रणथंबोरची राणी

‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डस्’ आणि ‘क्रोकोडाईल किलर’चा बहुमान मिळवलेली रणथंबोरची राणी अर्थात ‘मछली’ वाघीण सर्वाधिक आयुष्य जगली.
Tiger
Tigersakal

- संजय करकरे

‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डस्’ आणि ‘क्रोकोडाईल किलर’चा बहुमान मिळवलेली रणथंबोरची राणी अर्थात ‘मछली’ वाघीण सर्वाधिक आयुष्य जगली. पर्यटकांकडून सर्वात जास्त महसूलही तिने मिळवून दिला. ‘मछली’ने तब्बल ११ पिल्लांना जन्म दिला. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात आज तिचाच वंश बहरला आहे. मात्र, तिच्याच मादी पिल्लाने तिच्यावर मात करून रणथंबोरच्या जंगलाचा समृ परिसर आपल्या ताब्यात घेतला... उमेदीत राणीसारखे जीवन जगणारी ‘मछली’ वाघीण उतारवयात मात्र जगण्यासाठी धडपड करत असल्याचे दृश्य फारच वेदनादायी होते.

‘ती’रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाची राणी होती. जगातील सर्वाधिक छायाचित्रे तिची काढली गेली. ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डस्’ही तिने पटकावला. ‘क्रोकोडाईल किलर’चा बहुमानही तिला मिळाला. सर्वाधिक आयुष्य जगलेली म्हणून तिच्याकडे बघितले गेले. सर्वात जास्त महसूल मिळवून देणारी वाघीण असा तिचा गौरव झाला. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात आज तिचा वंश बहरला आहे.

मी हे सारे कौतुकाचे शब्द बोलत आहे ते ‘मछली’ नावाच्या वाघिणीबद्दल. राजस्थानातील सवाई माधवपूर जिल्ह्यात रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र आहे. हा सर्व परिसर रजपूत शासकांच्या अधिपत्याखाली होता. तिथे अनेक किल्ले, गढ्या आहेत. राजस्थानातील हा व्याघ्र प्रकल्प सुरुवातीच्या काळापासून सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे ते तेथे भेट देणाऱ्या अतिप्रसिद्ध व्यक्तींमुळेच.

दिल्लीपासून जवळ असल्याने साहजिकच तेथे येणाऱ्या अतिमहनीय पाहुण्यांसाठी तो कायमच कौतुकाचा विषय ठरला आहे. परदेशी पाहुण्यांना ज्याप्रमाणे आग्रा येथील ताजमहालाला भेट दिल्याशिवाय त्यांची ट्रीप पूर्ण होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात जाऊन वाघ बघितल्याशिवाय त्यांची पावले आपल्या देशाबाहेर पडत नाहीत, असाच काहीसा रिवाज आहे. साहजिकच रणथंबोरमध्ये घडणाऱ्या अनेक घटनांची प्रसिद्धी सातत्याने केवळ देशातच नव्हे; तर जगभरातही होत असते.

रणथंबोरचे जंगलही खूप सुंदर आहे. रणथंबोरचा किल्ला, राजबाग तसेच अनेक जुन्या पुरातन वास्तूंच्या घेऱ्यात येथील जंगल आहे. मलिक, पदम इत्यादींसारख्या अनेक लहान-मोठ्या तलावांची माळ या जंगलाची शोभा कमालीची उंचावत आहे. जंगलातील सांबर, चितळ, रानडुक्कर, वानर, नीलगाय, चौसिंगा व चिंकारा या तृणभक्ष्यी प्राण्यांच्या विविधतेमुळे साहजिकच वाघांचे येथे अस्तित्व कायम टिकून आहे.

याच जंगलात १९९६ मध्ये ‘मछली’ वाघिणीचा जन्म झाला. तिला तीन मादी पिल्ले झाली. तिच्या चेहऱ्यावर माशांसारखे पट्टे असल्याने तिला ‘मछली’ नाव मिळाले. ती पाण्यात जाऊन सांबराची शिकार करत असल्याने पर्यटकांची लाडकी होती. ‘मछली’ला झालेली तीन पिल्ले मोठी झाल्यानंतर त्यातील बिनधास्त आणि धाडसी असलेल्या एकाने आपल्या आईलाच आव्हान दिले.

साधारण १९९९ च्या सुमारास ऐन जवानीत आलेल्या या मादी पिल्लाने आपल्या आईला पराभूत करून तिच्या क्षेत्रावर कब्जा मिळवला. तिच्याही डाव्या कानाजवळ व चेहऱ्यावर माशाच्या कल्ल्यासारखी खूण होती. म्हणून आईप्रमाणेच ‘मछली’ नावाने ती पुढे आली. रणथंबोर प्रकल्पातील दोन, तीन, चार आणि पाच अशा वन्यप्राणी व पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या झोनमध्ये ‘मछली’चा त्यानंतर एकछत्री अंमल सुरू झाला.

पर्यटकांच्या क्षेत्रात या वाघिणीचा सर्वाधिक वावर असल्याने साहजिकच सर्व वन्यप्रेमी तसेच छायाचित्रकारांत ती अल्पावधीतच आवडीची ठरली. बिनधास्त आणि पर्यटकांना न घाबरता तिचा सुरू असणारा वावर तिला प्रसिद्धीकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरला. पर्यटकांच्या गाड्यांना आडोसा करून केलेली सांबराची वा चितळाची शिकार मोठा कौतुकाचा विषय ठरली.

२००३ मध्ये या वाघिणीने मगरीची शिकार केली आणि तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तलावाच्या काठाला असलेल्या १४ फुटी मगरीवर ‘मछली’ने हल्ला चढवला. मगरीशी तिची जबरदस्त झटापट झाली. मोठ्या मगरीची अत्यंत टणक अशी कातडी भेदून तिने तिला केवळ मारलेच नाही तर खाल्लेही. या शिकारीत ‘मछली’ला डाव्या बाजूचा वरचा व खालचा सुळा मात्र गमवावा लागला. मात्र, ऐतिहासिक पराक्रमामुळे तिला ‘क्रोकोडाईल किलर’चा किताब प्राप्त झाला.

ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंवर बसलेल्या ‘मछली’ वाघिणीची अनेक अत्यंत सुंदर छायाचित्रे आजही बघायला मिळतात. त्यामुळे या पुरातन वास्तूंवर जणू ही महाराणी बसली आहे, असेच त्यातून ध्वनीत होते. त्यामुळे ‘क्वीन ऑफ रणथंबोर’ हे बिरुदही तिला प्राप्त झाले. त्या सुमारास या व्याघ्र प्रकल्पात १२ ते १४ वाघांचा वावर होता. त्यातही अत्यंत बिनधास्तपणे ती वावरत असल्याने तिला साहजिकच अधिक प्रसिद्धी मिळाली.

या वाघिणीने आपल्या आयुष्यात चार वेळा पिल्लांना जन्म दिला. या काळात ‘बांसराम’, ‘निक इयर’ व ‘एक्स मेल’ या नरांसोबत तिचे मिलन झाले. या मिलनातून तिला सात माद्या आणि चार नर पिल्ले झाली. २००८ मध्ये राजस्थानातील सरिस्का व्याघ्र प्रकल्पात त्यांपैकी दोन मादी पिल्लांना हलवण्यात आले. २००५ मध्ये सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील संपूर्ण वाघ नामशेष झाल्यानंतर मोठी टीका झाली होती. त्यामुळे ‘मछली’ वाघिणीने केवळ रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातच आपला वंश वाढवला नाही; तर सरिस्का व्याघ्र प्रकल्पातही तिचा वंश पोहचला आणि तिथे नंतरच्या काळात तो वाढीसही लागला.

साधारण २०१४ पर्यंत ‘मछली’चा काळ रणथंबोरमधील सर्वोच्च मानण्यात येतो. १२ ते १३ वर्षे ती आपल्या संपूर्ण क्षेत्रावर वर्चस्व मिळवून होती. जशी ती प्रौढ होत गेली, तसे तिने आपल्या क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या नर वाघांशी दोन हात केले. या झटापटीत ती अनेक वेळा जखमी झाल्याचेही दिसले. मात्र आपल्या पिल्लांसाठी आणि जागेसाठी ती सतत एखाद्या लढवय्यासारखीच रणथंबोरच्या जंगलात वावरत होती.

तिने चौथ्या बाळंतपणात तीन मादी पिल्लांना जन्म दिला. त्यातीलच एका ‘सुंदरी’ नावाच्या वाघिणीने २०१४ च्या सुमारास आईपासून वेगळे होताच, तिलाच म्हणजेच ‘मछली’ला जोरदार तडाखा दिला. इथे इतिहासाची पुनरावृत्ती झाली. ज्या आईला पराभूत करून ‘मछली’ वाघिणीने आपले क्षेत्र प्रस्थापित केले होते, त्याच क्षेत्रात तिला तिच्या मादी पिल्लाने परास्त करून या जंगलाचा अत्यंत समृद्ध असा परिसर आपल्या ताब्यात घेतला.

त्यानंतर ‘मछली’ वाघिणीला तिचे वाढत जाणारे वय अवघड ठरू लागले. वयाच्या १७-१८ वर्षांपर्यंत ही वाघीण जंगलाच्या बाहेरील बफर क्षेत्रातही वावरत राहिली. तेथे मिळणाऱ्या लहान जनावरांवर ती गुजराण करू लागली. १८ ऑगस्ट २०१६ च्या सकाळी या जगप्रसिद्ध वाघिणीने आपला देह ठेवला. तत्पूर्वी अत्यंत थकलेल्या या वाघिणीच्या दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू झाला होता. तिचे शिकार करणे जवळपास थांबले होते.

या वाघिणीला तिच्या अखेरच्या काळात व्याघ्र प्रकल्पाने भक्ष्य देऊन जगवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारावरून मोठा वादही त्या वेळी झाला होता. मात्र पर्यटक तसेच अनेक रिसॉर्टचालकांनी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनावर दबाव टाकून ही वाघीण जगली पाहिजे, असा आग्रह धरून तिला खाद्य द्यायला हवे, असे आवर्जून सांगितले होते.

‘मछली’ वाघिणीवर बीबीसी आणि नॅशनल जिओग्राफिक वाहिनीने फिल्मही केली आहे. पहिला माहितीपट ‘क्वीन ऑफ टायगर’ बीबीसीने तयार केला. त्यानंतर २०१७ मध्ये ‘द वर्ल्डस् मोस्ट फेमस टायगर’ नावाची फिल्म सुप्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार एस. नल्लामुथू यांनी केली. नल्ला यांनी नऊ वर्षे या वाघिणीच्या मागावर राहून तिच्या आयुष्यावर फिल्म तयार केली आहे. ती अर्थातच तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाली.

आपल्या फिल्ममध्ये नल्ला यांनी ‘मछली’चे अत्यंत भावस्पर्शी असे चित्रीकरण केले आहे. खासकरून ती थकल्यानंतर  तिची सुरू असलेली जगण्याची धडपड, तिचे भेदक डोळे मनामध्ये कमालीची कालवाकालव करतात. उमेदीत राणीसारखे जीवन जगणारी ही देखणी वाघीण उतारवयात जगण्यासाठी धडपड करत असल्याचे दृश्य फारच वेदनादायी वाटते. २०१७ मध्ये ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘द वर्ल्डस् मोस्ट फेमस टायगर’ला सर्वोत्कृष्ट पर्यावरणावरील फिल्मचा पुरस्कार प्राप्त झाला. पन्नास मिनिटांची ही फिल्म आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळते. 

ट्रॅव्हल ऑपरेटर्स फॉर टायगर (ToFT) नावाच्या संस्थेने ‘मछली’ला ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डस्’ने सन्मानित केले आहे. खरे तर साधारण २०१० ते २०१८ पर्यंतचा काळ हा व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. या काळात वाघांची संख्या स्थिरावून वाढीस लागली होती. त्यामुळे साहजिकच ‘मछली’ वाघिणीने दिलेल्या ११ पिल्लांमुळे रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांची वंशावळ कमालीची पुढे गेली.

या वाघिणीच्या वंशावळीतील अनेक नर तसेच मादी वाघ पुढच्या काळात प्रसिद्धीच्या झोतात आले. व्याघ्र संवर्धनासाठीच या वाघिणीने काम केले असे नाही, तर रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील हजारो, लाखो कुटुंबांना रोजगार मिळवून देण्यात तिचा सर्वोच्च वाटा आहे. असे म्हटले जाते, की या काळात या व्याघ्र प्रकल्पाने दरवर्षी ५० कोटींहून अधिक रुपयांचा महसूल या वाघिणीच्या माध्यमातून केला.

या वाघिणीचे पोस्टाचे तिकीट काढून केंद्र सरकारने तिचा गौरव केला आहे. ही वाघीण मृत्युमुखी पडली तेव्हा तिचे वय वीस वर्षांचे होते. जंगलात सर्वात जास्त आयुष्य जगलेली वाघीण असा लौकिकही तिला मिळाला; मात्र अखेरच्या काळात तिला जगवण्यासाठी जे प्रयत्न झाले, त्यामुळे साहजिकच तिचे वय वाढले, याबद्दल कोणाचेही दुमत नाही.

प्रसिद्ध असलेल्या वाघांबाबत असणारी ही सहानुभूती जंगलातील अन्य वाघांच्या नशिबी येत नसल्याने, साधारण बाराव्या ते चौदाव्या वर्षीच वाघांना मृत्यूला सामोरे जावे लागते हे सत्य आहे. आता या वाघिणीचे स्मारक बनवावे, यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.

किल्ल्याच्या भिंतीवर ऐटीत बसलेली, आपल्या पाच ते सहा महिन्यांच्या पिल्लांसह रस्त्यावर दिमाखात पहुडलेली किंवा रस्त्यावरून पिल्लांसह चालत जाणाऱ्या ‘मछली’ वाघिणीची काही छायाचित्रे माझ्या मनात कुठेतरी खोलवर रुतल्याचे मला जाणवते.

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com