पडद्याआड... (राजस जोशी)

rajas joshi
rajas joshi

कोपऱ्यावर एका चहाच्या दुकानावर चौकशी करण्याकरिता मी आत शिरलो, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला माधवसारखा मनुष्य दिसला; पण कपडे मात्र मळकट, शर्ट आत न खोचलेला. मी आनंदानं हाक मारली ः 'विजय, ए विजय...'' तो मनुष्य मात्र थांबायला तयार नव्हता. आता मात्र मी पळत जाऊन त्याला थांबवलं. क्षणभर आम्ही एकमेकांकडं बघत राहिलो. माधवचे बरेचसे केस उडाले होते, डोळ्याखाली काळं, तसंच वर आलेली गालफडं असा अवतार धक्कादायक होता...

रिटायर होऊन काही महिनेच झाले होते. वर्तमानपत्र संपूर्ण वाचून झालं होतं. मुलगा ऑफिसला निघायच्या गडबडीत होता. 'बाबा, जरा मित्रमंडळींत राहत जा, दिवसभर घरी वाचत काय बसतो?'' बाप आता रिकामा असल्यानं मुलानं आपसूकच सल्लागाराची सूत्रं मिळवली होती.
'अरे, आता मित्रांना कसं शोधणार, त्यात या गावात हल्ली फार ओळखी नाहीत.''
'बाबा, लॅपटॉप, फेसबुक कशासाठी आहेत?''
'का रे, मैत्रिणी सापडतील का रे जुन्या?'' मी डोळे मिचकावत विचारलं.
'त्या सर्व आता नातवंडं सांभाळण्यात बिझी असतील, तुमच्यासारख्या रिकाम्या नाहीत त्या...'' आतून सौभाग्यवतींनी योग्य वेळेत बॉल फटकावला होता.
पत्नी- मुलगा दोघं आता कामावर गेली होती. मी टीव्ही चालू केला, तर समोर साक्षात दैवत! "रिश्‍ते में तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम हे शहेनशाह...' असा डायलॉग असलेला अमिताभचा "शहेनशाह'चा बहुतेक सातशेवा प्रयोग चालू होता. माझादेखील कित्येक वेळा पाहून झाला होता. पूर्वीच्या अमिताभची गंमत यात नव्हती हेही खरंच. अचानक कॉलेजचे दिवस आठवले. मित्र माधवबरोबर केलेली अमिताभच्या चित्रपटांची पारायणं, त्याच्या स्टाईल मारत कॉलेजला फिरणं वगैरे.
माधव हल्ली कुठं असेल, असा विचार डोक्‍यात आला व पटकन्‌ लॅपटॉप सुरू केला. मला हवा असलेला माधव पेंडसे कुठंच सापडला नाही. शऱ्याला विचारावं का, असा विचार करत मी घाईत फोन फिरवला. त्याच्याशी बोलल्यानंतर समजलं, की माधव पुण्यातच राहत आहे- नवी पेठेत.
मी पटकन कपडे चढवले, आरशात नजर टाकली, "अमिताभसारखा मधोमध भांग अजूनही शोभतो आपल्याला,' असं मनात म्हणत मी बाईकला कीक मारली.
नवी पेठेत पत्ता विचारत मी त्या जुन्या चाळीपाशी आलो. माधव अशा जुन्या चाळीत राहत असेल, असा विचार करत असताना कोपऱ्यात एका घरावर गंज चढत असलेली पत्र्याची पाटी दिसली. दार वाजवल्यावर दोन मिनिटांनी उघडलं गेलं. एका तीस वर्षाच्या तरुणानं (बहुदा माधवचा मुलगा) दार उघडलं.
'माधव पेंडसे इथंच राहतात का?''
'हो, ते जरा बाहेर गेले आहेत.''
मी माधवचा मित्र आहे हे कळल्यावर त्यानं आत घेतले. घरात नजर टाकताच लक्षात येत होतं, की फार चांगली परिस्थिती नसावी.
'काही काम होते का?''
'नाही सहज, खूप वर्षांत भेटलो नाही.''
'गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत जा, कुठंही भेटतील, कामधंदा आहे कुठं त्यांना?..'' असं म्हणत त्यानं मला मार्गी लावलं.
मी त्या अरुंद बोळात शोधक नजरेनं फिरू लागलो. माधवला शोधणं तसं अवघड नव्हतं. अंगावर अमिताभचं असतं तसं लेदरचं जॅकेट, पुढच्या दोन्ही खिशांत हात, डोळ्यांवर गॉगल असा आमचा माधव कुठंही पटकन शोधता आला असता. इकडं बोळ पूर्ण संपला; पण माधव काही दिसला नाही. कोपऱ्यावर एका चहाच्या दुकानावर चौकशी करण्याकरिता मी आत शिरलो, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला माधवसारखा मनुष्य दिसला; पण कपडे मात्र मळकट, शर्ट आत न खोचलेला. मी आनंदानं हाक मारली ः 'विजय, ए विजय...'' तो मनुष्य मात्र थांबायला तयार नव्हता. आता मात्र मी पळत जाऊन त्याला थांबवलं.
'अरे, ऐकू येत नाही का? मुझसे पाच मिनिट न मिलकर, आपने पाच लाख का नुकसान कर दिया है...''
क्षणभर आम्ही एकमेकांकडं बघत राहिलो. माधवचे बरेचसे केस उडाले होते, डोळ्याखाली काळं, तसंच वर आलेली गालफडं असा अवतार धक्कादायक होता. आज वीस वर्षांनी भेटत असलो, तरी आम्ही डोळ्यांनी आणि मुख्य म्हणजे अमिताभच्या डायलॉगनं एकमेकांना ओळखलं.
'अरे, कॉलेज सुटल्यानंतर कोणी विजय अशी हाक मारलीच नाही रे, चल चहा घेऊ या,'' माधव म्हणाला.
खरं तर कोपऱ्यावर घर असताना हा आपल्याला बाहेरच चहा पाजून कटवत आहे, असं मला उगीचच वाटलं. चहा पिता पिता मी माधवला विचारलं ः 'का रे, तुझी तब्येत एवढी खराब कशी झाली?''
'जख्म जलदी नही भरते...'' चहाचा घोट घेता घेता माधव आता विजयचं (अमिताभ) बेअरिंग पकडत होता.
मला मनापासून आनंद झाला होता. त्या खुषीत मी लगेच म्हणालो ः 'चल, आज मस्त बाहेरच जेवण करू, गावात फिरू, गप्पा मारू या.''
'नको, नको. त्याला उशीर होईल, घरी जायला हवं.''
'कोणाला?''
'मुलाला रे. दुपारची शिफ्ट आहे, डबा द्यायचा आहे.''
'अरे वहिनी देतील ना, आज मस्त फिरू..'' मी माझा आग्रह सोडत नव्हतो.
'ती गेली दहा वर्षांपूर्वीच, आता आम्ही दोघंच...'' माधव पटकन्‌ बोलून गेला.
"मुलाचं लग्न का केलं नाही' या माझ्या प्रश्नावर मात्र तो भकासपणे बाहेर बघत राहिला.
निरोप घेताना माधवनं त्याच्या जुन्या मोबाईलवर माझा नंबर सेव्ह केला आणि 'भेटू लवकरच'' असं म्हणत माझा निरोपही घेतला.
त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तिकडं गेलो होतो, तेव्हा रस्त्यावर खड्डा चुकवत असताना माधवला तोल जात होता, असं दिसलं. मी पटकन आधार देण्यासाठी त्याच्या खांद्याला पकडलं, तर त्याच्या चेहऱ्यावर वेदना जाणवल्या.
'का रे माधव, काही लागलं आहे का?'' असा प्रश्‍न विचारला.
माधव खूपदा माझ्या बऱ्याच प्रश्नांना उत्तरं द्यायचा नाही. त्या दिवशी मात्र तो घरी घेऊन गेला. घरी आल्यावर त्यानं सवयीप्रमाणं शर्ट काढून खुंटीला लावला अन्‌ मला त्याचा काळा निळा झालेला खांदा दिसला.
'माधव काय हे? कुठं पडलास का?''
आता मात्र माधव साफ कोसळला आणि गळ्यात पडून रडू लागला.
मुलाला दारूचं भयंकर व्यसन होतं, घरात त्याचे पैसे न देता उलट माधवचीच पेन्शन संपवणं असे प्रकार सुरू होते. चाळीतलं घरही त्यानं बळजबरीनं स्वतःच्या नावावर करून घेतलं होतं. पैसे मिळाले नाही, की हा पोरगा आपल्या बापालाही मारत होता.
आमचा विजय आज "जिंदगी की लढाई लढते लढते' पुरता थकला होता. मी नंतर आठवड्यातून दोन वेळा तरी त्याला आठवणीनं भेटत होतो. रोज फोनदेखील करायचो. हळूहळू तो खुलायला लागला होता; पण घरी जायची वेळ आल्यावर मात्र तो उदास व्हायचा.
'विजय, चल आज अमिताभचा सिनेमा टाकू...खूप वर्षांनी आपण तिघं एकत्र येऊ,'' असं एके दिवशी म्हणत मी सर्व वर्तमानपत्र चाळलं; पण अमिताभचा चित्रपट कुठंही लागलेला नव्हता. मग माझ्या डोक्‍यात विचार आला आणि मी म्हणालो ः 'चल, आपण माझ्या घरी होम थिएटरवर बघू या. "त्रिशूल' बघायचा?'' माधवच्या खास आवडीचा होता तो.
'घरी नको रे, पान खाऊन कोपऱ्यात थुंकता येणार नाही,'' माधव कॉलेजसारखं गंमतीनं म्हणाला; पण घरी आला.
घरी आल्यावर माझं प्रशस्त घर माधवला दाखवताना मला अपराधी वाटत होतं. खरं तर चित्रपट बघायला मला आवडतं, म्हणून मुलानं मस्तपैकी होम थिएटर बनवलं होतं; पण असं सांगून माधवच्या दुःखावर डागण्या द्यायची माझी हिंमत झाली नाही.
मी मस्तपैकी दोन कप चहा केला. चिवड्याचा डबा, डिश जवळ ठेवून "त्रिशूल'ची सीडी सुरू केली. पडद्यावर अमिताभ येताच माधवचे डोळे लकाकले. अमिताभ माधोसिंग नामक गुंडाला आणि त्याच्या साथीदारांना मारायला अँब्युलन्स घेऊन येतो हा प्रसंग सुरू झाला आणि आमचा विजय सोफ्यावर पाय घेऊन बसला. अमिताभ गुंडांना बेदम मारत असताना माधव बेभानपणे जोरजोरात बोलू लागला ः 'मार त्याला, माजलेत लेकाचे, झोड त्याला, पैसे मागतात....'' असं म्हणत असताना आपले काटकुळे हात तो हवेत हलवत होता. सर्वांना मारून झाल्यावर अमिताभनं अँब्युलन्सला हात मारून, 'चलो जाने दो'' असं म्हटल्यावर मात्र माधव दोन्ही हातानी टाळ्या वाजवू लागला. मला मात्र त्याच्या खांद्यावरचे वळ आठवत राहिले. टाळ्या वाजवून झाल्यावर त्याचं लक्ष माझ्याकडं जाताच तो अवघडला. मग मात्र मी 'आलोच हं, तू बघ'' असं म्हणत रूमबाहेर आलो. चित्रपट पूर्ण होईपर्यंत मात्र मी मुद्दाम आत गेलोच नाही.
चित्रपट पूर्ण झाल्यावर माधव खुशीत बाहेर आला, आपली आत गेलेली छाती उगाचच फुगवत, समाधानानं म्हणाला ः 'काय काम करतो यार आपला अमिताभ....मजा आ गया!''
त्याचं लक्ष अचानक घड्याळाकडं गेलं आणि तो "निघायचं' म्हणू लागला.
'ये की परत पुढल्या आठवड्यात, आपण "दिवार' बघू.''
माधव मात्र निघायच्या धांदलीत नीट ऐकत नव्हता.
'अरे "दिवार' ठरला ना? "मै आज भी फेके हुये पैसे नही उठाता दावरसेठ'...काय?'' मी आपलं बोलत होतो; पण माधव मात्र विजयच्या भूमिकेतून केव्हाच बाहेर आला होता. माझे हात हातात घेत तो एवढंच म्हणाला ः 'उठाता है रे, मेरा बेटा फेके हुये पैसे भी उठाता है...''
आवाजात आलेला हुंदका दाबत लिफ्टची वाटही न बघता माधव घाईघाईनं जिना कधी उतरून गेला कळलंच नाही!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com