कथा पहिल्या पत्रकाराची...

‘बंगाल गॅझेट’ हे भारतातीलच नव्हे तर, आशिया खंडातील पहिलं वृत्तपत्र होतं. हिकी हे भारतातील पहिला पत्रकार व वृत्तपत्र-संपादक ठरले.
Hicky Newspaper
Hicky NewspaperSakal
Summary

‘बंगाल गॅझेट’ हे भारतातीलच नव्हे तर, आशिया खंडातील पहिलं वृत्तपत्र होतं. हिकी हे भारतातील पहिला पत्रकार व वृत्तपत्र-संपादक ठरले.

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

सन १७७२ मध्ये इंग्लंडहून आलेलं एक जहाज कलकत्त्याच्या (कोलकता) बंदराला लागलं. लंडनमधला एक सर्जन व त्याचा सहाय्यक असे दोघं त्यातून उतरले. सर्जनचा सहाय्यक असलेला बावीस वर्षांचा तो आयरिश तरुण पुढच्या काळात ‘भारतीय वृत्तपत्रांचा जनक’ म्हणून इतिहासात ओळखला जाणार होता. आयर्लंडमध्ये १७४० च्या सुमारास जन्मलेल्या या तरुणाला लहानपणापासून छपाईच्या तंत्राची आवड होती. त्यासाठी त्यानं स्कॉटिश प्रिंटर विल्यम फॅडेन यांच्याकडे मोठेपणी प्रिंटिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी लंडन गाठलं. काही कारणांमुळे त्याला हे शिक्षण अर्धवट सोडाव लागलं आणि तो वकिलाकडे कारकून म्हणून काम करू लागला. तिथंही काही अडचणी आल्यामुळे कायद्यातील कारकीर्दीवर त्याला पाणी सोडावं लागलं. मग या तरुणानं एका सर्जनच्या हाताखाली त्याचा सहाय्यक म्हणून कामाला सुरुवात केली. त्याच सर्जनबरोबर हा तरुण - जेम्स ऑगस्टस हिकी - भारतात आला.

कलकत्त्याला आल्यावर हिकी यानं सर्जन आणि व्यापारी म्हणून कामाला सुरुवात केली. व्यापारातही त्याच्या नशिबानं त्याला साथ दिली नाही. त्याचा माल घेऊन येणारं जहाज उशिरा आल्यानं सर्व माल खराब झाला. त्यामुळे व्यापारासाठी घेतलेलं कर्ज चुकतं करण्यास तो असमर्थ ठरला. कर्जदारांच्या तक्रारीवरून ऑक्टोबर १७७६ मध्ये हिकी याला तुरुंगात जावं लागलं. तुरुंगात असताना त्याला आपल्या मूळच्या छंदाची, म्हणजेच प्रिंटिंग-क्षेत्राची आठवण झाली. त्यानं त्याही परिस्थितीत छापखाना खरेदी करण्यासाठी भांडवल मिळवलं. सन १७७७ च्या दरम्यान त्यानं तुरुंगातूनच मुद्रणव्यवसाय सुरू केला. पुढं १७७८ मध्ये त्याची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीसाठी तो छपाई करत असे.

मुद्रणव्यवसायात स्थिरावल्यानंतर हिकी याच्या डोक्यात वृत्तपत्र काढण्याची कल्पना आली. ता २९ जानेवारी १७८० रोजी हिकी यानं संपादित केलेलं पहिलं भारतीय वृत्तपत्र ‘हिकीज् बंगाल गॅझेट...’ (HICKY`s Bengal Gazette...) हे प्रकाशित झालं.

‘बंगाल गॅझेट’ हे भारतातीलच नव्हे तर, आशिया खंडातील पहिलं वृत्तपत्र होतं. हिकी हे भारतातील पहिला पत्रकार व वृत्तपत्र-संपादक ठरले. ‘बंगाल गॅझेट’ हे इंग्लिश भाषेतून प्रसिद्ध होणारं साप्ताहिक वृत्तपत्र आठवड्यातून एकदा - शनिवारी - छापलं जायचं.

एक रुपया हे त्याचं ‘किरकोळ विक्रीमूल्य’ होतं. दर आठवड्याला ‘बंगाल गॅझेट’च्या ४०० प्रती वितरित होत असाव्यात असा अंदाज आहे. हिकी यांच्या आधी १२ वर्षांपूर्वी विल्यम बोल्ट्स नावाच्या डच व्यक्तीनं भारतात वृत्तपत्र छापण्याची कल्पना मांडली होती; पण ही संकल्पना प्रत्यक्षात प्रथम उतरवली ती हिकी यांनीच. त्यांच्या वृत्तपत्राच्या ब्रीदवाक्यावरून ध्वनित होणारा आशय असा होता : ‘सर्व पक्षांसाठी खुले; परंतु कुणाचाही प्रभाव नाही.’

‘बंगाल गॅझेट’ हे व्यंग्यात्मक आणि सडेतोड लेखनशैलीसाठी प्रसिद्ध होतं. ते गरिबांच्या हक्कांची आणि त्यांच्या प्रतिनिधित्वाची मागणी करत होतं...अन्याय्य कर-आकारणीच्या विरोधात हे वृत्तपत्र वाद घालत असे...तसंच ब्रिटिशांच्या युद्धखोर वृत्तीला, वसाहतवादाला, विस्तारवादी व साम्राज्यवादी धोरणाला विरोध करत असे. ब्रिटिश राज्यसत्तेच्या या असुरी इच्छांच्या पूर्तीसाठी काम करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या नेतृत्वाची ‘बंगाल गॅझेट’मधून नेहमीच खिल्ली उडवली जाई. हिकी आता केवळ मुद्रक राहिले नव्हते तर, त्यांच्यातील पत्रकार आणि वृत्तपत्र-संपादक जागा झाला होता. ‘वृत्तपत्र हा सर्वसामान्य जनतेचा आवाज असतो,’ हा संदेश भारतातील या पहिल्याच वृत्तपत्रानं दिला होता हे त्याचं वैशिष्ट्य.

भारतात नियुक्त असणाऱ्या ब्रिटिश सैनिकांमध्ये ‘बंगाल गॅझेट’ लोकप्रिय ठरलंच होतं; परंतु भारतीयांनाही स्वतःचं वृत्तपत्र काढण्यासाठी ते प्रेरक ठरत होतं. ब्रिटिशांना विरोध करण्याच्या धोरणामुळे हिकी यांचं वृत्तपत्र काही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत खुपू लागलं. त्यांनी ‘बंगाल गॅझेट’ला प्रतिस्पर्धी म्हणून दुसरं वृत्तपत्र काढण्याचा घाट घातला. त्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी ‘द इंडिया गॅझेट’ नावाचं वृत्तपत्र काढलं.

हिकी यामुळे दुखावले गेले. ‘ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी सायमन ड्रोझ आणि गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज् यांची पत्नी मारियन हेस्टिंग्ज् यांना लाच देण्यास मी नकार दिल्याबद्दल ‘द इंडिया गॅझेट’ वृत्तपत्राचं समर्थन कंपनीचे अधिकारी करत आहेत,’ असा आरोप हिकी यांनी केला. त्यांच्या आरोपाचा बदला म्हणून टपालाद्वारे वृत्तपत्र वितरित करण्यास वॉरन हेस्टिंग्ज् यांनी हिकी यांना मनाई केली. हिकी आणि हेस्टिंग्ज् यांच्यात आता संघर्ष सुरू झाला. ‘हेस्टिंग्ज् आपल्या अभिव्यक्ती-स्वातंत्र्याची गळचेपी करत आहेत...ते भ्रष्टाचारी, जुलमी आहेत,’ असे आरोप हिकी आपल्या वृत्तपत्रातून करू लागले.

त्यांची व्यक्तिगत नालस्तीही हिकी यांनी ‘बंगाल गॅझेट’मधून केली. याशिवाय, अन्य ब्रिटिश अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. एवढंच नव्हे तर, तेव्हाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती इलायजा इम्पी यांनी लाच घेतल्याचे आणि प्रोटेस्टंट मिशनचे प्रमुख जॉन झकराया किरनॅंडर यांनी अनाथ मुलांच्या निधीतून चोरी केल्याचा आरोपही हिकी यांनी ‘बंगाल गॅझेट’मधून केला. परिणामी, हिकी यांच्या शत्रूंची संख्य वाढतच गेली.

हेस्टिंग्ज् आणि किरनॅंडर यांनी हिकी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला. जून १७८१ मध्ये एकूण चार खटल्यांमध्ये हिकी यांना दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना कारावासाची शिक्षा झाली.‘बंगाल गॅझेट’ छापलं जाईल अशी व्यवस्था हिकी यांनी तुरुंगात राहूनही केली आणि ते हेस्टिंग्ज् यांच्यावर व इतरांवर आरोप करत राहिले. हेस्टिंग्ज् यांनी त्यांच्याविरुद्ध नवीन खटले दाखल केले आणि अखेर त्यांना सरकारी दडपशाहीनं कायमचं दडपलं.

ता. ३० मार्च १७८२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ‘बंगाल गॅझेट’चा छापखाना जप्त करण्यात आला. त्याचा सार्वजनिक लिलाव झाला. ‘द इंडिया गॅझेट’नं हा छापखाना विकत घेतला. ‘बंगाल गॅझेट’ वृत्तपत्राचं प्रकाशन कायमचं बंद झालं. हिकी यांचं हे वृत्तपत्र भारताचे तत्कालीन गव्हर्नर-जनरल वॉरन हेस्टिंग्ज् यांना आवडत नसल तरी हिकी यांनी अनेक भारतीयांना वृत्तपत्रं सुरू करण्यास प्रेरित केलं. हिकी यांचं मुद्रणकार्यालय हे नंतरच्या अनेक संपादकांसाठी प्रेरणास्थान ठरलं. ‘बंगाल गॅझेट’नं बंगालमध्ये वृत्तपत्रांच्या एका युगाचा प्रारंभ केला.

सन १७८४ ला नाताळच्या सुमारास हिकी यांची तुरुंगातून सुटका झाली. जेव्हा वॉरन हेस्टिंग्ज् हे महाभियोगाचा सामना करण्यासाठी इंग्लंडला निघणार होते, तेव्हा त्यांनी हिकी यांचं कर्ज माफ केलं. तीन वर्षांच्या तुरुंगवासानंतर हिकी यांची तब्येत बिघडली होती. ते गरिबीत राहत होते. याव्यतिरिक्त हिकी यांच्या नंतरच्या आयुष्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. भारताच्या या पहिल्या पत्रकारानं व संपादकानं चीनला जाणाऱ्या बोटीत ऑक्टोबर १८०२ मध्ये विपन्नावस्थेत अखेरचा श्वास घेतला.

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com