अपघात की आत्मघात ?

महाविकास आघाडीने राज्यसभेच्या निवडणुकीत दाखल केलेला चौथा उमेदवार पराभूत झाला. हा अपघात आहे की आत्मघात? याची आवर्तने आता होत राहातील.
rajya sabha election result mahavikas aghadi candidate fall that is tragedy or mischance
rajya sabha election result mahavikas aghadi candidate fall that is tragedy or mischanceesakal

अपघात आहे की आत्मघात या चर्चेची चिकित्सा करण्यासाठी अडीच वर्षे मागे जावे लागेल. लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवणारे कमळ पूर्ण फुलले होते. दिल्लीत नरेंद्र पाठोपाठ मुंबईत देवेंद्रची पुनरावृत्ती निश्चित होती. युतीतही स्वबळावर १२० चा आकडा गाठण्याची खात्री होती. पण थोडी गल्लत झाली. फासे वेगळे पडले. समसमान वाटा म्हणजे मुख्यमंत्रिपद नाही, यावर वाद झाला. भारतजेत्यांचे थोरलेपण प्रादेशिक पक्ष नाकारेल कशाला? असे वाटत होते. भाजपच्या या आत्मविश्वासाला फाजील ठरवत शिवसेनेने नवी आघाडी केली.

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर झालेच पण नरेंद्र मोदी अमित शहांना आव्हान देणारे प्रादेशिक नेतेही. या मोहिमेला फत्ते करण्यात शरद पवारांच्या खालोखालचे योगदान होते खासदार संजय राऊत यांचे. महाराष्ट्र विकास आघाडीची मुहूर्तमेढ करून पक्षप्रमुखाला मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचवण्याची ही कामगिरी अजोड होती.या नवआत्मविश्वासाने संजय राऊत दररोज भाजपवर कोरडे ओढणारी वक्तव्ये करु लागले. भाजपला छोटे दाखवण्यात केवळ तेच नव्हे तर हळूहळू बहुतांश शिवसेना नेते देखील मैदानात उतरत होते. आपली ताकद वाढल्याचा साक्षात्कार या नेत्यांना होऊ लागला आणि त्यातूनच राज्यसभेच्या निवडणुकीत अधिकचा उमेदवार दाखल करण्याचे ठरले असावे. संजय राऊत यांच्या बरोबरीने कोल्हापूरचे संजय पवार यांचा अर्ज दाखल झाला. सहकाऱ्यांच्या सहाय्याने निवडून येऊ, असे गणित तयार झाले. निवडणूक जवळ आली. अडीच वर्षात मतदारसंघासाठी निधी तर सोडाच, प्रमुखाची भेटही मिळत नाही या भावनेने नाराज झालेल्या छोटया पक्षांना अन अपक्षांना भाजपने जोखले होते. राज्यसभेसाठी दोन उमेदवार निवडून येतील आणि तिसऱ्याचे गणित आखून पाहू, असे ठरले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय नेते या बाबत आग्रही होते. तिसरा निवडून आला तर आघाडीत आलबेल नसल्याची जाहिरात आपसूक होणार होती. पराभव झाला तर काहीच जाणार नव्हते. देवेंद्र फडणवीसांनी हीच संधी हेरली. राष्ट्रवादी काँग्रेस अन काँग्रेस या खेळीला फारसे उत्सुक नव्हते. अपक्ष नाराज आहेत हे त्यांना कळत होते. खरे तर शिवसेनेतले आमदारही राष्ट्रवादीचे मंत्री निधी देत नसल्याची तक्रार करत होते. दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले.गणित जमणारे नाही हे लक्षात आल्यावर तहाचे प्रस्ताव समोर आले. पण ते ठाकरे-राऊतांकडे न जाता फडणवीसांकडे पोचवले गेले. छगन भुजबळ वगळता उमेदवार मागे घ्या, हे सांगायला अनिल देसाई अन सुनील केदार हे नेते पाठवले गेले. प्रस्ताव गंभीर नव्हता, पण पुढचा खेळ भाजपने गंभीरपणे हाती घेतला. अपक्षांना विधानसभाअध्यक्षाच्या संभाव्य निवडणूक वेळी हेरुन ठेवले होते. त्यांचे हवे नको ते पाहिले गेले होते. ती निवडणूक झाली नाही पण पेरलेले राज्यसभा निवडणुकीत उगवले.

शिवसेनेला अपक्षांचे काही खरे नाही हे लक्षात आले होते. छोटे पक्षही नाराज होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मदतीने ‘सप’,‘एमआयएम’शी करार झाले. तरीही काही खरे नसल्याने मुख्यमंत्री ठाकरेंचे दूत खासदार अरविंद सावंत, मंत्री अनिल परब, सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मतदानाच्या आदल्या रात्री शरद पवार यांची भेट घेतली. आम्हाला राष्ट्रवादीने पहिल्या पसंतीची आठ मते द्यावीत, असा निरोप होता.ही मते द्या, हा मुख्यमंत्र्यांचा ‘एसओएस’ सांगावा होता, असे म्हणतात. ती मते दिलीही गेली. पक्षाचे नेते अन् माजी मुख्यमंत्र्याचे अशी दोन मते भ्रातृभाव दाखवण्यासाठी काँग्रेसनेही शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला दिली. पण अपक्ष मते फुटली. घात झाला. राज्यसभेच्या निवडणुकीत एकतर बिनविरोधाचा मार्ग तरी चोखाळला जातो, नाहीतर काही वेगळे तरी घडते. काल शिवसेनेचे जे झाले ते अपघाताने घडले. अंदाज चुकले की ताकद लक्षात न घेता थेट भाजपला आव्हान देण्याची खुमखुमी ही आत्मघात प्रकारातली आहे?

शिवसेना हा मराठी माणसाच्या मुंबईतल्या जगण्याला अभिमानाचे प्रतिष्ठान देणारा महत्त्वाचा पक्ष आहे .देशाच्या प्रादेशिक पक्षातला तृणमूल काँग्रेस इतकाच किंबहुना त्याहून महत्वाचा पक्ष. प्रादेशिक पक्षांना त्यांच्या भौगोलिक सीमांबाहेर विस्तार करायचा असतो, असे वाटणे नैसर्गिक असते अन् स्वाभाविकही. ते करताना एकट्याच्या जोरावर वाटचाल करायची असते. तसे मार्गक्रमण तृणमूलप्रमाणेच नवीन पटनाईकांचे बिजू जनता दल, तमिळनाडूतील द्रमुक आणि अण्णाद्रमुक,दक्षिणेतले केसीआर, जगनमोहन रेड्डी या नेत्यांचे पक्ष करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे तसे नाही अन शिवसेनेचेही नाही. महाराष्ट्रातल्या या शक्तीशाली पक्षांना ‘एकला चलो’ ऐवजी साथीने चालावे लागते. पूर्वी शिवसेना भाजप समवेत होती. आज राष्ट्रवादी अन काँग्रेस समवेत. राष्ट्रवादी पक्षालाही साथ घ्यावीच लागते. अशा वेळी आत्मबळाची खुमखुमी अधिक अनिष्ट असते. परीक्षा नापास होणे हे आपल्यासमवेत मित्रपक्षालाही अडचणीत आणणारे असते. झाले ते झाले. गंगेला मिळाले नाहीतर मुंबईच्या मिठीला. अशा आत्मघातकी लढयात पक्षाने उतरणे हा शक्तीचे योग्य आकलन न झाल्याने, फाजील आत्मविश्वासापोटी घेतलेला चुकीचा निर्णय होता.हा केवळ एक अपघात होता हे शिवसेनेला कळणे त्यांच्या भल्याचे आहे. शिवसेना ही मराठी माणसाची गरज आहे. तिने योग्य पावले उचलून बहरावे .

एकल मतदानाचा अभ्यास!

फडणवीसांनी राज्यसभेतल्या एकल मतदानाचा अभ्यास केला होताच, त्यांनी काही विश्वासू आमदार अन आशीष कुळकर्णी यांच्या मदतीने आखणी केली. कोटा ठरवला. पहिल्या दोन उमेदवारांना मोठा कोटा दिला की त्यांची दुसऱ्या पसंतीची मते सहाव्या उमेदवाराला पहिल्या पर्यायाची ठरतात, हे त्यांना कळले होते. कोरोना झाल्यावर सक्तीने विजनात गेलेल्या फडणवीसांनी एकेका आमदारांसाठी कसे मत द्यायचे हे लिहिले. ती चिठ्ठी नंतर हाती दिली अन विषय मार्गी लावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com