पपायरस रोल ते पेपर

इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं एक प्राचीन इजिप्शियन बंदर ‘वादी अल्-जर्फ’... या परिसरात २०१२ मध्ये पुरातत्त्वसंशोधकांनी उत्खनन केलं...या उत्खननात त्यांना काही लिखित पुरावे सापडले.
papyrus roll
papyrus rollsakal
Summary

इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं एक प्राचीन इजिप्शियन बंदर ‘वादी अल्-जर्फ’... या परिसरात २०१२ मध्ये पुरातत्त्वसंशोधकांनी उत्खनन केलं...या उत्खननात त्यांना काही लिखित पुरावे सापडले.

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं एक प्राचीन इजिप्शियन बंदर ‘वादी अल्-जर्फ’... या परिसरात २०१२ मध्ये पुरातत्त्वसंशोधकांनी उत्खनन केलं...या उत्खननात त्यांना काही लिखित पुरावे सापडले. या लिखित पुराव्यांमध्ये गिझाच्या ‘ग्रेट पिरॅमिड’च्या बांधणीची शेवटची काही वर्षं, इसवीसनपूर्व २५६०-५० च्या दशकात खुफूच्या राजवटीचा झालेला शेवट आदीचं वर्णन करण्यात आलं होतं. इजिप्शियन इतिहासाचे अशाच प्रकारचे पुरावे याआधीही संशोधकांना सापडले होते. ‘वादी अल्-जर्फ’चे पुरावे मात्र सर्वात जुने मानले जातात. या लिखित दस्तऐवजाला पुरातत्त्वसंशोधकांनी ‘पपायरस रोल’ अथवा ‘पपायरस स्क्रोल’ असं संबोधलं आहे.

एकोणिसाव्या शतकापर्यंत इजिप्तमध्ये व युरोपात काही जणांनी पपायरस रोल तयार करून त्यावर लेखन करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. नाईलच्या त्रिभुज प्रदेशात विपुल प्रमाणात असलेल्या पपायरस या वनस्पतीपासून तयार केलेल्या जाड कागदासारख्या या सामग्रीचा वापर लेखनपृष्ठभाग म्हणून केला जात असे. याची गुंडाळी करता येत असे, त्यामुळे तो ‘पपायरस रोल’.

साधारणपणे इजिप्तमध्ये इसवीसनपूर्व चौथ्या शतकात पपायरस वनस्पतीचा वापर लेखनसामग्री तयार करण्यासाठी केला जाऊ लागला. नाईलच्या खोऱ्यात विपुल प्रमाणात आढळणाऱ्या पपायरसचा वापर प्राचीन इजिप्शियन लोकांनी अन्नपदार्थ तयार करण्यापासून ते पादत्राणं तयार करण्यापर्यंत केला होता. त्यात सर्वात महत्त्वाचा वापर लेखनासाठीचा होता. खरं पाहिलं तर ‘लेखनपृष्ठभाग’ म्हणून पपायरस हा आदर्श नव्हता. मात्र, त्याची नाईल खोऱ्यात असलेली विपुलता आणि स्वस्त उपलब्धता महत्त्वाची होती. पपायरस नाजूक तर होतंच; परंतु अधिक ओलावा अथवा अधिक कोरडेपणा या त्याच्या टोकाच्या गुणधर्मामुळे त्याच्या टिकाऊपणाला मर्यादा होत्या. असं असले तरी त्याच्यावर जे लिहिलं गेलं, त्यामुळे पपायरस रोल हे आज जगात उपलब्ध असलेले सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणून ओळखले जातात. रोमच्या बाजारात सहा प्रकारचे पपायरस विकले जात होते, अशी नोंद इसवीसनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेले रोमन तत्त्वज्ञ व लेखक प्लिनी द एल्डर यांनी करून ठेवली आहे.

लेखनपृष्ठभाग किती बारीक, किती चिवट, किती पांढरा आणि किती गुळगुळीत आहे या गुणवत्तेवर त्याचा दर्जा निश्चित केला जात असे. दहा इंच रुंदीच्या शीटमध्ये तयार केलेल्या ‘सुपरफाईन ऑगस्टन’पासून ते कमीत कमी खर्चिक आणि सर्वात खडबडीत चार इंच रुंदीपर्यंतच्या श्रेणीमध्ये पपायरस लेखनासाठी उपलब्ध होतं. साध्या भाषेत सांगायचं झाल्यास, ‘सायपेरस पपायरस’ या वनस्पतीच्या देठापासून पपायरस तयार केलं जात असे. पपायरस वनस्पतीच्या या भागावर प्रकिया करून तिच्या १६ इंच लांब पट्टया तयार केल्या जात असत. ही वनस्पती आतून तंतुमय व चिकट असते. या पट्ट्या एकमेकींच्या शेजारी वाळत घातल्यावर दोन पट्ट्यांचे तंतू वनस्पतीच्या अंगच्या चिकटपणामुळे एकमेकांत एकरूप होत. त्यात अधिक एकजीवपणा येण्यासाठी ही शीट्स जड वस्तूखाली दडपून ठेवली जात असत. ही शीट्स कोरडी झाल्यानंतर त्यांना गोल दगडानं पॉलिश केलं जायचं. अशा प्रकारे तयार झालेल्या या लेखनपृष्ठभागाची गुंडाळी, म्हणजेच रोल किंवा स्क्रोल, तयार होत असे. पपायरस रोलमधील शेवटच्या शीटला लाकडी काठी जोडली जाई. त्यामुळे हा रोल हाताळणं सुलभ होत असे.

पपायारस हे खरं तर वनस्पतीचं नाव आहे; परंतु तिच्यापासून तयार केल्या गेलेल्या या लेखनपृष्ठभागावर लिहिण्यात आलेल्या ग्रंथांना, पत्रांना व कोणत्याही मजकुरालाही ‘पपायरस’ असंच म्हटलं जाऊ लागलं. कागदासाठी इंग्लिशमध्ये वापरला जाणारा ‘पेपर’ हा शब्दही ‘पपायरस’ या शब्दापासून निर्माण झालेला आहे. पपायरसचा अनेकदा पुनर्वापर केला जात असे. पपायरसची निर्मितिप्रकिया आणि त्याच्यावर लेखन करण्याची पद्धती यासंदर्भात एल्डर यांनी आपल्या ‘नॅचरलिस हिस्टोरिया’ या ग्रंथात सविस्तर माहिती दिलेली आहे. दमट वातावरणात पपायरस स्क्रोल ठेवल्यास ते लवकर नष्ट होतात. यासाठी ग्रंथालयात पपायरस स्क्रोल लाकडी पेटीत अथवा मानवी पुतळ्यांच्या छातीच्या भागात संग्रहित केले जात असत. पपायरसच्या या अल्पजीवित्वामुळे एखादा पपायारस दोनशे वर्षं टिकला तर ती महत्त्वाची घटना मानली जाते. या पपायरसला अनेकवचनात ‘पॅपिरी’ असं म्हटलं जातं. ग्रीस व इटलीमध्ये सापडलेले पॅपिरी अत्यंत खराब अवस्थेत होते. याउलट, इजिप्तमधील पपायरस चांगल्या स्थितीत सापडले. यामध्ये एलफंटीन पॅपिरी व ऑक्सिरिंकस हे प्रकार अधिक प्रसिद्ध आहेत. इजिप्तमधील हर्क्युलेनियम येथे असलेलं पॅपिरी संग्रहालय सन १७५२ मध्ये उत्खननात सापडलं असून, त्याला संशोधकांनी ‘व्हिला ऑफ द पॅपिरी’ असं नाव दिलेलं आहे.

पपायरस हा शब्द लॅटिनमधून इंग्लिशमध्ये आला असला तरी ग्रीक भाषेत यासाठी ‘बिब्लोस’ असा शब्द होता. इसवीसनाच्या चौथ्या शतकात ग्रीक लेखक थिओफ्रास्टस यांनी अन्नपदार्थ म्हणून वापरल्या जाणाऱ्या पपायरस वनस्पतीसाठी ‘बिब्लोस’ हा शब्द वापरलेला दिसतो. ‘बिब्लोस’चं अस्तित्व इंग्लिशमधल्या ‘बिब्लिओफाइल’ आणि ‘बायबल’ यांसारख्या शब्दांत आढळतं. यामध्ये पपायरस म्हणजे लेखनासाठी वापरला जाणारा कागदासारखा पृष्ठभाग हे सूचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राचीन इजिप्तमध्ये कुणी विद्वान आहे किंवा श्रीमंत आहे म्हणून त्याला पपायरसवर लेखनाची परवानगी नव्हती. ज्यानं पपायरसवर लेखनाची कला संपूर्णपणे अवगत केलेली आहे, त्यालाच पपायरस स्क्रोलवर लेखन करण्याची परवानगी होती. याचाच अर्थ, मान्यताप्राप्त लेखनिकांकडूनच पपायरसवर लेखन करून घ्यावं लागत असे. हे लेखनीक लेखनासाठी काळ्या व लाल शाईचा वापर करत. लाल रंगाचा वापर भुतं वा दुष्ट आत्म्यांच्या नावासाठी, नवीन परिच्छेदाचा सुरू करण्यासाठी, एखादा विशेष परिच्छेद लक्षात आणून देण्यासाठी, काही ठिकाणी विरामचिन्हं इत्यादीसाठी केला जाई.

पपायरसवरील मजकूर नष्ट करून त्याचा पुनर्वापरही केला जात असे. स्तोत्रं, धार्मिक ग्रंथ, आध्यात्मिक उपदेश, प्रेमकविता, वैद्यकीय-वैज्ञानिक ज्ञान, नोंदी, तांत्रिक हस्तपुस्तिका, दस्तऐवज, तंत्र-मंत्र आणि साहित्य यासाठी पपायरसचा वापर करण्यात आलेला आहे. ‘काहुन गायनॅकॉलॉजिकल पपायरस’, ‘लंडन मेडिकल पपायरस’, ‘एडविन स्मिथ पपायरस’ हे सर्व इजिप्शियन लोकांच्या वैद्यकीय ज्ञानाची व कौशल्याची साक्ष देतात. कर्करोग, हृदयरोग, गर्भपात, गर्भनिरोधक, वंध्यत्व यांबरोबरच चिंता, नैराश्य इत्यादीसंदर्भातल्या प्राचीन इजिप्तच्या वैद्यकीय ज्ञानाची प्रचीती यामधून येते. काही काळानंतर पपायरसऐवजी युरोपात चर्मपत्राचा वापर ग्रंथनिर्मितीसाठी अथवा लेखनासाठी होऊ लागला. त्यातून आधुनिक पुस्तकाचं सुरुवातीचं रूप विकसित झालं. चर्मपत्र न कापता दुमडता येऊ शकत होतं. मात्र, पपायरसच्या बाबतीत हे शक्य नव्हतं, तसंच त्याचा टिकाऊपणा कमी होता. त्यानंतर कागदाचा शोध लागला. त्यामुळे लेखनसामग्री म्हणून पपायरसचा वापर कमी होत होत अखेर बंद झाला. मात्र, मानवी अक्षरयात्रेचं सुरुवातीच्या काळातलं उपलब्ध लिखित रूप म्हणून पपायरसनं इजिप्तला इतिहासात एक विशिष्ट स्थान मिळवून दिलं आहे.

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com