ग्रेट ३९ त्रिकोण, चौकोन आणि गोल (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 7 मे 2017

मुलं थोडा वेळ घरात रेंगाळली आणि मग घड्याळाकडं पाहत बाहेर सुसाट पळाली. अन्वयच्या आईला जरा धाकधूक वाटत होती, की लोकांकडून पाच कॅमेरे आणले आहेत...ही मुलं ते बिघडवणार तर नाहीत ना?’’ बाबा तिला समजावत म्हणाले ः ‘‘आपली मुलं समजूतदार आहेत. आपण जर मुलांवर विश्‍वासानं जबाबदारी टाकली तर तितक्‍याच ताकदीनं मुलं ती जबाबदारी पेलतात. पाहशील तू.’’

मुलं थोडा वेळ घरात रेंगाळली आणि मग घड्याळाकडं पाहत बाहेर सुसाट पळाली. अन्वयच्या आईला जरा धाकधूक वाटत होती, की लोकांकडून पाच कॅमेरे आणले आहेत...ही मुलं ते बिघडवणार तर नाहीत ना?’’ बाबा तिला समजावत म्हणाले ः ‘‘आपली मुलं समजूतदार आहेत. आपण जर मुलांवर विश्‍वासानं जबाबदारी टाकली तर तितक्‍याच ताकदीनं मुलं ती जबाबदारी पेलतात. पाहशील तू.’’

कुणाच्या तरी घरी जमायचं की बाहेर जमायचं, यावरून वाद सुरू होता. वेदांगी, अन्वय आणि पार्थचं मत होतं, ‘बाहेरच जमू या’, तर उरलेल्या तिघांचं म्हणणं होतं, ‘नको, नको घरीच बरं. उगाच उन्हात कशाला?’
आता यावर सोपा उपाय म्हणजे ‘छापा-काटा’ करणं.
एका गटातली वेदांगी आणि दुसऱ्या गटातला शंतनू असे दोघं समोरासमोर उभे राहिले. वेदांगी म्हणाली ‘छापा’ व शंतनू म्हणाला ‘काटा’. अन्वयनं नाणं उंच उडवलं. नाणं वर जाताच शंतनू म्हणाला ः ‘‘नाही, नाही...मला छापाच म्हणायचं होतं; पण तीच आधी म्हणाली छापा.’’ शंतनूचा गट ‘छापा...छापा’ म्हणून ओरडू लागला.
अन्वयनं नाणं जमिनीवर पडण्याआधीच हातात पकडलं आणि खिशात घातलं. सगळे काही बोलण्याआधीच तो म्हणाला ः ‘‘चला.. आधी आपण घरी जाऊ आणि मग बाहेर जाऊ. म्हणजे छापाही आणि काटाही! काय?’’
सगळेच आनंदानं ओरडले ः ‘‘ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’
अन्वयचे आई-बाबा वाटच पाहत होते. बाबा म्हणाले ः ‘‘बरं झालं आलात. आज मी तुम्हा सहाजणांसाठी सहा वेगवेगळे डोळे आणले आहेत. लई भारी डोळे आहेत हे. आपल्या डोळ्यांनी या डोळ्यातून पाहायचं बरं...’’
‘‘अहो बाबा...आम्हाला काय करायचेत ते डोळे? आमच्याकडं आहेत की दोन दोन डोळे.’’
‘‘मला कळलं, तुम्ही काय आणलं असणार ते. तुम्ही आमच्यासाठी चष्मे आणले असणार. हो ना?’’

‘‘हॅ...चष्मे कशाला? मला वाटतं, उन्हात घालायचे गॉगल असणार, हो ना?’’
हात उंचावत बाबा म्हणाले ः ‘‘आधी माझं बोलणं पूर्ण होऊ दे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे सगळ्यांचे अंदाज चुकलेले आहेत. मी प्रत्येकाला एकेक डोळा देणार आहे आणि तुम्ही एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्यानं ‘नवीन डोळ्यातून’ पाहायचं आहे. कळलं?’’
सगळी मुलं एका सुरात ओरडली ः ‘‘काहीही कळलं नाही हो...काही नाही कळलं.’’
‘‘मी माझ्या मित्र-मैत्रिणींकडून तुमच्यासाठी सहा कॅमेरे आणले आहेत..’’ बाबांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मुलांनी आनंदानं कल्लाच सुरू केला. चित्र-विचित्र आवाजांत मुलं ओरडू लागली. मुलांना हातानं खूण करत बाबा म्हणाले ः ‘‘हे कॅमेरे मी फक्त तीन तासांकरताच आणलेले आहेत.’’
हे वाक्‍य ऐकताच एकदम शांतता पसरली.
‘‘आता तुमचं काम ऐका. आता चार वाजले आहेत आणि आज सूर्यास्त होणार आहे सात वाजून दोन मिनिटांनी. सूर्यास्त झाला की तुमचा कॅमेरा बंद. तुमच्याकडं वेळ आहे फक्त तीन तास आणि दोन मिनिटं. या वेळात तुम्ही किमान ५९ फोटो काढायचे आहेत...’’

‘‘हॅ हॅ हॅ. आम्ही ५९ कशाला १५५९ फोटो काढू. काय समजलात काय तुम्ही आम्हाला?’’ शंतनूनं असं म्हणताच सगळ्यांनी गचागचा माना हलवल्या.
‘‘तुम्ही मध्ये मध्ये बोलाल तर तुमचाच वेळ कमी होईल. आधी नीट ऐकून घ्या.’’
 तुम्ही ५९ च फोटो काढायचे आहेत. एकही जास्तीचा फोटो काढायचा नाही.
  तुम्ही फक्त तुम्हाला दिसणारे त्रिकोण, चौकोन आणि गोल यांचेच फोटो काढायचे आहेत.
  काही वेळा तुम्हाला गोलात गोल किंवा त्रिकोणात त्रिकोण दिसत असेल, तर अशा वेळी दोन फोटो काढा. म्हणजे पहिला फोटो बाहेरच्या गोलाचा आणि दुसरा फोटो आतल्या गोलाचा, असं आपण समजू. दुसरा फोटो काढताना जर तुम्ही कॅमेरा झूम केलात तरी चालेल.
  महत्त्वाची अट म्हणजे, प्रत्येकानं कमीत कमी नऊ त्रिकोणी, नऊ चौकोनी आणि नऊ गोल दिसणाऱ्या वस्तूंचे किंवा तुम्हाला दिसणाऱ्या आकारांचे फोटो काढायचेच आहेत. उरलेल्यांमध्ये आकारांची संख्या कमी-जास्त झाली तरी चालेल.
  आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकच फोटो जर दोघांनी काढला असेल, तर तो फोटो बाद समजला जाईल. म्हणून शक्‍यतो एकमेकांपासून लांब लांब जाऊन काम करा.
  काही शंका..?
जरा कां.. कूं करत पार्थनं विचारलं ः ‘‘मला गोल वस्तू म्हणजे टायरच आठवतो आणि गोल वस्तू शोधताना सगळ्यांना टायर तर दिसणारच ना? मग सगळे जण टायरचे फोटो काढणारच ना? मग काय...आमचे फोटो बाद?’’

‘‘अजिबात नाही. एकाच गाडीच्या एकाच टायरचे फोटो जर दोघांनी काढले असतील तर ते दोन्ही फोटो बाद. आणि हो...आता तुम्हाला एक कल्पना समजली असल्यानं, कुणीही टायरचा फोटो काढायचा नाही. ओके? हं. आता आणखी काही शंका?’’
‘‘अहो, आता द्या ते डोळे आणि पळतो आम्ही सगळे,’’ असं पालवीनं जोरात म्हणताच सगळे एका पायावर नाचू लागले. सगळ्या मुलांनी सहा कॅमेरे घेतले. फोटो कसे काढायचे हे सगळ्याच मुलांना माहीत होतं, तरीपण त्यांनी विचारून घेतलं. निघताना नेहानं विचारलं ः ‘‘समजा, ती वस्तू नसेल; पण ते चित्र असेल किंवा डिझाइन असेल तर चालेल का?’’
‘‘तुम्हाला जे जे त्रिकोणी, चौकोनी आणि गोल दिसेल त्याचा फोटो काढा.’’
मुलं थोडा वेळ घरात रेंगाळली आणि मग घड्याळाकडं पाहत बाहेर सुसाट पळाली.
अन्वयच्या आईला जरा धाकधूक वाटत होती, की लोकांकडून पाच कॅमेरे आणले आहेत...ही मुलं ते बिघडवणार तर नाहीत ना?’’
बाबा तिला समजावत म्हणाले ः ‘‘आपली मुलं समजूतदार आहेत. आपण जर मुलांवर विश्‍वासानं जबाबदारी टाकली तर तितक्‍याच ताकदीनं मुलं ती जबाबदारी पेलतात. पाहशील तू.’’
‘‘पण तरीही.’’
‘‘एक लक्षात ठेव. कुणीही मुद्दामहून चूक करत नाही, चूक चुकूनच होते आणि ती कुणाचीही होऊ शकते. म्हणूनच चुकलेल्याला त्याची चूक सुधारण्याची संधी द्यायची. त्यात काय विशेष?’’
सुमारे ८९ मिनिटांतच मुलं हल्लागुल्ला करत परत आली.
‘‘काय...? इतक्‍यातच झाले तुमचे ५९ फोटो?’’
‘‘येस बॉस; पण ५९ नव्हे तर ३५४ फोटो...’’
‘‘ओह! पण मी तुम्हाला ५९ सांगितले होते ना...?’’
‘‘अहो बाबा, आम्ही सहाजण आहोत ना...म्हणून ३५४’’
आता मात्र सगळेच हसले.
‘‘आता मी एकेकाचा नवीन डोळा टीव्हीच्या पडद्याला जोडणार आहे. म्हणजे मग आपण सगळे मिळून त्रिकोण, चौकोन आणि गोल पाहू या. ३५४ आकार पाहून त्यातल्या ‘जरा हट के’ अशा ३९ वस्तूंची यादी मी करणार आहे. या यादीत तुमच्या प्रत्येकाच्या किमान चार गोष्टी तरी असल्याच पाहिजेत. ओके?’’
मुलं म्हणाली ः ‘‘ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’
बाबांनी सहाही डोळे तपासले आणि यादी तयार केली.
दिसलेले त्रिकोण, चौकोन आणि गोल ः

 •  बुद्धिबळाचा पट
 •  सामोसा
 •  मोबाईल टॉवर
 •  लाडू
 •  कढई
 •  त्रिकोणी घड्याळ
 •  लोखंडी जाळीवरचं त्रिकोणी डिझाइन
 •  आपल्याच घराच्या पायऱ्या
 •  कॅरम
 •  पोळपाट
 •  गोल घड्याळ
 •  डोळे
 •  गोल जिन्याच्या त्रिकोणी पायऱ्या
 •  झुंबरामधलं लोलक
 •  पाठीवरची सॅक
 •  चौकोनी बर्फी
 •  आकाशपाळणा
 •  चाक
 •  द्राक्षाचा त्रिकोणी घड
 •  गोल घड्याळातले त्रिकोणी काटे
 •  मोबाईल
 •  नोटा
 •  पंखा
 •  नाणी
 •  कलिंगड
 •  दरवाज्याचं त्रिकोणी हॅंडल
 •  आईस्क्रीमचा कोन
 •  चष्मा ठेवायचं घर
 •  चेकबुक
 •  एका बॅंकेचा गोल लोगो
 •  काही मोटारींचे गोल लोगो
 •  चौकोनी पाव आणि गोल वडा
 •  गोल कलिंगडातून कापून काढलेला त्रिकोणी तुकडा
 •  त्रिकोणी कर्णफुलं, लॉकेट आणि अंगठ्या.
 •  सगळ्या बरण्यांची आणि बाटल्यांची झाकणं आणि बुचं.
 •  त्रिकोणी पर्स
 •  टीव्ही
 •  अंडी
 •  फुटबॉलचं मैदान

यादी ऐकताच मुलांचा आनंदानं धांगडधिंगा सुरू झाला.
‘‘माझे आठ, माझे सहा, माझे नऊ, माझे सात, माझे चार आणि माझे पाच’’ असा कालवा सुरू झाला.
मुलांनी अफलातून गोष्टी शोधून काढल्या होत्या. बाबांनी विचारलं ः ‘‘फुटबॉलच्या मैदानाचा फोटो तुम्ही कसा काय मिळवला? कारण आपल्या गावात तर फुटबॉलचं असं मैदानच नाही.’’
सगळी मुलं म्हणू लागलीः ‘‘चीटिंग चीटिंग. हा फोटो कॅन्सल.’’
पालवी म्हणाली ः ‘‘तो मी काढला आहे फोटो.’’
‘‘ऑ? चमत्कारच आहे. नसलेल्या गोष्टीचा फोटो?’’
पालवी म्हणाली ः ‘‘आधी ऐका. अट काय होती? नवीन डोळ्यातून पाहायचं आणि फोटो काढायचा. या नवीन डोळ्यात तो ‘फुटबॉलच्या मैदानाचा फोटो’ आधीपासूनच होता. तो मी माझ्या फोल्डरमध्ये कॉपी-पेस्ट केला.’’
बाबा म्हणाले ः ‘‘हं. आपण सध्या कॉपी-पेस्ट बाजूला ठेवू या. लक्षात घ्या, वरच्या सगळ्याच्या सगळ्या ३९ कल्पना इतक्‍या भन्नाट आणि ग्रेट आहेत, की मी तुम्हाला पैजेवर सांगतो, कुठल्याही सहा मोठ्या माणसांना ८९ मिनिटांत ३५४ सॉलिड कल्पना सुचणार नाहीतच; पण त्यातही अशा ३९ कल्पना तर नाहीच नाही सुचणार. तुमच्या या ३९ ग्रेट कल्पनांना माझा ‘चौकोनी’ सलाम.’’
सगळ्या मुलांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
शंतनू म्हणाला ः ‘‘मला एक जबरदस्त ४० वी कल्पना सुचते आहे...’’
इतक्‍यात चौकोनी ट्रेमध्ये गोल बशा, बशीत चौकोनी पावाचे त्रिकोणी तुकडे केलेलं सॅंडविच आणि बाजूला गोल वाटीत सॉस घेऊन आई आली आणि म्हणाली ः ‘‘आता प्लीज त्रिकोण न शोधता...’’
मुलं ओरडली ः ‘‘करा सुरवात. उगाच चांगल्या कामाला उशीर नको.’’


पालकांसाठी गृहपाठ ः

 •   या खेळासाठी कॅमेराच वापरला पाहिजे असं काही नाही. मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीला ताण देऊन वेगळ्याच वस्तूंची यादी तयार करणं इथं अपेक्षित आहे.
 •   या खेळामुळं मुलं वस्तूकडं ‘केवळ वस्तू’ म्हणून न पाहता तिच्यातले आकार शोधण्यास प्रवृत्त होतात.
 •   शोधाशोध करताना काही वेळा मुलं आकारात लपलेली गोष्ट शोधतात, तर काही वेळा गोष्टीत लपलेले आकार. हे दोन्ही योग्यच आहे.
 •   खेळात मुलांना एखादी गोष्ट जरूर सुचवा; पण तिचं अनुकरण करण्यापासून किंवा त्या गोष्टीची नक्कल करण्यापासून मुलांना परावृत्त करा.
 •  काही वेळा मुलं ‘तुम्हाला’ सामान्य वाटणाऱ्या गोष्टीपण सांगतील; तेव्हा त्यांची टिंगल न करता किंवा त्यांना नाउमेद न करता त्यांना आणखी गोष्टी शोधण्याचं बळ द्या.
 •   ‘जे सहृदय पालक आपल्या मुलांवर विश्‍वास टाकतात, त्यांचीच मुलं अविश्‍वसनीय प्रगती करतात’ या चिनी म्हणीवर कृपया विश्‍वास ठेवा!

Web Title: rajiv tambe's article in saptarang