अभिमान! 

डॉ. रामचंद्र देखणे, संत साहित्य व लोकवाङ्‌मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते 
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

परंपरा अनेक वर्षांच्या अनुभूतीने आणखी समृद्ध झालेल्या असतात. म्हणून त्या मानवी जीवनात चैतन्य व ऊर्जा देऊन जातात. मानवी जीवन, लोकव्यवहार, लोकाचार आणि तत्त्वदर्शन या सर्वांना जोडण्याचे काम परंपरा करीत असतात; म्हणूनच अभिमानाची परंपरा धरण्यापेक्षा परंपरेचा अभिमान बाळगावा, हेच खरे.

व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनातही परंपरा हा शब्द नेहमी वापरला जातो. व्यक्तिगत स्वरूपात बोलताना ‘माझ्या घरी सेवेची, संगीताची परंपरा आहे, गाण्याची परंपरा आहे, वारीची परंपरा आहे’, असे विधान केले जाते; तर सामूहिक स्वरूपात बोलताना ‘उत्सवाची परंपरा, व्याख्यानाची परंपरा, देशभक्तीची परंपरा, समाजसेवेची परंपरा, संतविचारांची परंपरा, वारीची परंपरा’, अशा वेगवेगळ्या स्वरूपात ‘परंपरा’ हा शब्द आपल्याला भेटत राहतो आणि काही चांगल्या मूल्यांची जाणीवजागृती करून देत असतो. खरे तर काही ठिकाणी व्यक्तिगत व सामूहिक जीवनातही अभिमान जागा होत असतो आणि एक अभिमानाची परंपराही उभी राहते. खरे तर अभिमानाची परंपरा असण्यापेक्षा परंपरेचा अभिमान असावा, इतकी सुंदर परंपरा आपल्याला लाभलेली असते. आता परंपरा आणि वारसा या दोन गोष्टी आपल्याला घराण्याकडून, समाजाकडून, आई-वडील, गुरूंकडून लाभलेल्या असतात. परंपरेची पालखी कोणीतरी आणलेली असते आणि ती आपण अभिमानाने मिरवत पुढे न्यायची असते. परंपरा या चालवायच्या असतात, त्या मोडायच्या नसतात. ज्ञान, विचार, कृती, लोकाचार, व्यवसाय, धर्म या सर्वांतून या परंपरा येत असतात.

जसा परंपरा आणि वारसा असा एक भाग आहे, तसाच परंपरा आणि रूढी असा दुसरा भाग सांगितला जाऊ शकतो. रूढी आणि परंपरा यांमध्ये फार फरक आहे. उदाहरणार्थ वारकऱ्यांच्या घरी वारीची परंपरा असते. आषाढ महिन्यातील वारी सुरू होण्याआधी ज्येष्ठ महिन्यातच त्याचं मन पंढरीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असते. त्या वेळी मनालाही दिसू लागते. कारण ती आनंदयात्रा डोळ्यासमोर उभी राहते. ते सावळे परब्रह्म साठवण्यासाठी निघालेली पावलं आणि तो टाळ-मृदंगाचा गजर कानात व मनात साठवला जातो आणि आपोआप पावले पंढरीच्या वाटेकडे वाटचाल करू लागतात. याचं कारण संतांनी दिलेली वारीची परंपरा. तुकाराम महाराजांच्या घरी ४३ पिढ्या पांडुरंगाच्या भक्तीची तर अनेक पिढ्यांची वारीची परंपरा होती. त्यांनी एका अभंगात या परंपरेविषयी मोठा अभिमान व्यक्त केला आहे. 

‘पंढरीची वारी... आहे माझे घरी... 
आणिक न करी... तीर्थ व्रत
व्रत एकादशी करीन उपवासी... 
गायीन अहर्निशी मुखी नाम’

या पंढरीच्या वारीची परंपरा तुकोबारायांपासून आजपर्यंत अखंड सुरूच आहे. ज्ञानदेवांच्या वडिलांची वारीची परंपरा होती. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत यांनी वारी केल्याचे संदर्भ आहेत. संतांनी एकात्मतेची दिंडी काढली. समतेची पताका खांद्यावर मिरवली गेली. भक्तीचा जागर झाला, ग्रंथांमधील अद्वैतता कृतीत उतरवली आणि पंढरपूरच्या महाद्वारात व वाळवंटामध्ये ‘एकची टाळी’ झाली. ही वारीची परंपरा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव ठरली. आजही जेव्हा लक्षावधी वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात विठूचा नामगजर करीत पंढरपुरी निघतात, तेव्हा भक्तीची केवढी वैश्‍विक परंपरा आहे, हे लक्षात येते. रूढी व परंपरेमध्ये फार फरक आहे. परंपरा ही चांगल्या गोष्टी, तत्त्व, विचार आणि कृती यांतून उभी राहते आणि ती संस्कृतीकडे नेते. रूढीच्या बाबतीत सर्व वेगळे आहे. रूढीतही चांगल्या रूढी, वाईट रूढी असे दोन प्रकार पडतात. एक गमतीशीर प्रसंग सांगितला जातो. एका घरामध्ये श्राद्ध असते. श्राद्धाचा स्वयंपाक केलेला असतो. खीर तयार असते. तेवढ्यात एक मांजरीचे पिलू येते व खिरीच्या पातेल्यात तोंड घालते. दूर केले तरी ते पिलू बाजूला जात नाही. शेवटी घरातील महिला नवऱ्याला सांगते- एक टोपली घेऊन या... आणि त्या टोपलीखाली ते पिलू ठेवले जाते आणि त्यानंतर श्राद्धाची जेवणे केली जातात. पुढील वर्षी त्या घरातील सासू गेलेली असते. पुढील वर्षी पुन्हा श्राद्धाचा दिवस येतो, खीर केली जाते. सूनबाई श्राद्धाचे ताट करताना नवऱ्याला सांगते - एक मांजराचे पिलू घेऊन या आणि एका टोपलीखाली ठेवा आणि मग जेवा. तो म्हणतो असे का? तर - तर ती म्हणते ‘सासूबाईंनी असेच केले होते. ही आपल्या घराची रूढी आहे.’ आता अशा रूढीला काय अर्थ आहे? खरे तर आपल्याकडील अनेक परंपरा रूढीमध्ये अडकतात आणि विकृतीकडे जातात. चांगल्या गोष्टीचे सातत्य ही परंपरा असते, तर वाईट गोष्टींचे सातत्य ही मात्र रूढी आहे. 

परंपरेने एक संस्कार्य जीवन उभे राहते. जीवनात संस्काराला खूप मोठे महत्त्व आहे. सगळे संस्कार हे मनुष्याच्या आतमधील श्रद्धा, भावना, मानवी स्वभाव आणि सामाजिक शक्ती यांच्याशी निगडित आहेत. संस्कार हे विविध तत्त्वांचे मिश्रण आहे. 

संस्कारच माणसाच्या शारीरिक व सांस्कृतिक स्थित्यंतराचे द्योतक आहेत. संस्कारानेच माणसाला सामाजिक दर्जा प्राप्त होतो. संस्कारामध्ये अनेक आरंभिक विचार, परंपरेने दृढ झालेली तत्त्वमूल्ये, नियम आणि आचार यांचा समावेश असतो; परंतु हे सारे रुजवण्याचे काम परंपरेकडून घडत असते. संस्कार हे केवळ संस्कार म्हणून करावयाचे नाहीत; तर संस्काराचा परिपाक नैतिक गुणांच्या अभिवृद्धीत व्हावा हीच अपेक्षा आहे. व्यक्तित्त्वाची निर्मिती आणि विकास हे संस्कारातून घडत असते. संस्कार हे मानवी सभ्यतेचे विकसित रूप ठरते. संस्कारित जीवन हे भौतिक धारणा व आत्मवाद यांच्यामधील मध्यम मार्ग आहे आणि तो मार्ग दृढ करण्याचे काम परंपरा करीत असते. खूप चांगल्या परंपरा जीवनात रूढ झालेल्या असतात. संगीताची परंपरा अशीच प्राचीन आहे. सामवेदापासून शास्त्रीय संगीतापर्यंत, ते लोकसंगीतापर्यंत ती अखंडपणे मानवी जीवनाला आनंद देत आहे. परंपरेतून एखादे दर्शनही उभे राहत असते. उदाहरणार्थ- तत्त्वविचारांची परंपरा हे एखादे तत्त्वचिंतन उभे करते. संगीताची परंपरा अभिव्यक्ती घडवते. सेवेची परंपरा सत्कृती उभी करते. म्हणूनच परंपरा ही टिकवायची असते; कारण वर्षानुवर्षांची अनुभूती त्यामध्ये सामावलेली असते. परंपरा ही कधी जुनी होत नसते. ती जरी परंपरा असली, तरी ती जुनी होत नाही; कारण ती नित्य नवे विचार आणि ऊर्जा देऊन जाते आणि सातत्याने लोकजीवनात आवश्‍यक असते. ज्ञानदेवांनी एक दृष्टांत दिलेला आहे....

‘हा गा सूर्य काय शिळा अग्नी 
म्हणो येत ओवळा
नित्य वाहे तया गंगाजळा... 
पारसेपण असे...’

काल येणारा सूर्य आज पुन्हा उगवतो; म्हणजे कालचा शिळा सूर्य पुन्हा येतो का? कालचा सूर्य आज पुन्हा चैतन्याची नवी किरणे घेऊन जगाला प्रकाशित करतो, तो प्रकाशित करण्याची परंपराच चालवीत असतो. काल वाहणारी गंगा आज वाहत राहण्याची परंपराच सांगत असते. म्हणूनच ज्या परंपरा आहेत, त्या अनुभूतीतून सिद्ध झालेल्या आहेत, म्हणूनच त्यातील पारंपरिकतेला महत्त्व दिलेले आहे. नव्या पिढीला या परंपरा जुन्या वाटतील; पण त्या जुन्या नसून, त्या नूतन असतात. त्या विचार व जीवनमूल्ये घेऊन परंपरेने चालत आलेल्या असतात. अनेक वर्षांच्या अनुभूतीने परंपरा आणखी समृद्ध झालेल्या असतात; म्हणून त्या मानवी जीवनात चैतन्य व ऊर्जा देऊन जातात. मानवी जीवन, लोकव्यवहार, लोकाचार आणि तत्त्वदर्शन या सर्वांना जोडण्याचे काम अशा परंपरा करीत असतात; म्हणूनच अभिमानाची परंपरा धरण्यापेक्षा परंपरेचा अभिमान बाळगावा, हेच खरे.
( शब्दांकन - प्रसाद इनामदार)

Web Title: Ramchandra Dekhane article on Tradition