कोई लौटा दे मेरे...

आपल्यातील प्रत्येक जण शांतता व एकांत यांच्या शोधात भटकत असतो. या शोधापायी आपण जगातील जवळपास सर्व शांत आणि एकाकी जागा माणसांच्या लोंढ्यांनी अशांत आणि गर्दीच्या करून ठेवलेल्या दिसतात
Rahul Hande writes Mankind journey is amazing was primitive man happy
Rahul Hande writes Mankind journey is amazing was primitive man happysakal
Summary

आदिमानवापासून प्रवास करत करत आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आधुनिक माणूस...हा मानवजमातीचा प्रवास थक्क करणारा आहे.

- राहुल हांडे

आदिमानवापासून प्रवास करत करत आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आधुनिक माणूस...हा मानवजमातीचा प्रवास थक्क करणारा आहे. असं असलं तरी शिकारीसाठी जंगलात भटकणारा आदिमानव सुखी होता की भौतिक सुख-सुविधांच्या गर्दीत स्वतःला शोधत भटकणारा आजचा मानव सुखी आहे, हा प्रश्न निश्चितच अस्वस्थ करणारा आहे.

आपल्यातील प्रत्येक जण शांतता व एकांत यांच्या शोधात भटकत असतो. या शोधापायी आपण जगातील जवळपास सर्व शांत आणि एकाकी जागा माणसांच्या लोंढ्यांनी अशांत आणि गर्दीच्या करून ठेवलेल्या दिसतात. एवढंच नव्हे तर, काही आदिवासी जमाती आधुनिक जगापासून अलिप्त राहून त्यांची शांतता व एकांत जोपासण्याचा प्रयत्न करत असतील तर आपल्याला तेदेखील सहन होत नाही. आपल्याला त्यांची भूमी आणि नैसर्गिक संपत्ती हवी आहे. यासाठी त्यांचा समूळ नायनाट करताना आपली मानवता कधीच आडवी येत नाही! यासाठी जगातील खऱ्या अर्थानं एकाकी जीवन जगणाऱ्या एका माणसाची कथा ऐकण्यासारखी आहे.

ब्राझीलच्या ‘ॲमेझॉन रेनफॉरेस्ट’मध्ये सहा सदस्यांचं एक कुटुंब आदिम अवस्थेत राहत होतं. हे सर्वजण कोणत्या तरी आदिवासी टोळीचे उरलेले घटक होते. सन १९७० आणि १९८० च्या दशकात पशुपालकांनी या जमातीची कत्तल केली. हे कुटुंबही अधिक काळ तग धरू शकलं नाही. त्यांच्यापैकी पाच जणांची हत्या झाली. त्यातला तो एकटाच वाचला. सन १९९६ मध्ये काही संशोधकांना तो सापडला.

आज त्याची जमात व भाषा यांविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. इतकच नव्हे तर, त्या माणसाचं नावदेखील माहीत नाही. तो शिकार करण्यासाठी जमिनीत खड्डे करतो, यावरून संशोधकांनी त्याचं नामकरण ‘मॅन ऑफ द होल’ असं केलं आहे. त्याची टोळी आणि कुटुंबं जेव्हा हयात होतं तेव्हा त्याला स्वतःचं नाव होतं. आज मात्र त्याची भाषा बोलणारा तो एकटाच असल्यानं, तो त्याच्या भाषेत बोलत असला तरी, आपल्यासाठी मुका ठरला आहे, तसंच आपण त्याच्यासाठी बहिरे ठरलो आहोत!

आपण भाषेतून आपली गरज, भावना, विचार व कल्पना मांडत असतो. आज त्याच्या गरजा, भावना, विचार व कल्पना तो- त्याला बोलता येत असूनही - दुसऱ्याला सांगू शकत नाही आणि आपल्याला ऐकू येऊनही आपण समजू शकत नाही. एखादा कुणी कुटुंबाचा वा समाजाचा त्याग करून एकांतवासात जातो. त्याच्या निसर्गोन्मुख एकांताचं आपल्याला खूप कौतुक व आकर्षण असतं. त्याच्याबद्दल भरभरून लिहिलं जातं-बोललं जातं. आज ‘मॅन ऑफ द हो’लची अवस्था पाहताना त्याच्यासंदर्भात मात्र ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ या किशोरकुमार यांनी गायिलेल्या हिंदी सिनेगीताची आठवण येते. या गाण्यातील प्रत्येक ओळ जणू काही त्याच्या जीवनाला लागू पडते. कारण, त्याचा एकांत हा त्यानं स्वीकारलेला नाही, तर नागर जीवन जगणाऱ्या, स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या माणसानं तो त्याच्यावर लादलेला आहे. त्याला आजही आपल्यात यायची इच्छा नाही. त्याचं स्वतःचं म्हणून असलेलं विश्व आपण नष्ट केलं आहे. त्यामुळे तो आणि आपण एकाच पृथ्वीवर राहत असलो तरी एकमेकांसाठी कायम परग्रहवासीच असणार आहोत.

ब्राझीलच्या रोंडोनिया राज्याच्या तनारू प्रदेशात ‘मॅन ऑफ द होल’ ज्या भागात तो राहतो ते जंगल गुरांचे गोठे व सोयाबीनची शेतं यांनी वेढलेलं आहे. त्याच्या जमातीची गरज जंगलच भागवत होतं; परंतु जंगलात पशू चारण्यासाठी जाणाऱ्यांना त्यांचं हे जंगलच हवं होतं. पशुपालकांच्या गरजा कोणत्याही नागर माणसाप्रमाणेच अमर्याद होत्या आणि आहेत, त्यामुळे या पशुपालकांना जंगलाची सर्व भूमी हवी होती. शहर असो वा खेडं, माणसांना अधिकाधिक जमीन हवी आहे. ‘मॅन ऑफ द होल’ला मात्र वस्त्रांचीदेखील आवश्यकता नाही.

सन १९९६ मध्ये त्याच्या वेगळ्या अस्तित्वाचा शोध लागला आणि त्याला ‘जगातील सर्वात एकाकी माणूस,’ असं संबोधलं गेलं. सन १९९८ पर्यंत पृथ्वीवरील त्याच्या अस्तित्वाची साक्ष देणारं केवळ एक अस्पष्ट छायाचित्र उपलब्ध होतं. एका चित्रपटनिर्मात्यानं ते काढलं होतं. त्यानंतर तो प्रकाशात आला आणि ब्राझीलच्या ‘आदिवासी जमाती संरक्षण संस्थे’नं म्हणजे FUNAI नं (Fundação Nacional do Índio - National Indian Foundation - फुनाई) त्याचं संरक्षण करण्याची योजना हाती घेतली. यासाठी एक माहितीपट तयार करण्यात आला. सन २००५ मध्ये संस्थेनं मध्यस्थांच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधण्याचा व संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानं एका मध्यस्थावर बाण सोडून त्याला जखमी केलं. भूतकाळात त्याच्या टोळीचं काय झालं, या त्याच्या स्मृतींवरून तो बाहेरील जगाला एक धोकादायक जागा मानतो आणि एकटं राहणं पसंत करतो, हे संस्थेच्या लक्षात आलं.

ब्राझीलच्या सरकारनं या अनुभवावरून या माणसाच्या एकांतात जगण्याच्या इच्छेचा आदर करण्याचं व त्याच्या प्रदेशाचं संरक्षण करण्याचं ठरवलं; जेणेकरून तो शांतपणे जगू शकेल. त्याच्यासाठी अकरा हजार हेक्टर क्षेत्राचं ‘अभयारण्य’ राखीव ठेवण्यात आलं. त्याचा वावर असलेल्या ठिकाणी काही साधनं व बियांच्या भेटवस्तू ठेवल्या जातात. संशोधकांना त्यानं बांधलेल्या पडक्या झोपड्यांमध्ये सुमारे दोन मीटरचा एक खड्डा खणलेला दिसला.

त्यानं प्राण्यांना अडकवण्यासाठी आणि स्वतः त्यात लपण्यासाठी हा खड्डा खोदला असावा, असं सुरुवातीला मानलं जात होतं. मात्र, नंतर काही निरीक्षकांनी लावलेल्या अंदाजानुसार, त्याच्या टोळीमध्ये अशा खड्ड्यांचं काही आध्यात्मिक महत्त्व असू शकतं. त्याच्या गवताच्या पेंढ्यांच्या झोपडीत लाकडी भाले, बांबू, राळ, मशाल, बाण अशी ‘हत्यारं’ होती. त्यानं संपूर्ण जंगलात बागाही निर्माण केल्या आहेत. केळी, मका, पपई आणि मॅनिओक आदी पिकं तिथं त्यानं पिकवली आहेत. ‘मॅन ऑफ द होल’च्या अभयारण्याच्या जमिनीवरही पशुपालकांची नजर आहे. एकदा त्यांनी ‘मॅन ऑफ द होल’ला मारण्याचाही प्रयत्न केला होता.

सारं गमावत गमावत आलेला हा ‘मॅन ऑफ द होल’ आज वयाच्या पन्नाशीत पोहोचला आहे. गेल्या २५ वर्षांपासून तो एकाकी जीवन जगत असल्यामुळे तो ‘जगातील सर्वात एकाकी माणूस’ म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनभिज्ञ जमातीचा व भाषेचा तो शेवटचा प्रतिनिधी आहे. जगातील आणखी एक जमात त्याच्याबरोबरच कायमची नष्ट होणार आहे. हे निराशाजनक आहे. मानवी जीवनातील विविधता आपण अजून किती गमावणार आहोत? ‘निसर्गाकडे चला’ म्हणणारा आधुनिक माणूस निसर्गात जगणाऱ्या माणसाला जगू देणार आहे की नाही, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. मात्र, सर्वस्व गमावून जगातील सर्वात एकाकी जीवन जगणाऱ्या या माणसानं जीवनसंघर्ष सोडलेला नाही आणि आत्महत्याही केलेली नाही. हा त्याचा जीवनसंदेश आजच्या आधुनिक माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com