झिंगवणाऱ्या गोष्टी

मराठी कथालेखक मनीष पाटील यांचा ‘झिंगण गोष्टी’ हा कथासंग्रह नुकताच अष्टगंध प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला.
Book Jhingangosti
Book Jhingangostisakal

- राजीव जोशी, joshrajiv@gmail.com

कोणत्याही बोलीभाषेचा वापर कलाकृतीसाठी मूल्यात्मक परीसस्पर्श असतो. मनीष पाटील यांच्या झिंगण गोष्टी या कथासंग्रहात खान्देशी बोलीभाषेचा मुबलक वापर कथेच्या अर्थप्रवाहात कुठेही अडथळा ठरत नाही. मानवी चांगुलपणावर मनीष व्यंगाचा विनोदात्मक पद्धतीने आविष्कार करतात. कथेतील बोलीभाषेचा सहज वापर कथा विषयाला, कथावस्तूला, कथेतील वातावरणाला पूरक ठरतात. झिंगण गोष्टी म्हणजे खऱ्या अर्थाने झिंगवणाऱ्या गोष्टी आहेत.

मराठी कथालेखक मनीष पाटील यांचा ‘झिंगण गोष्टी’ हा कथासंग्रह नुकताच अष्टगंध प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. या संग्रहाचे सूचक मुखपृष्ठ संतोष धोंगडे याचे आहे. संग्रहात एकूण चौदा विनोदी कथा आहेत. तसे पाहिले तर मराठी विनोदाला गेल्या शतकाची परंपरा आहे. त्यातून मराठी भाषक-वाचक-रसिक आणि मराठी साहित्य यांच्यातला सेतू कायम राखण्याचे कार्य केले गेलेले आहे, विशेषतः साहित्यातील दुर्बोधतेच्या काळात रसिकांशी दुरावलेले नाते कायम ठेवण्याचे काम पुलंच्या विनोदी साहित्याने केलेले आहे.

असे असले, तरी एखाद-दुसरा अपवाद वगळता, गुदगुल्या झाल्या नाही तरी किमान एखादी तरी स्मितरेषा उमटवणारा विनोद शोधावा लागतो. विनोदी स्वरूपाचे वाङ्‌मय इतर प्रकारांपेक्षा वाचकप्रिय आहे, असा एक समज आहे. खरे तर केवळ साठ-सत्तरीची पिढी वाचनालयांमध्ये पुलंच्या विनोदी साहित्याकडे वळताना दिसते. वाङ्‌मयातील वा साहित्यातील धुरीणही विनोदाला गांभीर्याने घेताना दिसत नाही. याचे कारण जागतिकीकरणामुळे वाढत्या विवंचनेच्या काळात वाचकांना सुकून देणाऱ्या विनोदाच्या गुणवत्तेचा अभाव.

विनोदाचे नाते प्रत्यक्ष जगण्याशी, जीवित प्रेरणेशी आहे आणि हेच विनोद या मानवी गुणधर्माचे, वाङ्‌मय प्रकाराचे वेगळेपण आहे. या पार्श्वभूमीवर, ‘झिंगणगोष्टी’ संग्रहातल्या कथांकडे केवळ विनोदी म्हणून न होता, बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्याचा विचार करता ललित बंधात्म, कथात्मक या पातळीवर नेणाऱ्या आहेत.

मनीष पाटील यांना खान्देशी भाषा, संस्कृती, माणसांच्या व्यक्तिमत्त्वातील संवाद उच्चारणातील लहेजा यांचे केवळ जुजबी ज्ञान नाही, तर सखोल अभ्यास आहे. कोणत्याही बोलीभाषेचा वापर कलाकृतीसाठी मूल्यात्मक परीसस्पर्श असतो. संग्रहातील ‘शप्पत’ कथेची सुरुवातच मुळी ‘लेखक व्हनं तसं लय सोपं’ अशा हादरा देणाऱ्या जगन आणि महादू यांच्या संवादाने होते. दोघेही ग्रामीण भागातले; पण जगन हा विचक्षण वाचक; तर महादू कथा लिहिणारा.

कवी व्हनं तर त्यापेक्षाही सोप्प, म्हंजे इतकं की नापास व्हया इतकं सोप्पं. कवी कसे निर्माण होतात, जगन म्हणतो ट ले ट आन र ले र लाईसन आपली भाषा टराटरा फाळली की झाली कविता आन उगोयला कवी. (खान्देशी भाषेत ड चा उच्चार ळ करतात), जगन आणि महादू यांचा संवाद म्हणजे थेट गावगाड्यापर्यंत पोहचलेले मराठी साहित्य, साहित्यिक यांचे पोस्टमार्टेम आहे. जगन म्हणतो तुह्यासारख्या गोष्टी त् मी दिवसाले छप्पन लिहीन.

पण ही सर्व रिकामपणातली कामे आहेत असे तो मानतो. त्याच्या मते विनोदी लेखन मोठाच विनोद आहे. जगन आणि महादू यांच्यातली चर्चा म्हणजे ग्रामीण भागातला झणझणीत लेखक-वाचक संवाद आहे. जगन म्हणतो, आजच्या गंभीर साहित्यात गंभीरपणे घ्या आसं काही नी आन् इनोदी वाचून त् हासू पेक्षा कीवच जास्त येते. विनोदाच्या नावाखाली टीव्ही च्यानेलवरील ‘हास्यास्पद’ कार्यक्रमसुद्धा या चर्चेतून सुटत नाही. ग्रामीण भाषेतला वाचक (जगन) बोलीभाषेचा वापर करण्यापासून लेखक-वाचकांबरोबर प्रकाशक, वितरक आणि वाचक यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करताना संवादात शालजोडीतले हलकेच फटकारेसुद्धा मारतो.

मुळात, अतिशयोक्ती विनोद निर्मितीचा एक भाग असला, तरी प्रस्तुत संवाद वाचकांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. कोणत्याही बाय-लॅटरल चर्चेत समाविष्ट असणाऱ्या द्विपक्षीय समझोत्याची खास शैली मनीष पाटील यांनी आपल्या लेखनात वापरलेली आहे. याचाच एक भाग म्हणून संवादाची फलश्रुती लेखक -वाचक -प्रकाशकांच्या शपथपत्राचा अनोखा वापर लेखकाने केलेला असावा. या प्रयोगामुळे कथेत नावीन्यपूर्णता आलेली आहे.

स्त्री-पुरुष अहमहमिकेच्या वादात, आरोप-प्रत्यारोपावर आधारित ‘कावा’ या कथेत स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र भूभागाची संकल्पना, त्यातील व्यवस्थेसह मांडलेली आहे. एकमेकाचे असणे, नसणे आणि सहजीवन, त्यातील फायदे-तोटे हा दैनंदिन जीवनातला नित्याचा अनुभव असला, तरी त्यातून स्त्री-पुरुष मानसिकता लेखक दर्शवतो. या खुसखुशीत वादाचा, चर्चेचा शेवट लेखक एका करारात करतो. एका बाजूला द्विपक्षीय करार ही शैली रूढ करताना असे करार म्हणजे वादाचे फलित नसून त्यातले वैगुण्य अप्रत्यक्षरीत्या लेखक सूचित करतो, ते ही हलक्याफुलक्या, खुशखुशीत अंगाने.

तुम भी खुश, हम भी खुश या थाटात ‘बैल संवाद’ ही कथा एका अर्थाने नंदी बैलाचे आत्मकथन आहे. जन्माला आल्यापासून माणसाने केलेल्या छळाची कहाणी सांगताना माणूस कसा हिटलर आहे, आमच्या आईचे दूध नीट आणि पोटभर पिऊ देत नाही, अशा अनेक व्यथा आहेत. बैल आणि नंदीबैल हे समानार्थी शब्द नाहीत, नंदीबैल म्हणजे होकार देण्याइतकी बुद्धी चालवतो असा माणूस. या संग्रहात ‘कचरू पाटलाची चांद्र मोहीम’ ही एक हलकीफुलकी, खुशखुशीत कथा आहे, खास खान्देशच्या झणझणीत बाजाची.

बॉम्बे टू गोवा या कथेत खान्देशी बोलीचा वापर केलेला असला आणि कथेला याच नावाच्या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. बहुराष्ट्रीय कंपनीने गोव्यात नव्याने उघडलेल्या शाखेच्या निमित्ताने हायरार्कीमधील राजकारण, योग्यता असून डावलणे, संधी मिळाल्यावरही गोव्यात पोहचण्यातल्या अडचणी यातून कोर्पोरेटमधील माणसांमाणसांतील तसेच व्यवस्थेतल्या वृत्ती प्रवृत्तींचा उपहासात्मक तरीही हसत खेळत पट लेखकाने मांडलेला आहे.

मनीष यांच्या एकूण कथांचा ललित बंधात्मक आणि कथात्म वाङ्‌मय प्रकारातील रचनांचा आढावा घेतल्यास, अगदी त्यांच्या हंबरडा या कथेत मृत्यूनंतरच्या तिरडीपर्यंतच्या प्रवासात दिसणारे खरे चेहरे, येणारी विषण्णता गृहीत धरूनही, आजूबाजूच्या नात्यातल्या, मैत्रीतल्या माणसांचे खरे-खोटेपण, यातही सुखात्म जाणिवेच्या श्रेष्ठ विनोद दिसतो. जगन काय किंवा कावासारख्या कथेतल्या स्त्री-पुरुष भेद करणाऱ्या महिला काय, यात मानवी चांगुलपणावर होणाऱ्या आक्रमणाचा प्रतिकार प्रतिआक्रमणाने करीत मनीष व्यंगाचा विनोदात्मक पद्धतीत आविष्कार करतात, विनोदी आशय अप्रत्यक्षपणे सूचित करतात.

कथासंग्रह : झिंगण गोष्टी

कथाकार : मनीष पाटील

प्रकाशक : अष्टगंध प्रकाशन, ठाणे

पृष्ठसंख्या : १३८; मूल्य : २५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com