कशी असेल ‘न्यू नॉर्मल’ कबड्डी?

Kabaddi
Kabaddi

‘कबड्डीला सुरुवात होईल त्या वेळी इतर सर्व खेळही सुरू झालेले असतील...,’ कबड्डीला वाहून घेतलेले एक पदाधिकारी उद्वेगानं म्हणाले आणि आता ‘न्यू नॉर्मल’मधली कबड्डी कशी असेल असा प्रश्न माझ्याही मनात घोळू लागला. त्याचं उत्तर शोधताना ‘नव्या वर्षात तरी कबड्डीची चढाई होणार का’ हाही प्रश्न मनात आला.

कोरोनानं कबड्डीचं जितकं नुकसान झालं आहे आणि सध्याही होत आहे तेवढं दुसऱ्या कुठल्याही खेळाचं झालेलं नाही. कबड्डी हा सांघिक खेळ आणि त्यात एकमेकांशी कमालीचा संपर्क येत असतो. सुरक्षित अंतराचा नियम कसोशीनं पाळल्यास हा खेळ खेळताच येणार नाही! 

प्रो-कबड्डी न झाल्यामुळे...
प्रो-कबड्डीचा आवाका राष्ट्रीय, तसंच राज्य स्पर्धेच्या तुलनेत कमी आहे. आयोजकांकडे यंत्रणा राबवण्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळ आहे, त्यामुळे आयपीएलचं जैवसुरक्षित वातावरणात आयोजन झालं किंवा सध्या इंडियन सुपर लीगचं जे होत आहे त्याच धर्तीवर एका शहरात सर्व लढतींचं आयोजन करून लीग होईल अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र, प्रो-कबड्डीचा दम न घुमताच सन २०२० ची सांगता झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वयोगटांतल्या खेळाडूंचंही नुकसान
सन २०२०-२१ या क्रीडावर्षातली एकही स्पर्धा झालेली नाही. याचा फटका वरिष्ठ खेळाडूंइतकाच वयोगटांतल्या स्पर्धकांना बसणार आहे. विविध वयोगटांत बॉर्डरवर असलेल्या खेळाडूंना त्यांच्या गटात सन २०२१-२२ च्या मोसमात खेळता येणार नाही. त्यांचं वर्ष वाया जाणार, गुणांचा फायदा होणार नाही. वरिष्ठ खेळाडूंचं आर्थिक नुकसान जास्त आहे. राष्ट्रीय स्पर्धेतल्या कामगिरीवर त्यांची बोली लागते. या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करून प्रो-कबड्डीच्या लिलावात वरच्या गटात जाऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंचा  हिरमोड झाला. 

कसं असेल ‘न्यू नॉर्मल...’?
‘न्यू नॉर्मल’मध्ये मास्क आवश्‍यक झाला आहे. कबड्डी मास्क घालून खेळता येईल... विचार केला तर पटकन ‘नाही’ असंच उत्तर येईल...पण विचार करायला सुरुवात तर व्हायला हवी. त्यावर लगेचच ‘मास्क लावून चढाई करता येईल का,’ हाही प्रश्न विचारला जाईल...पण हे शक्‍य आहे. जरा विचार करा...आता तर दमाचं महत्त्वही कमी झालं आहे...पूर्वीसारखा ‘कबड्डी...कबड्डी’ हा दम घुमत नाही...आता तर घड्याळ लावून ३० सेकंदांची चढाई होते. आता मास्क लावून चढाई करायची ठरवली तर बंदच होईल हा दम घेण्याचा नियम? पण ‘न्यू नॉर्मल’मध्ये अशा बदलांचा विचार करायला हरकत काहीच नाही.

कबड्डी कशी सुरू करता येईल यासाठी भारतीय कबड्डी महासंघानं त्याबाबतच्या निष्णात व्यक्तींची समिती नेमून त्यावर अभ्यास करण्याची गरज आहे. आता भारतात कबड्डी महासंघच जागेवर नाही. एकटे प्रशासक किती जबाबदारी घेऊ शकणार हा प्रश्न आहे.

कबड्डी सुरू करायची झाली तर जसे प्रश्न आहेत तशीच उत्तरंही आहेत. नव्या कोरोनालाटेमुळे ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन अमलात आला आहे; पण कबड्डीप्रमाणेच सांघिक, तसंच कमालीचा शारीरिक संपर्क असलेल्या रग्बी लढतींना मनाई करण्यात आलेली नाही. सहा देशांच्या रग्बी स्पर्धेत इंग्लंड संघ खेळणार आहे.  हेच भारतातही घडावं, कबड्डीची चढाई पुन्हा सुरू व्हावी हीच आशा.

अशक्‍य; पण अवघड नाही
स्पर्धेत खेळण्यासाठी अद्ययावत कोरोनाचाचणी प्रमाणपत्र अत्यावश्यक
स्पर्धेच्या कालावधीत खेळाडूंना विलगीकरणाची सक्ती करावी लागेल
हे केवळ खेळाडूंसाठी नसेल तर सामनाधिकारी, गुणलेखकांसाठीही असेल
घाम, स्पर्श यांतून संसर्ग टाळण्यासाठी, पाण्याबरोबरच सॅनिटायझरचे स्प्रेही मैदानाच्या मागं आवश्‍यक.
खेळाडूंना स्वतंत्र पाण्याची बाटली, टॉवेल, सॅनिटायझर या बाबी आणाव्या लागतील आणि त्या मैदानातच आसपास ठेवणंही कदाचित आवश्यक असेल.

या प्रश्नांची उत्तरं कोणती?
सर्व सुरक्षित उपाययोजनांची प्रत्यक्षातली अंमलबजावणी कितपत शक्‍य होईल, त्याचबरोबर सर्व काही सुरक्षित असल्याची हमी कोण देईल?
आपल्या संघातले खेळाडू कोरोनाबाधित आहेत हे कळल्यावर खेळाडूंची मानसिक स्थिती काय होईल?
एखाद्या संघात कोरोनाबाधित असल्यास त्या संघाला बाद करायचं की स्पर्धेत ठेवायचं?
संघाला कोरोनाचाचणीनंतर स्पर्धेत ठेवलं आणि अन्य संघांनी त्याविरुद्ध खेळण्यास नकार दिला तर...?
एखादा खेळाडू कोरोनाबाधित असल्यामुळे बाद झालेला संघ विजेतेपदाचा दावेदार असेल आणि त्या संघाच्या स्पर्धासहभागावर गदा आली तर संयोजकांनी केलेल्या खर्चाचं काय?

(सदराचे लेखक अर्जुन पुरस्कार विजेते आहेत, तसंच विविध कबड्डी स्पर्धांच्या संयोजनात त्यांचा सहभाग असतो.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com