संग्रहालयांची अजब दुनिया (प्रा. शैलजा सांगळे)

प्रा. शैलजा सांगळे shailaja.sangle@yahoo.com
रविवार, 14 मे 2017

येत्या गुरुवारी (१८ मे) आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन (International Museum Day) आहे. सन १९७७ पासून हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त जगभरातल्या १० आगळ्यावेगळ्या संग्रहालयांचा हा ओझरता परिचय...

येत्या गुरुवारी (१८ मे) आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन (International Museum Day) आहे. सन १९७७ पासून हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त जगभरातल्या १० आगळ्यावेगळ्या संग्रहालयांचा हा ओझरता परिचय...

कलात्मक व ज्ञानरंजक वस्तूंचा संग्रह म्हणजे संग्रहालय. प्रत्येक देशातली ही संग्रहालयं ही तिथली पारंपरिक कला-कौशल्यं, इतिहास, वास्तुकला आदींचा आरसाच असतात. संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक, कलारसिक व पर्यटक यांच्या दृष्टीनं अशा संग्रहालयांचं खूप महत्त्व असतं. हे झालं सर्वसाधारण आणि सर्वत्र आढळणाऱ्या संग्रहालयांविषयी. मात्र, या संग्रहालयांपेक्षा आगळीवेगळी अशी दहा संग्रहालयं जगातल्या विविध देशांत आहेत. त्यांचा समावेश ‘विचित्र (Weired) संग्रहालयां’च्या यादीत होतो.

लैलाचं हेअर म्युझियम
(Leila’s Hair Museum)

केसांपासून तयार केलेल्या कलात्मक वस्तूंचं संग्रहालय म्हणजे ‘लैला हेअर म्युझियम’. अमेरिकेतल्या मिसुरी या ठिकाणी हेअर आर्टच्या कलात्मक वस्तूंचं हे संग्रहालय आहे. हेअर आर्ट म्हणजे केसांचा वापर करून बनवलेल्या कलात्मक वस्तू. या कलेचा विकास प्रामुख्यानं व्हिक्‍टोरिया-युगात झाला. पूर्वी आपल्या आवडत्या किंवा प्रिय मृत व्यक्तीच्या स्मृती म्हणून लोक त्यांचे केस छोट्या डबीत जतन करून ठेवत असत. या विषयातल्या अभ्यासक-संशोधकांच्या मते, हेअर आर्टची कला सर्वप्रथम इंग्लंड व फ्रान्समध्ये विकसित झाली.  हेअर आर्टच्या साह्यानं नेकलेस, अंगठ्या, बांगड्या, लॉकेट, मोठी पदकं, चित्रांसाठीच्या चौकटी, व्यक्तिचित्रणं, भरतकामाचा वापर करून बनवलेल्या चित्रचौकटी आदी वस्तू बनवल्या जातात. या सगळ्या वस्तूंचा समावेश या संग्रहालयात आहे. केसांचा वापर करून तयार केलेले दोन हजारहून अधिक दागिने इथं आहेत. केसांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या कलात्मक अशा ६०० हून अधिक चक्रांचं दालन हे या संग्रहालयाचं वैशिष्ट्य. प्रसिद्ध व्यक्तींच्या मृतदेहावर ज्या प्रकारची चक्रं (Wreath) ठेवली जातात, तशा प्रकारची ही चक्रं आहेत.

मिसुरी इथं लैला कोहून नावाची हेअर ड्रेसर होती. तिला लहानपणापासून केसांचं खूप आकर्षण होतं. केस या विषयाचा तिचा अभ्यास दांडगा होता. त्यामुळं लोक तिला ‘केसांचा चालताबोलता ज्ञानकोश’ म्हणत. हा अभ्यास करता करता तिनं हेअर आर्टही शिकून घेतली.  कॉस्मेटॉलॉजीचं प्रशिक्षणही ती देत असे. महिला जेव्हा तिच्याकडं केशकर्तनासाठी येत, तेव्हा ती त्यांचे कापलेले केस जमा करून ठेवत असे. नातेवाईक तसंच नामांकित व्यक्तींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधूनही ती असे केस जमा करत असे. या केसांचा वापर करून तिनं कलात्मक वस्तू बनवल्या. तिनं तयार केलेल्या वस्तूंमध्ये मायकेल जॅक्‍सन, मेरिलिन मन्रो, अब्राहम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टन, व्हिक्‍टोरिया राणी, डॅनियल वेबस्टर आदी नामवंत व्यक्तींच्या केसांचा वापर करण्यात आला आहे. लैलानं बनवलेला पहिला दागिना म्हणजे आलंकारिक पान (Brutch). वैशिष्ट्य म्हणजे या संग्रहालयातल्या सगळ्या कलात्मक वस्तू स्वतः लैलानं बनवलेल्या आहेत.
***
टरबूज/कलिंगड संग्रहालय
(Watermelon Museum)

बीजिंग या चीनच्या  राजधानीच्या शहराच्या जवळच असलेल्या डक्‍सिंग काउंटीमध्ये हे टरबूज संग्रहालय आहे.
‘सगळ्यात जास्त टरबूज पिकवणारा देश’ अशी चीनची ओळख असून, साहजिकच ते चिनी लोकांचं आवडतं फळ आहे. चीनमध्ये डक्‍सिंग काउंटीमध्ये त्याचं भरपूर उत्पादन होतं. हे संग्रहालय ४३ हजार ५६ चौरस फुटांच्या परिसरात बांधण्यात आलेलं असून, ते टरबुजाच्याच आकाराचं आहे. त्याची सजावटही टरबुजासारखीच आहे; त्यामुळं बच्चेकंपनीचं हे आवडतं संग्रहालय आहे.

या संग्रहालयात टरबुजाची  मेणापासून बनवलेली वेगवेगळी मॉडेल, टरबूज खाणाऱ्या माणसांची-मुलांची चित्रं, टरबुजावर लिहिलेली पुस्तकं असं सगळं काही आहे; पण वास्तवातलं टरबूज मात्र या संग्रहालयात बघायला मिळत नाही! संग्रहालयाच्या सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या काही ऐतिहासिक कलात्मक वस्तू व पेंटिंगसुद्धा इथं आहेत. हे संग्रहालय निऑन दिव्यांच्या प्रकाशात झगमगून निघतं. टरबुजाचं मूळ स्थान असलेल्या दक्षिण आफ्रिकेपासून ते चीनपर्यंत या फळाचा प्रवास कसकसा झाला, ते इथं पाहायला मिळतं. टरबुजाचा केवळ इतिहासच नव्हे, तर त्याचं उत्पादन, टरबुजाचं पीक घेण्याचं तंत्र, विविध जाती व सांस्कृतिक महत्त्व यांविषयीचीही तपशीलवार माहिती या संग्रहालयात आहे. टरबूज खाणाऱ्या माणसांचे पुतळे या संग्रहालयाच्या आवारात, तसंच प्रवेशद्वाराजवळ उभे करून वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे.

अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यातल्या मेक्का या वाळवंटी प्रदेशात ‘इंटरनॅशनल बनाना म्युझियम’ उभारण्यात आलं आहे. त्या संग्रहालयाचा रंगसुद्धा केळ्याच्या रंगासारखा पिवळा आहे. तिथं केळ्याच्या आकारातल्या २० हजार वस्तू मांडण्यात आलेल्या आहेत. केळ्याच्या आकाराची उपकरणं, बंदुका, बागेत ठेवायची बाकं, स्टूल आदी वस्तू इथं पाहायला मिळतात. तिथल्या अन्नविक्री केंद्रांवर मिळणारे सगळे पदार्थ केळ्यापासूनचेच असतात, म्हणजे बनाना मिल्क शेक, वेफर्स, बनाना आईस्क्रीम, बनाना कूकीज, बनाना ब्रेड इत्यादी.
***

प्रेमभंग झालेल्या व्यक्तींच्या वस्तूंचं संग्रहालय (Museum of Broken Relationship)
छांदिष्ट लोक कोणत्याही वस्तूंचा संग्रह करतात व त्यात त्यांना मजा येत असते. याचं उदाहरण म्हणजे प्रेमभंग झालेल्या व्यक्तींच्या वस्तूंचं संग्रहालय!  युरोपातल्या क्रोशिया या देशात असं संग्रहालय आहे. प्रेमभंग झाल्यावर प्रियकराच्या आठवणींशी निगडित वस्तू तिथं जमवण्यात आलेल्या असून, त्यांच्याबद्दलची माहिती या संग्रहालयात मिळते. सन २०११ मध्ये या संग्रहालयाला ‘युरोपातलं सगळ्यात नावीन्यपूर्ण संग्रहालय’ म्हणून ‘केनेथ हडसन पारितोषिक’ देऊन गौरवण्यात आलं आहे.

या जगावेगळ्या संग्रहालयाची कल्पना सुचली ती दोन कलाकारांना. खरंच कलाकार कसे विक्षिप्त व अवलिये असतात, त्याची प्रचीती म्हणजे हे संग्रहालय. क्रोशिया इथला सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माता ओलिन्का व्हिस्टिका आणि सुप्रसिद्ध महिला-शिल्पकार ड्रॅझेन ग्रुबिसिक या दोघांचं चार वर्षं प्रेमप्रकरण सुरू होतं; पण २००३ मध्ये त्यांचा प्रेमभंग झाला व ते वेगळे झाले. त्यांचं प्रेम सफल झालं नाही; पण प्रेमभंग झालेल्या व्यक्तींच्या वस्तूंचं संग्रहालय तयार करण्याचा निर्णय दोघांनी एकमतानं घेतला! साहजिकच त्यांच्या दोघांच्याच वस्तूंनी सुरवात झाली. कुणाचा प्रेमभंग झाला असेल, तर संबंधितांनी संग्रहालयासाठी त्यांच्या वस्तू आणून द्याव्यात, असं आवाहन त्यांनी आपल्या मित्रमंडळींना-परिचितांना केलं आणि लोकांनी त्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यातूनच हे संग्रहालय निर्माण झालं.

या संग्रहालयात प्रेमपत्रं, छायाचित्रं, विरहपत्रं, निरोपपत्रं इत्यादी तर आहेतच; पण प्रेमवीरांचे हातरुमाल, पुस्तकं, टोप्या, परफ्यूम स्प्रे, एकमेकांना दिल्या-घेतलेल्या भेटवस्तू यांची तारखेनुसार नोंद आहे. याशिवाय, प्रेमभंगाविषयीच्या कटू आठवणी, कथाही इथं वाचायला मिळतात. त्यामुळं हे संग्रहालय केवळ मानवी संबंधांवरच प्रकाश टाकतं असं नव्हे, तर त्या वेळच्या सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीवरही ते भाष्य करून जातं. एका महिलेनं प्रियकराची आठवण म्हणून एक कुऱ्हाड  या संग्रहालयात ठेवण्यासाठी आणून दिली आहे. त्याचं स्पष्टीकरण देताना तिनं जे सांगितलं आहे ते असं ः ‘माझा प्रियकर जेम्स जेव्हा दुसऱ्या स्त्रीबरोबर डेटिंगला जात असे, तेव्हा मी फर्निचरवर ही कुऱ्हाड मारून माझा राग व्यक्त करत असे.’ मनात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या भाव-भावना, राग-विकार व्यक्त करणारे असे वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे या संग्रहात असे बघायला आणि वाचायला मिळतात.
या संग्रहालयाचं वैशिष्ट्य म्हणजे, सन २००३ ते २००६ या तीन वर्षांत संग्रहालय-चालकांकडं अनेक वस्तू गोळा झाल्या. त्यानंतर या वस्तूंचं प्रदर्शन अर्जेंटिना, बोस्निया, जर्मनी, सिंगापूर, सर्बिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, फिलिपाईन्स, इंग्लंड आदी देशांत भरवण्यात आलं. त्या त्या देशांतल्या मिळून २० लाख लोकांनी हे संग्रहालय पाहिलं. संबंधित देशांमधल्या अनेक लोकांनीही त्यांच्याकडच्या वस्तू या संग्रहालयात ठेवण्यासाठी दिल्या. सन २०१० मध्ये ३०० चौरस मीटर जागा भाड्यानं घेऊन कायमस्वरूपी संग्रहालय स्थापन करण्यात आलं आहे.
***
कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्ट्यांचे संग्रहालय (Dog collar Museum)
इंग्लंडमधल्या केंट इथं सन १९७९ मध्ये लीड्‌स किल्ल्याच्या सुंदर वास्तूत कुत्र्याच्या पट्ट्यांचं हे संग्रहालय स्थापन करण्यात आलं. कुत्र्याच्या गळ्यातले विविध फॅशनचे व डिझाईनचे गेल्या ५०० वर्षांपासूनचे पट्टे या संग्रहालयात पाहायला मिळतात.
या संग्रहालयाचा इतिहास असा, की या भल्यामोठ्या किल्ल्यात आठवा हेन्री व त्याची राणी राहत असे. त्यांच्या निधनानंतर तो किल्ला बैल्ली (Baillie) या श्रीमंत महिलेनं विकत घेतला. तिनं त्या किल्ल्याची डागडुजी केली व मृत्यूपूर्वी तो किल्ला ‘लीड्‌स फाउंडेशन’ला दान करून टाकला. आयर्लंडमधलं एक जोडपं जॉन हंट व त्यांची पत्नी ग्रेरट्य्रूड यांच्याकडं कुत्र्यांसाठीचे आगळेवेगळे आणि अतिशय आकर्षक असे १०० पट्टे होते. त्यांना त्या पट्ट्यांसाठी संग्रहालय उभारायचं होतं; पण त्यासाठी जागा नव्हती. जॉन यांच्या निधनानंतर ग्रेरट्य्रूड यांनी हे सगळे पट्टे ‘लीड्‌स फाऊंडेशन’कडं सुपूर्द केले. फाउंडेशननं त्यांचं संग्रहालय करावं, हा उद्देश.

इसवीसनपूर्व काळापासून ते १९ व्या शतकापर्यंतचे तऱ्हतऱ्हेचे पट्टे या संग्रहालयात पाहायला मिळतात. १५, १६ व १७, १८, १९ अशा शतकांमधल्या पट्ट्यांसाठीची वेगवेगळी दालनं इथं आहेत. १५ व १६ व्या शतकातल्या कुत्र्यांचे पट्टे हे लोखंडाच्या पट्ट्या वापरून किंवा भक्कम लोखंडाच्या साखळीपासून तयार केले जात. त्या काळी युरोपात घनदाट जंगल होतं. कोल्हे, लांडगे हे वन्य पशू कुत्र्यांचे गळे जबड्यात पकडून त्यांची शिकार करत असत, म्हणून अशा हिंस्र पशूंपासून बचाव करण्यासाठी कुत्र्यांच्या गळ्यात लोखंडाचे भक्कम पट्टे घातले जात व त्या पट्ट्यांवर पुन्हा अणकुचीदार खिळेही असत. १७ व्या शतकात मात्र कुत्र्यांना  चामड्याचे शोभिवंत किंवा वेल्वेटचे पट्टे घातले जात. त्या काळातले श्रीमंत राजे तर सोनेरी नक्षीकाम केलेले पट्टेही पाळीव कुत्र्यांच्या गळ्यात घालत असत. १८ व्या शतकात मात्र नाजूक नायलॉनचे किंवा चामड्याचे फॅशनेबल पट्टे घालायला सुरवात झाली. किमान पाच शतकांपासूनचे हे पट्टे पाहण्यासाठी दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त श्‍वानप्रेमी या संग्रहालयाला भेट देतात.
***
वाईट कलांच्या वस्तूंचे संग्रहालय
(Museum of Bad Arts)

खरंच मानवी मन किती  विचित्र असतं, याची प्रचीती या संग्रहालयाला भेट दिल्यावर येते. हे जगातलं असं एकमेव संग्रहालय आहे, की जिथं ‘कलात्मक’ नव्हे, तर ‘वाईट कले’चा संग्रह आहे! या संग्रहालयाबद्दल म्हटलं जातं ः It is so bad that is why it is good. सन १९९४ मध्ये अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्‌स या शहरात स्कॉट विल्सन या व्यक्तीनं हे संग्रहालय स्थापन केलं. तो त्या शहरात अँटिक वस्तूंचा व्यवसाय करत असे. त्या व्यवसायात त्याला दोन-तीन ‘वाईट’ चित्रं मिळाली. फ्रेम केलेली ही चित्रं टाकून देणं त्याच्या जिवावर आलं व त्यातून त्याला या वाईट कलेच्या वस्तूंचं संग्रहालय करण्याची कल्पना सुचली. त्याच्या संग्रहालयात अशा नवोदित कलाकारांनी बनवलेल्या किंवा चुका राहिल्यानं वाईट दिसणाऱ्या ६०० वस्तू आहेत. हे संग्रहालय स्थापन करण्याचा स्कॉटचा हेतू मात्र उदात्त होता व तो म्हणजे, ज्या कलाकारांनी या वस्तू बनवण्यासाठी वेळ व श्रम खर्च केले आहेत, ते वाया जाऊ नयेत, त्यांच्या कलाकृतीला न्याय मिळावा. या संग्रहालयाचं नाव वाचल्यावर कुतूहल म्हणून हजारो पर्यटक या संग्रहालयाला भेट देतात.
***
कीटकांचं व किड्यांचं संग्रहालय
(The Meguro Parasitological Museum)

जपानच्या टोकिओ शहरातल्या मेगुरो या भागात असलेलं ‘मेगुरो कीटक-किड्यांचं संग्रहालय’ हे जगातलं अशा प्रकारचं पहिलं व एकमेव संग्रहालय आहे. सन १९५३ मध्ये स्थापन झालेल्या या संग्रहालयात जगातले जवळपास सगळेच कीटक व किडे पाहायला मिळतात व त्यांची सविस्तर माहितीसुद्धा वाचायला मिळते. या संग्रहालयाची संकल्पना डॉ. सतोरू कामेगाई या शास्त्रज्ञाची. या दोनमजली संग्रहालयात तीन हजारपेक्षा जास्त कीटकांच्या व किड्यांच्या प्रजाती आहेत व त्यांचे फोटोसुद्धा आहेत. पहिल्या मजल्यावर अनेक कीटक व जीव बाटल्यात भरून ठेवलेले आढळतात, तर दुसऱ्या मजल्यावर मानवी शरीरातले परजीवी (Parasites) व त्यांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम बघायला मिळतात. या संग्रहालयात मानवी शरीरातले जंत, केसातल्या उवा, तसंच मुंग्या, खेकडे व इतर कीटक बाटल्यांमध्ये भरून ठेवलेले आहेत. याशिवाय संग्रहालयात जिथं संशोधन चालतं, त्या ठिकाणी ६० हजार किड्यांची माहिती, त्यांच्या बद्दलची पाच हजार पुस्तकं व ५० हजार संशोधनप्रबंध आहेत. त्यामुळं हे दोनमजली संग्रहालय म्हणजे कीटक-किड्यांविषयीचा ज्ञानकोश आहे, असं म्हटलं तरी चालेल.
***
कॅनकून इथलं पाण्याखालचं संग्रहालय
(Cancun Underwater Museum)

उत्तर अमेरिकेतल्या मेक्‍सिको देशात कॅनकून या ठिकाणी प्रवाळ-कीटकांनी बनवलेल्या प्रवाळराशींचं (Coral Reefs) संवर्धन करण्यासाठी ‘कॅनकून मरीन नॅशनल पार्क’मध्ये हे संग्रहालय तयार करण्यात आलेलं आहे. पर्यटकांमुळं प्रवाळराशींचं नुकसान होत असून त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असं पाण्याखालच्या प्रवाळराशींवर संशोधन करताना डॉ. जेम्स कान्टो यांच्या लक्षात आलं. त्यांची ब्रिटिश शिल्पकार टेलर यांच्याशी भेट झाली व त्यांच्या मदतीनं कान्टो यांनी पाण्याखाली ५०० मानवी आकृत्यांची शिल्पं उभी करण्याचं ठरवलं. त्यातली ४७७ शिल्पं स्वतः टेलर यांनी तयार केलेली आहेत, हे विशेष. या शिल्पांचा फायदा म्हणजे त्यामुळं प्रवाळ-कीटकांना संरक्षण मिळतं. कारण, त्या पुतळ्यांना छिद्रं आहेत व त्यातून प्रवाळ आत जातात व पुतळ्यांमध्ये त्यांची घरं करतात व अशा प्रकारे त्यांना संरक्षण मिळतं. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे, या पाण्याखालच्या शिल्पांच्या संग्रहामुळं पर्यटकांची संख्याही वाढली आहे. जगभरातून तिथं पर्यटक येतात व काचेचा तळ असणाऱ्या बोटीतून प्रवास करून हे संग्रहालय पाहतात. ज्यांना स्क्‍यूबा डायव्हिंग येतं, ते तर जवळ जाऊनही शिल्पं पाहतात. पाण्याखालचे मानवाचे पुतळे हे मानव व पर्यावरण यांच्यातला अनुकूल व प्रतिकूल असा परस्परसंबंध दाखवणारे आहेत. काही लोक पर्यावरणाची काळजी घेत आहेत, तर काहींनी पर्यावरणाचं नुकसान केल्यानं ते चेहरे लपवत आहेत, अशी ही शिल्पं आहेत. ही ५०० शिल्पं बनवण्यासाठी तीन वर्षं लागली. कलाकार-कामगारांना रोज १२ तास पाण्याखाली उभं राहून काम करावं लागलं. या शिल्पांसाठी १२० टन काँक्रिट, वाळू, छोटे दगड, ४०० किलो सिलिका व तीन हजार ८०० मीटर फायबर ग्लास आदी सामग्री लागली.
***
बार्ने स्मिथचं टॉयलेट-सीट संग्रहालय (Barney Smith’s Toilet Seat Art Museum)
अमेरिकेच्या टेक्‍सास राज्यातल्या सॅन ॲन्टोनिओ या शहरात बार्ने स्मिथ यांनी हे संग्रहालय स्थापन केलं. ते व्यवसायानं प्लम्बर होते. जवळजवळ १० वर्षं त्यांनी त्यांच्या गॅरेजमध्ये वेगवेगळ्या टॉयलेट-सीटचा संग्रह केला होता. एकदा स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीनं त्यांची मुलाखत घेतली आणि ते प्रसिद्धीच्या झोतात आले व मग लोक त्यांच्याकडं येऊ लागले. बार्ने यांनी टॉयलेट-सीटची व्यवस्थित मांडणी करून गॅरेजमध्येच संग्रहालय तयार केलं. आज तिथं टॉयलेट-सीट व त्यांची कव्हर यांचे एक हजार प्रकार पाहायला मिळतात.

भारतात दिल्लीतही टॉयलेटचं सुलभ आंतरराष्ट्रीय संग्रहालय आहे. ते स्थापन केलं आहे सुलभ आंतरराष्ट्रीय संस्थेनं. ‘टाईम मॅगझिन’नं केलेल्या पाहणीनुसार, हे संग्रहालयही जगातल्या दहा विचित्र संग्रहालयांपैकी एक आहे. सामाजिक कार्यकर्ते, सुलभ सॅनिटेशन आणि सामाजिक सुधारणा चळवळीचे संस्थापक व अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पारितोषिकांचे विजेते डॉ. बिंदेश्‍वर पाठक यांनी १९९२ मध्ये हे संग्रहालय सुरू केलं. त्यामागचा मूळ उद्देश लोकांना आरोग्यरक्षणाबाबत जागरूक करणं हा होता.
या संग्रहालयात इसवीसनपूर्व ३००० पासून ते २० व्या शतकापर्यंतच्या म्हणजे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या जगातल्या विविध देशांत वापरल्या जाणाऱ्या टॉयलेट-सीटचा संग्रह पाहायला मिळतो. सुशोभित व्हिक्‍टोरिया टॉयलेट-सीट, रोमन राजांनी वापरलेली व सोन्या-चांदीचा वापर करून तयार करण्यात आलेली टॉयलेट-पॉट्‌स, टॉयलेट-फर्निचर, सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती, राणी एलिझाबेथचा काळ आदी काळातल्या टॉयलेट-सीटचा समावेश या संग्रहात आहे. अंतराळात लघवीचं रूपांतर शुद्ध पाण्यात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचीही सविस्तर माहिती इथं मिळते. त्याशिवाय टॉयलेट-पॉट या विषयावरचे जोक, व्यंग्यचित्रं, कॉमिक्‍स, टॉयलेट-पॉटशी संबंधित विनोदी माहितीही वाचायला मिळते. थोडक्‍यात, माहितीपूर्ण आणि मनोरंजक असं हे संग्रहालय आहे.
***
मृत्यूशी संबंधित वस्तूंचं संग्रहालय (Museum of Death)
अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात लॉस एंजेलिस शहरात हे संग्रहालय आहे. मृत्यूशी संबंधित वस्तू म्हणजे शवपेटी (Coffin), बेबी शवपेटी, सांत्वनपर पत्रे, सीरियल-किलरबद्दलची माहिती, गुन्हेगारीच्या कथांवर आधारित छायाचित्रं व फिल्म्स या संग्रहालयात पाहायला मिळतात. त्याशिवाय पेंढा भरून ठेवलेले हिंस्र प्राणीसुद्धा इथं आहेत. काही सीरिअल-किलरचे पुतळेही आहेत. कुख्यात फ्रेंच गुन्हेगार हेन्री लाँद्र याचा शिरच्छेद करण्यात आला होता, त्याचं शिरही इथं आहे. जे. डी. हिले आणि कॅथेरिन शुल्झ यांनी हे संग्रहालय सुरू केलं. हे दोघंही खुनांवर आधारित मालिकांचे लेखक होते. सन २०१४ मध्ये त्यांनी १२ हजार स्क्वेअर मीटर जागेत न्यू ऑर्लिन्स इथंही मृत्यू या विषयाशी संबंधित वस्तूंचं दुसरं संग्रहालय उभारलं आहे, हेही विशेष.
***
ब्रेड कल्चर म्युझिमय
(Bread Culture Museum)

जगातलं एकमेव असं हे ‘म्युझियम ऑफ ब्रेड कल्चर’ दक्षिण जर्मनीतल्या उल्म या शहरात आहे. सहा हजार वर्षांपासूनचा ब्रेडचा इतिहास या संग्रहालयाद्वारे कळतो. गरीब, श्रीमंत, मजूर, मालक, कारखानदार, नोकर-चाकर अशा सगळ्यांचंच समान खाद्य म्हणजे ब्रेड! जर्मन लोकांच्या रोजच्या जेवणात ब्रेड हा पदार्थ फार महत्त्वाचा मानला जातो. जर्मनीत दरवर्षी ५ मे रोजी लोक ‘ब्रेड डे’ साजरा करतात. माणसाच्या संस्कृतीच्या उगमापासून अत्यंत आवडीनं खाल्ला जाणारा असा हा पदार्थ. ब्रेडची निर्मितीप्रक्रिया कसकशी बदलत गेली, तसंच त्याचं सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व कसकसं बदलत गेलं, याचा आढावा घेतलेला या संग्रहालयात पाहायला मिळतो.
अनेक वर्षं मेहनत करून, चिकाटीनं अभ्यास करून हे संग्रहालय उभारण्याचं श्रेय जातं बिली इसेलेन व त्यांचा मुलगा हर्सन इसेलेन यांना. बेकरीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याचा त्यांचा व्यवसाय होता; तसेच बेकरीचे पदार्थ पुरवणारे ते अग्रगण्य व्यापारी होते. सन १९५५ मध्ये त्यांनी आपल्या अनुभवाच्या व अभ्यासाच्या आधारे या संग्रहालयाची स्थापना केली. या संग्रहालयात १६ हजार वस्तू असून, त्यातल्या केवळ ७०० वस्तू कायमस्वरूपी आहेत. सन १९९१ पासून ‘इसेलेन फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेतर्फे या संग्रहालयाचा आर्थिक व्यवहार व व्यवस्थापन पाहिलं जातं. लाखो लोक दरवर्षी या संग्रहालयाला भेट देतात.

जगभरात आहेत ५५ हजार संग्रहालयं  
सन १९७७ पासून दरवर्षी १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय (म्युझियम) दिन साजरा केला जातो. ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्युझियम्स’तर्फे सगळ्या संग्रहालयांदरम्यान समन्वय साधला जातो व दरवर्षी त्यांना एक संकल्पना दिली जाते. तीनुसार त्यांनी ते संग्रहालय सजवायचं असतं. संग्रहालयांचं समाजाच्या विकासासाठी असणारं महत्त्व जनतेपर्यंत पोचवण्यासाठीची जागरूकता या दिवशी निरनिराळ्या संग्रहालयांतून निर्माण केली जाते. त्यासाठी विविध कार्यक्रम आयोजिले जातात. वर्ल्ड म्युझियम कम्युनिटीच्या अभ्यासानुसार, जगातल्या २०१ देशांत ५५ हजार संग्रहालयं आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे १२८ संग्रहालयं असणारं शहर म्हणजे मेक्‍सिको सिटी. हा दिवस साजरा करणाऱ्या देशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. २०१६ मध्ये १४५ देशांतल्या ३५ हजारांपेक्षा जास्त संग्रहालयांनी हा दिवस साजरा करून तेव्हापर्यंतचा विक्रम मोडीत काढला.

Web Title: prof shailaja sangale write article in saptarang