पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'मौनाचे प्रयोग'

Narendra Modi
Narendra Modi

'बहोत हुआ नारी पर वार, अब की बार मोदी सरकार' अशी घोषणा देत 2014मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचं सरकार आलं. दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर भाजपनं त्यावेळी दिल्लीतील आणि केंद्रातील काँग्रेस सरकारला अक्षरशः धारेवर धरलं होतं. त्या दुदैवी घटनेचा राजकीय फायदा भाजपला झाला. आता हैदराबाद, उन्नाव, त्रिपुरा अशा एका पाठोपाठ एक घटना घडत आहे. पण, छोट्या छोट्या विषयांवर ट्विट करणारे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'मौन की बात' खटकणारं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा सत्तेची सूत्रं हाती घेतली आहेत. त्याच वेळी देशभरात महिला अत्याचाराच्या घटना समोर येताना दिसत आहेत. पण, वर्ल्ड कप दरम्यान, अंगठ्याला दुखापत झालेल्या शिखर धवनला ट्विटरवरून धीर देणाऱ्या पंतप्रधान मोदींकडे महिलांच्या भळभळत्या जखमेवर मलम लावण्यासाठी चार शब्दही नाहीत. 

उत्तर प्रदेशात गुन्हेगारीच्या आणि महिला अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठला आहे. राज्यात पंतप्रधान मोदींच्या भाजपची सत्ता आहे. उन्नाव प्रकरणातील काही आरोपींचे भाजपशी संबंध असल्याचं समोर आलंय. या सगळ्यावर पंतप्रधान मोदी एक शब्दही काढायला तयार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटवरून अनेकदा त्यांच्या चाहत्यांनी स्तुती सुमनं उधळली आहेत. चेन्नईतील समुद्र किनाऱ्याची स्वच्छता असेल किंवा अगदी 'मन की बात'मध्ये कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातील पर्यावरण सवंर्धनाच्या कामाची घेतलेली दखल असेल. पंतप्रधान मोदी 'सगळं कसं छान सांगतात', अशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळत असतात. पण, देशभरात नव्हे तर, जगभरात महिला अत्याचाराच्या घटनांवरून वादळ उठलेलं असताना, पंतप्रधान मोदींच मौन कोड्यात टाकणारं आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणावेळी भाजपच्या महिला नेत्या प्रचंड आक्रमक होत्या. सध्या त्यांनाही या अघोषित मौनावर आश्चर्य वाटत असेल त्यामुळं त्याही याविषयावर स्पष्ट बोलताना दिसत नाहीत.

दिल्लीतील महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी अनेकदा दिल्लीचा उल्लेख 'बलात्कारांची राजधानी' असा केला होता. तेच मोदी एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांवर गप्प आहेत. 'या घटना दुदैवी आहेत. असं घडायला नको होतं,' अशी प्रतिक्रिया देण्याइतकी संवेदनशीलताही त्यांच्यात नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती एक वलय आहे. तरुण वर्ग त्यांचा चाहता आहे. महिलामध्येही ते तेवढेच लोकप्रिय आहेत. त्या तरुण वर्गाचे कान किमान एखाद्या भाषणातून, निवेदानातून किंवा ट्विटमधून धरण्याचं काम ते करू शकत नाहीत, याचचं कोडं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उजळवल्याचा प्रचार लोकसभा निवडणुकीत करण्यात येत होता. त्यांचे चाहतेही त्यात पुढं होते. चीन, पाकिस्तानसारख्या देशांना सडेतोड उत्तर देणारे, सर्जिकल स्ट्राईकसारखा, कलम 370 हटविण्यासारखा धाडसी निर्णय घेणारे पंतप्रधान म्हणून त्यांचा गौरव केला जातो. पण, त्यांचं हे धाडस देशांतर्गत महिला सुरक्षेच्या विषयात कुठच दिसत नाही, याचं आश्चर्य वाटतं.  हैदराबादमधील घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरन्यायाधीश शरद बोबडे, शरद पवार या सगळ्यांनी आपली परखड मतं मांडली आहेत. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादी कुठेच दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडचणीच्या प्रश्नांवर कायमच सौयीस्कर मौन पाळले आहे. अगदी इकलाख या मुस्लिम तरुणाला दगडानं ठेचून मारल्यानंतरही आणि तशाच झुंडशाहीच्या अनेक घटना देशभरात घडल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्पच होते. त्यांच्या या चुप्पीवर विरोधकांनी टीकाही केली. पण, त्याकडंही त्यांनी दुर्लक्षच केलं.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गप्प राहण्यातून चुकीचा संदेश जातो, हे कोणीच नाकारणार नाही. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी लोकसभेत निर्मला सितारामन यांचा उल्लेख 'निर्बला सितारामन' असा केला होता. त्यावरून भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी महिलांचा सन्मान आणि बरचं काही, सांगत लोकसभेत भाषणबाजी केली. आता देशभरात अक्षरशः जळत असलेल्या 'निर्बला' विषयी भाष्य करायला पूनम महाजन पुढं होताना दिसत नाहीत. उत्तर प्रदेशातील स्वामी चिन्मयानंद यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवर त्या गप्प बसतात. बलात्काराच्या आरोपांनंतर चिन्मयानंद रुग्णालयात दाखल असून, 'आराम' करत आहेत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी कदाचित कार्यक्रमात खूप व्यग्र असतील. पण, जर, शिखर धवनच्या अंगठ्याची जखम तुम्हाला दिसत असेल तर, महिला अत्याचारांचा थोडा तरी विचार करावा, एवढीच माफक अपेक्षा आहे. यासाठी कायदेशीर पावलं उचलणं, कठोर कायदे करणं हे सगळं अजूनही खूपच दूर आहे. किमान धीर तरी द्यावा. पण, जणू काही या घटनांशी आपला काही संबंधच नाही, असं वर्तन खूपच निराशाजनक आहे. इटलीचा निरो राजा होता. त्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, 'रोम जळत होतं तेव्हा निरो फिडेल वाजवत होता', तशीच काहींशी अवस्था आपल्या भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची म्हणावी लागेल. 

(ब्लॉगमधील मते ही लेखकाची स्वतःची मते आहेत. त्याच्याशी सकाळ माध्यम समूह सहमत असेलच असे नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com