रणांगणातुनि फुलती तेव्हा माणुसकीचे मळे (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

बंदुकीच्या नळीतून क्रांती होते. बंदुकीच्या नळीमधून युद्धं खेळली जातात. बंदुकीच्या नळीनं धर्मयुद्धंही लढली जातात. बंदुकीची नळी ही देशाची सत्ता, सरहद्दी शाबूत ठेवते; पण युद्ध हाच एक धर्म होतो, तेव्हा माणुसकी हेच एक शस्त्र असतं! पण हे कळेल कुणाला?

बंदुकीच्या नळीतून क्रांती होते. बंदुकीच्या नळीमधून युद्धं खेळली जातात. बंदुकीच्या नळीनं धर्मयुद्धंही लढली जातात. बंदुकीची नळी ही देशाची सत्ता, सरहद्दी शाबूत ठेवते; पण युद्ध हाच एक धर्म होतो, तेव्हा माणुसकी हेच एक शस्त्र असतं! पण हे कळेल कुणाला?

‘‘माझं माझ्या देशावर निस्सीम प्रेम आहे. माझ्या देशाचा सैनिकी गणवेश मला जिवापलीकडं प्यार आहे. माझ्या देशाच्या ध्वजासमोर मी सदैव नतमस्तक आहे. माझ्या देशाच्या शत्रूशी लढायला मी नेहमीच तयार आहे. फक्‍त मी शस्त्र उचलणार नाही. मी हत्या करणार नाही...’’
- विल्यम कोल्टमन, पहिल्या महायुद्धातल्या कामगिरीखातर व्हिक्‍टोरिया क्रॉस विजेते, ब्रिटिश सैन्य (१८९१-१९७४)

***
ओकिनावाचं युद्ध हे दुसऱ्या महायुद्धातलं एक रक्‍तरंजित प्रकरण आहे. जपानच्या मुख्य भूमीपासून दक्षिणेला सुमारे साडेपाचशे किलोमीटर अंतरावर पॅसिफिक समुद्रातलं एक बेट-ओकिनावा. हे बेट ‘उचलून’ जपानची आरमारी नांगी ठेचायची, हा दोस्तराष्ट्रांचा मनसुबा होता; पण ओकिनावा जपान्यांनी तब्बल ८२ दिवस लढवलं. किमान सव्वा लाख जपान्यांनी प्राणाहुती दिली. अखेर बेट दोस्तांच्या फौजांकडं आलं; पण तोवर दोस्तसैन्यातलेही हजारो जण मारले गेले होते. दोस्तसैन्यातलं पायदळ हे मुख्यत: अमेरिकेचं होतं. हे युद्ध जिंकण्यासाठी अमेरिकेनं प्रचंड किंमत मोजली आहे.
दोस्तांच्या फौजांनी ओकिनावावर चढाई केली. मुलुख डोंगराळ होता. उंच उंच पर्वतराजी, दऱ्याखोऱ्या आणि कभिन्न पहाड. सैन्याच्या मार्गात एक अजस्र कडा होता. मईदाचा उतार असं त्याचं प्रचलित नाव. करवतीचं पातं असतं तसाच. दातेरी. हा कडा ओलांडून वर जायचं. जपान्यांचा प्रतिकार मोडून काढत ओकिनावाकडं कूच करायचं, असा दोस्तांचा इरादा होता. अमेरिकी सैन्याच्या आधी बळी गेलेल्या पलटणींना कडा सर करणं जमलं. त्यावर दोरखंड चढवण्यात यश आलं; पण त्यापलीकडं इंचभर पुढं जाता येत नव्हतं. ओकिनावाकडं निघालेल्या दोस्तांच्या नव्या पलटणीत एक नवाकोरा सैनिक होता. त्याचं नाव डेस्मंड डॉस. त्यानं त्या रणभूमीवर इतकं शौर्य गाजवलं की त्याला तोड नाही. त्याखातर त्याला राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी स्वहस्ते ‘मेडल ऑफ ऑनर’ बहाल केलं.

डेस्मंड डॉसच्या मर्दुमकीचा विशेष म्हणजे त्यानं संपूर्ण युद्धात बंदूक हातातसुद्धा घेतली नाही. एकही गोळी झाडली नाही; पण आपल्याच तुटक्‍या-फुटक्‍या, जखमी सैनिकबांधवांना जिवाची पर्वा न करता युद्धभूमीवर वाचवलं. त्यांची शुश्रूषा केली.
डेस्मंड डॉस हा युद्धभूमीवरचा प्रेषित मानला गेला.

त्याची कहाणी म्हणजे ‘हॅकसॉ रिज’ हा चित्रपट. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी हा चित्रपट ताठ मानेनं उभा आहे. कारण या चित्रपटाचा आशय, चित्रीकरण, कथाकथन आणि हेतू या सगळ्याच पैलूंमध्ये तो सरस आहे. दुर्दैवानं हा चित्रपट अद्याप भारतात रिलीज झाला नाही, तरीही तो आयुष्यात एकदा तरी पाहावा आणि आयुष्यभरासाठी मनावर संस्कार म्हणून बिंबवावा असा आहे. त्याचा पोत पाहता ढोबळमानानं त्याला युद्धपट असं म्हणता येईलही; पण तो निखळ युद्धविरोधी चित्रपट आहे. गेल्या १०० वर्षांतल्या सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांची यादी करायची झाली, तर तीत ‘हॅकसॉ रिज’चा समावेश करावाच लागेल.
* * *

डेस्मंड आणि त्याचा भाऊ हाल व्हर्जिनियाच्या डोंगराळ मुलखात वाढलेले. आई-वडील कमालीचे धार्मिक. ‘सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट’ या अहिंसक पंथावर चालणारे. श्रद्धेनं दर शनिवारी व्रतस्थ (सब्बाथ) राहणारे. मांसाहार वर्ज्य. दहा कमांडमेंटपैकी ‘दाऊ शाल्ट नॉट किल’ ही सहावी आज्ञा पाळणारे. वडील टॉम डॉस हे दारूडे आहेत. पहिल्या महायुद्धातल्या आपल्या मित्रांना दफनभूमीत पोचवून कसेबसे नैराश्‍यात दिवस कंठणारे. आई, बर्था...अर्थातच सोशिक. लहानपणी एकदा घराच्या आवारातच मारामारी करताना डेस्मंडनं आपल्या भावाच्या डोक्‍यात वीटच घातली. भाऊ मरता मरता वाचला. याचा खोल चरा डेस्मंडच्या मनावर उमटला. पुढं तरुण होताना त्याच्या लक्षात आलं, की दारूत बुडाले की आपले वडील सैतान होतात. मग आईचं विव्हळणं, रडणं...त्याला ऐकणं असह्य होई. एकदा संतापाच्या भरात त्यानं बापाच्याच कपाळाला बंदूक टेकवली. ‘बस कर आता...मारून टाकीन!’ त्या दिवशी डेस्मंडनं शपथ घेतली. या पुढं आयुष्यात कधीही बंदूक उचलणार नाही. हत्या करणार नाही. दाऊ शाल्ट नॉट किल.
* * *

अपघातात जखमी झालेल्या एका गावकऱ्याला इस्पितळात पोचवायला गेलेला डेस्मंड रक्‍तदान करून आला. बाटलीभर रक्‍त देताना त्यानं नर्स डोरोथी शूटला आपलं हृदयसुद्धा देऊन टाकलं. डेस्मंडनं वारंवार इस्पितळात जाऊन डोरोथीला पटवलं.
‘‘डोरोथी, मी युद्धावर चाललोय.’’
‘‘जा की मग...मला कशाला सांगतोयस?
‘‘तुला सगळ्यात आधी सांगतोय. माझं ट्रेनिंग सुरू होतंय. मला जावं लागणार.’’
‘‘ओके. मला काही विचारायचंय असं वाटत नाहीए ना तुला?’’ संतापलेल्या डोरोथीनं विचारलं.
‘‘ विल यू मॅरी मी, डोरोथी?’’
‘‘येस आय विल...बट स्टिल आय हेट यू. कारण तू जवळपास मलाच विचारायला लावलंस...’’
डोरोथीचा गोडगिट्‌ट निरोप घेऊन डेस्मंड निघाला. प्रेयसी, प्रेमळ आई आणि दोन्ही मुलं युद्धावर गेल्याच्या दु:खात बाटलीत बुडालेला बाप यांना सोडून डेस्मंड लष्करी तळावर आला होता.

‘‘गर्ल्स, उद्यापासून तुमचं ट्रेनिंग सुरू होईल. ही पिकनिक नाही. पहाटे चार वाजता फॉल इन...’’ सार्जंट हॉवेल दम भरून गेला. नवे रिक्रूट स्तंभित होऊन आपल्या मेसमध्ये नुसते उभे होते. हा प्रायवेट स्मिटी. तडाखेबंद चाकूबाज. तो दुसरा प्रायवेट हॉलिवूड झेन. तो संपूर्ण निसर्गावस्थेत पुल-अप्स काढत बसलाय. हा प्रायवेट घूल. त्याला युद्धावरच यायचं नव्हतं. इतर पोरं आली, तसा तोही आला. ‘फॉल इन’नंतर सार्जंट हॉवेलनं घोषणा केली ः ‘‘उचला तुमची गर्लफ्रेंड...तिच्या स्पर्शानं रोमांचित व्हा. तिला जपा. लव्ह हर...यू फूल्स.’’ समोर बंदुका ठेवलेल्या होत्या. प्रत्येकानं एकेक ‘पोरगी’ उचलली. डेस्मंड डॉस मात्र नुसता उभा राहिला.  ‘‘मी बंदुकीला हात लावणार नाही, सर. मी तशी शपथ घेतली आहे.’’
‘‘बंदुकीला हात लावणार नाही? मग काय शत्रूचा मुका घेणार?’’
त्या रात्री डेस्मंड डॉस नावाच्या नेभळटाला काही अज्ञात मित्रांनी ‘कोडमंत्र’ दिला. कोडमंत्र म्हणजे कोड रेड. काही शिक्षा अशा असतात की त्या नियम-कायद्याच्या परिघातल्या नसतात. एखाद्याला वठणीवर आणण्यासाठी हे करावंच लागतं. त्याचं युनिटच त्याला कोडमंत्र देतं. बहुतेकदा एक-दोनदा कोडमंत्र मिळाला की सोल्जर वठणीवर येतो, असा अनुभव आहे.
मात्र, डेस्मंड बधला नाही. त्यानं संपूर्ण प्रशिक्षणात बंदूक उचलली नाही. बाकी प्रत्येक गोष्ट नीट केली. एव्हाना त्याचं युनिट त्याचा तिरस्कार करू लागलं होतं. त्याला सैन्यातून बाहेर घालवण्याचेही प्रयत्न करण्यात आले; पण तो गेला नाही. ‘युद्धाला माझा विरोध नाही. किंबहुना मी समर्थकच (Conscientious Cooperator) आहे; पण बंदूक नाही उचलणार, हा त्याचा बाणा. त्याला कॅप्टन जॅक ग्लोव्हरसमोर उभं करण्यात आलं. जॅकनं त्याला दम देऊन पाहिलं. ‘तू लष्कर सोड,’ असा सल्लाही दिला; पण डेस्मंड डॉस हरला नाही.
...अखेर त्याला कोर्टमार्शल केलं गेलं.
बुद्धिपुरस्सर विरोधक (Conscientious Objector) अशी एक लष्करी संज्ञा आहे. नैतिकता, धर्म आदी कारणांमुळं लढायला नकार देणाऱ्याचा एखाद्याला अधिकार असतो. ब्रिटिश आणि अमेरिकी सैन्यात हे मंजूर आहे. (भारतात अजून या दिशेनं पावलंसुद्धा पडलेली नाहीत. हे सुदैव की दुर्दैव हे तुम्हीच ठरवा). डेस्मंडच्या कोर्टमार्शलच्या वेळी मात्र व्हर्जिनियाचे सुप्रसिद्ध मद्यपि बाप श्रीमान टॉम डॉस यांनी जुना गणवेश चढवून काही हालचाल केली. ‘बुद्धिपुरस्सर विरोधक या भूमिकेला अमेरिकी काँग्रेसची मान्यता आहे. सबब, कोर्टमार्शलमध्ये डेस्मंडला दोषी ठरवता येणार नाही,’ असा युक्‍तिवाद झडला. डेस्मंडची निर्दोष मुक्‍तता झाली. बिनाबंदुकीचा तो ओकिनावाच्या दिशेनं रवाना झाला.
* * *

प्रचंड मोठा कडा. त्यावर रॅपलिंगचे दोर लावलेले. आपले सैनिक इथून वर चढून जातात; पण परत येत नाहीत. वर जपान्यांच्या कामिकाझे हल्ल्यांना तोंड देता देता दमछाक झाली आहे. सर्वत्र काळा धूर. राखेचं साम्राज्य. सडक्‍या प्रेतांचा दुर्गंध आसमंतात पसरलेला. काळीठिक्‍कर पडलेली परिचित गणवेशातली कलेवरं. काही नुसतेच हात...पाय. काही मुंडकी. काही नुसतीच धडं...अमंगळानं इथं नंगानाच केला आहे. नजर जातेय, तिथवर नुसते खड्डेच खड्डे पडले आहेत.

खड्ड्यांमध्ये दडून बसलेल्या नव्या दमाच्या अमेरिकी फौजांमध्येच एक सैनिक आहे ः डेस्मंड डॉस. मात्र, त्याच्या हातात बंदूक नाही. कमरेच्या पट्ट्यात हातबॉम्ब नाहीत. एकमेव शस्त्र म्हणजे खिशातलं डोरोथीनं दिलेलं बायबल. ...इतक्‍यात थडाथड गोळ्या येतात. काही सैनिकांचे मेंदू फुटतात. धुमश्‍चक्रीला सुरवात होते. जपान्यांच्या लाटांवर लाटा येतायत. इतकी संख्या? यांना तोंड कसं द्यायचं? तरीही दोन-तीन बंकर उडवण्यात स्मिटी आणि कंपनीला यश मिळालंय. कॅप्टन जॅक ग्लोव्हरनं तर शौर्याची कमाल केली. जपान्यांचे धमाके त्यानं काही तासांकरता का होईना बंद पाडले.
इतक्‍यात नवी कुमक मिळालेल्या जपान्यांनी निकराचा हल्ला चढवून दोस्तांच्या फौजांची दाणादाण उडवली. स्मिटी, घूल, हॉलिवूड झेन हे फक्‍त अवयवस्वरूपात उरले. उरलेले कुठं कुठं कोसळले. ...या मृत्यूच्या थैमानात डेस्मंड जखमी सैनिक हुडकून त्यांना कड्यावरून खाली पाठवण्यासाठी धडपडत होता. तुटक्‍या-फुटक्‍या, धुगधुगी उरलेल्या त्या सैनिकांना रॅपलिंग करत खाली पाठवणं हे दिव्य होतं. रात्रभर ते काम डॉस करत राहिला. ‘गॉड...हेल्प मी फाइंड वन मोअर’ ही प्रार्थना घोकत त्यानं अथकपणे त्या रणांगणात माणुसकीची रोपटी लावली. अमेरिकी सोल्जर्स त्यानं पाठवलेच; पण दोन जखमी जपानीही पाठवले. कड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळावरचे अधिकारी चक्रावून गेले होते. आख्खी पलटण गारद झाल्याचं कळल्यानंतर आता हे जखमी सैनिक कुठून येतायत? त्यांना कोण पाठवतंय? वर कड्यावरती कोण देवदूत उरला आहे? रात्रभर रणांगण पिंजून डेस्मंडनं तब्बल शंभरेक घायाळ सैनिक खाली पाठवले. त्यातल्या ८७ जणांना त्याच्यामुळं जीवदान मिळालं. स्वत: डेस्मंड कसाबसा कडा उतरून आला. शनिवारचा सब्बाथ बुडवून हा गडी नव्या चढाईसाठी पुन्हा कडा चढून गेला. त्याची प्रार्थना पूर्ण होईपर्यंत सारी पलटण चढाईसाठी थांबली होती. नवी कुमक मिळाल्यानंतर दोस्तांच्या फौजांनी निर्णायक ‘हमला बोलून’ जपान्यांना शरण आणलं. ओकिनावाचा पाडाव झाला. पुढं राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी डेस्मंडच्या गळ्यात शौर्यपदक अडकवलं. एका युद्धविरोधकाला युद्धाचा नायक म्हणून गौरवण्यात आलं. जीव घेणाऱ्यापेक्षा जीव वाचवणारा खरा हीरो असतो.
* * *

मेल गिब्सन या विख्यात हॉलिवूड नट-दिग्दर्शकानं हा चित्रपट बनवला आहे. अँड्य्रू गारफिल्डनं डेस्मंड डॉसची भूमिका वठवली आहे. गारफील्डचा अभिनय हा कुठलाही सुजाण प्रेक्षक आयुष्यात विसरणं अशक्‍य आहे. ‘अमेझिंग स्पायडरमॅन’मधला हा स्पायडरमॅन मुखवट्यासकट प्रसिद्ध पावला; पण इथं त्याच्या चेहऱ्यावर माणुसकीचा मुखवटा आहे. कॅप्टन जॅक ग्लोवरची छोटीशीच; पण प्रभावी भूमिका रांगड्या सॅम वर्दिंग्टननं (अवतार) केली आहे. मेल गिब्सनच्या कारकीर्दीतला ‘हॅकसॉ रिज’ हा मेरुमणी ठरावा. मॅड मॅक्‍स किंवा ब्रेव्हहार्टसारख्या चित्रपटांत दिसलेल्या गिब्सननं इथं दिग्दर्शनात दाखवलेली कमाल केवळ असामान्य आहे. या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण ऑस्ट्रेलियात झालं. गेल्या नोव्हेंबरमध्ये तो रिलीज झाला. भारतात मात्र आला नाही. ऑस्कर सोहळ्यानंतर आता तो आला, तरी सेन्सॉर बोर्डानं तो काटछाट न करता दाखवावा. कारण, या चित्रपटाचा हेतूच मुळात युद्धाला विरोध म्हणजे अहिंसा हा आहे. खरेखुरे डेस्मंड डॉस सन २००६ मध्ये वयाच्या ८७ व्या वर्षी निवर्तले. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढावा, हे प्रयत्न गेली १४ वर्षं सुरू होते; पण ‘‘मी काही ग्रेट केलेलं नाही. माणुसकी ही काय जाहिरात करण्याची गोष्ट आहे का?’’ असं सांगून ते फुटवत असत. मात्र, अखेर ‘सेवन्थ डे ॲडव्हेंटिस्ट’ चर्चनंच मध्यस्थी केल्यानंतर २००३ मध्ये त्यांनी अनुमती दिली.

युद्धभूमीवर नि:शस्त्र फिरणारे डेस्मंड हे एकटे नाहीत. त्यांच्या आधी ब्रिटिश सैन्यातल्या विल्यम कोल्टमन यांनी अशीच काहीशी कामगिरी बजावली होती. ब्रिटिश सैन्यात ते ‘स्ट्रेचर बेअरर’ होते. बंदुकीच्या नळीतून क्रांती होते. बंदुकीच्या नळीमधून युद्धं खेळली जातात. बंदुकीच्या नळीनं धर्मयुद्धंही लढली जातात. बंदुकीची नळी ही देशाची सत्ता, सरहद्दी शाबूत ठेवते; पण युद्ध हाच एक धर्म होतो, तेव्हा माणुसकी हेच एक शस्त्र असतं! पण हे कळेल कुणाला?
...आपल्या देशात एका माहात्म्यानं असंच काहीसं सांगितलं होतं. आपण त्यालाही गोळ्या घातल्या.

Web Title: pravin tokekar's article in saptarang