कल्याणाची प्रार्थना

namskar
namskar

सकीनाला बाजारात एकटीलाच पैसे गोळा करताना बघून, मी अचंबित झालो. तिच्या मैत्रिणी कुठेही दिसत नव्हत्या म्हणून तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली, "सब हैदराबाद भाग गए' तिला हैदराबादला न जाण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली, "जहॉं बचपना गया, वहॉं से बाहर जाने को दिल नहीं करता...' सकीना आणि तिच्या मैत्रिणी, सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत हायवेला असणाऱ्या रेल्वेगेटजवळ, टाळ्या वाजवून पैसे जमा करायच्या. रेल्वेगेट बंद झाले रे झाले की, तिथे थांबलेल्या प्रत्येकांकडून केवळ दहा रुपयांची अपेक्षा करायच्या. कधी उपेक्षा, तर कधी अवहेलना सहन करून स्वतःच्या चेहऱ्यावरील बटबटीत मेकअपचा रंग फिका पडू दिला नाही. ज्याने पैसे दिले त्याला आशीर्वाद द्यायच्या. बोटांच्या मध्ये नोटांची चवड कोंबून दोघी-तिघी रेल्वेगेटजवळचं भावविश्‍व ढवळून काढायच्या.
आपल्याच माणसातली ही माणसं. निसर्गानं त्यांच्या वाट्याला साधं-सोपं जिणं दिलं नव्हतं. प्रत्येकांना त्यांची टिंगल-टवाळी उडवताना, त्यांच्याशी अश्‍लील चाळे करताना मी कित्येकदा बघितले. माझी गाडी थांबली की, माझा हात अलगद खिशात जायचा आणि त्यांचा वाटा त्यांच्या पदरात पडायचा. रेल्वेगेट कधी बंद होईल, याचीच वाट पाहात बसायच्या. नियतीनेही त्यांच्याशी डाव मांडला. दहा वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम आत्ताच पूर्ण झाले. लोकांचा प्रवास नव्या कोऱ्या पुलावरून सुरू झाला. रेल्वेगेटची कटकट, वाहतुकीची कोंडी संपली. त्यासोबतच तृतीयपंथींच्या त्रासापासून प्रवाशांची सुटका झाली. नाइलाजाने त्यांना शहर सोडून इतर ठिकाणी परागंदा व्हावं लागलं. कुटुंबीयांनी त्यांना नाकारलंच होतं; पण सकीना आणि तिच्या मैत्रिणींनी आपल्या आसपास राहणाऱ्या गरिबांना आपलंस केलं होतं. रात्री-बेरात्री आजारपणात सर्वार्थाने धावून गेल्या होत्या. आता मात्र त्यांचीच अन्नासाठी धावपळ सुरू झाली होती. काळ कुणाचाही मित्र अथवा शत्रू नसतो. तो तटस्थ असतो आणि आम्ही प्रवाही.
विकासाने अनेकांचे भले झाले; पण सकीना आणि तिच्या मैत्रिणींचा रोजगार गेला. तिथे असणारी छोटी-छोटी दुकाने बंद झाली. आता केवळ उरला रेल्वेगेट आणि सध्यापुरता गेटमन. उद्या तोही जाईल. रेल्वेगेट म्हणजे एक विसावा होता. लोकं काही क्षणापुरती थांबायची. चर्चा करायची. रेल्वेतून जाणाऱ्या माणसांकडे बघायची. गर्दी तुंबली तरी माणुसकीने वाट काढायची, हालहवाल विचारायची... आता ते होणे नाही. सर्व सुसाट पळतात. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी असल्यासारखे... या उड्डाणपुलाने माणसाचं जगणं गतिमान केलं खरं; पण भावनांची अगतिकता तिथे सतत रेंगाळताना दिसते.
प्रगती आणि विकास सर्वांना प्रिय आहे. ही मापकं आपल्या एका हातावर मलाई ठेवतात, तर दुस-या हातावर निखारा. ज्याच्या हातात मलाई आली त्यांच्या घरात हिरवळ नांदते. ती हिरवळ वैभवाची, भौतिकतेची असेलही किंबहुना नसेलही; पण प्रासंगिक स्थिती वैभवपटलाला सलाम करते. पण, ज्यांचे हात विस्थापिताच्या आगीत होरपळले जातात; त्यांचे भूमी, शिवार, भाकर सारं करपून जाते. जगण्याची भाकर नव्या गावात शोधावी लागते. सकीनासारखी जिगरबाज माणसं नवीन आव्हाने पेलत, मुठीत वादळाला घेऊन प्रश्‍नांची उत्तरे शोधतात. उद्याच्या भटकंतीत कुणाचेतरी संसार पुलाखाली स्थिरावेल. कृतज्ञतेसाठी त्यांचेही मन सद्‌गदीत होईल. आणि कुणाच्यातरी कल्याणाची प्रार्थना तिथेही घडून येईल.
मला आठवते, उन्हाळा सुरू झाला की, आमच्या लहानपणी एक फकीर गावात यायचा. त्याचा मुक्‍काम ग्रामपंचायतीच्या ओसरीत असायचा. संध्याकाळ झाली की, हातात कंदील घेऊन बुढा-बुढी सुखी ठेवा, गाय-वासरू सुखी ठेवा, लेकरं-बाळं सुखी ठेवा म्हणत गावाच्या कल्याणाची मागणी निसर्गाला करायचा. शेवटच्या दिवशी गावातून जे मिळेल ते स्वेच्छेने दिलेले गोळा करून निघून जायचा. त्याने स्वतःचा संसार उघड्यावर मांडला होता; पण इतरांच्या कल्याणाचे पसायदान निसर्गाला मागितले होते. मला प्रश्‍न पडायचा हा कुठलेही गीत गात नाही, कुठलीही नक्‍कल करून दाखवत नाही; केवळ सुखी ठेवा, सुखी ठेवा म्हणतो. फकिराची मागणी विश्‍व कल्याणाची होती, हे आता समजायला लागलं. संताच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने अशाच लोकांनी जपला आणि चालवला. ज्यांच्याकडे भरपूर काही देण्यासारखे असते त्याच्या हाताचं औदार्य खुजं असते. जो फकीर असतो तो इतरांच्या सुखासाठी सतत प्रयत्नशील असतो.
प्रत्येकाने प्रत्येकांसाठी थोडीतरी मानवतेची ओल शाबूत ठेवली पाहिजे. जात-धर्म-वंश या पलीकडे अर्थ नावाची संसाराला चिकटलेली परंपरागत व्यवस्था मायावी जगात माणसा-माणसांतील अंतर अधिक गडद करीत आहे. श्रीमंताला ओढ श्रीमंतीकडे, गरिबांची धावपळ गरिबीच्या कोशातून बाहेर पडण्यासाठी... दूर डोंगरावर वसलेल्या आदिम वस्त्या अजूनही उजेडाची वाट बघत निबीड अरण्यात कधीच्या वास करून आहेत.
जगण्याला असू द्या रे थोडी तरी माती
अंधारल्या भुईमध्ये पेटू द्या रे वाती.
उन्हं-पावसात जीव राबतो-कुढतो
घास आभाळाचा व्हावा म्हणून लढतो.
लढणाऱ्या माणसाला द्या रे थोडी छाती
जगण्याला असू द्या रे थोडी तरी माती.
हे आर्जव वजा प्रार्थना आमच्या मनात वास करायला हवी. आम्हाला सकीना किंवा फकीर होता येत नाही. पण, अशा दुआ मागणाऱ्या माणसांसाठी आम्ही आमची ओंजळ भरून ठेवली पाहिजे. कुणाच्या संघर्षमय वाटेवर आम्ही दगड नाही, तर फुले व्हायला पाहिजे. लढणाऱ्या माणसाचा आधार व्हायला पाहिजे. अशा विरूप परिस्थितीत माणसाच्या कल्याणाची प्रार्थना माणसाने गावी. इतरांच्या पायात काटा रुतला की, आपल्या डोळ्यात पाणी यावे, ही तीव्र संवेदनशील जाणीव निर्माण झाल्याखेरीज माणसाचे मंगल होणार नाही.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com