ्या उलथापालथी घडत राहिल्या. बेन हा तिचा आता जवळपास राइट हॅंड किंवा मॅन फ्रायडे झाला होता. तिच्या मुलीला शाळेत सोडणं, आणणं हेही तो करू लागला.
एक दिवस त्या चिमुरडीला आणताना बेननं पाहिलं...
ज्यूल्सचा ‘आदर्श’ नवरा आदर्श नाही. शाळेतल्याच एका पेरेंटशी त्यानं सूत जुळवलं आहे. कामात बिझी असलेल्या ज्यूल्सच्या पाठीमागं तो दुसऱ्याच बाईमध्ये गुंतला आहे. बेन भयंकर अस्वस्थ झाला. हे ज्यूल्सला माहीत आहे?
* * *

सॅनफ्रान्सिस्कोच्या ट्रिपसाठी ज्यूल्सनं बेनला सोबतीला घेतलं. नवा सीईओ नेमून टाकायचा, आणि पुन्हा संसाराकडे वळायचं, असा तिचा निर्णय झालाच होता. रात्री हॉटेलात आगीचा भोंगा वाजला. त्यामुळं घाबरलेल्या ज्यूल्सनं बेनला खोलीत बोलावलं. ‘‘इथंच बस सोबतीला.’’
खोलीतल्या टीव्हीवर ‘सिंगिंग इन द रेन’ चालू होता. जुना सिनेमा. रोमॅंटिक म्युझिकल. तरुण पोरीनं बापाच्या डोक्‍याशी बसावं, तसं बसून ज्यूल्स बोलू लागली.
‘‘बेन, डू यू नो, मॅट फसवतोय मला!’’
‘‘ओह, म्हणजे तुला माहीत आहे...’’
‘‘तुला माहीत होतं?’’
‘‘...मी परवाच पाहिलं त्या दोघांना! तुला कसं सांगावं, याचा विचार करत होतो. शेवटी मी एक नोकर आहे...’’
...ज्यूल्स लहान पोरीसारखी रडू लागली. कोसळली. कसलं आलंय ‘अबाऊट द फिट?’ इथं काहीच फिट होत नाहीये. सहवास कमी झाला, की प्रेम आटतं? मग ते प्रेम कसं? जेफ दुसऱ्या बाईत अडकलाय, हे अठरा महिन्यांपूर्वीच कळलं होतं. आपण घराला वेळ देऊ शकत नाही आहोत, यानं तिचं बाईमन आधीच खात होतं. वाघिणीसारखी वावरणारी ज्यूल्स आतल्या आत कोसळली.
तिनं झटपट हालचाली केल्या. सीईओ नेमायचा निर्णय घेऊन टाकला. संभाव्य उमेदवाराची मुलाखतही घेतली. मॅटलाही फोन करून आपला निर्णय कळवून टाकला. कुटुंब पहिलं. मग बाकीचं.
बेन व्हिटॅकर हे सगळं उतरंडीच्या सर्वांत खालच्या तळातून बघत होता...पण अगदी जवळून.
* * *

‘तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस बेन’ हे कबूल केल्यावर ज्यूल्सनं त्याला त्याचं मत विचारलं.
...पण बेननं त्यावर जे सांगितलं त्यानं ज्यूल्स अक्षरश: जागी झाली! एक सत्तरीचा म्हातारा पंचविशीतल्या तरुणीला जो सल्ला देतो, तो आधुनिक मानायचा की सोयीस्कर? त्याच्या बोलण्यात तथ्य तर दिसतंय, पण त्याची किंमत काय? ‘आग रामेश्‍वरी बंब सोमेश्‍वरी’ असं तर ज्यूल्सचं होत नाहीये ना?
...एक शिकाऊ उमेदवार तिला जगण्याचं गुह्य देऊन गेला. काय सल्ला दिला त्यानं? तो पडद्यावर बघणं खरंच मनोज्ञ आहे.
* * *

रॉबर्ट डिनिरोनं साकारलेला बेन व्हिटॅकर भलताच गोड आहे. असा म्हातारा आपल्या आसपास असावा, असं वाटत राहतं. सभ्य, तरीही मॉडर्न. खराखुरा, अस्सल चेहऱ्याचा. जगण्यानं त्याला शहाणपण शिकवलंय आणि वयानं त्याला छान पिकवलंय. तरुणांमध्ये किती छान मिसळतो. तरीही वयाचं भान राखून. उगीच भडक टीशर्ट घालून नाचण्याचा अनुपम खेरी आचरटपणा नाही. ज्यूल्स ऑस्टिनची भूमिका ॲन हॅथवेनं इतकी मस्त रंगवली आहे, की तिच्या यशस्वी उद्योजक चेहऱ्यामागं दडलेली अवखळ तरुणी मधूनच डोकावते आणि अगदी ओळखीची वाटू लागते. ‘डेव्हिल विअर्स प्राडा’मध्ये ॲन हॅथवे एक इंटर्न होती, इथं बॉस झाली आहे. नॅन्सी मेयर्सनं ही गोष्ट लिहिली तेव्हा तिच्या डोळ्यासमोर रीस विथरस्पून होती आणि रॉबर्ट डिनिरोच्या जागी जॅक निकोल्सनला घ्यायचं तिच्या डोक्‍यात होतं. ‘समथिंग गॉट्‌टा गिव्ह’ या तिच्याच झकास चित्रपटात निकोल्सननं जान आणली होती. ‘व्हॉट वुमेन वाँट’ हा तर नॅन्सी मेयर्सचा एक लक्षणीय सिनेमा. त्यात मेल गिब्सन होता. या दोघांनाही तिला घ्यायचं होतं; पण ते काही जुळलं नाही. शेवटी ॲन हॅथवे आणि रॉबर्ट डिनिरोनं या भूमिकांचं सोनं केलं. झालं ते बरंच झालं म्हणायचं.
‘द इंटर्न’मधले संवाद तर टॉपच आहेत.
‘‘यू आर नेव्हर राँग व्हेन डुइंग राइट थिंग्ज!’’ बेन.
‘‘हे कुणाचं वाक्‍य आहे...तुझं?’’
‘‘हंऽऽ...पण त्या लेकाच्या मार्क ट्‌वेननं आधी बोलून ठेवलं होतं..’’
...हे असले संवाद मजा आणतात. कुठंही रडारड नाही. जड बोजड इमोशनलगिरी नाही. सगळं काही तरुणाईच्या भाषेत. ढंगात. रंगात...पण तरीही रंगतदार.
...म्हातारपण बोअरिंग नसतं. ते लोढणंही नसतं. वार्धक्‍य ही एक जिवंत शहाणीव असते. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा बुजुर्ग यार जुलाहा असावा. त्याच्यामुळं आपली ‘बुनाई साफसुथरी’ राहते.

Web Title: pravin tokekar write article in saptarang