बहोत निकले मेरे अरमान... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 29 जानेवारी 2017

‘द बकेट लिस्ट’ ही सत्तरीतल्या दोन बुढ्ढ्यांनी केलेली मौजमजा...दोन वेगवेगळ्या जगात जगणारे हे दोघं आजारपणामुळं रुग्णालयात एकत्र येतात आणि पुढच्या तीन महिन्यांत एकमेकांचे जवळचे ‘बडी’ बनतात. त्यांनी केलेली मौजमजा बघणं म्हणजे पडद्यावरची ट्रीट आहे. ते जगण्याबद्दल बोलतात...मरणाबद्दल तर बोलतातच...शिळ्यापाक्‍या, विस्मरणात गेलेल्या ‘रिश्‍त्यां’ना फोडणी देतात...बरंच काही करतात.

‘द बकेट लिस्ट’ ही सत्तरीतल्या दोन बुढ्ढ्यांनी केलेली मौजमजा...दोन वेगवेगळ्या जगात जगणारे हे दोघं आजारपणामुळं रुग्णालयात एकत्र येतात आणि पुढच्या तीन महिन्यांत एकमेकांचे जवळचे ‘बडी’ बनतात. त्यांनी केलेली मौजमजा बघणं म्हणजे पडद्यावरची ट्रीट आहे. ते जगण्याबद्दल बोलतात...मरणाबद्दल तर बोलतातच...शिळ्यापाक्‍या, विस्मरणात गेलेल्या ‘रिश्‍त्यां’ना फोडणी देतात...बरंच काही करतात.

तशा बऱ्याच गोष्टी राहून जातात. सगळंच काही एका आयुष्यात जुळत नाही. उमर हातातून निसटत जाते.
मनातलं वाभरं पोर काही ना काही मागत राहतं आयुष्यभर; पण जगण्याबिगण्याच्या भानगडीत ते सगळं सांडून जातं. आता उरलेलं करायचं पुढच्या जन्मी.
उदाहरणार्थ ः त्या भोळेआज्जींना सारखं वाटतं, की ती जीन्स का काय ती एकदा घालून पाहायला हवी होती...राहून गेलं. आता पुढच्या जन्मी.

किंवा दोंदेकाकांना कवळी सावरताना उगीचच वाटत राहतं, की आपणही अस्सं मोटारसायकलवर बसून भर्रर्रदिशी जायला हवं होतं एकदा तरी. काय ही पोरं जातात विमानासारखी. छ्या! पण आता आपले सांधे दुखतात..जाऊ द्यात. आता पुढच्या जन्मी. बसस्टॉपवर उभ्यानं वाट बघत असलेल्या कृष्णा मोरेला कायम वाटतं की आपल्याकडं बी एकांदी नॅनो गाडी असायला हवी होती राव. स्वत्ताच्या गाडीत बसूनशेनी महाडला सासुरवाडीला गेलो अस्तो...जाव द्या. आता फुडच्या जल्मी.
‘रांधा-वाढा-उष्टी काढा’ करत आयुष्य गेल्यानंतर हल्ली हल्ली शैलावहिनींना वाटायला लागलंय...एकटीनं युरोपची सहल करता येईल आपल्याला? एकटीनं? छे, आता पुढच्या जन्मीच.

तशी आपल्या सगळ्यांची एक ‘बकेट लिस्ट’ असते. मनातल्या अतृप्त इच्छा-आकांक्षांची यादी. राहून गेलेल्या, न जमलेल्या, अप्राप्य ठरलेल्या गोष्टींची यादी. कागदावर कधीही न मांडली गेलेली मनाच्या वाणसामानाची यादी.
इंग्लिशमध्ये ‘किकिंग द बकेट’ या ‘मुहावऱ्या’चा अर्थ ः वर जाणं! या बादलीत आपली ती अपूर्ण यादी चोळामोळा करून टाकायची आणि यमदूताबरोबर प्रस्थान ठेवायचं. ती ‘बकेट लिस्ट’. याच नावाचा एक चिरतरुण चित्रपट मनाचा इतका ठाव घेतो की वाटतं, प्रत्येकाच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये हीसुद्धा एक इच्छा समाविष्ट व्हायला हवी ः ‘द बकेट लिस्ट’ एकदा तरी पाहायचाच!
* * *

कार्टर चेंबर्स हा एक सत्तरीपुढचा तरणाबांड गडी. त्याला इतिहासकार व्हायचं होतं; पण दरिद्री घरात जन्मलेल्या आणि ऐन उमेदीच्या काळात बायको पोटुशी राहिल्यानं कृष्णवर्णीय कार्टरची (ब्लॅक, ब्रोक अँड बेबी ऑन द वे...) ती संधी हुकली. तो तसा आहे निष्णात मोटर मेकॅनिक; पण जनरल नॉलेजही भरपूर. पोटापुरतं कमावणारा, सुखी. प्रेमळ बायको...नुकताच हाताशी आलेला उमदा मुलगा. बरं चाललं आहे तसं.
...सुशिक्षित, परिपक्व असा कार्टर एक दिवस गराजमध्ये गाडी दुरुस्त करत असतानाच घरून फोन येतो. वाईट बातमी आहे. त्याच्या बायोप्सीचा रिपोर्ट चांगला नाही. फुफ्फुसाचा कर्करोग बळावलाय. ॲडमिट व्हावं लागणार. कार्टरच्या हातातली सिगरेट गळून पडते...

त्याच वेळी शहरात दुसरीकडं पंचपंचतारांकित ऑफिसात विख्यात उद्योजक एडवर्ड कोल भर बोर्ड मीटिंगमध्ये सगळ्यांना थांबवून आपल्या लाडक्‍या पीआर असिस्टंटला एक ‘नायाब’ कॉफीची चव घ्यायची जबरदस्ती करतोय. ‘‘पी लेका, टॉमी! ही कोपी लुवाक...इतकी महागडी कॉफी तुझ्या १७ पिढ्यांना परवडणार नाही...पी!’’ एडवर्ड कोलला कुणाच्या ‘बा’ची पर्वा करण्याचं कारण नाही. हे हॉस्पिटल खरोखर त्याच्या ‘बा’चं आहे. हेच नव्हे तर, अशी साताठ फाइव्ह स्टार इस्पितळं तो यशस्वीरीत्या चालवतो. फेमस बिझनेसमन आणि हॉस्पिटल-मॅग्नेट एडवर्ड कोल आहे तो. तोही सत्तरीच्या पुढचाच. पैशाचा, कर्तृत्वाचा नको तेवढा माजही त्याला आहे. फटकळ आवाजात ऑर्डरी सोडत हाताखालच्या कर्मचाऱ्यांना नाचवणं हा त्याचा आवडता छंद. हाताखालचे कर्मचारी म्हणजे संचालक, डॉक्‍टरांपासून थेट नर्सेसपर्यंत सगळेच. उदाहरणार्थ ः  ‘मिशेल फायफरबरोबर लंच घेणं रद्द करून मी तुमच्या या रद्दड बोर्ड मीटिंगला आलोय, हेच नशीब समजा’ हे तो भर बैठकीत संचालकांना सुनावतो.
‘‘हे बघा, मी हेल्थ स्पा चालवत नाही...हॉस्पिटल चालवतो. एका खोलीत दोन पेशंट बसवलेच पाहिजेत. भलते लाड चालू देणार नाही. व्हीआयपी पेशंट वगैरे सगळ्या बाता आहेत...’’ एड कोलला बोलता बोलता उबळ आली. तोंडावर दाबून धरलेल्या रुमालावर रक्‍त आलं...एड कोललासुद्धा कॅन्सरनं ग्रासलंय. लंग्ज्‌चा कॅन्सरच. त्याच्याच सुपरस्पेशालिटी इस्पितळात त्याला ॲडमिट केलं आहे.
* * *

उपचाराच्या नावाखाली छळ मांडणाऱ्या डॉक्‍टरांच्या ७२ पिढ्यांचा उद्धार करत आरडाओरडा करणाऱ्या एड कोलला त्याच्या लाडक्‍या थॉमसनं खोलीत आणलं. त्याच्या आवडत्या ‘कोपी लुवाक’ कॉफीची मांडामांड केली. साहेबांच्या नाका-तोंडाशी नळ्या आहेत. शेजारच्या खाटेवर नेमका आडवा आहे कार्टर चेंबर्स. तो सूप पीत एड कोलचा तमाशा नुसता बघतो आहे.
‘‘हा शेजारी कोण कडमडलाय?’’ एडनं तोंड वाकडं करत थॉमसला विचारलं. ‘‘दुसरा पेशंट!’’ थॉमस उत्तरला.
‘‘ नॉन्सेन्स...मला स्पेशल खोली हवी. मी मालक आहे या हॉस्पिटलचा!’’ एड डरकाळला.
‘‘तुमचाच पॉलिसी-डिसिजन आहे, सर. एका खोलीत दोन पेशंट’’ थॉमसनं आठवण करून दिली.
‘‘ तेव्हा मी आजारी नव्हतो...’’ पडेल आवाजात एड म्हणाला.
‘‘एक्‍सक्‍यूज मी...तुम्ही खरंच या हॉस्पिटलचे मालक आहात?’’ सूपचं भांडं बाजूला करत कार्टर शेजारच्या खाटेवरून म्हणाला ः ‘‘ असाल तर मग इथल्या वाटाण्याच्या सूपबद्दल मला गंभीर तक्रार करायची आहे!’’
...एडवर्ड कोल आणि कार्टर चेंबर्स या सत्तरीतल्या तरुणांची इस्पितळाच्या खाटांवर झालेली ही पहिली भेट होती. इथून पुढले तीन महिने म्हणजे ‘बकेट लिस्ट’ हा एक झकास चित्रपट.
* * *

एड कोल हा काहीसा आतरंगी, तर कार्टर चेंबर्स काहीसा अंतर्मुख. एड कमालीचा बेपर्वा, तर कार्टरला परिस्थितीनं बरंच शहाणपण शिकवलेलं. एडकडं प्रचंड पैसा, तर कार्टरच्या नशिबाला छिद्रं. एडनं एव्हाना तीन लग्न करून हौसेहौसेनं मोडलीही आहेत; पण कार्टरकडं मात्र एकुलती एक प्रेमळ बायको. एड कोलला एक मुलगी आहे; पण तिनं संबंध तोडले आहेत. एडला एकच नातलग. थॉमस. तर कार्टरचा मुलगा आत्ताच चांगला हाताबुडी आला आहे.
किमोथेरपीनंतर ओकाऱ्या काढून हैराण झालेला एड आणि त्याच वेदनांना निमूटपणे तोंड देणारा कार्टर. ‘‘कमी होईल त्रास काही तासांत,’’ तो आपल्या रूममेटला धीर देतो.
‘‘या घटकेला कुठल्या तरी सुदैवी माणसाला हार्ट अटॅक येत असेल...ना?’’ ओकत ओकत एड कोल विचारतो.  
किमोथेरपीच्या चक्रानंतरच्या शांततेत एक दिवस कार्टरनं एक कागद समोर ओढला. सहज मन रमवण्याचा चाळा. आता इथून निघायचं आहे...पण आपलं इथं काय काय करायचं राहून गेलंय? वेल, बरंच. तरीही...
१) खराखुरा शाही असा नजारा बघायचाय...ट्रूली मजेस्टिक, २) एका संपूर्णपणे अनोळखी माणसाला मदत करायची आहे, ३) इतकं हसायचंय, इतकं हसायचंय की रडू कोसळावं, ४) पॉश शेल्बी मस्टॅंग मोटार चालवायचीये एकदातरी, ५) जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीचं चुंबन घ्यायचंय, ६) अंगावर टॅटू काढून घ्यायचाय, ७) स्कायडायव्हिंग, ८) इंग्लंडातल्या विल्टशरच्या प्राचीन स्टोनहेंजला भेट द्यायचीये, ९) चीनच्या प्राचीन भिंतीवर मोटरसायकल चालवायचीये, १०) आफ्रिकेतली सफारी, ११) इंडियातल्या ताजमहालला भेट, १२) इजिप्तमधल्या पिरॅमिडवर पाय सोडून बसायचंय, १३) आयुष्यातला आनंद म्हंजे काय ते शोधायचंय....

...कार्टरचं मन उडालं. छे, काहीतरीच वेडगळ इच्छा. त्यानं बोळा करून कागद टाकून दिला. तो नेमका भोचक एड कोलनं उचलला. ओह, आपल्या मित्राची विश लिस्ट दिसतेय. त्यानं चेष्टामस्करी करत त्यात भर घातली. ‘‘दोस्ता, तू काहीच जग पाहिलं नाहीस रे. चल, आपण इथून सटकू आणि वन बाय वन हे सगळं करून टाकू. नाहीतरी आपले दिवस भरलेलेच आहेत. सो, नथिंग टू लूज ड्यूड!’’
एड कोलनं सगळा खर्च करायची तयारी दाखवली. हो-ना करता करता कार्टर चेंबर्स तयार झाला.
* * *

सत्तरीतल्या दोन बुढ्ढ्यांनी केलेली मौजमजा इथं शब्दांत रंगवण्यात काहीही हशील नाही. ती पडद्यावर बघावी. पुढच्या तीन महिन्यांत हे दोघंही एकमेकांचे किती जवळचे ‘बडी’ बनतात, हे बघणं म्हणजे पडद्यावरची ट्रीट आहे. ते जगण्याबद्दल बोलतात. मरणाबद्दल तर बोलतातच. शिळ्यापाक्‍या, विस्मरणात गेलेल्या ‘रिश्‍त्यां’ना फोडणी देतात. बरंच काही करतात.
इतर सर्व बकेट लिस्टप्रमाणेच या दोघांचीही यादी सुफळ संपूर्ण होत नाहीच. त्याआधीच कार्टर पुन्हा अत्यवस्थ होतो. आता कॅन्सर त्याच्या मेंदूत पसरलाय. मरणशय्येवरच तो त्याला भेटायला आलेल्या एडला सांगतो ः ‘‘ ऐक एड, तू ती तुझी आवडती कॉफी ‘कोपी लुवाक’...ती कशी बनवतात माहितीये? एशियन पाम सिवेट नावाची एक रानमांजर असते. ती या कॉफीच्या बिया खाते. त्या तशाच तिच्या विष्ठेतून पडतात. मग त्या वेचून, स्वच्छ धुऊन...यक्‌!’’
...दोघंही खळखळून हसतात. इतकं की कार्टर त्याच्या यादीतल्या ‘इतकं हसायचंय की रडू यावं’ या इच्छेवर काट मारतो. ‘‘माझ्या राहिलेल्या इच्छाही तूच पूर्ण कर,’’ असं तो एडला सांगतो आहे...

अखेर कार्टर गेला. त्याच्या शोकसभेत एडनं जे भाषण केलं, ते ऐकून (आणि पाहून) घशात आवंढा न येणारा दगडच म्हटला पाहिजे. एड कोल म्हणतो : ‘‘ तीन महिन्यांपूर्वी आम्ही एकदम अनोळखी होतो, असं म्हणणं थोडं अप्पलपोटेपणाचं वाटेल; पण खरंच...कार्टरचे शेवटचे तीन महिने हे माझ्या आख्ख्या आयुष्यातले सर्वोत्तम तीन महिने होते...’’
कृतज्ञतेनं एडनं आपल्या हातातल्या यादीतून ‘एका संपूर्णपणे अनोळखी माणसाला मदत’ करण्याची आपल्या मित्राची अंतिम इच्छा यादीतून इथं कटाप केली.
एडनं शेवटी आपल्या पोरीशी पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न केला. मुलीनं त्याला स्वीकारलंच; पण आपली गोड छोकरीही मरणवाटेवरच्या आजोबाच्या हातात दिली. आजोबानं तिची सुंदरशी पापी घेतली आणि यादीतलं शेवटलं कलम निघून गेलं : जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीचं चुंबन?’ घे-त-लं!!
अर्थात काही महिन्यांतच एड कोलही प्रस्थान ठेवतोच. त्याची अंतिम इच्छाही त्याचा लाडका थॉमस पूर्ण करतो.
* * *

बोलघेवड्या, धनाढ्य एड कोलचा रोल जॅक निकोल्सननं केलाय, तर अंतर्मुख कार्टर चेंबर्सची भूमिका मॉर्गन फ्रीमनची. या चित्रपटाला ऑस्करबिस्कर तर सोडूनच द्या; उलट समीक्षकांनी ‘खोटारडा, दांभिक चित्रपट’ म्हणून त्याला चिक्‍कार झोडून काढलं. काळा-गोरा वाद उगीचच ड्रामेबाजी करून आणल्याचा आरोप दिग्दर्शक रॉब रायनरवर झाला. ‘आयुष्यावर इतकी कृत्रिम टिप्पणी करण्याचं काहीही कारण नव्हतं,’ असं टीकाकारांचं मत. काहीही असो, अर्थात चित्रपटानं धंदा उत्तम केला, हे सांगणे न लगे. समीक्षकांचं मत काहीही असलं तरी हा चित्रपट बघणं हा बहारदार अनुभव आहे, हे नक्‍की. जॅक निकोल्सन आणि मॉर्गन फ्रीमन हे दोघंही तगडे अभिनेते. मृत्यूच्या छायेतले दोन म्हातारे रंगवताना त्यांनी त्यात अशा काही छटा भरल्या आहेत, की बघता बघता आपणही त्यात मनापासून रंगून जातो.
चित्रपट संपता संपता एक यादी आपल्याही मनात घोळू लागते...

Web Title: pravin tokekar's article in saptarang