अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाताना... (प्रा. डॉ. गणेश राऊत)

प्रा. डॉ. गणेश राऊत
रविवार, 24 मार्च 2019

"थोरांचे अज्ञात पैलू' हे डॉ. सदानंद मोरे यांचं पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावं असं आहे. "सकाळ'च्या "सप्तरंग' पुरवणीतल्या लेखांचं हे संकलन आहे. या लेखांमधून डॉ. मोरे वाचकांसमोर "थोरांचे अज्ञात पैलू आणि अज्ञात महाराष्ट्र' अशा दोन्ही गोष्टी दाखवून देतात. पुस्तक वाचताना अनेकदा आपली अवस्था "अरेच्चा! हे आपल्याला ठाऊकच नव्हतं' अशी होते. हेच या पुस्तकाचं यश आहे. या लेखांमध्ये व्यक्तींवर आधारित, विषयांवर आधारित लेख आहेत. या लेखमालेचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातल्या अनेक व्यक्ती वेगळ्या रूपांत लेखकानं आपल्यासमोर उभ्या केल्या आहेत. प्रत्येक लेख लिहिताना तीन पथ्यं पाळणं आवश्‍यक होतं.

"थोरांचे अज्ञात पैलू' हे डॉ. सदानंद मोरे यांचं पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावं असं आहे. "सकाळ'च्या "सप्तरंग' पुरवणीतल्या लेखांचं हे संकलन आहे. या लेखांमधून डॉ. मोरे वाचकांसमोर "थोरांचे अज्ञात पैलू आणि अज्ञात महाराष्ट्र' अशा दोन्ही गोष्टी दाखवून देतात. पुस्तक वाचताना अनेकदा आपली अवस्था "अरेच्चा! हे आपल्याला ठाऊकच नव्हतं' अशी होते. हेच या पुस्तकाचं यश आहे. या लेखांमध्ये व्यक्तींवर आधारित, विषयांवर आधारित लेख आहेत. या लेखमालेचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातल्या अनेक व्यक्ती वेगळ्या रूपांत लेखकानं आपल्यासमोर उभ्या केल्या आहेत. प्रत्येक लेख लिहिताना तीन पथ्यं पाळणं आवश्‍यक होतं. व्यक्ती थोर पाहिजे किंवा ती थोरांच्या सहवासात पाहिजे. तिच्या ज्ञात असलेल्या गोष्टी सांगायच्या नाहीत. अज्ञात पैलू- म्हणजे त्या व्यक्‍तीची अष्टपैलू कामगिरी समोर येईल, अशाच गोष्टी- वाचकांपुढं मांडायचे. वर्षभर अशा प्रकारचं सदर लिहिण्यासाठी एक वेगळ्याच प्रकारची तपश्‍चर्या लागते, ती लेखकानं पूर्वीच केलेली असल्यामुळं पुस्तक वाचनीय झालं आहे.

डॉ. मोरे हे महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे जाणते अभ्यासक आहेत. त्यांनी आयुष्यभर जे ज्ञानकण गोळा केलेले आहेत, ते सगळे वाचकांसमोर अगदी मोजक्‍या शब्दांत मांडले आहेत. इतिहासाच्या पुस्तकांमधून आजवर "गाळीव' असलेला इतिहास लेखकानं आपल्यासमोर मांडला आहे. एकेका वाक्‍यात सार सांगितल्यामुळं एकाच वाक्‍यात संपूर्ण व्यक्ती वाचकासमोर उभी राहते. उदाहरणार्थ, "समताधिष्ठित समाजरचनेचा पुरस्कर्ता' या लेखात त्यांनी केलेलं शरद पाटील यांचं वर्णन पुढीलप्रमाणं : "बहुजनांच्या संस्कृत ज्ञानाचा "बॅकलॉग' त्यांनी एकट्याने भरून काढला, असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही.' या एकाच वाक्‍यावर अख्खा लेख तोलला गेला आहे. शेवटच्या "महानुभाव आणि वारकरी' या लेखात बाभुळगावकर शास्त्री यांच्या संदर्भात मोरे यांनी कोणताही अभिनिवेश न बाळगता सहज लिहिलं आहे, की "त्यांच्यामुळं मला कितीतरी अज्ञात गोष्टी ज्ञात झाल्या.' पैलू मांडत असताना डॉ. मोरे ज्याचं श्रेय त्याला देण्यात कंजूषपणा करत नाहीत. उदाहरणार्थ, "शरद जोशी आणि शेतकरी चळवळ' या लेखात डॉ. मोरे लिहितात : "संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मी संत नामदेव, गुरू गोविंदसिंग, हुतात्मा विष्णू, गणेश पिंगळे, शिवराम हरी राजगुरू यांचे संदर्भ देत महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातले संबंध अधोरेखित केले; पण एक महत्त्वाचा दुवा माझ्याकडून राहून गेला. तो लक्षात आणून देण्याचं काम भानू काळे यांच्या "अंगारवाटा : शोध शरद जोशींचा' या शरद जोशी यांच्या चारित्रानं केलं.' एका मोठ्या मनाच्या अभ्यासकानं दुसऱ्या मोठ्या मनाच्या अभ्यासकाला दिलेली ती दाद आहे.

या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना लेखकानं मनोगतातून मांडली आहे. त्यावरून लेखकाच्या मनोवृत्तीवर प्रकाश पडतो आणि पुस्तकाचं मध्यवर्ती सूत्र समजतं. अर्थात, सूत्र समजावून सांगण्यावरच डॉ. मोरे यांचा भर असतो. संत तुकाराम यांच्या संदर्भात ते लिहितात : "स्वत: तुकोबांचे दिवाळे निघाले, ते त्यांच्यात पुरेशी व्यावसायिकता नव्हती, त्यांना हिशेबच करता येत नव्हता म्हणून नव्हे. दिवाळे निघाल्यानंतरही ते "बरे झाले देवा निघाले दिवाळे' असे म्हणतात. याचाच अर्थ या प्रकारातून झालेला "लाभ' दिवाळ्यामुळे झालेल्या नुकसानीपेक्षा त्यांना महत्त्वाचा वाटला असणार, हे उघड आहे.' हे सूत्र लक्षात घेतलं, की पुस्तक समजायला सोपं आहे.
महाराष्ट्राबद्दल बोलताना गांधीजी म्हणाले होते, की हे राज्य अधिक जागरूक आहे. त्याचा प्रत्यय आपणास या पुस्तकातून येतो. टिळक आणि गांधी युगात भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्रानं महत्त्वाची भूमिका बजावली. हजारो ध्येयधुंद झालेल्या लोकांनी आपल्या घरावर निखारे ठेवले. सुरवातीला स्वराज्यासाठी आणि नंतर स्वातंत्र्यासाठी लोकांनी स्वत:ला समर्पित केलं. लोक वेगवेगळ्या क्षेत्रांत गेले. आपल्यात असणारे गुण त्यांनी समाजासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. उदाहरणार्थ लोकमान्य टिळक गणिताच्या संशोधन क्षेत्रात शिरले असते, तर त्यांनी जगाच्या गणिताच्या आकलनात मोलाची भर घातली असती. परंतु, देशसेवेपुढं त्यांनी गणिताला नकार देऊन राजकीय कार्यातल्या बेरीज आणि गुणाकारावर भर दिला. हे सगळं समजून घेण्याची समज समाजात निर्माण व्हायची होती. त्यातही क्रांतिकारकांच्या वाट्याला जास्तच उपेक्षा आली. अनेकांनी घराकडं दुर्लक्ष करून देशाला प्राधान्य दिलं. अशा देशाला प्राधान्य देणाऱ्या लोकांना स्वातंत्र्यानंतर विस्मृतीत जावं लागलं. कारण, लोकांचे आणि नेत्यांचे प्राधान्यक्रम बदलून गेले. अशा वेळी विस्मृतीत गेलेल्या नायकांचं स्मरण करणं, त्यांचं कार्य उजेडात आणणं हे एका अर्थानं आजच्या पिढीचे किंवा जुन्या पिढीच्या खांद्यावर उभ्या असणाऱ्यांचं कर्तव्य असते. ते कर्तव्य करण्यात डॉ. मोरे यांनी कसूर केली नाही.

खरं म्हणजे, या पुस्तकाचे क्रमश: आणखी भाग येणं गरजेचं आहे. कारण यात पन्नासच लेख आहेत. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इथलंही नेतृत्व आणि पुढं भारतभरातल्या विविध व्यक्ती (उदाहरणार्थ, कोकणचे गांधी, जे. पी. नाईक, सी. राजगोपालाचारी) यांचाही परामर्श होणारं लिखाण डॉ. मोरे यांनी करावं. कारण सोशल मीडियाच्या कोलाहलात सत्य काय आणि असत्य काय अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा ही पुस्तकं वाचकाला दिशा दाखवू शकतात, हेच या पुस्तकाचं यश आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रंथालयात आणि शाळा-महाविद्यालयांत हे पुस्तक पोचणं आवश्‍यक आहे. पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथांची यादी किंवा पूरक वाचनाची यादी वाचकांसाठी दिली असती, तर अधिक बरं झालं असतं.

पुस्तकाचं नाव : थोरांचे अज्ञात पैलू
लेखक : डॉ. सदानंद मोरे
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे
पानं : 250, किंमत : 350 रुपये

Web Title: prof dr ganesh rawut write book review in saptarang