चावा...वाचा (राजीव तांबे)

राजीव तांबे
रविवार, 8 जानेवारी 2017

बाबांच्या उत्तरावर खूश होत वेदांगी म्हणाली ः ‘‘आता काहीतरी वेगळं खेळू या; पण ते ऱ्हस्व आणि दीर्घचे नियम बाजूला करून...’’
शंतनू टिचक्‍या वाजवत म्हणाला ः ‘‘आपण इंग्लिशमध्ये हा खेळ खेळू...’’
सगळ्यांनी टिचक्‍या वाजवत आपला होकार दिला.

बाबांच्या उत्तरावर खूश होत वेदांगी म्हणाली ः ‘‘आता काहीतरी वेगळं खेळू या; पण ते ऱ्हस्व आणि दीर्घचे नियम बाजूला करून...’’
शंतनू टिचक्‍या वाजवत म्हणाला ः ‘‘आपण इंग्लिशमध्ये हा खेळ खेळू...’’
सगळ्यांनी टिचक्‍या वाजवत आपला होकार दिला.

आज रविवार असल्यानं वेदांगी आणि तिचे आई-बाबा तयारीतच बसले होते. थोड्याच वेळात पार्थ, पालवी, नेहा आणि शंतनू हजर झाले.
आज पोटात अशी काही भूक उसळली आहे, की मला तर वाटतंय पोटात भुकेच्या ज्वालामुखीचा उद्रेक होतोय...शंतनूला थांबवत वेदांगी म्हणाली ः ‘‘व्वा व्वा. तू काय पण एकेक शब्द वापरतोस...’’
‘‘अगं, त्याच्याकडं शब्दांचा सॉलिड स्टॉक आहे.’’
‘‘अरे म.. तोच स्टॉक टाक तुझ्या ज्वालामुखीत...’’
सगळे फॅ फॅ हसू लागले.
इतक्‍यात बटाटेवडे तळल्याचा घमघमाट सुटला.
‘‘वॉव...गरमागरम बटाटेवडे...’’
‘‘ओह. गरमागरम हा काय मस्त शब्द आहे. एकाच शब्दात दोन ग, दोन र आणि दोन म’’ असं शंतनूनं म्हणताच वेदांगी म्हणाली ः ‘‘क्‍या बात है। आज आपण अक्षरांचे आणि शब्दांचेच गरमागरम खेळ खेळणार आहोत...पण...’’
‘‘पण.. गरमागरम बटाटेवडे चापल्यावर...’’ सगळेच ओरडले.
नंतर लगेचच ‘गरमागरमी-चापाचापी-बटाटेवडे-कोंबाकोंबी’ असा कार्यक्रम हायहुई हायहुई करत उत्साहात पार पडला.
आता सगळे ढेकर देत खेळ खेळायला सरसावून बसले.
‘‘आपण अंताक्षरी खेळू या; पण सिनेमाची गाणी मात्र म्हणायची नाहीत...’’ हे वेदांगीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच पार्थ म्हणाला ः ‘‘मग काय डायलॉग म्हणायचे?’’
सगळे हसणार इतक्‍यात आई म्हणाली ः ‘‘राम...राम...’’
नेहा म्हणाली ः ‘‘रामनंतर मगर, नंतर रस’’
सुरूच झाली अंताक्षरी.
पालवी म्हणाली ः ‘‘रसनंतर सराव’’
शंतनू हातवारे करत म्हणाला ः ‘‘ ‘सराव’नंतर वरती-खालती; पण लक्षात घ्या, की वरती-खालती या शब्दात ती दीर्घ आहे. त्यामुळं तुमच्या पुढच्या शब्दाची सुरवात दीर्घ ‘ती’ या अक्षरानंच व्हायला पाहिजे.’’
नेहा म्हणाली ः ‘‘हॅ... त्यात काय? वरती-खालती नंतर ‘तीन’, ‘तीन’ नंतर ‘नवीन’, ‘नवीन’ नंतर ‘नशीब.’’’
पुन्हा एकदा शंतनू ओरडला ः ‘‘ थांबा. ‘नशीब’ नंतर ‘बशी’. इथं पण शी हे अक्षर दीर्घ आहे. आता सांगा...’’
बाबा हसतच म्हणाले ः ‘‘अरे, अशा गमती सोडवण्यासाठी आपल्याला ‘शिर’ असावं लागतं. नाहीतर वैतागून आपलीच ‘शीर’ उडू लागते! काय खरंय की नाही?’’
बाबांच्या उत्तरावर खूश होत वेदांगी म्हणाली ः ‘‘आता काहीतरी वेगळं खेळू या; पण ते ऱ्हस्व आणि दीर्घचे नियम बाजूला करून...’’
शंतनू टिचक्‍या वाजवत म्हणाला ः ‘‘आपण इंग्लिशमध्ये हा खेळ खेळू...’’
सगळ्यांनी टिचक्‍या वाजवत आपला होकार दिला.
‘‘माझ्यापासून सुरवात,’’ असं म्हणत तो पुढं म्हणाला ः ’’Parth’’
नेहा म्हणाली ः ‘‘Parth नंतर Huge’’
‘‘Huge नंतर Egg’’ शंतनू किरकिरला.
पालवी म्हणाली ः ‘‘Egg नंतर Grand’’
‘‘Grand नंतर Delicate’’आई म्हणाली.
पार्थ उड्या मारत म्हणाला ः‘‘E वरून एकदम सोपा शब्द English’’
‘‘हा तर मोठाच Humour’’ बाबा हळूच म्हणाले.
बाबांना टाळी देत वेदांगी म्हणाली ः ‘‘बाबा, यू आर Right’’
पार्थ चिडून म्हणाला ः ‘‘Right नंतर Table’’
हात उडवत शंतनू म्हणाला ः ‘‘आता मी सांगतो ते ऐका...Table नंतर End म्हणजे End. आता हा खेळ बंद.’’
‘‘अरे, आता कुठं सुरवात झाली आणि लगेच खेळ बंद?’’ सगळेच चिरचिरले.
‘‘अरे, ऐका तर. मला एक सॉलिड खेळ सुचलाय. एकदम भारी खेळ आहे. या खेळात असे काही शब्द शोधायला लागतील की डोक्‍यात नुसता शब्दांचा चिवडा होऊन जाईल. विचार करताना डोकं खाजखाज खाजवून खेळणाऱ्यांच्या डोक्‍याचे पेरू होतील...’’ शंतनूला थांबवत सगळे ओरडले ः ‘‘अरे, काय ते सांग आता...’’
वेदांगी हळूच कुरकुरली ः ‘‘ते ऱ्हस्व-दीर्घ प्रकरण नको हं त्यात.’’
शंतनू सगळ्यांकडं ऐटीत पाहत बोलू लागला ः ‘‘हॅ..हॅ.. या खेळात ऱ्हस्व-दीर्घ यांना थाराच नाही. खेळ नीट समजून घ्या बरं. आपण अंताक्षरी खेळताना पहिल्या शब्दातलं जे शेवटचं अक्षर असेल, त्यानं सुरवात होणारा दुसरा शब्द आपण सांगतो. या खेळात थोडा वेगळा प्रकार आहे. म्हणजे एक शब्द मी सांगितला की माझ्या शब्दातलं पहिलं अक्षर हे तुमच्या शब्दातलं शेवटचं अक्षर असायला हवं... म्हणजे आपण याला हवं तर ‘आद्याक्षरी’ म्हणू शकतो...’’
शंतनूला थांबवत आणि डोकं खाजवत पार्थ म्हणाला ः ‘‘अरे, शंतनूदादा मला काहीच कळलं नाही रे. थोडं सोपं करून सांग. नाहीतर माझ्या डोक्‍याचा पेरू व्हायचा.’’
सगळेच फॅ..फॅ हसू लागले.
‘‘हसू नका. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे पटकन कळेल. मगाशी आपण राम शब्दानं सुरवात केली होती. आता माझा शब्द आहे रावण. -माझ्या शब्दातलं पहिलं अक्षर ‘रा’ आहे. आता तुम्ही मला असा दुसरा शब्द सांगा, ज्या शब्दातलं शेवटचं अक्षर ‘रा’ असेल.’’
‘‘एकदम सोपं. ‘चारा’ हो किनई?’’ पार्थ आनंदानं म्हणाला.
‘‘शाबास पार्थ. आता पुढचा बरोबर शब्द कोण सांगेल...?’’
‘‘सांगते. ‘साचा’ ’’ वेदांगी म्हणाली.
‘‘व्वा. आता तुम्हाला जमलं की. ‘साचा’ नंतर ‘घसा’ ’’ बाबा म्हणाले.
‘‘घसा नंतर वाघ...वाघ...वाघ. बस्स. आता आपण गट करून खेळू या...’’ पालवीची ही सूचना सगळ्यांनाच आवडली.
वेदांगी म्हणाली ः ‘‘गट करण्यापेक्षा मी आणखी एक आयडिया सांगते. एकदम खत्रूड आयडिया आहे. आपण सगळे गोलात बसू या. गोलाच्या मध्यभागी पेन्सिलीचा तुकडा ठेवू या. मी एक शब्द सांगेन आणि पेन्सिल गोल फिरवेन. पेन्सिलीचं टोक ज्याच्याकडं येईल त्यानं पुढचा शब्द सांगायचा. मग त्यानं शब्द सांगून पुन्हा पेन्सिल फिरवायची. ओके..?’’ ‘‘ओके...बोके...पक्के...’’ सगळेच ओरडले.
‘‘माझ्यापासून सुरवात. ‘वेदांगी’ असं म्हणत वेदांगीनं पेन्सिल फिरवली.
पेन्सिल हातात घेत शंतनू म्हणाला ः ‘‘पारवे’’
आता पेन्सिलचं टोक आलं पार्थकडं. पार्थ विचार करू लागला आणि बाकीचे गोंगाट करू लागले. इतक्‍यात पेन्सिल फिरवत पार्थ म्हणाला ः ‘‘ढलपा...ढलपा’’
पार्थनं इतक्‍या जोरात पेन्सिल फिरवली की ती उडून नेहाच्या मागं पडली. पेन्सिलीनंच डोकं खाजवत नेहा म्हणाली ः ‘‘अं...‘ढलपा’नंतर.. अं...गाढ... गाढ.’’
‘गाढ’नंतर आली ‘जागा’ आणि ‘जागा’ नंतर आला ‘राजा’. शंतनूनं ‘राजा’ म्हणताच पालवी ओरडली ः ‘‘बावरा...बावरा’’
त्याच वेळी पालवीच्या हातातली पेन्सिल घेत बाबा म्हणाले ः ‘‘आता ‘थांबा’... थांबा हो.’’
बसल्या बसल्या डोलत आणि हात फिरवत पालवी म्हणाली ः ‘‘आता सुरू करू या नवीन खेळ. हाच खेळ पण इंग्लिशमध्ये आणि अर्थातच माझ्या नावापासून सुरवात. तो हो जाए शुरू Palvi  से.’’
शंतनू म्हणाला ः ‘‘Trap’’
नेहा म्हणाली ः ‘‘Mat’’
वेदांगी म्हणाली ः‘‘Sum’’
भीत भीत पार्थ म्हणाला ः ‘‘Pass ’’
या Pass नंतर Trip...Fat...Surf...Marks...Dam...Pad...Laptop अशी मालिकाच  सुरू झाली. अचानक हात उंचावत शंतनू म्हणाला ः ‘‘थांबा. थांबा. थांबा. मला या खेळाचं नाव बदलायचं आहे.’’
‘‘पण का?’’ ‘‘तर...खेळाचं नाव आहे ‘चावा...वाचा’ ’’
‘‘आता हे काय नवीनच?’’
‘‘हे एकदम फंडूश नाव आहे. ‘चावा...वाचा’ असं म्हटलं की ती ‘अंताक्षरी’पण होऊ शकते आणि ‘आद्याक्षरी’पण!
सगळेच म्हणाले ः ‘‘बिलकूल सही.’’
आईकडं पाहत डोळे मिचकावत शंतनू म्हणाला ः ‘‘आता आम्हाला काहीतरी चविष्ट चावायला द्या, तरच जीव वाचेल हो. नाहीतर फक्त वाचवा...वाचवा होईल.’’

--------------------------------------------------------------------
पालकांसाठी गृहपाठ :

  •   अंताक्षरीनं सुरवात करा.
  •   मुलांची सहनशक्ती संपण्याआधीच खेळात बदल करा.
  •   खेळाचे नियम बदलणं किंवा (तुमची इच्छा नसताना) खेळ थांबवणं यासाठी मुलांना हसत हसतच परवानगी द्या. (‘त्याक्षणी मुलं तुमच्याकडं आदरानं पाहतील,’ हा आनंदानुभव घ्या)
  •   मुलांना शब्द सुचला नाहीतर त्यांना अनेक वेळा संधी द्या.
  •   तुम्हाला योग्य शब्द सुचला नाही तर ‘आपल्याला शब्द सुचला नाही,’ हे मोठ्या मनानं मान्य करा. अशा वेळी विनासंकोच मुलांची मदत घ्या.
  •   मुलांना चकित करण्यासाठी एखाद्‌वेळेस स्वत:हून राज्य घ्या.
  •   मुलावर राज्य आलं आणि त्याला शब्द सुचला नाही तर लगेचच आनंदानं बेभान होऊन त्याला मूर्खात काढू नका! ‘खरोखरीची शहाणी माणसं इतरांना मूर्ख म्हणत नाहीत,’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा.

--------------------------------------------------------------------

Web Title: rajiv tambe's article in saptarang