सुटी - अनंत प्रश्‍नांची उत्तरे देणारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

हेल्थ वर्क
आई-वडील स्वतः शरीराची किती काळजी घेतात, कसे वागतात याकडे मुलांचे बारकाईने लक्ष असते. आई-वडिलांनी बेताल वर्तन करून मुलांना सद्‌वर्तनाचे धडे देणे कोणत्याच काळी चालत नव्हते. आता तर ते अजिबातच चालत नाही. आई-वडील दूरदर्शनला न चिकटता उत्तम दर्जाची पुस्तके वाचत बसतील तर मुलेही अगदी तसेच करतील, असे नसले तरी एक वेगळी गोष्ट त्यांच्यासमोर येते.

पुस्तकातले एखादेच योग्य क्षणी वाचलेले वाक्‍य अचानक एखाद्या मुलीला अंतमुर्ख करून जाते. सध्यपरिस्थितीत मुलांना उद्दिपित करणाऱ्या इतक्‍या गोष्टी आहेत, की एखादा सत्पुरुषदेखील विचलित होईल. या उद्दिपतनातून हाती काहीच लागत नाही, हे लवकरात लवकर कळले पाहिजे. अशा उद्दिपनामुळे मानसिकदृष्ट्या अपंग आणि हिंस्र अशी पिढी विकसित राष्ट्रांत निर्माण झालेली पाहून आपण वेळीच जागे झाले पाहिजे. मुला-मुलींनी त्यासाठी मनसोक्त खेळले पाहिजे. शरीराच्या कमाल मर्यादांची त्यांनी माहिती करून घेतली पाहिजे. त्या मर्यादा वाढविण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. उंची वाढायला लागल्यावर वजन उचलण्याचा व्यायाम करून शरीर तगडे बनविले पाहिजे.

विशेषतः मुलींनी हा व्यायाम जरूर करावा. आसपासचे सारे गडकिल्ले फिरून उत्तम दमश्‍वास कमावला पाहिजे. एकंदरीत सुटीमध्ये मुला-मुलींनी आपल्या आयुष्याची दिशा ठरविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. एखादी कला शिकता-शिकता आयुष्याची लयच त्यांना सापडू शकेल. कोणतीही गोष्ट त्यांनी आपल्या जबाबदारीवर करायला शिकले पाहिजे. आई-वडिलांनी कमीत कमी हस्तक्षेप केला पाहिजे.

एखादी गोष्ट करताना ती का व कशासाठी करतो आहोत? आपण उगाच वाहवत तर चाललो नाही ना? अशा अनंत प्रश्‍नांची उत्तरे ही सुटी आपल्याला देऊ शकते. आपण फक्त जागे राहिले पाहिजे.
(उद्याच्या अंकात वाचा - विश्रांती आणि व्यायाम)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajiv Sharangpani Article All Is Well Health