esakal | हिटलरला ‘श्रद्धांजली’(?)
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi-Amale

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ वाढतो आहे अशी एक थाप मध्यंतरी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ठोकली. आता उत्तर प्रदेश सरकारनं त्याबाबतच्या कायद्याचा एक अध्यादेश मंजूर केला आहे. असाच एक कायदा केला होता हिटलरनं. तो एका महा असत्यावर आधारलेला होता. याच षड्‌यंत्र सिद्धांतावर…

हिटलरला ‘श्रद्धांजली’(?)

sakal_logo
By
रवि आमले ravi.amale@esakal.com

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ वाढतो आहे अशी एक थाप मध्यंतरी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ठोकली. आता उत्तर प्रदेश सरकारनं त्याबाबतच्या कायद्याचा एक अध्यादेश मंजूर केला आहे. असाच एक कायदा केला होता हिटलरनं. तो एका महा असत्यावर आधारलेला होता. याच षड्‌यंत्र सिद्धांतावर…

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘जर्मनी-१९३३’ हे आपलं गंतव्यस्थान असेल, तर उत्तर प्रदेश सरकारनं मंजूर केलेला लव्ह जिहाद कायद्याचा अध्यादेश हे त्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल म्हणता येईल. ही १९३३ मधली जर्मनी होती, अॅडॉल्फ हिटलरची. हिटलर म्हणजे तोच - ज्याचं नाव काढताच येथील अनेक सनातन आर्य धर्माभिमान्यांचे हात मनातल्या मनात कानाच्या पाळीकडं जातात तो. त्यांना हिटलर असा प्रातःस्मरणीय वाटतो, कारण तो आर्य वंशश्रेष्ठत्वाचा पुरस्कर्ता होता. शिवाय तो ब्रिटिशांविरोधात होता. त्यामुळे अनेकांना तो आपला वाटतो. पण त्यांना याची जाणीव नसते, की भारतीयांना तो वांशिकदृष्ट्या हीन मानत होता. आपल्याला आपल्या आर्यवंशाचा मोठा अभिमान. हिटलर मात्र सांगत होता, की भारतीयांच्या रक्तांत भेसळ आहे. बरं तो ब्रिटिशविरोधक म्हणून आपला मानावा, तर तो म्हणत होता, की ‘दुसऱ्या कुठल्या देशाच्या वर्चस्वाखाली जाण्यापेक्षा भारतावर ब्रिटनचं वर्चस्व असावं, असं एक जर्मन म्हणून मला वाटतं.’ तरीही अनेकांना त्याच्याबद्दल ममत्व आहे. किंबहुना भारतात हिटलरशाहीच पाहिजे, असं येता जाता आपण आळवत असतो. त्यादृष्टीनं आपण अविरत प्रयत्नशीलही आहोत. त्यात राज्यघटनेसारखे काही अडथळे आहेत. पण तेही यथावकाश दूर करता येतील. मात्र त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच नव्हे, तर हिटलरला आपण वाहिलेली श्रद्धांजली म्हणूनही आपणांस ‘लव्ह जिहाद’विरोधी अर्थात ‘उत्तर प्रदेश विधीविरुद्ध धर्मसंपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेशा’कडं पाहता येईल. कारण या अध्यादेशाद्वारे हिटलरच्या न्यूरेम्बर्ग कायद्याचाच कित्ता आपण गिरवतो आहोत.

हा कायदा आला १९३५ मध्ये. हिटलर हा मोठा इव्हेन्ट-प्रिय. त्याच्या ‘राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्षा’चे - एनएसडीएपी अर्थात नाझी पक्षाचे - मोठमोठे वार्षिक मेळावे होत. त्यातलाच एक मेळावा झाला होता न्यूरेम्बर्गमध्ये. त्यात दोन कायद्यांची घोषणा करण्यात आली. एक - ‘राईश सिटिझनशिप लॉ’ आणि दुसरा - ‘लॉ फॉर प्रोटेक्शन ऑफ जर्मन ब्लड अँड जर्मन ऑनर’. पहिला कायदा नागरिकत्वाबाबतचा आणि दुसरा जर्मनांच्यातील वंशसंकर रोखण्यासाठीचा. त्यानं ज्यू आणि जर्मन यांच्यातल्या विवाह बेकायदा ठरवला. त्यांच्यातल्या विवाहबाह्य संबंधांवर बंदी घातली. एवढंच काय, तर ज्यूंना जर्मन मोलकरीण ठेवण्यासही बंदी घालण्यात आली. का, तर न जाणो एखादा ज्यू त्या जर्मन आर्यबालेचा गैरफायदा घ्यायचा. हिटलरला हे असलं काही अजिबात अमान्य होतं. त्याच्यादृष्टीनं ज्यू म्हणजे सैतानी प्रवृत्तीचे, क्रूर, धूर्त, लबाड, बलात्कारी, अस्वच्छ. हे ज्यू म्हणजे पुढं ज्यांनी इस्रायल हे राष्ट्र स्थापन केलं आणि त्या राष्ट्राबद्दल, त्यांचं सक्तीचं लष्करी प्रशिक्षण, त्यांची मोसाद यांबद्दल आपल्या मनात प्रेम असतं, तेच. हे लोक जर्मनांच्या रक्तात भेसळ करायला टपूनच बसले आहेत, त्यांना जर्मनांचा वंशविच्छेद करायचा आहे, असं हिटलरचं म्हणणं. हा वंशविच्छेद ते कसा करणार, तर त्यांची लोकसंख्या वाढवून, जर्मन मुलींना जाळ्यात ओढून. ‘माईन काम्फ’मध्ये त्यानं लिहून ठेवलं होतं, की ‘‘हे काळ्या केसांचे ज्यू तरूण साध्याभोळ्या जर्मन मुलींवर तासन् तास नजर ठेवून बसलेले असतात. सैतानासारखं निरखीत असतात त्यांना. त्यांच्यावर पाळत ठेवतात.’ कशासाठी, तर  ‘त्यांना आपल्या आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं रक्त नासवण्यासाठी, त्यांना त्यांच्या स्वतःच्या माणसांच्या काळजापासून तोडण्यासाठी…’’ थोडक्यात हा ज्यूंचा लव्ह जिहाद. त्या विरोधातला हिटलरचा अपप्रचार अनेक वर्षं सुरू होता. सत्तेवर येताच त्यानं त्याबाबत सर्वंकष कायदेच केले. 

असे कायदे करणारे, वंशसंकराची, रक्तभेसळीची काळजी करणारे फक्त नाझीच होते असं नव्हे. दक्षिण आफ्रिकेत पूर्वी तसे कायदे होते. अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये काळ्या-गोऱ्यांच्या विवाहावर बंदी होती. रिचर्ड लव्हिंग आणि मिल्ड्रेड जेटर या दाम्पत्यानं व्हर्जिनियातल्या अशा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. १९६७ मध्ये त्या न्यायालयानं अमेरिकेतले सगळे असे कायदे रद्दबातल ठरवले. ते सभ्य समाजास साजेसंच झालं. तसं झालं नसतं, तर लव्हिंग या गोऱ्या युवकाला आणि त्याच्या काळ्या पत्नीला व्हर्जिनियाच्या त्या लव्ह जिहाद-सम कायद्यानुसार किमान पाच वर्षं खडी फोडायला जावं लागलं असतं. आपल्या ‘लव्ह जिहाद’ विरोधी अध्यादेशात, विवाहाकरीता धर्मपरिवर्तन केल्यास किमान पाच वर्षं तुरुंगवासासह १५ हजारांचा दंड अशी सजा मुक्रर करण्यात आली आहे. पण दोन्हींत मुद्दा तोच - वंश वा वर्ण वा धर्म वा रक्त संकराच्या भयाचा.

आपल्याकडील ‘लव्ह जिहाद’ संकल्पनेचा उदयही मुस्लिमांबाबतचं भय आणि द्वेष यांतून झालेला आहे. ही संकल्पना प्रथम केरळमधून पुढं आली आणि ती आणली केरळ कॅथलिक बिशप कौन्सिलनं, हे विशेष. तर अन्य सर्वच धर्मीयांत मुस्लिमांबाबत जो भयगंड आहे त्याला कारणीभूत अर्थातच मुस्लिमांचं धर्मांध, धर्मवेडं राजकारणही कारणीभूत आहे. काही मुस्लिमांनी ‘इस्लाम खतरे में’ची हाक द्यावी, सारं जग इस्लाम करण्याची स्वप्नं पाहावीत, त्यांच्यातल्या दहशतवादी धर्मांधांनी बॉम्ब फोडावेत यातून प्रेम निर्माण होणं शक्य नसतं, आणि त्यातून जे उत्पन्न होतं, ते अन्य धर्मीयांतील कट्टरतावादाला पोषकच ठरतं. सामान्य मुस्लिमांनी हे खास करून ध्यानात घ्यायला हवं. मात्र याला दुसराही एक कोन आहे. हिंदू-मुस्लिमांच्या धार्मिक राजकारणाचं वैशिष्ट्य हे की ते एकमेकांच्या आधारे फोफावत असतं. याला क्रिया-प्रतिक्रियावाद म्हणा वा अन्य काही. ते दोन्ही एकमेकांना पूरकच असतं. ‘लव्ह जिहाद’ हा याच एकमेकांस पोषक राजकारणाचा भाग आहे. 

या संकल्पनेचा उगम आहे, या देशात मुस्लिमांची संख्या वाढते आहे या लोकप्रिय समजुतीतून. ‘व्हॉट्सअॅप’ विद्यापीठाच्या स्नातकांची त्यावर फारच श्रद्धा असते. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. मुस्लिमांचा लोकसंख्या वृद्धिदर घसरतो आहे. आणि याच वेगानं ती वाढत राहिली, तरी २०६१ मध्ये ती २९.२४ कोटींवर जाईल आणि तेव्हा हिंदू असतील १७३.०३ टक्के. परंतु अपप्रचार असा सुरू आहे, की संख्याबळ वाढविण्यासाठी मुस्लिमांनी हिंदू मुलींना पटवून त्यांचं धर्मांतर करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ‘लव्ह जिहाद’ तो हाच. पण ‘तद्दन षड्‌यंत्र सिद्धांत’ याहून त्यास अर्थ नाही. त्याला आकडेवारीचा आधार नाही. गेल्या फेब्रुवारीत खुद्द केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी संसदेत तसं सांगितलं होतं. कोणत्याही केंद्रीय यंत्रणेने अशी एकही घटना नोंदविलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही ‘लव्ह जिहाद’ वाढतोच आहे असं भाजपचे नेतेगण म्हणतच आहेत. मध्यंतरी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे लाडके राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या या म्हणण्याला कोणता आधार होता ? नव्हताच. खुद्द महिला आयोगानेच ते नंतर स्पष्ट केलं. पण तरीही शर्माबाईंनी ते ठोकून दिलं होतं. या शर्माबाई आणि भाजपचे अनेक नेतेगण ‘लव्ह जिहाद’चा षड्‌यंत्र सिद्धांत पुढे का रेटत आहेत, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तशात आता तर पश्चिम बंगालची निवडणूक आहे. तेव्हा ‘लव्ह जिहाद’हा राष्ट्राच्या जीवन-मरणाचा प्रश्न न बनल्यास नवलच. 

उत्तर प्रदेश सरकारचा अध्यादेश न्यायालयात टिकणार नाही असं जाणकार म्हणतात. पण त्याने काहीच फरक पडत नाही. ‘लव्ह जिहाद’ विरोधातला हा हिंदूंचा जिहाद आहे. तो असा ना तसा सुरुच ठेवला जाणार आहे. तेव्हा यात खरा मुद्दा आहे, भारताचा ‘जर्मनी-३३’ कडं प्रवास सुरू आहे की काय हा ?  ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्‌यंत्र सिद्धांतांच्या आडून खेळलं जाणारं विद्वेषाचं हिटलरी राजकारण तर प्रवासाची दिशा तीच असल्याचं सांगत आहे. पण सर्वांनीच इतिहासाचा हाही धडा ध्यानी घ्यायला हवा, की न्यूरेम्बर्ग कायदे जसे असतात, तशाच न्यूरेम्बर्ग ट्रायल्सही असतात. दुसऱ्या महायुद्धानंतर नाझी गुन्हेगारांवरचे खटले चालले होते ते न्यूरेम्बर्गमध्येच.

Edited By - Prashant Patil

loading image