चरैवेती चरैवेती

राजा हरिश्चंद्र चितेवर बसला, इथपर्यंतची कथा आपण मागील सदरात पाहिली होती. त्याची पत्नी शैब्या आणि मुलगा रोहिताश्व हे देखील त्याच्याबरोबर चितेवर असतात.
raja harishchandra
raja harishchandrasakal

- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com

राजा हरिश्चंद्र चितेवर बसला, इथपर्यंतची कथा आपण मागील सदरात पाहिली होती. त्याची पत्नी शैब्या आणि मुलगा रोहिताश्व हे देखील त्याच्याबरोबर चितेवर असतात. अर्थातच, हरिश्चंद्राला कशाप्रकारे मृत्यू येणं शक्य नाही.

हरिश्चंद्रानं भगवान वासुदेव, ब्रह्मदेव आणि इंद्रदेवाचं ध्यान करत त्यांची प्रार्थना केली.

त्याची प्रार्थना ऐकून ब्रह्मदेव, धर्म, साध्य, विश्वदेव, मरुत, सिद्ध, रुद्र, अश्विनीकुमार आणि अनेक गंधर्व असे सगळे तिथं उपस्थित झाले. धर्म म्हणाला, ‘हे राजा! एवढा उतावळेपणा योग्य नाही. मी धर्म आहे आणि तुझ्यासमोर उपस्थित झालो आहे. तुझे धैर्य, मनोनिग्रह, सत्यप्रियता आणि इतर गुण पाहून मी संतुष्ट आहे.’ इंद्र म्हणाला, ‘हे हरिश्चंद्रा! हे भाग्यवंता! मी शक्र आहे आणि तुझ्यासमोर प्रगट झालो आहे.

आपल्या पत्नी आणि मुलासह तू अनंतावर विजय प्राप्त केला आहेस. त्यांच्यासह आता तू स्वर्गारोहण कर. इतरांसाठी ही बाब अशक्यप्राय आहे. तू मात्र तुझ्या कर्मांच्या जोरावर हे साध्य केलं आहेस.’ इंद्रानं आकाशातून हरिश्चंद्रावर मृत्यूलाही पळवून लावणाऱ्या अमृताचा वर्षाव केला. याबरोबरच आकाशातून मोठा पुष्पवर्षाव झाला आणि देवांनी वाद्यवादन सुरू केले. मृत्युमुखी पडलेला रोहिताश्व त्या देवसभेसमोरच झोपेतून जागा झाल्यासारखा उठून बसला. त्याच्या कोमल शरीरावर तजेला निर्माण झाला आणि त्याचे मन व संवेदना जागृत झाल्या.

राजा हरिश्चंद्रानं लगेचच आपल्या पुत्राला उराशी कवटाळलं. त्याच्या पत्नीबरोबर त्याचंही सर्व सौंदर्य परत आलं. दैवी वस्त्रं आणि फुलांच्या माळा परिधान केलेले त्यांचे देह तेज:पुंज दिसू लागले. हरिश्चंद्राचं हृदय अपार कृतज्ञतेनं भरून गेलं. त्या वेळी इंद्र त्याला म्हणाला, ‘केवळ पुण्यवंतांनाच प्राप्त होणाऱ्या सर्वोच्च स्वर्गाची तुला आणि तुझ्या पत्नी व मुलाला प्राप्ती होईल. त्याचा स्वीकार कर. हे सर्व तुला तुझ्या कर्मामुळंच प्राप्त होत आहे.’

यावर हरिश्चंद्र म्हणाला, ‘हे देवेंद्रा! माझ्या मालकाच्या, श्‍वप याच्या परवानगीशिवाय मला मुक्त होता येणार नाही. त्यामुळंच देवभूमी असलेल्या स्वर्गात मला येता येणार नाही.’ धर्म म्हणाला, ‘तुला अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचं मला ज्या वेळी समजलं, तेव्हा मीच माझ्या योगमायेचा वापर केला आणि श्‍वपचं रूप धारण करत तुझ्यासमोर आलो होतो. इंद्र म्हणाला, ‘हे हरिश्चंद्रा!

मृत्युलोकातील प्रत्येक व्यक्तीला जे ठिकाण गाठण्याची अंतिम इच्छा असते, तेच हे दैवी ठिकाण आहे. पुण्यकर्मे करणाऱ्यांसाठीच असलेल्या या ठिकाणी तू प्रवेश कर.’ हरिश्चंद्र म्हणाला, ‘हे देवेंद्रा! मी तुझ्यासमोर लीन आहे. मात्र, माझंही म्हणणं तू कृपा करून ऐकून घे. कृपा वर्षाव वाटणाऱ्या शब्दांत तू माझ्याशी बोललास, त्यामुळंच तुझ्याशी हे बोलण्याचं धाडस मी करत आहे.

माझ्यावर ओढवलेल्या आपत्तीमुळं, कोसलनगरातील जनता संकटात बुडाली आहे. त्यांना त्याच अवस्थेत सोडून मी स्वर्गप्राप्ती कशी करू? आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचा त्याग करणाऱ्याच्या पापाची तुलना केवळ ब्राह्मणहत्या, स्त्रीहत्या व गोहत्येशीच होऊ शकते.

माझी पूजा करणाऱ्या आणि माझ्या आश्रयावर जगणाऱ्या निष्पाप लोकांना मी एकटं सोडलं, तर मला या जगातच काय, पण कोणत्याही जगात सुख मिळणार नाही. हे शक्रा ! म्हणूनच तू स्वर्गात परत जा. हे देवेंद्रा ! माझी प्रजा माझ्याबरोबर येऊ शकत असेल, तरच मी स्वर्गात येईन. अन्यथा, त्यांच्याबरोबर नरकही मला मान्य आहे.’

इंद्र म्हणाला, ‘अनेक प्रकारची सत्कृत्ये आणि दुष्कर्मे असतात, आणि व्यक्तिगणिक त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. अनेक जण जर स्वर्गाचा आनंद घेणार असतील, तर तू तेथे कसा जाशील? हरिश्चंद्र उत्तरला, ‘हे शक्रा! आपल्या प्रजेवर अधिकार गाजवत असल्यानेच राजा त्याच्या साम्राज्याचा उपभोग घेऊ शकतो. मी अनेक मोठे यज्ञ केले आहेत आणि नागरिकांसाठी कामेही केली आहेत. मात्र, हे सर्व मला त्या प्रजेने दिलेल्या अधिकारांमुळेच शक्य झाले आहे.

माझ्यावर ज्यांनी निर्व्याज प्रेम केले आहे, त्यांना मागे सोडून स्वर्गप्राप्ती करावी, अशी माझी अजिबात इच्छा नाही. दान, यज्ञ आणि ध्यान या माध्यमातून मी जे काही थोडेफार पुण्य कमावले असेल, ते आमच्या सर्वांमध्ये, म्हणजे मी आणि माझ्या प्रजेमध्ये समान वाटले जावे. मी केलेल्या सत्कर्माची फळे मी कदाचित दीर्घकाळ उपभोगली असतील, पण आता ही फळे आम्हाला एकत्रितपणे चाखू देत. मग हे भाग्य आम्हाला केवळ एक दिवसासाठी लाभले तरी हरकत नाही.’ शक्र ‘तथास्तु’ म्हणाला.

अत्यंत प्रफुल्लित मनानं राजा हरिश्चंद्र, धर्म आणि विश्वामित्र यांच्यासह सर्व जण नगरात परतले. हरिश्चंद्राच्या समोरच इंद्र चारही वर्णांच्या सर्व लोकांना म्हणाला, ‘प्रजाजन हो! एरवी अत्यंत दुर्लभ असलेल्या स्वर्गामध्ये तुमच्या सर्वांचं सहज स्वागत आहे.’’ त्याचं हे वाक्य संपताच स्वर्गातून कोट्यवधी विमानं पृथ्वीवर अवतरीत झाली. ‘अयोध्यावासी जनहो! या विमानांमध्ये बसा आणि स्वर्गाकडं प्रयाण करा.’

इंद्राचं हे आवाहन ऐकल्यानंतर आणि हरिश्चंद्रावर अनुग्रह केलेल्या महर्षि विश्वामित्रांनी रोहिताश्वाला जवळ घेतलं. त्यांनी अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध नगरी असलेल्या अयोध्येच्या सिंहासनावर या राजपुत्राला बसविलं. या राज्याभिषेक सोहळ्यानंतर सर्व देवदेवता, ऋषिमुनी, सिद्ध यांच्यासह राजा हरिश्चंद्र आपल्या सर्व निरोगी व उत्साही प्रजेला, त्यांचे पुत्र, पत्नी आणि सेवकांसहित घेऊन स्वर्गाच्या दिशेनं गेला.

त्याच्या या अद्‍भुत सुखाकडं पाहून त्रिकालदर्शी, महाज्ञानी आणि वाचासिद्ध दैत्यगुरू शुक्राचार्यांच्या मुखातून श्लोक बाहेर पडले. ‘‘हरिश्चंद्रासारखा राजा पूर्वी कधी झाला नव्हता, भविष्यात कधी होणारही नाही. हरिश्चंद्राची कथा जो भक्तिभावाने श्रवण करेल, तो सर्व दुःखातून मुक्त होईल.’

या निमित्तानं इथं एका बाबीची नोंद करावी लागेल. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक असलेले प्रणव वर्धन हे प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ आहेत. सध्या ते वयाच्या पंचाऐंशीत असून नुकतेच त्यांनी आपल्या आठवणींचं एक पुस्तक प्रकाशित केलंय. या पुस्तकाचं नाव आहे ‘चरैवेती’. याचा अर्थ ‘पुढे जात राहा’, ‘चालत राहा’. हा मूळ शब्द ऐतरेय ब्राह्मणात आढळतो. कोणत्या संदर्भात हा शब्द तेथे आला आहे ? तर, इंद्र हा रोहिताश्वाला धर्म आणि जीवनाचं स्वरूप उलगडून सांगत आहे. होय, हा तोच रोहिताश्व.

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

(लेखक हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असून पुराणं आणि वेद तसेच भारतीय संस्कृतीचा त्यांचा अभ्यास आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com