आपापला स्वतंत्र चंद्र...

शान्ताबाई खूप गोष्टीवेल्हाळ होत्या. त्यांना कोणत्याही विषयावर बोलायला आवडत असे. साध्या-सोप्या भाषेतलं त्यांचं भाषण संवादात्मक व रसमधुर असे.
anolakh book
anolakh booksakal

- रमण रणदिवे, raman.ranadive@gmail.com

मराठी साहित्यजगतातलं एक ठळक नाव म्हणजे शान्ता ज. शेळके (जन्म : ता. १२ ऑक्‍टोबर १९२२. मृत्यू : ता. ०६ जून २००२). कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रं, बालसाहित्य, चित्रपटगीतं, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद आदी साहित्यप्रकारांत

त्यांनी विपुल लेखन केलं. मात्र, शान्ताबाईंची खरी ओळख ‘एक प्रतिभावंत कवयित्री’ म्हणूनच राहिली. उत्तुंग प्रतिभा, चौफेर वाचन, दांडगा व्यासंग, तीव्र स्मरणशक्ती, पाठांतर आदी गुणांमुळे महाराष्ट्रात त्या विदुषी म्हणून गणल्या गेल्या.

साहित्यजगतात होणाऱ्या स्थित्यंतरांचं कुतूहलजनक आकर्षण त्यांना होतं. नवसाहित्याचं त्यांनी स्वागतच केलं; पण त्यांच्या कवितेत मात्र पूर्वपरंपरेशी असलेलं नातं त्यांनी कधीच सोडलं नाही.

शान्ताबाई खूप गोष्टीवेल्हाळ होत्या. त्यांना कोणत्याही विषयावर बोलायला आवडत असे. साध्या-सोप्या भाषेतलं त्यांचं भाषण संवादात्मक व रसमधुर असे. त्या बोलत असताना श्रोत्यांना आसपास उदबत्ती दरवळत असल्याचा भास होई!

मला आवडणाऱ्या त्यांच्या एका अप्रतिम कवितेविषयी मी इथं लिहीत आहे...त्या कवितेचं शीर्षक आहे : ‘आपापला स्वतंत्र चंद्र’.

शान्ताबाईंनी ही कविता १९८०-८२ च्या सुमारास लिहिली. ‘अनोळख’ या त्यांच्या काव्यसंग्रहात ती आहे. कविता मुक्तछंदातली आहे.

काही कविता आपल्याला आवडतात; कारण, त्यांत अनुस्यूत असलेल्या आपल्या व्यक्तिगत सुख-दुःखांशी, भावाशयाशी आपलं उत्कट आंतरिक नातं जडलेलं असतं. कवितेतून मिळणाऱ्या प्रभावी प्रत्ययांच्या कसोटीवर कलानंद अवलंबून असतो. तो अनिर्वचनीय असतो. निर्मितीचा आनंद शब्दातीत असतो आणि निर्मिलेली रचना पुनःपुन्हा वाचण्याचा आनंद असतो कालातीत.

शान्ताबाईंच्या एका कविमित्रानं गप्पागोष्टी करताना त्यांना प्रश्न विचारला होता : ‘आज चाळीस वर्षं तुम्ही कविता लिहीत आहात. काय मिळालं तुम्हाला या खटाटोपातून? थोडे पैसे, थोडं नाव तुम्हाला मिळालं खरं; पण इतक्या दीर्घकालीन कवितालेखनातून कलेच्या दृष्टीनं आपल्याला काही साधलं आहे असं तुम्हाला खरंच वाटतं का?’

काहीशा थट्टेनं विचारल्या गेलेल्या या प्रश्नानं शान्ताबाई मात्र हळव्या झाल्या. व्यथित झाल्या. त्यांच्या मनाला विलक्षण अस्थिरतेच्या, हताशपणाच्या भावनेनं घेरून टाकलं. ज्या कवितालेखनानं त्यांना अपार आनंद दिला, आधार दिला त्या अस्तित्वहेतूवरच शंका घेतली गेल्यामुळं त्यांना मनस्वी नैराश्य आलं.

या कवितेच्या निर्मितिप्रक्रियेसंदर्भात लिहिलेल्या एका लेखात त्या म्हणतात : ‘हॉलिवूडमधल्या एका दिग्दर्शकाचं पुस्तक माझ्या वाचनात आलं. तो त्याच्या एका मित्रासह हॉलिवूडमध्ये नशीब अजमावण्यासाठी आला होता. दोघंही अपार धडपड करत होते. धडपडीचं चित्र रंगवताना फार सुंदर प्रतिमा त्यानं वापरली होती : We were both in search of our own moons. आम्ही दोघंही आपापले खासगी चंद्र शोधत होतो.’

त्या एका वाक्यामुळं शान्ताबाईंना ‘आपापला स्वतंत्र चंद्र’ ही कविता सुचली. कुठलाही कलावंत कलेच्या श्रेयसासाठी धडपड करतच असतो.

कला कोणतीही असली तरी तशी ती कष्टसाध्य असते. नितळ प्रामाणिकता तथा उत्कट भावमयता या दोन गोष्टी कलेला अनिवार्य असतात. श्रेष्ठ कलावंतांना त्यांच्या कलात्मक यशाचा चंद्र त्यांच्या हयातीतच गवसतो; पण सामान्य कलावंतांना आयुष्यभर जिवापाड धडपडूनही हवं ते यश मिळत नाही.

प्रत्येकाच्या यशाचा चंद्र स्वतंत्र असतो. जरी तो उशिरा मिळाला तरी; किंबहुना मिळालाच नाही तरीही, तो मिळवण्यासाठी केलेल्या धडपडीतला आनंद मात्र वेगळाच. हा निर्मळ आनंदही लाखमोलाचा असतो.कलावंताला जे साधायचं असतं ते जर साधता आलं नाही तर त्यानं हेही लक्षात ठेवायला हवं की, साध्यासाठी केलेल्या धडपडीनं आपल्याला जन्मभर साथ दिलेली आहे. आणि हो... आपल्या पायाखालच्या मातीतच आपलं चांदणं रुजलेलं असतं. आपल्या अश्रूंच्या प्रत्येक थरथरत्या थेंबात प्रत्येकाला आपापला स्वतंत्र चंद्र गवसतो.

शान्ताबाईंनी म्हटलंय : ‘अनेक चंद्र हातातून निसटून गेले. चांदण्यांची चिमूटभर राख झाली. डबीत जपून ठेवलेलं चांदणंही पैठणीच्या जरीकाठासारखं काळवंडून गेलं तरीही चंद्र आपल्याला दुरावलेला नसतोच. कारण, चंद्राचा ध्यास हीच एका वेगळ्या पातळीवर त्याच्याशी केलेली सलगी असते.’

कलेची साधना करताना मिळणाऱ्या यशाला कलात्मक चंद्राची सुंदर उपमा शान्ताबाईंनी दिली आहे. यश मिळो वा न मिळो; कलावंतानं प्रामाणिकपणे श्रेयसाधना करून आपापला चंद्र मिळवावा. कारण, प्रत्येकाचा चंद्र असतोच. तो मेघात दडलेला असला तरी कधी तरी आकाश निरभ्र होतं, असा सकारात्मक विचार ही कविता देते. शान्ताबाईंनी आपल्या कवितेच्या माथ्यावर असलेला शालीनतेचा पदर कधीही ढळू दिला नाही.

आपापला स्वतंत्र चंद्र...

प्रत्येकालाच कवळायचा असतो

आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातांत

ते न जमल्यास निदान

वेचायचे असते चिमूटभर चांदणे तरी

जे डबीत ठेवायचे असते जपून

आणि दाखवायचे असते

म्हातारपणी पोराबाळांना

एक अपूर्वाईची चीज म्हणून!

अनेक चंद्र निसटून जातात

चांदण्यांची होते चिमूटभर राख

डबीत ठेवलेले चांदणेही

काळवंडते कालांतराने

ठेवणीतल्या पैठणीच्या जरीकाठाप्रमाणे

तेव्हा उमगते

आपल्या पायाखालच्या मातीतच

रुजले आहे आपले चांदणे

आणि आसवांच्या थरथरत्या थेंबात

गवसतो आहे आपापला स्वतंत्र चंद्र

- शान्ता ज. शेळके

[‘अनोळख’ (प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस) या काव्यसंग्रहातून साभार]

(लेखक हे ज्येष्ठ कवी आणि गझलकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com