काळोखातल्या सावल्या... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 8 जानेवारी 2017

ध्वनी आणि छायाचित्रण हा ‘झीरो डार्क थर्टी’ या चित्रपटाचा आत्मा आहे. ऑस्करही मिळालं ते त्याच्या ध्वनिनिर्मितीलाच. डॉक्‍युमेंटरी पाहत आहोत, असं वाटेवाटेतोवर आपण नकळत त्या मोहिमेत ओढले जातो. व्यक्‍तिरेखा मागं पडत जातात. संवाद निरर्थक ठरू लागतात. सहजच आपण त्या मोहिमेचा भाग होऊन जातो.

ध्वनी आणि छायाचित्रण हा ‘झीरो डार्क थर्टी’ या चित्रपटाचा आत्मा आहे. ऑस्करही मिळालं ते त्याच्या ध्वनिनिर्मितीलाच. डॉक्‍युमेंटरी पाहत आहोत, असं वाटेवाटेतोवर आपण नकळत त्या मोहिमेत ओढले जातो. व्यक्‍तिरेखा मागं पडत जातात. संवाद निरर्थक ठरू लागतात. सहजच आपण त्या मोहिमेचा भाग होऊन जातो.

दाढेत अडकलेल्या सुपारीच्या कणासारखा एखादा चित्रपट मनात रुतून बसतो. जीभ सारखी तिकडंच जावी, तसं मन त्या चित्रचौकटींकडं वळत राहतं. नको तेव्हा त्या फ्रेम आठवत राहतात. घशात गरळ यावं, तसं मन कडूझार पडतं. हा अनुभव तितकासा बरा नसतो, तरीही ‘हा चित्रपट बघितला, हे बरंच झालं,’ असं मात्र वाटत राहातं. ती अभिजात, देखणी कलाकृती आहे, असं नसतं; पण आपल्याला कधीही न दिसणारं एक वास्तव असतं आणि ते दिसत नसलं तरी आपल्याही वर्तमानाचा तो एक अटळ भाग असतो, हे सत्य स्वीकारायला ती कलाकृती आपल्याला भाग पाडत असते. ‘झीरो डार्क थर्टी’ हा असल्याच पठडीतला एक चित्रपट.

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या गंडस्थळावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन्ही मनोरे विमानं धडकवून पाडले. तीनेक हजार जीव हकनाक बळी गेले. त्यानंतर जवळपास १० वर्षांनी, दोन मे २०११ रोजी पाकिस्तानातल्या ॲबटाबाद नावाच्या आळसटलेल्या गावात अमेरिकी नेव्ही सील्सच्या पथकानं ओसामा बिन लादेनला घरात घुसून मारलं. एका सूडनाट्याचा हा पूर्णविराम होता.
- मधल्या काळात काय घडलं?
डिवचलेल्या जनावरासारख्या अमेरिकी गुप्तचर यंत्रणा चवताळल्या होत्या. वाट्टेल त्या मार्गानं उसामा बिन लादेन नावाचा राक्षस हुडकायचा म्हणून पाण्यासारखा पैसा ओतत होत्या; पण त्यांच्या उच्च तंत्रज्ञानाला, अवकाशातल्या डझनावारी उपग्रहांना, मानवरहित टेहळणी-विमानांना, सायबरशोधाला संपूर्ण चकवत उसामा बिन लादेन मात्र अदृश्‍य झाला होता.
गुप्तचरांच्या अधोविश्‍वात तो ओसामा नाही; उसामा बिन लादेन आहे ः यूबीएल.
कुठं दडून बसलाय हा राक्षस?

* * *
ही एक तिशीतली सीआयए एजंट. दहशतवादी गटांच्या ई मेल्स, फोन कॉल्स तपासून त्यातल्या सांकेतिक संदेशांची उकल करत बसण्याची डेस्क ड्यूटी पुरेशी केल्यानंतर तिला आता फील्डवर पाठवण्यात आलं आहे. हा काळ ‘नाइन इलेव्हन’नंतर लगेचचा.
सीआयएचं एक अज्ञात ठाणं....ब्लॅक साइट. तिथं माया एका अम्मार नावाच्या संशयित दहशतवाद्याची ‘चौकशी’ पाहते आहे. बहुधा आयुष्यात प्रथमच. चेहरा लपवण्यासाठी तिनं काळा बुरखा चढवला आहे. डॅन हा तिचा ज्येष्ठ सहकारी चौकशी करतो आहे. चौकशीच्या खोलीत जाण्यापूर्वी डॅन तिला तो काळा बुरखा देतो.
‘‘अम्मारला सोडणार आहेस नंतर?’’ माया विचारते.
‘‘नेव्हर’’ डॅन म्हणतो. माया बुरखा टाकून देत खोलीत शिरते.
‘‘ अम्मार, तू खोटं बोललास तर मी तुला मारीन. अर्धवट माहिती दिलीस तरीही मारीन. आय ओन यू अम्मार. माझ्याकडं भरपूर वेळ आहे आणि तुझ्यापाशी मात्र नाही. हे शरीरशास्त्र आहे, अम्मार. इथं प्रत्येकजण कधीतरी मोडतोच...’’ डॅन त्याला सांगतो. अम्मार त्याला भीक घालत नाही; पण डॅन छळ करण्यात वाकबगार आहे. त्याला खूप आयडिया माहीत आहेत. टॉवेल भिजवून थोबाडाभोवती लपेटायचा. वरतून पाणी ओतायचं. गळ्यात कुत्र्याचा बेल्ट अडकवून कपडे काढून खोलीभर चार पायांवर हिंडवायचं. सूटकेसएवढ्या खोक्‍यात फोल्ड करून तीन दिवस गुवा-मुतात लोळत ठेवायचं. बाईसमोर त्याचे कपडे फेडून खदाखदा हसायचं. सलग ९० तास हेवी मेटल म्युझिक कानावर आदळवून मेंदू-मन बधीर करून टाकायचं. चिमट्यानं नखं उपटणं, मारहाण, केस झिंजाडणं...हे तर बेसिक आहे. फार फार बेसिक. सहकार्य केलं तर पाण्याचा घोट मिळेल. आणखी सहकार्य केलंस तर आणखी एक घोट. ब्लॅंकेटसुद्धा देईन. तसा मी स्वभावानं उदार आहे...वगैरे.
शरीरशास्त्राचा नियम पाळून अम्मार शेवटी कोलमडतो. त्याच्या तोंडून पहिल्यांदा एक नाव बाहेर पडतं-अबू अहमद अल-कुवैती. दॅट्‌स इट. आणखी काही धरपकडी. आणखी काही इंटरॉगेशन्स. आणखी काही धागेदोरे.
...त्याच सुमारास सात जुलै २००७ रोजी लंडनमधली एक बस बॉम्बस्फोटात फुटते. लंडन शहर बॉम्बस्फोटांनी हादरतं. अमेरिकी प्रशासनाकडून विचारणा होते : ‘‘काय, तुम्ही करताय काय तिकडं नेमकं?’’

* * *
जेसिका ही सीआयएची नाणावलेली एजंट. एव्हाना मायाची मैत्रीण झाली आहे. दोघी एकत्र जेवतात वगैरे. काही थोड्या गर्ली गप्पाही होतात त्यांच्यात. तेवढाच विरंगुळा.
इस्लामाबादेतल्या पंचतारांकित मॅरिएट हॉटेलमध्ये वाईनचे घोट दोघी घेत असतानाच बॉम्बस्फोट होतो. धूर, किंकाळ्या आणि कलेवरांच्या गदारोळात दोघी कशाबशा त्यातून वाचतात; पण दोघींमधला संवाद अधिक घट्ट होतो.
‘‘ एक जॉर्डनचा डॉक्‍टर उसामा बिन लादेनवर उपचार करतो म्हणे. थोडेसे पैसे आणि थोडंसं राष्ट्रकार्याचं इंजेक्‍शन टोचलं की गडी बहुधा फुटेल. त्याला भेटता येईल; पण इथं माझ्या मुक्‍कामाच्या ठिकाणी येऊन भेटा, असं म्हणतोय,’’ जेसिका सांगतेय.
‘‘खोटं बोलत नाहीए ना तो? असा कसा स्वस्तात फुटेल?’’ माया म्हणते.
‘‘त्याला अफगाणिस्तानातल्या कॅम्प चॅपमनवर बोलावून घेऊन बोलावं का? तू येतेस माझ्याबरोबर?’’ जेसिका विचारतेय.
ंतिला नकार दिलाय. ‘तुझा लीड आहे, जेसी. क्रेडिट तुलाच मिळालं पाहिजे. तू जा. बी इन टच.’
...कॅम्प चॅपमनवर एका डबडा गाडीतनं आलेला तो डॉक्‍टर आल्या आल्या ‘अल्लाहूअकबर’ असं उच्चारत स्वत:सकट निम्मा-अधिक कॅम्प बॉम्बनं उडवतो. धूळ आणि धुराच्या साम्राज्यात जेसिकाच्या शरीराचीही वाफ मिसळते आहे...

* * *
अबू अहमदचे धागे-दोरे गडद होत चालले आहेत. ‘हा माणूस उसामाचा कुरिअर आहे’, अशी त्रोटक माहिती मायाला मिळाली आहे. कोण आहे हा अबू अहमद? चौकशीत दोन-तीन महत्त्वाच्या गोष्टी कळतात. एक ः अबू अहमद पाच वर्षांपूर्वीच मेलाय. दोन ः अबू अहमद अजून जिवंत आहे, त्याचा डिट्टो त्याच्यासारखाच दिसणारा भाऊ मेलाय. तीन ः अबू अहमद? छे, अशा नावाचा माणूसच अस्तित्वात नाहीय.
ज्याअर्थी पकडल्या गेलेल्या ‘अल्‌ कायदा’च्या प्रत्येक दहशतवाद्यानं अबू अहमद हे नाव ऐकलं आहे, त्याअर्थी हा माणूस महत्त्वाचा असला पाहिजे. मायानं अखेर एका संशयित अबू अहमदचा माग काढलाच. त्याच्या मोटारीचा पाठलागही केला; पण भाज्या, फळं घेत हिंडणारा तो एक सामान्य माणूस निघाला. मायानं गाडी परत वळवली...त्याच्या दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी एम्बसीमधून बाहेर पडताना मायाच्या बुलेटप्रूफ मोटारीवर एके-४७ मधून गोळ्यांचा वर्षाव झाला. माया वाचली आहे; पण आता तिचं ‘कव्हर’ उडालंय. तिच्या पाकिस्तानात राहण्याला आता काहीच अर्थ नाही.
वॉशिंग्टनला रवानगी केली गेली, ते तिच्या पथ्यावरच पडलं. कारण, एव्हाना सीआयए उसामाला शोधत बसण्याच्या मूडमध्ये नव्हती. पुढचे हल्ले तेवढे रोखा. लादेन गेला उडत.

* * *
बॅक टू अबू अहमद. ‘हेच नाव आपल्याला उसामा बिन लादेनपर्यंत घेऊन जाणार,’ असं मायाचं अंतर्मन तिला सांगतं आहे. आपल्या सीनिअर लोकांच्या ती कच्छपीच लागली आहे. ‘यूबीएल’ उडवणं हेच आपलं मिशन हवं. बाकी हल्ले आपोआप थांबतील, असं तिचं म्हणणं. ‘अबू अहमदवर नजर ठेवा’ ती फील्डवर निरोप पाठवते. सीआयएचं नेटवर्क अनिच्छेनं का होईना हलू लागतं. येस, हाच तो अबू अहमद. तो मोटारीनं लांबवर निघाला आहे. त्यानं पेशावर ओलांडलं. तो उत्तरेकडं कुठंतरी निघाला आहे. पाकिस्तानातल्या ॲबटाबादेत त्याचा प्रवास संपला. ॲबटाबाद हे पाकी लष्कराचं एक ठाणं. उत्तरेतलं एक थंड हवेचं आळसट गाव. तिथं काही श्रीमंतांचे बंगले उठले आहेत. कच्चे रस्ते. वस्तीही फार नाही. दूरदराजचं एक खेडंच. त्याच्या पूर्वेला पाकव्याप्त काश्‍मीर आहे.
...तिथलं दोनमजली घर लक्ष वेधून घेतं आहे. त्याला ना धड रंगरंगोटी, ना देखरेख. ठोकळेबाज रचना. खिडक्‍याही मोजक्‍याच. आवारात काही बकऱ्या पाळलेल्या आहेत.
कोंबड्या फिरताहेत. भाजीपाल्याचे वाफे. आश्‍चर्य म्हणजे या घराचं ड्रेनेजही ती माणसं गटारात न सोडता आवारातच पुरतात. कुणीही बाहेर डोकावतसुद्धा नाही. तिथं कुणी पोस्टमन येत नाही. पेपरवाला नाही. दूधवाला नाही. येणारं-जाणारं कुणीसुद्धा नाही. तरीही तिथं कुणीतरी राहतंय.
...गच्चीवरती वेलींनी झाकलेला एक मांडव आहे. त्या मांडवाखालून एक मानवाकृती अधूनमधून शतपावल्या करताना दिसते.
अबू अहमद तिथं पोचला आहे.

* * *
तिथं खरंच उसामा बिन लादेन राहतो का? कुणाला खात्री आहे? फोटो मिळालाय? तिथं एखादा सर्व्हेबिर्व्हे करा आणि घरात घुसा, सरकारी अधिकारी म्हणून. काढा माहिती. स्पाय सॅटेलाइट्‌स ऑलरेडी २४ तास त्या घरावर पाळत ठेवून आहेत. उसामा बिन लादेन तिथं आहे, याची पक्‍की माहिती मिळाल्याशिवाय काहीही करता येणार नाही. तुमच्या भंपक अंदाजांना काहीही किंमत नाही. कळलं?
तिथं लादेनच राहतो, याची १०० टक्‍के खात्री कुणालाच नाही. कुणाला ४० टक्‍के वाटतेय, कुणाला ६० टक्‍के...मायाला मात्र १०० टक्‍के खात्री वाटते. तसं ती सीआयएच्या डायरेक्‍टरला तोंडावर सांगते.
नेव्ही सील्सचं एक तेजतर्रार पथक नेवाडाच्या तळावर तयारीला लागतं. रंगीत तालमी होतात आणि एक दिवस ‘आज रात्री ‘ऑपरेशन जिरोनिमो’ला निघायचं,’ असं फर्मान सुटतं.
तीन हेलिकॉप्टर घरघरत निघाली. ती अर्थात सुसज्ज आहेत. जगात कुठल्याही देशाकडं नाहीत, अशी तंत्रज्ञानं त्यांच्या ठायी आहेत. पाकी रडारला चुकवण्यासाठी ती अगदी खालून उडत निघाली आहेत.

थर्मल दुर्बिणी, थर्मल कॅमेऱ्यांनी सुसज्ज असे ते कमांडोज्‌ त्या कंपाउंडमध्ये उतरतात. पहिलं हेलिकॉप्टर निष्कारण कोसळतं. कंपाउंडमध्येच. कमांडोज्‌ घरात शिरतात.
...घरातल्या अस्फुट किंकाळ्या. दबक्‍या आवाजातल्या हाका. लहान पोरांचं रडणं. ‘चकचक चकचक’ असे सायलेन्सरवाल्या बंदुकांच्या गोळयांचे आवाज. थर्मल कॅमेरा तिथल्या काळोखातल्या हालचाली टिपतो आहे. तो थेट वॉशिंग्टनमधल्या एका सर्वोच्च ऑफिसात लाइव्ह इमेजेस पाठवतो आहे.
एक उंच दाढीधारी आकृती क्षणभरापुरती पडद्यावर दिसते न दिसते. बंदुकीच्या गोळीनं तिचा वेध घेतला आहे.
हाच...हाच उसामा बिन लादेन. आयडेंटिफिकेशन कन्फर्म्ड.
चला, इथल्या सीडीज्‌, कंप्युटर्स, फायली सगळं घेऊन पुढच्या सहा मिनिटांत नेव्ही सील्स कमांडोज्‌ परत हवाईतळाकडं निघालेसुद्धा...
अवघ्या २५ मिनिटांचं काळोखातलं ऑपरेशन; पण त्यानं एका १० वर्षांच्या प्रदीर्घ सूडनाट्याचा अंत केला. बॉडीबॅगमधल्या लादेनची अधिकृत ओळख पटवण्यासाठी तिथं माया स्वत: उभी आहे.
तो चेहरा बघून ती डोळे मिटते.
दुसऱ्याच दिवशी तिच्यासाठी हवाई दलाचा पायलट एक लढाऊ विमान आणून उभं करतो. ‘‘आख्खं विमान तुझ्यासाठीच आहे, बेबी. तुला कुठं जायचंय तेवढं सांग. सोडतो. आख्खं विमान तुला दिलंय म्हणजे तू कुणीतरी व्हीआयपी असणार...आहेस का?’’
मायाच्या डोळ्यातून आसवं येतात.
तिची एकांडी शोधमोहीम संपलेली असते.

* * *
‘झीरो डार्क थर्टी’ला ऑस्कर बहाल करण्यात आलं. ब्रिटिश ॲकॅडमीनं त्याला गौरवलं. गोल्डन ग्लोबनं त्यावर शिक्‍कामोर्तब केलं.
हा चित्रपट बनवला होता तोही कॅथरिन बिगॅलो या एका महिलेनंच. कॅथी ही खरं तर विख्यात दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनची (‘अवतार’) बायको; पण ही तिची खरी ओळख नाही. ‘हर्ट लॉकर’सारखा अफलातून ‘विनर’ पेश करणारी अजोड दिग्दर्शिका म्हणून हॉलिवूड तिला आजही सलाम ठोकतं. हर्ट लॉकर हा खरंतर स्वतंत्र विषय आहे. त्याबद्दल पुढं कधीतरी. युद्धपट बनवणं मुदलात अवघड. त्यात एका महिलेनं तो बनवणं आणखीच अवघड; पण कॅथीची तीच खासियत बनली.

नव्या सहस्रकाच्या सुरवातीला वास्तविक ती अमेरिकी गुप्तचरांच्या अफगाणिस्तानातल्या अपयशावर आधारित चित्रपट करत होती. ‘तोराबोराचं युद्ध’ या विषयावर तिनं मार्क बोएलच्या साथीनं संहिताही तयार केली; पण तो विषय बासनात गेला. हर्ट लॉकरसारखी अलौकिक चित्रकलाकृती तिनं रसिकांसमोर आणली...तेवढ्यात ओसामा बिन लादेनला उडवण्यात सीआयएला यश आलं. एका रात्रीत कॅथीनं आपलं जुनं-पुराणं स्क्रिप्ट गुंडाळलं आणि ‘फॉर गॉड अँड कंट्री’ नावाच्या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली. हाच चित्रपट पुढं ‘झीरो डार्क थर्टी’ या नावानं चित्रपट-इतिहासात अजरामर झाला.

‘झीरो डार्क थर्टी’ ही एक लष्करी परिभाषेतली टर्म आहे. ‘मध्यरात्री बारानंतर अर्ध्या तासानं’ या अर्थाची. अर्थात पहाटे चारचं ऑपरेशनही लष्करात ‘झीरो डार्क थर्टी’मध्येच गणलं जातं. प्रचंड तहानेला ‘‘आय ॲम ‘बीअर थर्स्टी’’ असं म्हणायची पद्धत आहे, तसंच काहीसं.
कॅथरिन बिगॅलोच्या या चित्रपटानं अमेरिकेत घुसळण झाली. सीआयए पुन्हा खवळली. इतकं डिटेल चित्रण हे कसं करू शकले? आपल्यातलं कोण फुटलं या सिनेमावाल्यांना? हू इज द मोल? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तर भडकलेच. त्यांच्या तोंडी आलेल्या शिव्यासुद्धा चित्रपटात जशाच्या तशा आल्या होत्या. वस्तुत: हे सगळं एका मार्क बिसॉनेट ऊर्फ मार्क ओवेन नावाच्या निवृत्त नेव्ही सील कमांडोनं लिहिलेल्या ‘नो इझी डे’ नावाच्या पुस्तकात आलेलं होतं. हा माजी कमांडो ‘ऑपरेशन जेरोनिमो’मध्ये सहभागी होता. पुस्तकात बरीच बंडलबाजी असल्याचा जाणकारांचा दावा असला तरी त्यातला ‘ऑपरेशन जेरोनिमो’चा भाग बराच खराखुरा आहे.
कॅथीनं अजून थोडा गृहपाठ करायला हवा होता. पाकिस्तानातले लोक अरेबिक बोलत नाहीत. उर्दू किंवा पश्‍तो बोलतात; पण कॅथीच्या चित्रपटातले पाकी नागरिक अरेबिक अस्खलित बोलताना दाखवले आहेत. हे म्हणजे दिल्लीतल्या प्रांठेवाल्या गल्लीत तमीळमध्ये ऑर्डर देण्यासारखं. इस्लामाबादेतली अमेरिकी कॉन्सुलेट कमालीची अंतर्भागात आणि अतिसुरक्षित आहे. तिथं मोर्चे येऊ शकत नाहीत. गोळीबार होणं जवळजवळ अशक्‍य आहे.

मुख्य म्हणजे कॅथरिन बिगॅलोचा हा चित्रपट दहशतवाद्यांचा छळ करणं म्हणजे राष्ट्रवाद मानतो का? तोही इतका अमानुष छळ? हे सीआयए बिनकाळजाच्या लोकांचं आहे का? नॉन्सेन्स. अमेरिकन्स असे नाहीत. निषेध...असे बरेच विरोधी सूरही उमटले आहेत. अर्थात कॅथीनं या टीकेला जुमानलं नाही.
‘कैद्यांच्या अनन्वित छळाचं तू समर्थन करतेस की विरोध?’ असं कॅथीला कुणीतरी विचारलं. तेव्हा ती म्हणाली ः ‘‘दोन्ही’’
मार्क बोएल या पत्रकारानं त्याची पटकथा लिहिली आहे. त्यासाठी त्यानं पाकिस्तानात सहा महिने मुक्‍काम ठोकून थोडीशी क्रिएटिव्ह गुप्तहेरगिरीही केली. अल्‌ कायदा आणि इस्लामी दहशतवादावर त्याचा अभ्यास आहेच.
ध्वनी आणि छायाचित्रण हा ‘झीरो डार्क थर्टी’ या चित्रपटाचा आत्मा आहे. ऑस्करही मिळालं ते ध्वनिनिर्मितीलाच. डॉक्‍युमेंटरी पाहत आहोत, असं वाटेवाटेतोवर आपण नकळत त्या मोहिमेत ओढले जातो. व्यक्‍तिरेखा मागं पडत जातात. संवाद निरर्थक ठरू लागतात. सहजच आपण त्या मोहिमेचा भाग होऊन जातो.
चित्रपट बघताना हरेक प्रेक्षकाची माया झालेली असते आणि चित्रपट संपल्यावर दाढेत सुपारी अडकल्याची विचित्र भावना होते.

--------------------------------------------------------------------------
‘क्‍लासिकाना’बद्दल...

‘क्‍लासिकाना’च्या पहिल्याच भागाला रसिक- वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आभार! क्‍लासिक्‍स, म्हंजे अभिजात चित्रपटांचा चविष्ट रवंथ असं ह्या ‘क्‍लासिकाना’चं वर्णन करता येईलही. वाचक त्यावर डोळा ठेवून आहेत, हे बघून बरं वाटलं. अभिजात चित्रकलाकृतींच्या याद्याच काही वाचकांनी लेखकाकडं धाडल्या आहेत. अगदी जुन्या काळातल्या ‘कॅसाब्लांका’पासून व्हाया ‘रोमन हॉलिडे’, ‘मॅकानाज्‌ गोल्ड’पासून अगदी ‘साउंड ऑफ म्युझिक’पर्यंत! अर्थात यापैकी काहींवर लिहायचंच आहे; पण आधुनिक काळातही ‘अभिजात’ म्हणावेत, असे चित्रपट निघाले आहेत. त्यांचीही ओळख करून घेणं तितकंच रंजक आणि बोधकही ठरावं. पडद्यावरच्या कथाकथनाला स्तिमित करणाऱ्या तंत्रज्ञानाची साथ मिळाल्यामुळं ही ‘मॉडर्न क्‍लासिक्‍स’ आणखीच आशयघन झालेली आहेत. जुनं आणि नवं यातलं ‘निकं सत्त्व’ शोधून वाचकांसमोर ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे...

--------------------------------------------------------------------------

Web Title: pravin tokekar's article in saptarang