'कुटुंबजीवना'कडं चला... (प्रा. डॉ. भरत देसाई)

प्रा. डॉ. भरत देसाई
रविवार, 3 जून 2018

"आजी-आजोबा नातवंडांना राजीखुशीनं सांभाळत असतील तर गोष्ट वेगळी; पण त्यांनी नातवंडांना सांभाळलंच पाहिजे, अशी जबरदस्ती त्यांच्यावर करता येणार नाही,' अशा आशयाचा निकाल कौटुंबिक न्यायालयानं एका प्रकरणात नुकताच दिला आहे. या खटल्यात मूळ मुद्दा "लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी' हा असला, तरी एकूणच कुटुंबजीवनाचा एक भाग या दृष्टिकोनातूनही त्याकडं बघायला हवं. "कुटुंबजीवन' या संकल्पनेचा विचारच आज कुणी करताना दिसत नाही. कारण, आपण सगळेच आज आत्मकेंद्री झालो आहोत का? तसं असेल तर हे असं तुटलेपण, विखुरलेपण टाळण्यासाठी कुटुंबजीवन ही संकल्पना आणि तिचं महत्त्व जाणून घ्यावं लागेल.

"आजी-आजोबा नातवंडांना राजीखुशीनं सांभाळत असतील तर गोष्ट वेगळी; पण त्यांनी नातवंडांना सांभाळलंच पाहिजे, अशी जबरदस्ती त्यांच्यावर करता येणार नाही,' अशा आशयाचा निकाल कौटुंबिक न्यायालयानं एका प्रकरणात नुकताच दिला आहे. या खटल्यात मूळ मुद्दा "लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी' हा असला, तरी एकूणच कुटुंबजीवनाचा एक भाग या दृष्टिकोनातूनही त्याकडं बघायला हवं. "कुटुंबजीवन' या संकल्पनेचा विचारच आज कुणी करताना दिसत नाही. कारण, आपण सगळेच आज आत्मकेंद्री झालो आहोत का? तसं असेल तर हे असं तुटलेपण, विखुरलेपण टाळण्यासाठी कुटुंबजीवन ही संकल्पना आणि तिचं महत्त्व जाणून घ्यावं लागेल. त्याविषयी...

भारत ब्रिटिशांचा गुलाम झाला होता हे वाईटच होतं; परंतु त्यापूर्वीच्या राजवटीच्या तुलनेत काही चांगल्या गोष्टीही त्या काळात घडत गेल्या. लढायांचं प्रमाण खूप कमी झालं, समाजजीवन हळूहळू स्थिरावलं, शिक्षणसंस्थांचं जाळं पसरू लागलं आणि स्वातंत्र्यानंतर स्त्री-शिक्षणाचं प्रमाणही वाढत गेलं. परिणामी स्त्री-पुरुष समानतेचा विचार प्रबळ होत गेला. घरकामाच्या दंडाबेडीतून अधिकाधिक सुटका होत गेल्यानं पुरुषांप्रमाणेच घराबाहेरच्या मुक्त हवेचा अनुभव सुशिक्षित, नोकरदार महिला घेऊ लागल्या. प्रारंभी घरचं सगळं सांभाळून महिला नोकऱ्या करत असल्यानं पुरुषांना कुठल्याच अडचणी नव्हत्या. त्यांचं सगळं पूर्वापार चालूच राहिलं. शिवाय, घराचं उत्पन्नही वाढलं. दोन्ही आघाड्या सांभाळणारी कमावती सून सासूबाईंच्याही कौतुकाची होती; पण काळ कुणासाठी थांबतो थोडाच!

तंत्रज्ञानाच्या विलक्षण प्रगतीमुळं "कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त काम' हा मंत्र सर्व प्रकारच्या कष्टाच्या कामांमध्ये प्रत्यक्षात येत गेला आणि अगदी हळूहळू कळत-नकळत सारा समाज सुखासीन होत गेला. भारतीय समाजाचं सरासरी वयोमान 1947 मध्ये केवळ 37 वर्षांचं होतं ते आज थेट 67 च्या पुढं गेलं खरं; पण आरोग्य मात्र - अनेक साथीचे रोग आटोक्‍यात येऊनही - सतत खालावत गेलं. उच्च, उच्चतम शिक्षण = बौद्धिक विकास = भरपूर उत्पन्न देणारे उद्योग-व्यवसाय या तशा तर चांगल्या बदलांबरोबरच असं काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांचा "अहं' मात्र स्वाभिमान, आत्मसन्मान या गोंडस शब्दांच्या आड वाढत गेला आणि आजअखेरीस "माणूस हा कळपात राहणारा प्राणी होय' या व्याख्येची जागा "गर्दीत असूनही एकटाच राहणारा प्राणी म्हणजे माणूस' या व्याख्येनं घेतली आहे. आम्ही ऑटिस्टिक मुलांसारखे "स्वमग्न' होत आहोत का?

आपण आत्मकेंद्री का झालो आहोत?
कौटुंबिक न्यायालयाच्या ज्या एका निकालामुळं लहानग्यांना सांभाळण्याच्या समस्येपायी तरुण आणि ज्येष्ठ पालकांमधील "ही जबाबदारी कुणाची?' या प्रश्‍नाचं उत्तर "ही जबाबदारी "प्रत्यक्ष पालकांची, आजी-आजोबांची नव्हे' ' असं मिळालं, त्याचा थोडा विचार करू या...म्हणजे प्रारंभीच्या विवेचनाचा संबंधही स्पष्ट होईल. एक "मानसशास्त्रीय समुपदेशक' या भूमिकेतून विचार करता न्यायालयाचा अंतिम निकाल जरी योग्यच वाटत असला, तरी ती तक्रारदार महिला थेट न्यायालयात का गेली असावी? पती आणि सासू-सासरे यांचा आधार तिला का मिळत नाहीये? मुलांच्या काळजीपोटी अर्थार्जनासाठी तिला कामावर जाणं अपरिहार्यच असल्यास पाळणाघराचा पर्याय - काही उणिवा असूनही- तिला का पटला नाही? तिला आर्थिक मदत न करणाऱ्या पतीकडून मुलांच्या संगोपनातल्या इतर कामांसाठी तरी तिला सहकार्य मिळत आहे की नाही? तिची मानसिक कोंडी तर झालेली नाही ना? अशा असंख्य उपप्रश्‍नांची उत्तरं शोधण्याची गरज वाटते. त्या अभागी आईला दोषी ठरवण्याची घाई करून चालणार नाही. कारण, "कुपुत्रो जायेत, क्वचिदपि कुमाता न भवति।' या जुन्या संस्कृत वचनावर अजूनही विश्वास ठेवावासा वाटतो. एक प्रश्‍न मात्र वारंवार मनात येतो व तो हा की ती आई, तिचा पती आणि ते आजी-आजोबा हे सगळेच थोड्याफार प्रमाणात "आत्मकेंद्री' किंवा वर म्हटल्याप्रमाणे "स्वमग्न' तर झालेले नाहीत ना! केवळ स्वतःच्या (कदाचित अविवेकी) गरजा भागवण्यासाठी इतरांकडून विशिष्ट वर्तनाच्या अपेक्षा ठेवत असल्यामुळं तर त्यांचा परस्परसंवाद इतका खालावला नसेल ना? अन्यथा पोटगीसाठी केलेल्या दाव्याच्या सुनावणीदरम्यान "सासू-सासऱ्यांनी मुलांना सांभाळावं' अशी मागणी का केली जाते?

"माझंमय'मधूनही काढता येतो मार्ग
कौटुंबिक न्यायालयातल्या या खटल्यात मूळ मुद्दा लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी हा असला, तरी एकूणच कुटुंबजीवनाचा एक भाग या दृष्टिकोनातून त्याकडं बघायला हवं.
आजचं कुटुंबजीवन, विशेषतः शहरी आणि निमशहरी भागातलं कुटुंबजीवन कसं आहे ते सर्वजण जाणतात. माझं करिअर, माझी आर्थिक प्रगती, माझं मित्रमंडळ, माझे छंद, माझी स्पेस आणि अधूनमधून माझं घर असं सगळं "माझंमय' झालेलं आहे. माझ्या नजरेतून माझं सगळंच योग्य, आवश्‍यक असतं, चांगलं असतं. मग ज्या इतरांना ते बऱ्यापैकी पटत व रुचत असेल, ती माणसंही माझी व म्हणून चांगली. साहजिकच जे वेगळा विचार मांडतील, वेगळं बोलतील, करतील ते चांगले कसे असतील? मग सुरू होतं घरातलं शीतयुद्ध!

व्यक्तिविकासाचं मानसशास्त्र सांगतं, की सुख-समाधानाचे तीन आवश्‍यक घटक आहेत ः स्वीकृती, प्रेम आणि उपलब्धी (Achievement). स्वीकार मी स्वतः आणि इतरांनीही करायला हवा. हेच इतर दोन घटकांनाही लागू आहे. पती-पत्नीच्या सुखी दांपत्यजीवनाचं रहस्य सांगतानादेखील परस्परप्रेम, आदर आणि विश्‍वास ही त्रिसूत्री मांडली जाते; पण क्वचितच हे सांगितलं जातं, की हा सुखाचा मार्ग प्रत्यक्षात जातो तो त्यागामधून. होय त्यागामधून. गेली काही हजार वर्षं- कारणं कोणतीही असोत- पण घराघरातल्या गृहिणींनी छोटे-मोठे असंख्य त्याग वारंवार केले म्हणून संसार टिकले आणि टिकले म्हणून सुख-समाधानाच्या अनेक शक्‍यताही निर्माण होत राहिल्या. आज स्त्री-पुरुष समानतेच्या आणि स्त्री-मुक्तीच्या काळात तसाच त्याग पुरुषांनीही करायला हवा आहे. त्याग करायचा म्हणजे स्वतःच्या काही इच्छा-आकांक्षांना मुरड घालायची. नेमक्‍या कुठल्या इच्छांना ते ठरवता येण्यासाठी काही पूर्वाभ्यास लागेल. उदाहरणार्थ ः स्वतःची शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक बलस्थानं आणि दुर्बल स्थानं ओळखणं. हेच जोडीदाराबाबतही करणं. नंतर परस्परांच्या बलस्थानांद्वारे काही गोष्टी करण्याच्या संधी साधणं. हे करताना एकमेकांची दुर्बल स्थानं झाकून न ठेवता त्यावर मनमोकळी चर्चा करत राहणं. थोडा विचार केला तर नक्की लक्षात येईल, की हे करताना समानतेच्या अवाजवी धडपडीपेक्षा परस्परांना पूरक कसं नि कुठं ठरता येईल ते ओळखून कृती करणं हे सहजीवन अधिक आनंदाचं बनवेल. स्त्री-पुरुषांची परस्परपूरकता निसर्गदत्त आहे. घरकाम, संगोपन हे क्षेत्र स्त्रियांचं आणि नोकरी-व्यवसाय पुरुषांसाठी हे सार्वत्रिक ठेवून चालणार नाही. त्याबाबतचे तडजोडीचे निर्णय ज्या त्या जोडप्यानं खरंतर लग्न जुळवतानाच घ्यायला हवेत; पण थोडी हिंमत दाखवली तर वैवाहिक जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत ते शक्‍य आहे. ज्यांना यात अडचणी जाणवतील त्यांनी समुपदेशकाची मदत घ्यावी.

आपलं कुटुंबजीवन समाधानी कसं होईल ते सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे. समाधानी कुटुंबांचा जो थोडाफार अभ्यास मला करता आला त्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्यानं आढळल्या. एक म्हणजे त्यागाधारित सहजीवन जगण्याचा प्रयत्न आणि दुसरी त्याहूनही जास्त महत्त्वाची बाब होती ती म्हणजे एखाद्या सामाजिक समस्येच्या निराकरणासाठी जमेल तेवढा प्रयत्न शक्‍यतो कुटुंबातल्या जास्तीत जास्त सदस्यांनी करणं. दारिद्य्र, अपंगत्व, वार्धक्‍य, निरक्षरता आणि अशाच एखाद्या समस्येनं ग्रासलेल्या व्यक्तीला किंवा समूहाला निःस्वार्थ बुद्धीनं आपण जेव्हा मदत करतो, तेव्हा मिळणाऱ्या आनंदाची गोडी अवीट असते. कारण, आपण आत्मकेंद्रिततेमधून बाहेर पडून इतरांशी जोडून घेत असतो. हे करताना कळत-नकळत जाणवू लागतं, की "अरे, यांच्या समस्या किती गंभीर आहेत आणि आपण मात्र सगळं काही असूनही छोट्या छोट्या मुद्द्यांना नको इतकं महत्त्व देत बसतो आहोत!' मग काय बिशाद आहे घर असमाधानी राहील!

"कुटुंबजीवन' अभ्यासक्रमात हवं !
अशा प्रकारे कुटुंबजीवन बऱ्यापैकी स्थिर करण्याचे हे काही उपाय असले, तरी असे गंभीर लेख किती जण वाचणार? त्यातूनही ज्यांना उपाय करताना अडचणी येतील त्यांना वेळेला समुपदेशक (तोही सक्षम) सापडणार का? म्हणूनच एक वेगळा उपाय सुचवावासा वाटतो व तो म्हणजे "कुटुंबजीवन' नावाचा एक विषयच शक्‍य त्या पातळ्यांवर अभ्यासाला ठेवणं. इयत्ता आठवीपासून सुरू करून पदवी, पदविका, पदव्युत्तर वर्ग, प्रौढशिक्षण अशा सर्व ठिकाणी तो असावा. याचे अभ्यासक्रम ज्या त्या पातळीसाठी तयार करता येतील. त्यामध्ये मानसतज्ज्ञ, समुपदेशक यांसह समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, सक्रिय तत्त्वज्ञ अशा अनेकांचा सहभाग असावा. यासाठीचा पुढाकार अर्थातच शासनाला घ्यावा लागेल. शेवटी शिक्षणाद्वारे होणारं परिवर्तन संथ असलं, तरी योग्य दिशेकडं नेणारं आणि टिकाऊ असतं.

समस्या जेवढी गुंतागुंतीची तेवढीच उपाय करणाऱ्यांची टीमही मोठी आणि विविध संबंधित अभ्यासक्षेत्रातल्या तज्ज्ञांना एकत्र आणणारी म्हणजेच समावेशक (Collaborative) असायला हवी. "चारित्र्यसंवर्धन' केंद्रभागी ठेवून व्यक्तिविकास घडवणारा आणि "परस्परपूरकतेवर आधारित सहजीवन' या संकल्पनेतून कुटुंबजीवन विकसित करणारा असा हा अभ्यासक्रम असावा. त्यामध्ये अनुभवशील अध्ययनाची (Experiential Learning) तंत्रं वापरली जावीत.

समस्यांची व्याप्ती पाहता या उपायाचा प्रारंभ जिथं कुशल अध्यापक पुरेशा संख्येनं मिळू शकतील अशाच ठिकाणी करावा. अशा प्रशिक्षकांचं प्रशिक्षणही योजावं लागेल. सुदैवानं महाराष्ट्रात सक्रिय विचारवंतांची संख्या मोठी आहे. एक चिनी म्हण आहे "Even the longest journey begins with the first step.` प्रवास कितीही दूरवरचा असो, पहिल्या पावलानं तो सुरू होत असतो.
अखेरीस घर तर प्रत्येकाला हवंय; पण स्वतःच्या कल्पनेतलं! त्र, कवयित्री विमल लिमये यांच्या शब्दांत सांगायचं तर -
"घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती।
तिथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती।
या घरट्यातुन पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती।
आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती!

Web Title: prof dr bharat desai write family artilce in saptarang