आयुष्याच्या संध्याकाळी जबाबदारीचे ओझे

नातवंडांमध्ये रमणे ज्येष्ठांना आवडतं; पण ती जबाबदारी त्यांच्यासाठी ओझे ठरू नये...
Old People Responsibility
Old People Responsibilitysakal

- प्रीती शिंदे

नातवंडांमध्ये रमणे ज्येष्ठांना आवडतं; पण ती जबाबदारी त्यांच्यासाठी ओझे ठरू नये...

काळ बदलतोय. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीचे विचारही बदलताहेत. पूर्वी एकत्र मोठ्या कुटुंबात राहून सून, सासू, आजी व पणजीपर्यंतचा प्रवास करीत तिथेच आयुष्याचा अखेरचा श्वास घेऊन निघून जाणारी पिढी आता संपत आली आहे. किंबहुना संपलीच आहे. आत्ता जी वृद्ध पिढी आहे, ती वर्ष ६० ते ८० मधील आहे, त्यांनी समाजातील एक आमूलाग्र बदल पाहिला आहे.

संयुक्त कुटुंब पद्धती ते वृद्धाश्रमापर्यंतची वाटचाल त्यांना माहीत आहे. ग्रामोफोन, रेडिओ, टीव्ही, पेजर, मोबाईल, कम्प्युटरपासून सुरू झालेली प्रगती ते अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान पाहिलेले हे साक्षीदारच जणू.

४० ते ५० वर्षे काटकसर करीत, आयुष्यातील खस्ता खात, अनेक जबाबदाऱ्या पेलवत त्यांनी त्यांचा संसार केलेला असतो. मुला-मुलींच्या लग्नानंतर झालेली त्यांची विभक्त कुटुंबे त्यांनी आता स्वीकारली आहेत. लांब राहून नाते टिकविणे त्यांनाही पटू लागले आहे (काहींच्या बाबतीत नाईलाजास्तवही असेल). अशा बदललेल्या काळात त्यांनी जर स्वतःच्या आनंदाचा, त्यांना जसे हवे आहे तसेच जगण्याचा जर विचार केला, तर आपण त्यांचे स्वागतच करायला हवे.

सध्या जे आपल्या अवतीभवती चालू आहे, त्याच्यात आणखी एक जाणवते की, मुला-मुलींच्या लग्नानंतर त्यांना मुले झाली की, ते आपल्या आई-वडिलांना गृहीत धरतात. त्यांना घरी येऊन राहण्याचे आमंत्रण दिले जाते. नातवंडाच्या ओढीने हे आजी-आजोबाही नाही म्हणत नाहीत. घरी आल्यानंतर मात्र त्यांच्यावर नातवंडाच्या जबाबदाऱ्या येतात. सून-मुलगा असो किंवा मुलगी-जावई दोघेही नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असतात.

घरात मोलकरीण असतेच; घर कामासाठी. नातवंडाचे खाणे पिणे, त्याला शाळेच्या बसपर्यंत नेणे व आणणे, खूप लहान असेल तर गार्डनमध्ये घेऊन जाणे, त्यांचे रुसवे-फुगवे, आजकालच्या मुलांचे मोबाईलचे वेड, त्यांच्या क्लासच्या वेळा पाळणे या सगळ्यात आजी-आजोबांची दमछाक होते.

हे करताना त्यांना कितीही त्रास होत असेल, तरी ते कधीच या गोष्टींची तक्रार तुमच्याकडे करणार नाहीत. त्यांच्यावरील संस्कार कधीच त्यांना तक्रार करण्यास परवानगी देणार नाहीत. आपल्याला तर असे वाटत असते की नातवंडाबरोबर या वयात दिवस घालवायला मिळतो आहे, मग यांना अजून काय हवे आहे? किती सुखी आहेत ते! इथेच आपण त्यांना समजून घेण्यात चुकतोय. आयुष्यभर त्यांनी हेच केले आहे.

संसार, काटकसर, जबाबदाऱ्या, कर्तव्य इत्यादी. ज्या वयात निवांतपणा हवा त्या वेळी पुन्हा नातवंडांच्या जबाबदाऱ्या, आपल्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, हे सगळे खरेच त्यांना हवे आहे का? याचा विचार या पिढीने करायला हवा. आपल्या आनंदात, दुःखात व गरजेवेळी ते आपल्या सोबत असणारच आहेत. ते कधीच आपल्याला नाराज करणार नाहीत; पण आता त्यांना नका अडकवू जबाबदाऱ्यांत.

त्यांनाही आवडते त्यांच्या वयाच्या मित्र-मैत्रिणी बनविणे, त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे, एकत्र जाऊन चित्रपट पाहणे, जवळच कुठे सहलीला जाणे. त्यांचीही आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलत चालली आहे. त्यांनाही मुक्त राहण्यातला आनंद हवाहवासा वाटतो आहे. त्यांनाही आवडू लागले आहे.

आता सोशल मीडियावर अपडेट राहणे, स्टेटस टाकणे, स्वतःचा डीपी लावणे, त्यांनाही पडते भुरळ या क्षणिक आनंदाची. त्यांना आहेच कल्पना कधीही त्यांचा शेवट होऊ शकतो याची, मग चला तर त्यांच्या आनंदातच आपला आनंद समजून साजरी करूयात त्यांची संध्याकाळ.

आधुनिक युगासोबत जीवनशैली बदलत चालली आहे. तशीच आवड-निवड आपल्या मुला-मुलींचे आजोबा झालेल्या आपल्या आई-वडिलांचीही बदलली असेल. त्यांनाही मुक्त राहण्यातला आनंद हवाहवासा वाटत असेल. सोशल मीडियावर अपडेट राहणे, स्टेटस टाकणे, स्वतःचा डीपी लावणे, त्यांनाही आवडत असेल; पण आपण त्यांच्यावर आपल्या मुलाच्या देखरेखीच्या जबाबदारीचे ओझे टाकून, त्यांचा आनंद हिरावून तर घेत नाही ना, हे जाणून घेण्याची गरज आहे...

(लेखिका मेकॅनिकल इंजिनिअर असून, त्यांनी काही महत्त्वाच्या प्रायोगिक नाटकांत काम केले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com