पर्शिया ते रोम मिथ्राची प्रकाशयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rom mithra

इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमन साम्राज्याच्या विस्ताराचा भाग म्हणून रोमन फौजांनी पर्शियावर (इराण) आक्रमणं करण्यास सुरुवात केली होती.

पर्शिया ते रोम मिथ्राची प्रकाशयात्रा

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमन साम्राज्याच्या विस्ताराचा भाग म्हणून रोमन फौजांनी पर्शियावर (इराण) आक्रमणं करण्यास सुरुवात केली होती. जगाचा इतिहास पाहिला, तर अशा आक्रमणांनी राजसत्तेच्या राज्यविस्ताराची भूक तर भागवलीच; परंतु सर्वस्तरीय आदान-प्रदानालाही चालना दिलेली आहे. यामध्ये व्यापारापासून धर्मापर्यंत आणि भाषेपासून संस्कृतीपर्यंत सर्वच प्रकारचं आदान-प्रदान अंतर्भूत होतं.

रोमन फौजा पर्शियाच्या भूमीवर पोहचल्या. तिथं केलेल्या लूटमारीत त्यांनी पर्शियाची एक देवतादेखील लुटून आणली. हा झाला गमतीचा भाग. पर्शियात गेल्यावर रोमन लोकांचं लक्ष तेथील एका देवतेने वेधलं, ती म्हणजे ‘मिथ्रा’.

इसवी सनपूर्व सहाव्या शतकात झरतुष्ट्राने आपल्या ‘झोरास्टियन’ धर्माची स्थापना केली होती. हा झरतुष्ट्र जरदस्तू जोरास्टर, जरदूशी जोरास्टर, झोरोस्टर अशा उच्चारणातील विविध बदलांनी ओळखला जातो. झोरास्टियन धर्माला आपण पारशी धर्म म्हणून संबोधतो. ‘आहूरमझ्द’ म्हणून ईश्वराची कल्पना करणारा झरतुष्ट्राचा हा एकेश्वरवादी धर्म आहे. झरतुष्ट्राच्या पूर्वी पर्शियात ईश्वराला विविध रूपांत भजणारी बहुदेववादी धार्मिक परंपरा अस्तित्वात होती, त्यातीलच एक देवता होती मिथ्रा. मिथ्राचा संबंध सूर्यदेवतेशी मानला जातो. संस्कृतमध्ये सूर्याला ‘मित्र’ असंही संबोधलं जातं.

ऐतिहासिक भाषाविज्ञानात इंडो-इराणियन भाषांचं एक भाषाकूळ मानण्यात आलं आहे, ज्यामध्ये उत्तर-पूर्व भारतापासून ते युरोपातील फिनलँडपर्यंतचा समावेश होतो. खरंतर ग्रीक, लॅटिन व संस्कृत भाषांमधील साम्य लक्षात आल्यावर सर विल्यम जोन्स यांनी इंडो-युरोपियन भाषाकुळाची संकल्पना मांडली आणि यातूनच ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा जन्म झाला. ह्या इंडो-युरोपियन भाषाकुळातील दहा उपशाखांपैकी पहिली शाखा म्हणजे इंडो-इराणियन शाखा. ह्या शाखेतील दोन प्रमुख भाषा म्हणजे संस्कृत व पर्शियन वा अवेस्ता (इराणियन), त्यामुळे भारतीय आणि इराणी अथवा पर्शियन भाषेत आपल्याला साम्य असलेलं दिसतं. भाषेबरोबरच आस्थांमध्ये असलेलं साम्यदेखील याठिकाणी लक्षवेधक ठरतं. रोमन सैन्य जेव्हा पर्शियात पोहचलं, तेव्हा खरंतर झोरास्टियन धर्म हा पर्शियाचा धर्म झालेला होता, तरी त्याच्यापूर्वी असलेल्या बहुदेववादी काळातील मिथ्रा ही देवता त्यांचं लक्ष वेधते, याचा अर्थ तेव्हादेखील ह्या देवतेची उपासना होत असावी किंवा झोरास्टियन धर्मातही मिथ्राला महत्त्व असावं. मिथ्रा देवतेने झोरास्टियन धर्माला आणि झोरास्टियन धर्माने मिथ्रा उपासनेला प्रभावित केलं होतं, असं काही इतिहासकारांचं मत आहे.

इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकात मिथ्रा देवता रोममध्ये पोहचली आणि हळूहळू तिची उपासना करणारा एक पंथ तिथे अस्तित्वात आला. पर्शियाच्या मिथ्रा या संकल्पनेच्या विविध छटा आहेत. ही देवता सूर्यदेवतेशी संबंधित असली तरी न्यायदेवता, परस्पर करार वा दायित्वदेवता, युद्धदेवता इत्यादी संकल्पना मिथ्रामध्ये सामावलेल्या दिसतात. मिथ्राला त्याच्या या सर्व रूपांमध्ये रोमन लोकांनी स्वीकारलं होतं. पर्शियात मिथ्राची उपासना गूढ वा रहस्यमय होती किंवा नाही याबद्दल निश्चित असं विधान करता येत नाही. मात्र, रोममध्य जो मिथ्रा उपासना संप्रदाय अस्तित्वात आला, तो एक गूढ अथवा रहस्यमय संप्रदाय होता. रोमन साम्राज्य आणि पर्शिया भौगोलिकदृष्ट्या एकमेकांना लागून असल्याने त्यांच्यात सांस्कृतिक आदान-प्रदान मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. पुरातत्त्व संशोधकांनी केलेल्या उत्खननात युरोप, आफ्रिका व आशिया खंडांना व्यापणाऱ्या रोमन साम्राज्याच्या विविध परिसरांत मिथ्रा उपासना पंथाचं अस्तित्व आढळून आलेलं दिसतं. पर्शियातून आलेल्या मिथ्राची संकल्पना रोमनांनी स्वीकारली असली, तरी त्याच्या उपासना पद्धतीत मात्र रोमन साम्राज्यात खूप बदल झाले होते. एका धष्टपुष्ट वृषभाला आपल्या कवेत घेऊन सुऱ्याने त्याचा बळी देत असलेला मिथ्रा रोमन शिल्पांमध्ये व चित्रकलेमध्ये आढळून येतो. त्यामागे एक कथा सांगितली जाते की, सूर्यदेव आपल्या ‘रेव्हन’ नावाच्या दूताद्वारे मिथ्राला संदेश पाठवतो की, एका वृषभाचा बळी दे, कारण सृष्टीच्या पुनर्निर्मितीसाठी ते आवश्यक आहे.

मिथ्रा अत्यंत दुःखद मनाने वृषभाचा बळी देतो. त्यानंतर मोठा चमत्कार होऊन बळी गेलेला वृषभ चंद्रात रूपांतरित होतो. मिथ्राच्या वस्त्राचं तारांकित आकाश होतं. वृषभाची शेपूट व रक्तापासून धान्य-द्राक्ष यांच्या आद्य बीजांची निर्मिती होते. वृषभाचं वीर्य एका कोषात साचतं आणि त्यातून प्रजोत्पादनाची प्रक्रिया प्रारंभ होते. ह्या बळीनंतर सृष्टीचं पुनर्निर्माण तर झालंच, त्याचबरोबर वृषभाचं रक्त प्राशन करणाऱ्या प्रतीकांमधून दुष्ट शक्तींचादेखील उदय झाला, असं सांगण्यात येतं. यामध्ये अंधार, सर्प, विंचू आदींचा दुष्टतेची प्रतीकं म्हणून समावेश करण्यात आला आहे. वृषभाच्या बळीनंतर सुष्ट व दुष्ट शक्तींचा संघर्ष जगात सुरू झाला, असंदेखील या कथेत नमूद करण्यात आलं आहे. असा हा पर्शियन मिथ्राचा रोमन अवतार सांगता येतो. रोमन मिथ्रा संदर्भातील संकल्पनेला ‘ट्युरोक्टॉनी’ असं संबोधलं गेलं आहे. वृषभाचा बळी घेणाऱ्या मिथ्राला सामर्थ्य आणि प्रजनन यांचं प्रतीक मानलं जातं. वृषभाच्या बळीतून पुनर्जन्माची संकल्पनादेखील अभिव्यक्त केली गेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, वृषभाचा बळी ही संकल्पना झोरास्टियन धर्मातून घेण्यात आलेली नाही, कारण झरतुष्ट्र हे कोणत्याही पशुबळीच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांच्यापूर्वीच्या बहुदैवत संस्कृतीतच ही संकल्पना अंतर्भूत असावी.

पर्शियाच्या सम्राटांनी झोरास्टियन धर्म स्वीकारला तरी, त्यांनी आधीच्या श्रद्धा-उपासना यांच्याविषयी उदार धोरण ठेवलं, त्यामुळे काळाच्या ओघात पर्शियातील बहुदैवतवादी संस्कृती क्षीण होत गेली. इसवी सनपूर्व ३३० मध्ये सिंकदराने जेव्हा पर्शियावर विजय प्राप्त केला, तेव्हा मिथ्रा ही देवता केवळ कृषक समाजात काही प्रमाणात उपासली जात होती. त्यानंतर तीनशे वर्षांनंतर म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकात आलेल्या रोमनांनी कृषक समाजाची ही उपास्य देवता स्वीकारावी हे विशेष आहे. रोमन साम्राज्याचा कुख्यात सम्राट नीरोदेखील मिथ्राच्या उपासनेसाठी मोठ्या उत्सवाचं आयोजन करत होता.

यामागे एक महत्त्वाचं कारण होतं की, रोमन मिथ्रावादात प्रजेची राजाप्रती असलेली बांधिलकी, समर्पण भावना आणि प्रामाणिकता हे तत्त्व महत्त्वाचं होतं. इसवी सन ३१२ मध्ये रोमन साम्राज्याची दोन शकलं झाली, त्यातील काँन्स्टटाइन साम्राज्याने ख्रिश्चन धर्माचा राजधर्म म्हणून स्वीकार केल्यामुळे रोमन साम्राज्यातील पॅगन, जुडा आणि त्यासोबतच मिथ्रा हे सर्व उपासना पंथ क्षीण होत गेले. सृष्टीच्या पुनर्निर्माणानंतर मिथ्रा आणि सूर्यदेवाने सोबत भोजन घेतलं, त्यामुळे सहभोजनाची ही पद्धत मिथ्रा उपासकांनी जोपासलेली दिसते. मिथ्रा संप्रदायाची उपासनास्थळं असलेल्या गुंफा उत्खननात सापडल्या आहेत, त्यावरून अभ्यासकांनी रोमन मिथ्रा उपासनेतील गूढ उपासना पद्धतीचं रहस्य उलगडण्याचे प्रयत्न सुरू केलेले दिसतात. असा मिथ्रा पर्शियातून रोममध्ये आला तरी त्याच्या संकल्पनेतील प्रकाश सोबत घेऊनच आला.

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

टॅग्स :saptarang