सुरक्षिततेची नवी 'किल्ली' (रश्‍मी उर्ध्वरेषे)

rashmi urdhwareshe
rashmi urdhwareshe

वाहनांच्या सुरक्षिततेसाठी दोन नवीन नियम उद्यापासून (सोमवार, ता. एक एप्रिल 2019) लागू होणार आहेत. रस्त्यावर नवीन येणाऱ्या वाहनांना अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस) आणि हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) लावणं अनिवार्य असणार आहे. वाहनांची सुरक्षितता वाढवण्यासाठी या दोन्ही यंत्रणांचा उपयोग होणार आहे. एबीएस आणि एचएसआरपी नक्की काय आहेत, त्यांच्यामुळं वाहनांवर काय परिणाम होतात, त्यांचे फायदे-तोटे काय आदींची माहिती.

वाहनांची आणि मुख्य म्हणजे चालकाची सुरक्षितता हा खूप चर्चेचा अन्‌ जिव्हाळ्याचा विषय आहे. तंत्रज्ञानाची वाढती प्रगती आणि त्याच दिशेनं वाहनांत तंत्रज्ञानाचा होणारा वाढता वापर ही काळाची मोठी गरज आहे. त्या दृष्टीनंच वाहनांमध्ये असणाऱ्या सुरक्षाप्रणालींमध्ये सतत सुधारणा होत असते. नवीन नियम लागू होत असतात आणि त्याबद्दल ग्राहकाला नेहमीच उत्सुकता वाटते. मात्र, नवीन येणारे हे नियम नक्की काय बदल घडवतात याबद्दल नेहमीच प्रश्न पडतात. त्यापैकी एक एप्रिलपासून अंमलात येऊ घातलेले दोन नवीन नियम तर सध्या खूपच चर्चेत आहेत. यातला पहिला नियम आहे तो वाहनांवर लावण्यात येणाऱ्या अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिमबाबत (ABS- एबीएस). दुसरा नियम आहे हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटबाबत (HSRP- एचएसआरपी). एक एप्रिलपासून रस्त्यावर येणाऱ्या नवीन वाहनांमध्ये या गोष्टी अनिवार्य असणार आहेत. यातल्या एबीएसमुळं चालकाची सुरक्षा वाढते, तर एचएसआरपीनं वाहनाची! या दोन्ही गोष्टी नक्की आहेत काय, त्यामुळं वाहनांवर काय परिणाम होतात, त्यांचे फायदे-तोटे काय आदींची आपण माहिती बघू या.

एबीएस अन्‌ त्याचा वाहनातला वापर
आपण सर्वच जण कोणतं ना कोणतं वाहन चालवतो आणि ब्रेकचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हेही जाणतो. अगदी सायकल चालवतानासुद्धा बघा, एकाच चाकाला अन्‌ तोही जोरात ब्रेक लावला तर गचका बसतो आणि तोल जातो. चारचाकी वाहन अशा वेळी घसरतं अन्‌ दुचाकी वाहनचालक कोलमडू शकतो. असं का बरं घडतं?

ब्रेक दाबला असताना नेमके काय घडतं?
वाहनाची गती अचानक कमी करायची गरज निर्माण झाली, की चालक ब्रेक दाबतो. त्याबरोबर प्रत्येक चाकाला असलेले ब्रेक कार्यान्वित होऊन चाकांची गती झपाट्यानं कमी होते. रस्त्याशी होणारं प्रत्येक चाकाचं घर्षण, ब्रेक दाबतानाची असणारी वाहनाची गती आणि प्रवेग (ऍक्‍सिलरेशन) इत्यादींचा एकत्र परिणाम होऊन गतिरोधाबरोबरच वाहनाच्या वळणक्षमतेवर (स्टिअरिंग) विपरीत परिणाम होतो. अशा स्थितीत चालकाचं नियंत्रण जातं आणि वाहन असुरक्षित होतं. अशा वेळी पुढं अडथळा दिसत असून, स्टिअरिंगवर ताबा न राहिल्यामुळं अपघात अटळ होऊ शकतो.
चाकावरचा ब्रेक दबाव प्रमाणाबाहेर वाढला, की ते विशिष्ट चाक लॉक होतं. इतर चाकांच्या गतीत थोडाफार फरक असू शकतो, त्यामुळं ती चाकं फिरत राहतात आणि याचमुळं वाहन अचानक अस्थिर होतं.

एबीएस कशी काम करते?
अचानक ब्रेक फोर्स वाढला, की चाकाची गती झपाट्यानं कमी होते. एक क्षण असा येतो, की चाक लॉक होतं. गाडीच्या चार चाकांची स्थिती वेगवेगळी असू शकते, किंबहुना ती तशी वेगळी असतेच. यात ओला रस्ता, रस्त्याचे वेगवेगळे पोत, वळण, इत्यादींमुळं भर पडते. अशा वेळी प्रत्येक चाकाच्या गतीचं क्षणार्धात मोजमाप करून, ब्रेक सिस्टिममध्ये बदल घडवून, चाकं लॉक न होऊ देणं हे एबीएसचं उद्दिष्ट असतं.
चाकं लॉक न होऊ देता अधिक संयत आणि सुसूत्रपणे वाहनाची एकंदरीत गती कमी करणं आणि चालकाचा स्टिअरिंगवरचा ताबा पुन्हा प्रस्थापित करणं हे यातून शक्‍य होते. निसरड्या, ओल्या रस्त्यांवर तर याचा फारच फायदा होतो अन्‌ गाडी पूर्णपणे थांबायला लागणारा वेळही वाचू शकतो. त्यामुळं चालकाचा जीवही प्रसंगी वाचू शकतो.

दुचाकी वाहनांवर एबीएस लावता येते का?
दुचाकी वाहनांवरदेखील अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिमचा वापर प्रभावी ठरतो. मात्र, इतकी वर्षं जास्त किंमतींमुळे त्याचा प्रसार महागड्या अन्‌ मोठ्या वाहनांपुरताच मर्यादित राहिला. तंत्रज्ञानाच्या झपाट्यानं कमी होणाऱ्या किंमती आणि ग्राहकांची जागरुकता या दोन महत्त्वाच्या घटकांमुळं सर्वसामान्य वाहनांतही आता एबीएसचा वापर वाढू लागल्याचं दिसू लागलं आहे. दुचाकी वाहनांत तर दोनपैकी एक- विशेषतः पुढचं चाक लॉक होणं म्हणजे आपत्तीच! एबीएस यंत्रणेमुळं ही आणीबाणीची परिस्थिती आटोक्‍यात येते आणि वाहनावरचा ताबा चालकाच्या हाती राहतो. खालील आकृतीत साधी दुचाकी अन्‌ एबीएस असलेली दुचाकी याच्यातला तुलनात्मक फरक लक्षात येईल.

एबीएसचे महत्त्वाचे घटक
कोणत्याही एबीएस यंत्रणेचे घटक प्रामुख्यानं असे असतात ः
गतिमापक सेन्सर ः प्रत्येक चाकाची गती आणि विशेषतः प्रवेग (ऍक्‍सिलरेशन) ही स्वतंत्रपणे मोजली जाते. वाहनाच्या एकंदरीत गतीपेक्षा प्रत्येक चाकाची गती ही सूक्ष्मपणे वेगवेगळी असू शकते किंबहुना ती वेगळी असतेच.
एबीएस कंट्रोल मोड्युल ः एबीएसचा हा मेंदूच आहे. प्रत्येक चाकाची गती, वाहन गती अन्‌ ऍक्‍सिलरेशन यांचं सूक्ष्म मोजमाप करून योग्य प्रेशर ठरवणं अन्‌ त्याप्रमाणं चाकांना आदेश देणं हे कंट्रोल मोड्युलचं काम!
हायड्रॉलिक पंप आणि व्हॉल्व ः कंट्रोल मोड्युलकडून येणाऱ्या सिग्नलबरहुकूम प्रेशर कमी किंवा जास्त करणं- जेणेकरून चालकाच्या जोरात ब्रेक दाबण्याच्या आदेशाकडं दुर्लक्ष करून, योग्य त्याच प्रमाणात चाकाची गती कमी करणं हे पंप आणि व्हॉल्वचं काम असतं. याद्वारे प्रत्येक चाकावर वेगळं नियंत्रण ठेवता येतं.

एबीएस हे तंत्रज्ञान नवीन आहे का?
एबीएसबाबत संशोधन सन 1929 सुमारास झालं. अर्थात याचा पहिला वापर हा विमानांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आला होता. लवकरच वाहनांवरही या तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी करण्यात आला. बॉश आणि मर्सिडीज या जर्मन कंपन्या त्यात अग्रेसर होत्या. सन 1940 आणि 1950 या दशकांमध्ये प्रायोगिक स्वरूपात; तसंच कायमस्वरूपीही काही वाहनांमध्ये एबीएसचा वापर होऊ लागला. अवजड वाहनांमध्ये देखील त्याचा वापर 1970 च्या सुमारास वॅबको आणि व्होल्वो यांनी ट्रकसाठी सुरू केला. सन 1975-1980 च्या नंतर परदेशी बनावटीच्या अनेक मॉडेल्समध्ये एबीएस दिसू लागले. भारतात मात्र त्याचा सर्वदूर प्रसार आणि स्वीकार व्हायला बराच काळ जावा लागला!

वाहनांना एबीएस लावणं अनिवार्य आहे का?
वर सांगितल्याप्रमाणं वाहनांत एबीएस यायला भारतात बराच काळ जावा लागला. आता मात्र सन 2006पासून आतापर्यंत टप्प्याटप्प्यानं सर्व वाहनप्रकारांमध्ये एबीएसचा समावेश असणं आता अनिवार्य झालं आहे. बस, ट्रक, ट्रेलर, यांना आधी, तर मोटारींना थोडा नंतर असा हा नियम लागू झाला. आता तर सन 2018-19पासून 125 सीसीपेक्षा मोठ्या दुचाकी वाहनांमध्येही एबीएस असणं अनिवार्य आहे. दुचाकी वाहनांची संख्या खूप मोठी असणाऱ्या भारतात सुरक्षेच्या दिशेनं हे मोठंच पाऊल ठरेल, यात शंका नाही.

हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी)
वाहनांच्या नंबरप्लेट हा एक गंमतीचा विषय आहे. चार आकडी नंबर अन्‌ काही अक्षरं यांत आपली सर्जनशीलता वापरून केलेल्या "दादा', "वाघ' इत्यादी आभासी प्लेटसुद्धा सर्रास दिसतात. नंबरप्लेट ही वाहनाची ओळख सांगणारी अशी पाटी असते आणि याचमुळं वाहनमालकाचीसुद्धा ओळख त्यात एकप्रकारे परावर्तित होताना दिसते!

प्रमाणीकरणाची आवश्‍यकता
रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांत, वाहनांचा वापर करून केलेल्या गुन्हेगारीत आणि इतर अनेक कारणांनी वाहनाची अचूक ओळख पटणं गरजेचं ठरतं. मात्र, अशा वेळी अशा "विविधतेनं नटलेल्या' प्लेट्‌स ही एक मोठीच डोकेदुखी होऊन बसते. याशिवाय खोट्या नंबरप्लेट सर्रास उपलब्ध असणे ही बाबही गुन्हेगारीला चालना देणारी ठरते. याचा विचार करून परिवाहन मंत्रालयानं नुकतीच हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) ही योजना अंमलात आणली आहे.

एचएसआरपीमध्ये वेगळेपणा काय?
मोटार वाहन कायद्याच्या तरतुदीनुसार, प्रत्येक वाहनाचा वेगळा रजिस्ट्रेशन नंबर असणं आवश्‍यक आहे. वाहनाचं सर्वसाधारण आयुष्यमान 15 वर्षं धरलं, तर ती रजिस्ट्रेशन प्लेटदेखील तितकीच वर्षं टिकणं अपेक्षित आहे. प्लेटची सहजासहजी नक्कल करता येऊ नये, त्याचं वितरण फक्त वैध मार्गानंच व्हावं, यासाठी नवीन डिझाईन्स विकसित करण्यात आली आहेत.
या नवीन प्रकारच्या प्लेटमधली ठळक वैशिष्ट्यं अशी असतील ः

एचएसआरपीचे फायदे
- परावर्तित पृष्ठाभागामुळं कमी उजेडातही प्लेटचा नंबर वाचता येऊ शकतो.
- होलोग्राम हा प्लेटचा भागच असल्यामुळं तो वेगळा काढता येणं आणि त्याचमुळं नकली नंबरप्लेट तयार करणं अतिशय अवघड होईल.
- प्रत्येक प्लेटला त्याचा स्वतःचा असा एक नंबर असतो. बारीक अक्षरांत हा नंबर प्लेटवर ठराविक जागी कायमस्वरूपी लिहिलेला असतो. या नंबरमुळं त्या प्लेटची ओळख ठरते.
- वाहनात पुढं एक आणि मागं एक अशा दोन नंबरप्लेट लावणं अनिवार्य असतं. या दोन्ही प्लेटवरचा रजिस्ट्रेशन नंबर असलेली एक तिसरी प्लेट आता वाहनाच्या आत स्टिकरसारखी बसवावी लागेल. हे स्टिकर कायमस्वरूपी असल्यानं पुढची किंवा मागची नंबरप्लेट खराब झाल्यास किंवा जाणीवपूर्वक बदल केल्यास गाडीच्या आतली प्लेट अबाधित राहील.
- नंबरप्लेट वाहनाला लावण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या स्क्रूचा वापर करावा लागेल. या स्क्रूची काढ-घाल केल्यास त्याचं मूळ स्वरूप नष्ट होईल. यामुळं प्लेटचा गैरवापर करण्याची शक्‍यता कमी होईल.
- प्लेटवर असणारे नंबर आणि अक्षरं यांचं आकारमान, गुणोत्तर आणि रंग हे सर्व आता प्रमाणित करण्यात आलं आहे.

नवीन नियम कधीपासून लागू होणार?
ता. 1 एप्रिल 2019 पासून या नवीन नियमाची अंमलबजावणी होईल. याचा अर्थ, नवीन येणाऱ्या सर्व वाहनांना या नवीन, सुधारित नंबरप्लेट वाहननिर्माते किंवा त्यांचे विक्रेते/ प्रतिनिधी यांच्यामार्फत दिली जाईल. यात "एप्रिल फूल' काही नाही बरं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com