चॉकलेटच्या जादूचा क्षण...

पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मी आमच्या साऱ्या टीममेंबर्सना नव्या वर्षासाठीच्या डायऱ्या त्यावर शुभेच्छा-स्वाक्षरी लिहून देतो.
pune muktangan rehabilitation center health chocolate therapy
pune muktangan rehabilitation center health chocolate therapysakal

- डॉ. आनंद नाडकर्णी

पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मी आमच्या साऱ्या टीममेंबर्सना नव्या वर्षासाठीच्या डायऱ्या त्यावर शुभेच्छा-स्वाक्षरी लिहून देतो. ‘आनंद काकांनी काय लिहिलेय या वर्षी’ अशा उत्सुकतेनं सारे जण एकमेकांच्या डायऱ्या चाळतात. आमचा एक सहकारी आहे ‘बंधू.’

त्याची माझी मैत्री किमान पस्तीस वर्षांची. त्या काळी तो माझा पेशंट होता. आज सहकारी आहे. व्यसनामध्ये वारंवार आपल्या आपट्या खात खात अगदी कातर होऊन तो दादरच्या माझ्या दवाखान्यात आला होता. रस्त्यावर राहत होता. त्याच्या नजरेत मला सच्चेपणा जाणवला होता. आजवर मी त्याला जमेल ती मदत आणि उपचार दिले होतेच. पण यश मिळालं नव्हतं.

या वेळी, मी सावध होतो. अमली पदार्थ सोडल्यावर येणाऱ्या शारीरिक-मानसिक वियोगाची लक्षणं (withdrawal symptoms) ताब्यात आणण्यासाठीची औषधे मी त्याला पुडीत बांधून द्यायचो.

ती सुद्धा फक्त दोन दिवसांची. संपूर्ण स्ट्रीप दिली गोळ्यांची आणि यानं ओव्हर डोस घेतला तर... ही भीती होती. दवाखान्याशेजारी असलेल्या खाणावळीमध्ये त्याची दोन वेळच्या जेवणाची सोय लावली होती. दादरच्या दवाखान्याचे, माझे वार असायचे सोम, बुध, शुक्र. त्या दिवशी रात्री तो मला नेमानं भेटायचा.

असे एकूण सहा ‘फॉलो अप’ झाले. त्यानंतरच्या वेळी मला ओपीडी संपवायला उशीर झाला. बंधू माझी वाट पाहत थांबला. मी मोकळा झालो तेव्हा शेजारची खाणावळ बंद झालेली... आम्ही दोघं गप्पा मारत निघालो.

त्या काळी दहा-साडेदहाला दादर भागातही चहलपहल नसायची. मला ठाण्याला जायला दादर स्टेशन गाठायचं होतं. वाटेत एक दुकान उघडं दिसले. मी कॅडबरीचा मोठा बार विकत घेतला. बंधूला दिला. “खायला सुरुवात कर” असं सांगितलं.

स्टेशनपाशी काही फळं घेऊन दिली. त्याच्या हातात पैसे द्यायचे नाहीत हे पथ्य मी आणि त्यानं दोन आठवडे पाळलं. त्यानंतर तो मुक्तांगणमध्ये आला. अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाला होता तो. त्यानंतर त्याच्या व्यसनमुक्तीला दहा वर्षे झाली तेव्हा मी तिथं होतो.

‘‘मी आजवर प्रिस्क्रिप्शन देणारे डॉक्टर खूप पाहिले होते. पण चॉकलेट खाऊ घालणारे तुम्ही पहिलेच होतात.’’ त्याच्या व्यसनमुक्ती वाढदिवसाच्या मीटिंगमध्ये बंधू म्हणाला होता. या घटनेलाही आज पुढची दहा वर्षे झाली आणि बंधूंच्या प्रगतीचा आलेख सुरेख राहिला. म्हणून या वर्षीची डायरी त्याला देताना मी लिहिलं, “स्वामी तिन्ही जगाचा बंधूविना भिकारी... भ्रातृभावाचं साक्षात उदाहरण असलेल्या बंधूला नववर्षाच्या शुभेच्छा.’’

अशा प्रकारे चॉकलेटला, माझ्या थेरपीमध्ये मानाचं स्थान मिळालं. ठाण्याच्या आय.पी.एच. संस्थेच्या ओपीडी मध्ये माझ्या हाताशी चॉकलेट्स असतातच. ‘इंजक्शने देणारे डॉक्टर म्हणून आधीच आमच्या व्यवसायाची बदनामी झालेली.

आणि विविध शैक्षणिक, भावनिक, वर्तनविषयक कारणांनी लहान मुलं भेटीला आणली जातात (पालकांद्वारे) तेव्हा त्यांच्या डोळ्यात अविश्वासाची सावट स्पष्ट दिसत असते. अशावेळी चॉकलेटचा वापर... Ice breaker म्हणून होतो. कोणत्याही वयातला पेशंट जेव्हा काही चांगली बातमी घेऊन येतो, तेव्हा चॉकलेटचा वापर होतो गोड प्रोत्साहन म्हणून.

वय वर्षे पाचपासून आज वीस वर्षे नियमितपणे येणारा एक मुलगा आहे. त्याला फिट्सचा आजार होता, शैक्षणिक अक्षमता (Learning Disability) होती आणि वृत्तीची चंचलता देखील. आज तो ग्रॅज्युएट झाला, एमबीए झाला, नोकरीला लागला आणि आता CFA म्हणजे फायनान्शियल ऍनालिस्ट सुद्धा बनतोय. आमच्या प्रत्येक भेटीची सुरुवात किंवा सांगता नेहमी चॉकलेटने होते.

माझी काही मुलं-मुली (जी कधी काळी पेशंट्स असतात) भेटायला येताना हक्कानं चॉकलेट वसूल करतात. स्वमग्नता असलेली, बौद्धिक दृष्टीनं मागं पडलेली, अशांचे डोळेसुद्धा चॉकलेट म्हटलं की चमकतात.

विभक्त होण्याच्या टोकाला येऊन नंतर प्रयत्नांती परत एकत्र आलेल्या जोडप्यालाही माझी हीच भेट असते. डिमेन्शिया म्हणजेच स्मृती पुसल्या जाण्याच्या प्रवासात असलेल्या आजीसुद्धा माझ्यासमोर आपली मूठ उघडून चॉकलेटची मागणी करतात.

पुण्याच्या आय.पी.एच्. संस्थेमध्ये मदतीसाठी येणारे एक काका-मावशी प्रत्येक भेटीच्या वेळी बारा-पंधरा, चॉकलेट बार घेऊन येतात. आमच्या रिसेप्शनवर काम करणाऱ्या सहकाऱ्यांपासून त्यांचं वाटप सुरू होतं. त्या दिवशी जेवढे कन्सल्टंट्स हजर असतील त्या सर्वांना चॉकलेट मिळतं.

‘‘तुम्ही सगळे आमच्या भेटीची वाट पाहता... तुमचे चेहरे खूश होतात. आम्हाला छान वाटतं... तुम्ही सारे लोकांना अहोरात्र मदत करता. त्याची दाद नको का द्यायला?” ते काका म्हणतात. मावशी त्यांना दुजोरा देतात. भावनिक आरोग्याच्या वाटेवरचे आम्ही सारेच वाटसरू आहोत हे दर्शवणारे क्षण असतात हे सारे.

चॉकलेट हे मैत्रीचं, प्रेमाचं प्रतीकात्मक एक्सप्रेशन असतं. डॉक्टर-पेशंट नात्याला चौकटीच्या बाहेर काढणारी वाट असते ती. पण काही जण असे असतातच ज्यांना चॉकलेट आवडत नाही. सहसा माझ्या टेबलच्या खणामध्ये, लाडू, चिक्की असे घरगुती पदार्थही असतात.

नवी कोरी पेन्स असतात आणि मी लिहिलेल्या पुस्तकांपैकी काही अगदी हाताशी ठेवलेली असतात. खास क्षणांची आठवणभेट राहावी म्हणून. काउन्सेलिंगचा अभ्यास करताना एक वाक्य वाचलं होतं, Relationships not therapies cure people.

मी त्या not च्या जागी and असा शब्द घालतो. कारण मानसशास्त्रातील समुपदेशक म्हणजे फक्त ‘गप्पा’ नव्हेत. त्या गप्पा भासायला हव्यात पण समोरच्या व्यक्तीला नवीन दृष्टिकोन मिळायला हवा, भावनिक सक्षमता वाढायला हवी आणि बुद्धीलाही खाद्य मिळायला हवं.

प्रेमाच्या नात्यामध्ये अपयश मिळालेली एक मुलगी परवाच माझ्यासमोर बसली होती. ‘‘मी त्याला विसरूच शकत नाही... खूप सॅड वाटतं... पण त्याचा रागपण येतो.’’ ती म्हणाली.

‘‘आपल्याला ह्या नात्याचं सध्यां भावनिक अंतर ठरवायचं आहे. असं समज की त्या व्यक्तीच्या उत्तम फोटोची फ्रेम तुझ्या बेडरूममध्ये, उशीजवळ आहे... पाहायला लाग ते दृश्य... आता तू त्याला मिस करते आहेस... काय करशील?’’

‘‘ती फ्रेम कवटाळून रडेन मी...’’

‘‘आता इमॅजिन कर त्याचा राग आलाय...’’

‘‘फेकली मी जमिनीवर... फुटली ती... आता त्याचा फोटो फाडते आहे... ’’

‘‘उपयोग होतोय का त्याचा...? शांत वाटतं आहे?’’

‘‘तात्पुरतं... तेवढ्यापुरतं.’’

‘‘आपल्याला ती फ्रेम दृष्टीबाहेर ठेवायची आहे. एवढंच... अशा अनेक गोष्टी असतात आयुष्यात ज्या येतात आणि दखल न देता राहू शकतात... आपापल्या जागी.’’ मी म्हणालो.

‘‘गॅरेजमध्ये ठेवायची आहे मला ती फ्रेम.’’ ती म्हणाली.

‘‘हातांनी कवटाळलेली फ्रेम गॅरेजपर्यंत जायची असेल, तर पहिला टप्पा काय असेल?’’ मी विचारले.

‘‘समोरच्या भिंतीवर टांगणं तिला.’’ ती म्हणाली.

‘‘उशाशी असलेली फ्रेम पटकन फेकता येईल... इथं अंतर वाढलं... त्यानंतरचा टप्पा कोणता असेल?’’ मी विचारलं.

अशा प्रकारे तिच्या घराचा ‘दृश्य’ नकाशा चितारून आम्ही तिचा भावनिक प्रवास ‘स्पष्ट’ आणि ‘रेखीव’ करत गेलो. प्रत्येक टप्प्यावर तिच्या मनातले विचार काय असतील याचा मागोवा घेतला. त्यावरचे कोणते पर्याय ती ‘स्वतः’ आखू शकते ह्यावर चर्चा केली. ‘‘समजा आपण फोटोफ्रेम गॅरेजमध्ये ठेवली आहे... पण सहवासाची तीव्र आठवण आली, दुसऱ्या कोणी तुमच्या नात्याचा संदर्भ दिला तर...?’’ मी म्हणालो.

‘‘तो फोटो अचानक बेडरूममध्ये भिंतीवर येईल,’’ ती म्हणाली आणि स्वतःशीच किंचित हसली.

‘‘आणि तरीही आपल्याकडे कोणते चॉइस असतील?’’

‘‘उशीकडं ठेवायचं की त्याला मिठी मारायची की बाहेरच्या पॅसेजमध्ये टांगायचं सध्यापुरतं!’’ ती विचार करत म्हणाली.

‘‘शाबास...’’ असं म्हणत मी तिच्या हातावर चॉकलेट ठेवत, त्या क्षणाच्या ‘बोधा’वर गोड शिक्कामोर्तब केलं.

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com