अद्वैताचे संध्यारंग! (प्रवीण टोकेकर)

Pravin-Tokekar
Pravin-Tokekar

सौमित्र चटर्जी हे बंगाली साहित्यकलाविश्वाचा एक चेहरा होऊन गेले होते. हा विचारशील ज्येष्ठ कलावंत फक्त बंगाली कलाविश्वाशीच बांधील नव्हता, तो वंचितांच्या, पीडितांच्या वेदनेचा भाष्यकारदेखील होता. राजकीय मखलाशीच्या खेळाचा भेदक टीकाकारही होता. निव्वळ लेखणीनंच नव्हे, तर कुंचल्यांच्या फटकाऱ्यांनीही आपल्या मनातील स्पंदनं गडदपणे मांडणारा चित्रकारसुद्धा होता. सौमित्रदांचं नुकतंच (ता. १५ नोव्हेंबर) निधन झालं, त्यानिमित्त...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एखादा कलावंत जग सोडून जातो. मन हळहळतं. निसर्गाच्या, प्रकृतीच्या नियमानुसार हे कधीतरी घडणार असतंच. म्हातारं शरीर, त्यात नानाविध विकारांनी हल्लक झालेलं. कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानं तर पार शेवटच्या टोकाला पोचलेलं. सौमित्रदांचं जाणं तसं अटळच होतं; पण तरीही बंगाली रसिक हळवे झाले. सौमित्र चटर्जी हे एका जुन्या-जाणत्या कलावंताचं नाव नव्हतं, तर संपूर्ण बंगाली कलादालनाच्या प्रवेशद्वाराला शोभिवंत करणारं ते एक तोरण होतं. ते तोरण निखळून पडलं. दालनाचं प्रवेशद्वार तूर्त तरी ओकंबोकं दिसतं आहे. सौमित्रदांसाठी बंगाली भद्रसमाजानं अश्रू ढाळले. ‘एखादा समाज सामूहिकरीत्या कशासाठी तरी अश्रू ढाळतो, तेव्हा त्या समाजाची सांस्कृतिक पातळी ओळखता येते,’ असं एक विलायती भाषेतलं वचन आहे. संस्कृतीची लांबी-रुंदी नोंदवण्याची ही आसवांची मोजपट्टी काहीशी अघोरीच म्हणायला हवी. ख्यातनाम अभिनेते, लेखक, कवी, नाटककार, दिग्दर्शक, चित्रकार आणि ‘विचारशील बंडखोर’ असलेले सौमित्र चटर्जी यांच्या निधनानंतर (ता. १५ नोव्हेंबर), गेल्या आठवड्याच्या अखेरीला सारं बंगाली कलाजगत दु:खात बुडालं, त्यावरून या वचनात दडलेलं तथ्य ध्यानी येतं. वास्तविक, सध्या बंगालप्रांतात सुरू असलेली राजकीय धुळवड, कोरोनानं केलेली दैना कुणासाठी चार आसवं ढाळण्याची फुरसत देणारी नाही. बंगाली वर्तमानपत्रं आणि इतर माध्यमं या असल्या कोरड्याठाक गोष्टींनी भरभरून वाहत आहेत. मात्र, सौमित्रदा गेल्याची बातमी आली आणि सगळी माध्यमं जणू स्तब्ध झाली.

कोलकात्याच्या बेले व्ह्यू रुग्णालयात एकेक पाश संपवत सौमित्रदा अखेरच्या प्रवासाला निघाले आहेत, हे तसं सगळ्यांनाच ठाऊक होतं. तरीही सारं कोरडं वर्तमान विसरून बंगाली रसिकांनी अश्रू ढाळले ते त्यांच्या या लाडक्या ‘अपू’साठी. ‘चारुलता’मधल्या अनवट प्रीती करणाऱ्या कोवळ्या प्रेमिकासाठी. ‘अरण्येर दिनरात्री’मधल्या आशिमसाठी. मृणाल सेन यांच्या ‘आकाशकुसुम‘मधल्या तोतयासाठी. तपन सिन्हा यांच्या ‘जिंदेर बंदी’मधला घोडेस्वार खलनायक, मयूरबाहनसाठी. अशा त्यांच्या कितीतरी व्यक्तिरेखा आजही बंगाली रसिकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.

सौमित्रदा हे बंगाली साहित्यकलाविश्वाचा एक चेहरा होऊन गेले होते. हा विचारशील ज्येष्ठ कलावंत फक्त बंगाली कलाविश्वाशीच बांधील नव्हता, तर वंचितांच्या, पीडितांच्या वेदनेचा भाष्यकारदेखील होता. राजकीय मखलाशीच्या खेळाचा भेदक टीकाकारही होता. निव्वळ लेखणीनंच नव्हे, तर कुंचल्यांच्या फटकाऱ्यांनीही आपल्या मनातली स्पंदनं गडदपणे मांडणारा चित्रकारसुद्धा होता. कलागुणांचा हा समुच्चय त्यांनी असोशीनं जपला, याला कारण होतं, सत्यजित राय ऊर्फ माणिकदा यांची प्रेरणा. माणिकदा हे सौमित्रदा यांच्या ‘मानस पंचायतना’तलं एक पूजास्थान होतं. अहर्निश प्रेरणा देणारी ती गुरूची मूर्त होती. माणिकदा यांचे सौमित्रदा हे परमशिष्य. तीच त्यांच्या आयुष्यभराची ओळख ठरली. गुरू-शिष्याचं हे नातं सातासमुद्रापल्याड पोहोचलं. गाजलं. बंगालच्या साहित्यक्षेत्राला आणि कलाक्षेत्राला समृद्ध करून गेलं. या नात्याला सुरुवात झाली ती गेल्या शतकाच्या पन्नासच्या दशकात. साठोत्तरी कालखंडात भारतातल्या साहित्यविश्र्वात आणि कलाविश्वात प्रचंड उलथापालथ होत होती. जाणिवांचे नवे वारे वाहू लागले होते. ‘जुने जाउ द्या मरणालागुनी’ असं उद्वेगानं म्हणत नव्या पिढीच्या कलाकारांनी वास्तवाला भिडण्याच्या ऊर्मीत मध्यमवर्गीय बंधनं झुगारण्याची चढाओढ सुरू केली. केवळ भद्रसमाजालाच पचनी पडेल, असं मध्यमवर्गीय साहित्य मागं पडत होतं. थेट जगण्याला भिडण्याचा हा कलावंतांचा पवित्रा नवनवी क्षितिजं आपलीशी करू लागला. त्याच काळात बंगालीतले आघाडीचे कथालेखक आणि चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांच्या प्रतिभेनं भराऱ्या मारायला सुरुवात केली.

माणिकदांच्या चटकदार विज्ञानकथांनी, रहस्यकथांनी बंगाली रसिकांना चांगलाच खुराक उपलब्ध करून दिला. बंगालीत तोवर अभिजात साहित्यिकांच्या कलाकृतींचा प्रचंड दबदबा होता. अजूनही आहेच. त्यात सत्यजित राय यांच्या कथांनी भरच घातली. रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली साहित्याला व कलेला जागतिक मंचावर नेलं, तर राय यांच्यासारख्यांनी त्याला नवे पंख दिले. कारण, राय यांच्याकडे फक्त प्रतिभेचं वरदान लाभलेली लेखणीच नव्हती, तर जोडीला चित्रभाषाही होती. उत्तम चित्रकार असलेल्या राय यांनी जाहिरातसंस्थेत काहीएक अनुभव मिळवल्यावर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. तिथून बंगाली साहित्याला आणि कलेला जागतिक पंखही मिळाले. त्या पंखांचा भार पेलणारे अभिनेते म्हणजे सौमित्रदा होत.

राय यांनी सन १९५५ च्या आसपास ‘पथेर पांचाली’ रसिकांना पेश केला आणि सारं कलाजगत जणू स्तंभित झालं. पुढं आणखी दोनेक वर्षांत त्याच्या पुढचा भाग ‘अपराजितो’ आला आणि नंतर सन १९५९ मध्ये ‘अपूर संसार’ या अखेरच्या, तिसऱ्या पुष्पानं, या त्रिधारेची सांगता झाली. ही त्रिधारा अनेक कारणांनी भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मानाचं पान धरून बसली आहे. या चित्रपटत्रिधारेनं भारतीय चित्रपटांना थेट सातासमुद्रापल्याड नेलं. या तीन कलाकृतींपैकी ‘अपूर संसार’ या चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा म्हणजेच अपू ऊर्फ अपूर्वकुमार रॉय! ती सौमित्रदा यांनी साकारली होती.

एकदा राय आपल्या चित्रपटाचं शूटिंग करत असताना काही कारणानं सौमित्र चटर्जी नावाचा एक तरुण नट तिथं पोचला. तिथं कुणाशी तरी बोलताना राय यांनी सौमित्रदांची ओळख करून दिली : ‘‘हा माझ्या आगामी ‘अपूर संसार’चा नायक- सौमित्र!’’

इथून पुढं सुरू झालेला सिलसिला परवा, गेल्या आठवड्यात बेले व्ह्यू रुग्णालयाच्या खाटेवर संपला. आता ‘अपू’ ही काही हाडामांसाची व्यक्ती नव्हे. बंगालातल्या कुग्रामात जन्मून बनारस-कोलकात्यात स्थिर होण्यासाठी धडपडणाऱ्या एका युवकाची ही गोष्ट. ती राय यांनी पडद्यावर आणली. सौमित्रदा यांनी यातला ‘अपू’ असा काही साकारला की तीच त्यांची ओळख ठरली. याच अपूसाठी गेल्या आठवड्यात बंगाली कलारसिक इतके हळहळले. वास्तविक ‘माणिकदांचा अपू’ एवढीच सौमित्रदांची ओळख सांगणं, म्हणजे चार्ली चॅप्लिनचं वर्णन ‘ ‘माशीकट’ मिशी असलेला एक विनोदी नट’ एवढंच करण्यासारखं आहे. चॅप्लिनची मिशी हे एक सत्य होतं, तसंच सौमित्रदा हे अपू होते, हेही एक सत्यच; पण ते तेवढंच मर्यादित नाही. त्यापलीकडेही सौमित्रदा बरंच काही होते. माणिकदांच्या चौदा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या, त्यांनी स्वत:ला माणिकदांच्या सुपूर्द केलं होतं.

प्रदोषचंद्र मित्तर ऊर्फ फेलुदा हा माणिकदांचा मानसपुत्र. पेशा : खासगी गुप्तहेर. या फेलुदानं तर बंगाली रसिकांना वेड लावलं. सहा फूट दोन इंच उंची. अंगा-पिंडानं बळकट. विलक्षण बुद्धिमान. बारीक निरीक्षणाचं कसब आणि अखंड धूम्रपानाची आवड. माणिकदांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातले बरेचसे गुण आपल्या या मानसपुत्राला बहाल केले होते. रहस्यकथांचा हा नायक पडद्यावर आणण्याचा मोहही त्यांना आवरला नाही. पडद्यावरचा हा फेलुदा साकारण्यासाठी त्यांनी बोलावलं कुणाला? तर सौमित्र चटर्जी यांना. पुढं अनेकांनी फेलुदा साकारण्याचा प्रयत्न केला. सब्यसाची मुखर्जी हे त्यापैकीच एक नट.

नव्यानं फेलुदा पडद्यावर आणण्याचं ठरलं तेव्हा सब्यसाची मुखर्जींना प्रश्न पडला की सौमित्रदांनी केलेली ही भूमिका रसिकांच्या मनात अजूनही घट्ट असताना, आपणही तीच भूमिका कशी साकारणार? तिला न्याय कसा देणार?
ते सौमित्रदांना भेटायला गेले. वार्धक्यानं पुरत्या पिकलेल्या सौमित्रदांनी या व्यक्तिरेखेचा मंत्र त्यांना दिला. म्हणाले, ‘‘ हे बघ, फेलुदा बुद्धिमान आहे. अंगा-पिंडानं बळकट आहे; पण हिंसेवर त्याचा विश्वास नाही, हे कायम लक्षात ठेव. तो बुद्धीनं रहस्याची उकल करतो. तू डोळ्यांनी अभिनय कर, जमून जाईल!’’ सौमित्रदांनी या वेळी माणिकदांचंच वर्णन केलं होतं!

अशी ही गुरू-शिष्याची जोडी. सत्यजित राय आणि सौमित्रदा हे अद्वैत मुळात अतिशय विलोभनीय असं आहे. त्या काळात जगात प्रतिभावंत गुरू-शिष्यांच्या अनेक जोड्या गाजत होत्या. फेडरिको फेलिनी आणि मास्त्रोयानी, मार्टिन स्कोर्सिसी आणि रॉबर्ट डिनिरो, अकिरा कुरोसावा आणि तोशिरो मिफुने, इंगमार बर्गमन आणि बिबि अँडरसन...अशा कितीतरी जोड्या सांगता येतील. मात्र, माणिकदा कॅमेऱ्याला डोळा लावून चित्रीकरण करायचे, समोरच्या प्रसंगात सौमित्र चटर्जी नावाचा नट त्यांचंच व्यक्तिमत्त्व घेऊन अभिनय करत राहायचा. ‘अपूर संसार’मध्ये बाळंतपणात बायको गमावलेला अपू दु:खानं विकल होतो आणि अवलक्षणी बाळाला स्वीकारणंच नाकारतो. तेव्हाचा सौमित्रदांचा मुद्राभिनय अद्वितीय म्हणावा लागेल. तोच अपू पुढं, याच लहानग्यात आपली पत्नी अजूनही जिवंत आहे, असं जाणवून ते पोर उचलतो, छातीशी धरतो, तो क्षण तर अपूर्व मानावा असा. असे किती तरी क्षण सौमित्रदांनी रसिकांना दिले. पिढ्यान्‌पिढ्यांना रिझविणारा, दमदार आणि लाडका कलावंत हरपला की दु:ख हे होणारच.

कारण, असे कलावंत त्या त्या समाजाचा स्वाभिमानबिंदू होऊन गेलेले असतात. त्या त्या संस्कृतीचा ठेवा होऊन गेलेले असतात. बंगाली कलाप्रांताच्या पुनरुत्थानकाळाचा सौमित्रदा हे महत्त्वाचा आणि कदाचित अखेरचा शिलेदार होते. राय यांनी पैलू पाडलेल्या या अभिनेत्यानं केवळ तेवढ्याच पुंजीवर समाधानी न राहता तपन सिन्हा, मृणाल सेन आदी तालेवार दिग्दर्शकांकडेही अप्रतिम भूमिका वठवून प्रतिभेचा ‘झरा मूळचाचि खरा’ असल्याचं सिद्ध केलं. उत्तमकुमार हा बंगाली महानायक सौमित्रदांचा समकालीन म्हणावा असा; पण तो मुख्य प्रवाहातला अभिनेता होता. त्याला अफाट ग्लॅमर लाभलं होतं. सौमित्रदा त्याच्याच तोलामोलाचे; पण त्यांच्यावर ‘समांतरवाला’ असा शिक्काही होताच.

सौमित्रदांनी बंगाली रंगभूमीवरही भरपूर काम करून ठेवलं आहे. शेक्सपीअर हा जुन्या पिढीतल्या नटांना विशेष भुरळ घालणारा नाटककार. त्यातही बंगाली रंगभूमीवर शेक्सपीअरची गडदरंगी नाटकं जोरदार गाजत असत. सौमित्रदांनी तेव्हा साकारलेला ‘किंग लिअर’ अजूनही काही रसिकांच्या लक्षात आहे. वृद्धत्व आलेलं असतानाही त्यांनी एकदा किंग लिअर साकारला होता. तोही रसिकांनी आवडून घेतला होता.

इब्सेनच्या नाटकांना बंगाली साज चढवून ती त्यांनी आवर्जून रसिकांसमोर आणली. नवीन रंगकर्मींमध्येही ते शिंग मोडून वासरांमध्ये घुसल्यागत रमून जात. अगदी शेवटपर्यंत. सौमित्रदांना देश-विदेशांतले अनेक मानसन्मान मिळाले; किंबहुना भारत सरकारनं त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, दादासाहेब फाळके सन्मान किंवा पद्मभूषण देण्याआधी फ्रान्स सरकारनं त्यांना, फ्रान्समधला कलाक्षेत्रातला सर्वोच्च सन्मान देऊन गौरवलं होतं. सौमित्रदांनी या पुरस्कारांचा बडिवार फारसा मानला नाही; किंबहुना या मामल्यात ते थोडे कडवटच होते. राष्ट्रीय पुरस्काराच्या वेळी त्यांना दोनदा संधी आली होती; पण ती भलत्यांनीच हिरावून नेली. मग त्यांनी नादच सोडला...

पुढं कधी तरी वाकलेल्या वयात त्यांना ‘कोनी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तेव्हा तो स्वीकारताना ते म्हणाले : ‘‘वय झालंय, आता असले पुरस्कार निरर्थक वाटतात.’’

सौमित्रदांच्या जाण्यानं भूतकाळातल्या जडणघडणीच्या काळाचा शेवटचा दुवा निखळला. कोण्या एका ‘अपू’ची गोष्ट खऱ्या अर्थानं संपली. माणिकदा आणि सौमित्रदा या गुरू-शिष्यांचं अद्वैत पंचत्त्वात विलीन झालं. माणिकदा सन १९९२ मध्ये गेले. बंगाली रसिक त्यांच्या पश्चात सौमित्रदांमध्येच माणिकदांना पाहत होते. आता तेही गेले. भारतीय कलाक्षेत्रातला एक सृजनशील अद्वैत संपलं. कायमचं.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com