नाझीविरोधाचं संगीत !

आपण मेलो तरी जर्मनी जगलेच पाहिजेत’ या विचाराचा सततचा मारा या मुलांवर केला जात होता
Rahul Hande writes about Adolf Hitler art League of German Girls founded Edelweiss Pirates
Rahul Hande writes about Adolf Hitler art League of German Girls founded Edelweiss Piratessakal

- राहुल हांडे

जर्मन राष्ट्रवादाच्या नावाखाली हिटलरने जे अनेक प्रयोग केले, त्यांपैकी एक होता ‘हिटलर यूथ’. जर्मनीतील नाझी पक्षाची ही युवा संघटना. जर्मन भाषेत हिटलर यूथला ‘हिटलर जुजेंड’ असं संबोधलं जातं. १९२२ मध्ये हिटलरने या संघटनेची स्थापना केली आणि जुलै १९२६ मध्ये ती हिटलर जुजेंड (हिटलर यूथ) अथवा बंड ड्यूशर अर्बिटरजुजेंड (लीग ऑफ जर्मन वर्कर यूथ) या नावाने ओळखली जाऊ लागली. १९३६ ते १९४५ या कालखंडात हिटलर यूथ वा हिटलर जुजेंड जर्मनीमधील युवकांची एकमेव अधिकृत संघटना होती. ती अंशतः निमलष्करी संघटना होती. १४ ते १८ वयोगटातील मुलांना हिटलर यूथमध्ये आणि १० ते १४ वयोगटातील मुलांना डर हिटलर जुजेंड म्हणजे जर्मन यंगस्टर्समध्ये सहभागी करून घेतलं जात होतं.

लीग ऑफ जर्मन गर्ल्सची स्थापना करून मुला-मुलींमध्ये तटबंदी निर्माण करण्यात आली होती, त्यामागे त्यांचं लैंगिक भेदावर विभाजन करून त्यांना एकमेकांपासून दूर ठेवणं, हाच उद्देश होता. हिटलर यूथच्या सदस्यांकडे नाझी जर्मनीचं भविष्य सुनिश्चित करणारे म्हणून पाहिलं जात होतं. देशातील प्रत्येक व्यक्तीचा उपयोग देशासाठी करून घेणं, हा हिटलरप्रणीत नाझीवादाचा मूलभूत सिद्धांत हिटलर यूथच्या निर्मितीत दडलेला होता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, वयाच्या दहाव्या वर्षापासून जर्मनीतील प्रत्येक मुलाच्या मनात स्वतःच्या वंशाबद्दल व वर्णाबद्दल असीम श्रेष्ठत्वाची भावना निर्माण करणं आणि इतर वंशांबद्दल व वर्णाबद्दल असीम द्वेष निर्माण करणं, हे हिटलर यूथचं उद्दिष्ट होतं.

‘आपण मेलो तरी जर्मनी जगलेच पाहिजेत’ या विचाराचा सततचा मारा या मुलांवर केला जात होता. १९३५ पर्यंत हिटलर यूथच्या प्रशिक्षणासाठी स्काऊट-गाइड चळवळीतील अनेक तंत्रांचा वापर करण्यात आला, त्यात कॅम्पिंग व हायकिंग यांचा समावेश होता. हळूहळू हिटलरने त्यामध्ये बदल केला आणि याबोक मुलांना सरळ लष्करी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मुलांच्या शैक्षणिक अभ्यासापेक्षा शारीरिक क्षमता व लष्करी प्रशिक्षण यांच्यावर जास्त भर दिला जाऊ लागला. राष्ट्रासाठी बलिदान ह्या एकाच तत्त्वाचा त्यांच्यावर चौफेर मारा करत, त्यांना हिटलरचे प्रेरित सैनिक बनवलं जाऊ लागलं. त्याचबरोबर वयाच्या १७ व्या वर्षापासून ह्या मुलांना लष्करात भरती होणं सक्तीचं करण्यात आलं. हिटलरच्या जर्मन राष्ट्रवादाचा आणि वंशश्रेष्ठत्वाचा अंतर्गत हेतू स्वतः जगावर राज्य करणं होता. हिटलरने शालेय वेळापत्रकात ड्रिल, शारीरिक चाचण्या व लष्करी प्रशिक्षणावर अधिक वेळ दिला होता. कारण त्याच्या तत्त्वज्ञानात युद्ध हे अंतिम उद्दिष्ट होतं. जर्मन जनता हिटलरचं व्यक्तिमत्त्व व तत्त्वज्ञान यांनी भारावून गेलेली होती. हिटलरचा प्रत्येक विचार आणि कृती म्हणजे जर्मनीसाठी आहे, अशी त्यांची अगाध श्रद्धा होती. अशा भारावलेल्या काळातही काही युवक असे होते की, ज्यांच्या धडावर त्यांचंच शिर होतं. हिटलर आपल्या संकुचित विचारसरणीच्या माऱ्यातून जर्मन लोकांचं सर्वांगीण स्वातंत्र्य हिरावून घेत आहे आणि यातून जगावर राज्य करण्याची त्याची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेत आहे, याची जाणीव ह्या तरुणांना झाली. त्यांनी हिटलरच्या या लष्करीकरणाला विरोध करणारी एक अनौपचारिक संघटना निर्माण केली. ही संघटना ‘एडलवाईस पायरेट्स’ म्हणून ओळखली गेली.

हिटलरच्या नाझी जर्मनीला यथाशक्ती विरोध करणं, हे या संघटनेचं ध्येय होतं. स्वतःला सक्तीच्या लष्करीकरणापासून म्हणजेच हिटलर यूथपासून वाचविण्यासाठी ह्या मुलांनी शाळा सोडून दिली. शाळेचा त्याग केल्यामुळे हिटलर यूथमधील आणि नंतरच्या सक्तीच्या लष्कर भरतीपासून ते स्वतःचा बचाव करू शकणार होते. एडलवाईस पायरेट्सने वैचारिक व कलात्मक पातळीवर हिटलरच्या धोरणांना विरोध करण्याचा मार्ग अवलंबला. स्वतःला अभिव्यक्त करणे आणि स्त्री-पुरुष लिंगभेद न ठेवता एकत्र येणे, यासाठी एडलवाईस पायरेट्स संघटना प्रयत्नशील होती. एकाधिकाराचा विरोध आणि बंडखोरी हा एडलवाईस पायरेट्सचा ध्यास होता. यासाठी त्यांनी दमनकारी नाझी राजवटीच्या बाहेर पडून जीवन जगण्याचा मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न केला. बंदी असलेल्या हायकिंग व कॅम्पिंगला जाऊन नाझींच्या निर्बंधांचं उल्लंघन ते करू लागले. त्यांनी टेंट, वेशभूषा, गाणी, नृत्य, संगीत आणि विविध चिन्हांच्या माध्यमातून स्वतःचं स्वातंत्र्य आणि वेगळेपणा यांचं अस्तित्व प्रकट करण्यास सुरुवात केली. रस्त्यांच्या कोपऱ्यांवर, म्हणजेच नाक्यावर एकमेकांना भेटणं आणि विचारांचं आदान-प्रदान करणं, हा संघटनेच्या दैनंदिन हालचालीचा भाग होता. संघटनेचे सदस्य असलेली मुलं आणि मुली आठवड्याच्या शेवटी कॅम्पिंग ट्रिपसाठी वेळोवेळी एकत्र येत असत. ते जंगलात तंबू ठोकायचे, गाणी गायचे आणि हिटलर यूथच्या गस्तीला विरोध करायचे. ‘हिटलर यूथविरोधात शाश्वत युद्ध’, ही त्यांची घोषणा होती.

हिटलर यूथचा त्याग करत एडलवाईस पायरेट्सचा सदस्य झालेल्या एका युवकाने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं होतं की, ‘‘हिटलर यूथमध्ये सहभागी होणं ही युवकांची चूक आहे. हिटलर यूथमध्ये देण्यात येणाऱ्या प्रत्येक आदेशात धमकी दडलेली असते.’’ एडलवाईस पायरेट्सने हिटलरशाहीला विरोध करण्यासाठी संगीताचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. त्यांनी सर्व भेदांना मूठमाती देणाऱ्या त्यांच्या आवडत्या संगीताद्वारे स्वतःची एक स्वतंत्र माणूस म्हणून व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. संगीत हे त्यांच्या विरोधाचं माध्यम बनलं. स्वतःला ‘स्विंग जुजेंड’ ( स्विंग किड्स) म्हणजेच स्विंग मुलं म्हणून अभिव्यक्त केलं. स्विंग मुलांनी खुलेपणाने राजकीय विधानं केली नाहीत; परंतु त्यांचं परदेशी संगीतावरील प्रेम, त्यांची जंगली नृत्यशैली आणि ज्यू व इतर वंशीयांचा स्वीकार, हे नाझी पक्षाच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात होतं. स्विंग किड्स राजकीय अर्थाने उघडपणे फॅस्टिटविरोधी नव्हते. मात्र, त्यांचं वर्तन जोरदारपणे राजकीयविरोधी होतं. नाझी घोषणा आणि राष्ट्रवाद या दोन्ही गोष्टींच्या विरोधात त्यांचं वर्तन होतं. त्यांनी हिटलरप्रणीत शिस्तबद्ध, औपचारिक संस्कृतीच्या विरोधात स्वतःच्या संस्कृतीला ‘स्लोव्हनली कल्चर’ म्हणजेच अव्यवस्थित वा गबाळी संस्कृती म्हणून संबोधलं.

नाझी सरकारने प्रारंभी एडलवाईस पायरेट्सना केवळ एक प्रतिक्रिया किंवा किरकोळ चिडचिड म्हणून पाहिलं. देशविरोधी कारवाई, देशद्रोह, दहशतवाद अशा कोणत्याच व्याख्येत एडलवाईस पायरेट्सला बसवता येत नव्हतं. गेस्टापोने अनेकदा त्यांना पकडलं आणि त्यांना सार्वजनिक जीवनात लाज वाटावी म्हणून त्यांचं मुंडण करून सोडून दिलं. काही तरुणांना कॉन्सेन्ट्रेशन कॅम्पमध्ये पाठविण्यात आलं. युवक एखाद्या दमनकारी राजसत्तेला केवळ आपल्या वर्तनातूनदेखील आव्हान देऊ शकतात, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून एडलवाईस पायरेट्सकडे पाहता येतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com