दरड कोसळणं रोखायचं कसं !

राज्यात गेल्या महिन्यापासून पडणाऱ्या पावसाने हाहाकार माजविला आहे आणि दरडी कोसळून मनुष्य व प्राणी हानी होण्याची शृंखला सुरू आहे.
Control Landslide
Control LandslideSakal

राज्यात गेल्या महिन्यापासून पडणाऱ्या पावसाने हाहाकार माजविला आहे आणि दरडी कोसळून मनुष्य व प्राणी हानी होण्याची शृंखला सुरू आहे. निसर्गकोपामुळे पावसाचा अतिरेक हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे, मग अशा परिस्थितीला तोंड देण्या साठी काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे का ? किवा मनुष्य/ प्राणी मात्राची हानी कशी टाळता येईल ? त्यासाठी काय नियोजन केले पाहिजे ? यावर अनुभवावरून व उपलब्ध तंत्रज्ञान आणि या विषयावर पुढील संशोधन काय सुरू आहे या विषयांचा आढावा या लेखातून घेऊया.

निसर्गाचे गुपित : निसर्ग आपोआप स्थैर्य साधण्याची किमया करत असतो. लोखंडाचे गंजामध्ये परिवर्तन. लाव्हाने निर्माण झालेल्या कठीण पाषाणाचेही हळू हळू मातीत रूपांतरित (weathering-erosion) होणे. मातीचा मोठा ढीग सुद्धा हळूहळू घसरत एका स्थैर्यस्थितीत पोचण्याचा प्रयत्न करतो व तो तिथे पोचतो. मग याला वारा - पाऊस असे हे निसर्गाच्या नियोजनाचाच भाग जणू. त्यात भर पडते ती मनुष्याने निर्माण केलेल्या विशाल बांधकामाची, तोड फोडीची. माती किंवा रेती एखाद्या समतल भागावर ओतली असता त्याचा पृष्ठभाग जमिनीशी जो आतल्या बाजूला कोन करतो त्याला आपण स्थैर्यकोन (Angle of Repose) असे म्हणतो. दगडापासून त्याचे मातीपर्यंत रूपांतरित होत असताना त्याचा स्थैर्यकोन बदलत जातो. ९० अंशापेक्षा जास्त असलेला हा कोन ४५ अंशापर्यंत जातो. कधी कधी तो १० ते १५ अंशापर्यन्त जातो. एखादा पाषाण मध्ये तोडल्यानंतर ६० अंशापर्यंत तो स्थिर मानला जाऊ शकतो. मातीचा भरणा किंवा डोंगर ४५ अंशापर्यंतच स्थिर मानवा लागतो. परंतु अशी स्थिती नेहमीच राहत नाही. पण दरड कोसळण्याआधी निसर्ग त्याच्याबाजुने दरड सर्वतोपरी न पडण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो.

दरड कोसळण्याची कारणे काय?

एखाद्या डॉक्टरला जसे उपाय सुचवण्या आधी कारणे शोधावी लागतात. हाताला दुखापत झाली असेल तर नुसते बॅंडेजने काम होईल की प्लास्टर घालावे लागेल ? की पोटात औषध द्यावे लागेल ? का हातात रॉड टाकावा लागेल त्याप्रमाणेच जिओटेक्निकल अभियंत्याला अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो, त्याला ही बरेच टेस्ट कराव्या लागतात ! हा विषय मोठा आहे पण थोडक्यात सांगायचे तर माती आच्छादित डोंगर व पाषाणाचे डोंगर असे दोन भाग व नुसतेच मातीचे डोंगर असा तिसरा प्रकार आपण लक्षात घेऊ. या तीन प्रकारांचा विचार करून त्यानुसार उपाययोजना केल्याने आपल्याला दरड कोसळण्याची कारणे शोधून ते रोखता येऊ शकेल. सर्वात आधी सह्याद्रीच्या रांगांमध्ये प्रचलित असलेले माती आच्छादित पाषाणाचे डोंगर व मातीचे डोंगर यांचा विचार करू.

पाषाणाचे डोंगर

सह्याद्री पर्वत म्हणजे लाव्हारसाच्या उद्रेकाने तयार झालेल्या पाषाणापासून निर्माण झालेल्या डोंगररांगा आहेत. पाषाणाचे अपक्षय (WEATHERING) झाले की दगडाचे भाग निखळून पडतात आणि स्थैर्यकोन साधायचा प्रयत्न करतात. पावसाच्या माऱ्याने हे सुटे भाग खाली येतात आणि ते वजनी असल्याने व उंचावरून खाली येत असल्याने त्याचा मारा तोफेपेक्षाही भयानक असतो. या डोंगराच्या खाली असलेल्या वस्तीचा विध्वंस करतात.

उपाययोजना

असे दगड मोठे किवा सुटसुटीत दगड सुद्धा जे पावसाने खाली येतात त्यांना स्फोटकविरहित रसायन पद्धतीने बारीक तुकडे करून काढणे आवश्यक आहे.

उरलेल्या दगडाच्या भागास सिमेंट

रेती एकास पाच या प्रमाणात फवारा (GUNITE) २५ ते ५० मिलीमीटर मारल्यास दगडाचे तुकडे निखळत नाहीत व पावसाचे पाणी दगडात शिरायचे थांबते व पाषाणाचा / दगडाचा अपक्षय थांबवते. डोंगरातून झिरपलेले दरडीतील पाणी पाषाणाच्या अपक्षयला करणीभूत होते म्हणून त्याला WEEP HOLE देऊन पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बाजूस कालवा काढून पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. जे दगड काढणे कठीण आहेत पण निखळण्याची शक्यता आहे त्यांना निखळणाऱ्या भागाच्या दुप्पट लांबीचे किंवा स्पॉट बोल्ट लावल्यास वारंवार दरडी काढण्याची आवश्यकता भासणार नाही. दरडींमध्ये पाणी झिरपल्यास गनाईटला तडे जाऊ शकतात त्याला प्लॅस्टिक नेट वर दूसरा गनाईट थर दिल्यास कायमस्वरूपी उपाययोजना ठरू शकते. लोखंडाची जाळी वापरल्यास ती गंजते. हा पूर्ण भाग सूर्यप्रकाशाला उन्हाला उघडा असल्याने दहावर्षात पापुद्रे पडू शकतात त्यासाठी वेळोवेळी छोट्या यंत्रानं दुरूस्ती करणे गरजेचे असते. ज्या दरडप्रवण क्षेत्रात ताबडतोब योजना राबविण्यास वित्तीय तुटवडा असल्यास किमान ईल्यास्टो-मागनेटिक सेन्सर बसवावे. जेव्हा दरडी घसरण्यासाठी लागणारा दबाव या सेन्सरवर येण्याच्या मार्गावर असतो तो स्थानिक यंत्रणेला SMS द्वारे सूचना देऊ शकतो. किंवा सायरन वाजवून धोक्याची घंटा वाजवून स्थानिकांना सतर्क केले जाऊ शकते व होणारी मनुष्य हानी टाळता येऊ शकते.

ज्या गावांच्या आसपास मातीचे डोंगर आहेत त्या डोंगरात विक ड्रेन /स्ट्रिप ड्रेन किंवा पीव्हीसी पाईपचे ड्रेन जमिनीत खोल बसवावे म्हणजे माती वाहून न जाता डोंगराच्या बाहेर फक्त पाणी वाहून जाईल. कारण या मध्ये जीओ सिथेंटीक कापडाचा वापर केलेला असतो त्यामुळे माती वाहून न जाता फक्त पाणी वाहून जाते यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार कमी होतील.वेळूची झाडे जर डोंगराखाली किवा डोंगरावर लावल्यास ते माती थोपवून धरण्यास काही प्रमाणात मदत कारतात. पण या सोबत पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. नाहीतर ते प्रभावी ठरत नाहीत.

दगडाचे भार घेणाऱ्या जाळ्या व सॉइल नेल व गनाईट प्रणाली हे प्रचंड अशा मातीच्या डोंगराच्या भूस्खलानाला उपाय ठरतात. पुण्यातील लवासा प्रकल्पात याचा यशस्वी प्रयोग लेखकाने केला आहे.

(लेखक स्थापत्य अभियंता असून दरड व्यवस्थापनशास्त्राचे तज्ज्ञ आहेत. इमारतींचे संरचनात्मक मजबुतीकरण व विविध खाणींमध्ये त्यांचे योगदान आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com