शिकणं, समजणं आणि प्रश्न (राजीव तांबे)

राजीव तांबे me@rajivtambe.com
रविवार, 21 मे 2017

बाबा खूश होत मुलांना म्हणाले ः ‘‘व्वा व्वा ! तुम्ही प्रश्न शोधण्यामागं माझा एकच हेतू होता व तो म्हणजे, तुमचा प्रवास ‘डोळस’ व्हावा. नाहीतर आपण नुसताच प्रवास करतो, मजा करतो; पण जाणीवपूर्वक काही पाहण्याचं टाळतो. मी सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं काही देणार नाही. मी फक्त तीनच प्रश्‍नांची उत्तरं देणार आहे आणि तीन प्रश्‍नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत.’’

बाबा खूश होत मुलांना म्हणाले ः ‘‘व्वा व्वा ! तुम्ही प्रश्न शोधण्यामागं माझा एकच हेतू होता व तो म्हणजे, तुमचा प्रवास ‘डोळस’ व्हावा. नाहीतर आपण नुसताच प्रवास करतो, मजा करतो; पण जाणीवपूर्वक काही पाहण्याचं टाळतो. मी सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं काही देणार नाही. मी फक्त तीनच प्रश्‍नांची उत्तरं देणार आहे आणि तीन प्रश्‍नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत.’’

रविवारी ठरलेल्या बेतानुसार सोमवारी सकाळी सात वाजताची ट्रेन पकडून सहा मुलं आणि चार पालक अशी दिवसभराची ट्रिप सुरू झाली.
या प्रवासात मस्ती करा...गाणी म्हणा...खादाडी करा...नवीन ठिकाणी भटका... असं सगळं स्वातंत्र्य मुलांना होतं; पण तरीही या प्रवासात त्या सगळ्यांना एक टास्क म्हणजे एक कामही दिलेलं होतं. प्रत्येकानं प्रवासाशी संबंधित एक प्रश्‍न शोधून ठेवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचा प्रश्न हा इतरांच्या प्रश्नापेक्षा वेगळा हवा.

सकाळी सात वाजता गाडी सुटली आणि मुलांची गाणी सुरू झाली...नकला सुरू झाल्या...मग गाण्यांच्या भेंड्या झाल्या. गप्पागोष्टी करून, गाणी म्हणून, सुकी भेळ खाऊन आणि गारेगार सरबत पिऊन मुलं जरा सुस्तावली.
इतक्‍यात अन्वयनं खिशातली छोटी डायरी काढली. घड्याळात पाहिलं आणि म्हणाला ः ‘‘नो प्रॉब्लेम. आपली गाडी वेळेत आहे. आतापासून २८ मिनिटांनी आपलं स्टेशन येणार आहे. आता येणारं स्टेशन आणि त्याच्यापुढचं स्टेशन गेलं, की आपण तयारीला लागायचं आहे.’’
नेहा म्हणाली ः ‘‘आपण काल शिकल्यानुसार, स्टेशनवर उतरण्याआधी आपण कामाचा क्रम निश्‍चित करायला हवा.’’

आई म्हणाली ः ‘‘शाबास नेहा. खरंतर हे मीच सुचवणार होते. कारण, गाडी स्टेशनवर थांबल्यानंतर गाडीतल्या प्रवाशांनी उतरणं आणि नवीन प्रवाशांनी चढणं यात एक शिस्त असावी लागते. शिस्त आली की क्रम आला आणि क्रम आला की तर्कशुद्ध विचार आला. तर मग सांगा बरं, स्टेशनवर उतरण्याच्या कामाचा काय क्रम असावा?’’
‘‘क्रम? हातात बॅग घ्यायची आणि खाली उतरायचं. बस्स.’’ असं पार्थनं म्हणताच शंतनू म्हणाला ः ‘‘तसं नॉय रे. हे बघ आपण एकाच वेळी दहाजण खाली उतरणार. आपल्यासोबत उतरणारी आणखीही माणसं असणार आणि त्याच वेळी गाडीत चढणारी माणसं स्टेशनवर उभी असणार. कळलं का?’’
खरंतर पार्थला काहीच कळलं नव्हतं.
पालवी म्हणाली ः ‘‘आपण एका रांगेत उतरलं पाहिजे.’’
‘‘स्टेशन येण्याच्या अगोदर पाच मिनिटं आपण दरवाजाजवळ जाऊन थांबलं पाहिजे.’’
‘‘मुख्य म्हणजे दरवाजाजवळ उभं राहताना, माणूस पुढं आणि बॅग मागं असं उभं राहिलं पाहिजे. नाहीतर गाडी स्टेशनात शिरता शिरता कुणीतरी बॅग हिसकावून घेईल.’’
‘‘वॉव. एकदम सही.’’

‘‘काही वेळा चढणाऱ्या माणसांना भलतीच घाई असते. अशा वेळी त्यांना कुणीतरी समजवावं लागतं. ‘आधी लोकांना उतरू द्या, मग तुम्ही चढा,’ हे त्यांना पुनःपुन्हा विनवून सांगावं लागतं. एकदम लठ्ठालठ्ठी झाली तर मग उतरणारे गाडीत आणि चढणारे स्टेशनवरच राहतील ना.’’
‘‘पण आई, इतकी साधी शिस्त लोकं का पाळत नाहीत?’’
‘‘अगं, याचं साधं सोपं उत्तर म्हणजे, त्यांचा क्रम चुकतो आणि क्रम चुकतो, याचं कारण त्यांनी त्याचा कधी गांभीर्यानं विचारच केलेला नसतो.’’
‘‘पण..,त्या लोकांनी.’’
‘‘आधी माझं ऐक. आपण सगळे मिळून बरोबर वागायला सुरवात करू या. मला खात्री आहे, आपल्यासारख्या योग्य वागणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाईल. आपण इतरांच्या चुका शोधण्यापेक्षा आपणच अधिकाधिक चांगलं वागत जाऊ. हे थोडंसं कठीण आहे; पण प्रयत्न केला तर अजिबात अशक्‍य नाही.’’
आईचं बोलणं ऐकून सगळी मुलं आनंदानं ओरडली ः ‘‘येस. ओके-बोके-पक्के...काम शंभर टक्के.’’

पालवीचे बाबा म्हणाले ः ‘‘अजून २८ मिनिटं आहेत आणि स्टेशनवरची ११ मिनिटं म्हणजे एकूण ३९ मिनिटं तुमच्या हातात आहेत.’’
‘‘कशासाठी? कशासाठी?’’
‘‘अरे, असं काय करताय? आठवा तुमचं टास्क. प्रत्येकानं प्रवासाशी संबंधित एक प्रश्न शोधून ठेवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येकाचा प्रश्न हा इतरांच्या प्रश्नापेक्षा वेगळा हवा. तो गुरू हो जाओ शुरू.’’
मुलं कामाला लागली.
कुणी खिडकीत बसून बाहेर डोकावून पाहू लागलं.
कुणी गाडीतल्या गाडीत फेऱ्या मारू लागलं.
कुणी सरबत पिऊन झालं असल्यानं ‘घोटभर चहा घेऊ’ म्हटलं. पार्थला तर काही सुचेचना. पार्थनं ठरवलं, काही हरकत नाही; आपण गाडीतून उतरल्यावर आपला प्रश्न शोधू.
या सगळ्या गडबडीत एक स्टेशन गेलं. गाडी जोरात पळू लागली, तशी मुलांच्या डोक्‍यात विचारचक्रंही विमानाच्या वेगानं फिरू लागली.

अन्वय म्हणाला ः ‘‘माझा पहिला प्रश्‍न. गाडी जितक्‍या वेगानं पुढं जाते, तितक्‍याच वेगानं जवळची झाडं उलट्या दिशेनं जोरात पळतात; पण ते लांबचे डोंगर मात्र अतिशय सावकाश गाडीबरोबरच पुढं पुढं सरकत आहेत. असं का ?’’
पार्थ म्हणाला ः ‘‘अरे, झाडं लंबूलांब असतात म्हणून ती फास्ट पळत असतील. डोंगर तर भलेमोठे, अवाढव्य आहेत म्हणून ते सावकाश सरकत असतील ना?’’
‘‘अरे पार्था, ते उलटसुलट का पळत आहेत, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.’’
 नेहा म्हणाली ः ‘‘माझा प्रश्न...तसा हा सोपा आहे; पण प्रश्‍न आहे. मघाशी आपण कागदी कपातून गरम चहा प्यायलो; पण त्या कागदी कपात गरम चहा ओतल्यावर तो कप ओला झाला नाही किंवा त्यातून चहा गळतही नव्हता, असं का ?’’
वेदांगीनं विचारलं ः ‘‘आपल्याप्रमाणे पक्षांच्या अंगात हाडं असतात आणि रक्त व मांसपण असतं. हे पक्षी विजेच्या तारांवर बसतात, झोके घेतात...तरीपण त्यांना शॉक कसा लागत नाही?’’

शंतनूनं डोकं खाजवत प्रश्न विचारला ः ‘‘मीसुद्धा मघाचपासून अन्वयप्रमाणे उलटी पळणारी झाडं, सोबत येणारे डोंगर पाहतोय; पण असं खूप वेळ पाहत राहिलं तर गरगरल्यासारखं होतं. काहीतरी फिरतंय असं वाटतं. असं का होतं ?’’
पार्थला काही केल्या प्रश्न सुचत नव्हता. त्याची उगाचच इकडं-तिकडं धावपळ सुरू होती. अचानक मध्येच उभा राहत पार्थ म्हणाला ः ‘‘मिळाला प्रश्न. आपण घरात चालतो तसं आपल्याला ट्रेनमध्ये सरळ सरळ का चालता येत नाही? सारखं धडपडायला का होतं?’’
आता खरंतर प्रश्न विचारायची पालवीची वेळ होती. इतक्‍यात अन्वयनं शिट्टी वाजवली. त्याबरोबर काहीजण हातात पिशव्या, तर काहीजण पाठीवर सॅक घेऊन दरवाजाकडं एका रांगेत निघाले.
स्टेशन आलं (म्हणजे स्टेशन तिथंच होतं, गाडी स्टेशनला आली) आणि सगळे व्यवस्थित उतरले. आता स्टेशनमधून बाहेर पडायच्या आत प्रश्न शोधणं आवश्‍यक होतं. पालवीला काही सुचतच नव्हतं.
अन्वयनं पालवीला हळूच विचारलं ः ‘‘मी सांगू का?’’
पालवीनं खाली पाहतच काही न बोलता ‘ना ना’ करत मान हलवली.
गाडी निघाली आणि खाली पाहणाऱ्या पालवीला तिथंच प्रश्न दिसला.
पालवीनं विचारलं, ‘‘सगळ्यांना गुळगुळीत रस्ते आवडतात. इथं रुळांच्या खाली चांगला गुळगुळीत रस्ता न बांधता इथं खडी का टाकली आहे? या खडीवरून हे रूळ घसरणार तर नाहीत?’’

बाबा खूश होत म्हणाले ः ‘‘व्वा व्वा ! तुम्ही प्रश्न शोधण्यामागं माझा एकच हेतू होता व तो म्हणजे, तुमचा प्रवास ‘डोळस’ व्हावा. नाहीतर आपण नुसताच प्रवास करतो, मजा करतो; पण जाणीवपूर्वक काही पाहण्याचं टाळतो. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही देणार नाही. मी फक्त तीनच प्रश्नांची उत्तरं देणार आहे आणि तीन प्रश्‍नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत.’’
‘‘पण आम्ही कुठं शोधणार? आणि कशी शोधणार?’’
आई म्हणाली ः ‘‘कमालच करताय तुम्ही. थोडीशी निरीक्षणशक्ती, थोडा तर्कशुद्ध विचार आणि कुणाचीही मदत घेतलीत तर सुटतीलच की प्रश्न.’’
‘‘हां. तर पहिल्यांदा आपण ती उलटी पळणारी झाडं आणि सोबत येणारे डोंगर यांची गंमत समजून घेऊ. आता संध्याकाळी परत जाताना एक प्रयोग करा. गाडी जोरात धावू लागली तरी तुम्ही झाडांकडंही पाहू नका आणि डोंगरांकडंही पाहू नका. या दोघांच्या मध्ये जे अंतर आहे, त्या ठिकाणी पाहत तुमची दृष्टी स्थिर ठेवा. आणि पाहा, काय गंमत दिसते...’’
‘‘सांगा, सांगा...कुठली गंमत दिसते. सांगा ना...’’

‘‘कुणीच उलटं पळत नाही की कुणीच सोबतही येत नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी गोलाकार फिरत आहेत असं दिसेल.’’
शंतनू ओरडला ः ‘‘कळलं...कळलं. म्हणून मला खिडकीतून पाहत असताना गरगरल्यासारखं वाटत होतं; पण याचं कारण काय?’’
‘‘याचं कारण, डोळ्यांना दिसणारा गतिभ्रम. वस्तूचा डोळ्यांशी होणारा कोन ज्या गतीनं बदलतो, ती गती त्या वस्तूला आहे, असं आपला मेंदू समजतो; पण प्रत्यक्षात गती ही आपल्याला आहे आणि बाहेरचं हे सगळं स्थिर आहे, याचीही मेंदूला कल्पना असते.’’
‘‘आता कधी एकदा उलटा प्रवास करतोय आणि ही गरगरणारी दुनिया नीट पाहतोय असं झालंय मला...’’ असं शंतनूनं म्हणताच अन्वय म्हणाला ः ‘‘अरे, ‘उलटा प्रवास’ नव्हे, तर ‘परतीचा प्रवास’ म्हण, नाहीतर तूच गरगरशील.’’
‘‘आता शेवटचा प्रश्न आणि मग सटको, भटको...रुळांखाली जर सपाट रस्ता केला असता तर ट्रेन नक्कीच घसरली असती. आगगाडी धाडधाड आवाज करत, वेगात रुळांवरून जात असताना, रूळ समांतर असल्यानं त्या रुळांवरचा दाब एकसारखाच असतो. या खडीमुळं दाबाचं काही प्रमाणात विकेंद्रीकरण होतं व हा प्रचंड दाब सहन करण्याची लवचिकता या रुळांना मिळते. जर खडीऐवजी काँक्रिटचा सपाट रस्ता केला, तर रेल्वेच्या दाबानं रस्त्याचे तुकडे पडतील.’’
}
किंचित नाराजीनं नेहानं विचारलं ः ‘‘आणि माझ्या कागदी ग्लासचं काय?’’
पण मुलं पिशव्या उचलत ओरडली, ‘‘सटको, भटको जोर से खसको. प्रश्न का उत्तर कहीं भी खोजो.’’
आणि मुलं चालायलाच लागली. निरुद्देश खिडकीतून पाहणं असो, प्रवास असो किंवा चालत्या गाडीत धडपडत चालणं असो, कुठलीच गोष्ट फालतू नाही की मामुली नाही. प्रत्येक गोष्टीत समजून घेणं आहे, शिकणं आहे आणि जिथं शिकणं आहे, तिथं प्रश्‍न आहेतच.
आता खरं सांगा, प्रश्न तुम्हालाही छळतात का? तुम्हीही प्रश्‍नांचा पाठपुरावा करता का?


पालकांसाठी गृहपाठ ः

  •   तुमची मुलं जर प्रश्नच विचारत नसतील, तर त्यांना प्रश्न विचारण्यासाठी उत्सुक करा. (आणि तरीही ती प्रश्न विचारत नसतील, तर ‘घरात कुणाची तर दहशत आहे’ असा त्याचा अर्थ असू शकतो...! आणी ज्यांची घरात दहशत असते त्यांना(च) हे विधान पटत नाही!!)
  •   कृपया तुमच्या मुलांच्या कुठल्याही प्रश्नाला फालतू किंवा मामुली समजून त्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करू नका.
  •   मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत नसतील, तर मुलांकडं तसं कबूल करा (कारण तुमचा चेहरा पाहून ते मुलांनी अगोदरच ओळखलेलं असतं) आणि मुलांसोबत उत्तर शोधण्यास सुरवात करा.
  •   जेव्हा पालक मुलांबरोबर प्रश्नांची उत्तरं शोधू लागतात, तेव्हा मुलं आपसूकच अशी काही प्रेरित होतात, की ती पालकांच्या एक पायरी पुढं जातात.
  •   ‘तुमचं शिकणं आणि तुमची समज ही तुम्हाला पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची तुमची पद्धत यावर अवलंबून आहे’ ही लांबलचक अतिप्राचीन चिनी म्हण लक्षात ठेवा!

Web Title: rajiv tambe's article in saptarang