रसिकत्वाची ‘समृद्धी’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

कवितेतून उलगडला रसिकत्वाचा धागा

लाभल्या खडकातही मी - पिंपळाचे झाड झालो
रोवुनी हे पाय खाली- फत्तरां फोडून आलो
दाबणारे कैक होते - दगड धोंडे नित्य माथी
मी काही शोधून त्यातील - गगन वेडा वृक्ष झालो

कवितेतून उलगडला रसिकत्वाचा धागा

लाभल्या खडकातही मी - पिंपळाचे झाड झालो
रोवुनी हे पाय खाली- फत्तरां फोडून आलो
दाबणारे कैक होते - दगड धोंडे नित्य माथी
मी काही शोधून त्यातील - गगन वेडा वृक्ष झालो

या कवितेच्या चार ओळी मी सादर केल्या. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. रसिकांचा एवढा मोठा प्रतिसाद वा दाद मिळेल, याची मला यत्किंचितही कल्पना नव्हती. श्रोत्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे माझं अंग शहारून आलं. निमित्त होतं द्वारकानाथ लेले यांनी आयोजित केलेल्या ‘काव्यशिल्प’ या संस्थेच्या कविसंमेलनाचं!’ पुण्यातल्या टिळक रस्त्यावरच्या महाराष्ट्र साहित्य परिषद इथं हा कार्यक्रम झाला होता. तेव्हापासून माझ्या मनातल्यासुद्धा रसिकत्वाला नवनवीन फुलोरे फुटायला लागले. मिळालेल्या प्रोत्साहनाची केवढी ही किमया? या घटनेला किती तरी वर्षं होऊन गेली; पण तेव्हापासून रसिकत्वाची जी समृद्धी सुरू झाली, ती आजतागायत. थंडीचे दिवस सुरू होताच साहित्यिक- सांस्कृतिक हवा वाहू लागते. सवाई गंधर्व संगीत महोत्सव कार्यक्रमांना मी जाऊ लागलो. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातल्या चित्रपटांना मी जातो. साहित्य संमेलन - कविसंमेलनांना हजेरी लावू लागलो. हे सांस्कृतिक कार्यक्रम माझ्यातलं रसिकत्व समृद्ध करतात. कविसंमेलनात आलेल्या एका विरळा अनुभवानं काव्यलेखनाचा हा एक निराळाच उपक्रम माझ्या आयुष्यात सुरू झाला. दिवाळी अंकांना कविता पाठवणं, त्या छापून येण्याची दाद मिळणं, पसंतीची पावती मिळणं, हीच माझी प्रेरणा झाली आहे. खरोखर या काव्यलेखनाच्या छंदानं माझ्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे आणि नैराश्‍यवादी विचारांची भैरवीच झाली आहे. ही रसिकत्वाची समृद्धी कशी वाढू लागली पहा. मी काही तबलानवाज नाही. परंतु, तबला शिकण्याच्या ओढीने मी एका तबला क्‍लासला जाऊ लागलो. सोळा मात्रांचा त्रिताल, सोळा मात्रांचा ताल; तसंच झपताल, एकताल, केरवा, दादरा, झुमरा, रूपक हे तालज्ञान मला झालं. कारणवशात मी तबलजी होऊ शकलो नाही. तरी पण कार्यक्रमांतून संगीत ऐकताना या तबल्यातले बोल-ताल समजू शकल्यामुळे संगीताचा आनंद आणि आस्वाद घेऊ शकतो. त्यामुळे आपण तबल्याच्या क्‍लासला जाऊन वेळ-पैसे वाया घालवले, असं मला मुळीच वाटत नाही. उलट मी नंतर हार्मोनियमच्या क्‍लासला जाऊन तीन परीक्षाही उत्तीर्ण झालो. भारत गायन समाज-  गांधर्व महाविद्यालय इथं हार्मोनिअमच्या क्‍लासला जाऊन मला राग-ज्ञानही थोड्या फार प्रामाणात प्राप्त झालं. यामुळे मी शास्त्रीय संगीतांच्या कार्यक्रमांना जाऊन संगीताचा आस्वाद आणि आनंद घेऊ शकतो. स्वरज्ञानही मला वाटतं- दैवी देणगी आहे. ती उपजतच असावी लागते; पण तिलाही रियाजाची गरज असतेच. या जन्मी नाही जमलं, ठीक आहे- पुढच्या जन्मी तरी मी नक्कीच गायक होईन, गाऊ शकेन, वाजवू शकेन, असं मला आता वाटू लागलं आहे. रसिकत्वाची समृद्धी ती हीच असं मला वाटतं. कविता लिहिण्याचा एक छंद मला जडला आणि या छंदानं माझ्या जीवनात आनंद निर्माण केला, रसिकत्व वृद्धिंगत केलं हे खरं. प्रत्येक साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद मिळतो. ‘तानसेन’ नव्हे, तर किमान ‘कानसेन’ झाल्याचं समाधान लाभतं हे खरं. हे रसिकत्व मला लाभलं नसतं, तर माझं आयुष्य अगदी अळणी होऊन गेलं असतं हे नक्की! श्रोता आहे- म्हणून वक्ता आहे. ‘श्रोत्याविण वक्ता नोहे’ तसे रसिक आहेत म्हणून गाणारे कलाकार आहेत. गायक-गायिका आहेत म्हणून आपलं रसिकत्व समृद्ध करणं हे प्रत्येक रसिकाचं कर्तव्य आहे, असं मला वाटतं. कारण त्यातून आनंद मिळतो आणि जीवन आनंदी होते. परतत्त्वाला स्पर्श करून पाहणारं असं हे रसिकत्व समृद्ध करण्याचा आपण सर्व जण प्रयत्न करूया!
- दत्तात्रेय जोशी, पुणे.

---------------------------------------------------------------------------
प्रेरणेनं जागली ‘साहित्यचेतना’

शा   लेय जीवनापासूनच मला मराठी साहित्यविषयी गोडी होती. शाळेच्या वाचनालयात मराठीतील नामांकित लेखकांचे कथासंग्रह, कादंबऱ्या वाचावयास मिळाल्यामुळे मराठी साहित्याविषयीची आवड वृद्धिंगत झाली. पुढे स. प. महाविद्यालयात शिकत असताना डॉ. अनुराधा पोतदार, डॉ. चंद्रशेखर बर्वे, प्रा. कविता नरवणे सारखे नामांकित प्राध्यापक प्रसिद्ध साहित्यिकांना कॉलेजमध्ये आमंत्रित करून विद्यार्थ्यांना साहित्य-मेजवानी पुरवत. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी लिहू लागलो. मात्र, महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर मी हळूहळू कथा-कविता लिहिण्यापासून दूर गेलो. पुढे महानुभाव वाङ्‌मयाकडे आकर्षित झालो. महानुभाव साहित्याचा आनंद मिळाला. मात्र, त्यावर मी स्वतंत्रपणे काही लिहू शकलो नाही. पुढे कार्यबाहुल्यामुळे आणि अन्य कारणांमुळे सुमारे वीस-पंचवीस वर्षं साहित्यापासून दूरच राहिलो. मात्र, या कालखंडात मी उत्तमोत्तम पुस्तके वाचली. परंतु, हातून स्वतंत्र असं लेखन जवळजवळ घडलंच नाही.

एके दिवशी कामानिमित्त प्रसिद्ध लेखक राजन खान माझ्या एका स्नेह्यासोबत घरी आले. त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांनी मला पुन्हा साहित्य लिहिण्यास प्रारंभ करावा असे सुचविले. मलासुद्धा आपण लिहावं, असं वाटू लागलं. माझ्या घरून निघताना राजन खान यांनी मला आवर्जून लिहिण्यास सांगितलं. काही अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं. राजन खान यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे मी कथा लिहू लागलो. दरम्यान, विद्या बाळ यांच्या ‘मिळून साऱ्या जणी’ फेब्रुवारी २०११ मध्ये एक कथा स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत माझ्या ‘सार्थक’ या कथेला सर्वोत्कृष्ट कथेचं पहिलं पारितोषिक मिळालं. प्रसिद्ध साहित्यिक आणि अभिनेते गिरीश कार्नाड यांच्या हस्ते पारितोषिक मिळालं. मान्यवरांच्या कौतुकानं आणि प्रोत्साहनामुळे मी जोमानं लिहू लागलो. २०१२ मध्ये ‘कालनिर्णय’ने दिवाळी अंकासाठी कथास्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सुमारे ७०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात माझ्या गूढकथेला दुसरं पारितोषिक मिळालं. समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, प्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्रगडकर आणि कालनिर्णयचे जयराज साळगावकर यांनी माझं कौतुक केलं आणि या पुढे अशाच दर्जेदार कथा लिहिण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी सातत्यानं कथा लिहू लागलो. विविध दिवाळी अंकामध्ये माझ्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. कथा वाचकांच्या पसंतीला पडू लागल्या. कथा आवडल्याचे फोन दर वर्षी येतात. ‘अकल्पित विश्‍व’ हा माझा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध साहित्यिक प्रा. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रसिद्ध झाला आणि सगळ्या प्रती हातोहात खपल्या गेल्या. आजपर्यंत माझ्या पन्नासहून अधिक कथा व लेख प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय तीन कादंबऱ्या लिहून झाल्या आहेत.

राजन खान यांच्याशी अनपेक्षित घडलेल्या भेटीमुळे माझ्यातली विझत चाललेली ‘साहित्यज्योत’ पुन्हा प्रज्वलित झाली आणि मला रसिकत्वाची समृद्धीच अनुभवायला मिळाली.
- नंदकुमार येवले, धनकवडी, पुणे.

---------------------------------------------------------------------------
बोल उमटले अंतरी

रसिक म्हणजे लौकिकार्थानं रस घेणारा. निसर्गानंही आधी पान, मग फूल, फळ आणि शेवटी रस अशी व्यवस्था करून ठेवली आहे. कुतूहल असणारा माणूस आपल्या जिज्ञासा शमवताना कधी रसिक बनतो, हे त्याचं त्यालाच कळत नाही आणि ही रसिकता त्याचं जीवन रसरशीत करते.

कलाकारास केवळ अवगत कलेच्या सादरीकरणाचं बंधन असतं; पण रसिक मात्र मुक्तपणे अनेक क्षेत्रात दर्दी म्हणून वावरत असतो. मोठ्याहून मोठ्या कलाकाराची ब्रह्मानंदी टाळी लागते ती रसिकाच्या हाताच्या टाळीनं, ‘क्‍या बात है’ हे तीन शब्द कलाकाराच्या कलेचं चीज करतात.

माझ्या रसिक होण्याचा मोठा श्रेय आकाशवाणीस जातो. बालपणी घरात सतत सुरू असणाऱ्या रेडिओनंच माझे कान तयार केले आणि पुण्यासारख्या  ठिकाणी विविध सांगीतिक मेजवानी आणि व्याख्यानमालांचा धांडोळा घेत पुढचा जीवनप्रवास कलेकलेनं सुरू राहिला.

मागं स्वरभास्कर भीमसेन जोशी यांच्या देहावसानानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ ‘अर्घ्य’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
भारतभरातल्या श्रेष्ठ कलाकारांचा कुंभ यानिमित्त भरणार होता आणि माझ्यासारख्या रसिकासाठी ही पर्वणीच होती. ‘अर्घ्य’च्या कार्यक्रमपत्रिकेत पंडित बिरजू महाराज यांचं गायन होणार, असा उल्लेख होता. पंडित बिरजू महाराज यांचं गायन म्हणजे दुर्मिळ आणि दुर्लभच. नृत्यकलेत आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेले पंडित बिरजू महाराज गातात, हे बऱ्याच लोकांना माहीतही नव्हतं.

त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. गायन रंगत होतं. लागोपाठच्या टाळ्या थंड वातावरणात ऊब आणत होत्या. त्यांनी त्यांच्या गायन आणि खुमासदार निवेदनानं रमणबाग प्रशालेचा मैदान भारून टाकलं. त्यांना तबल्यावर विजय घाटे यांची साथ संगत होती. त्या दिवशीच्या तबल्याचा प्रत्येक बोल काळजाला भिडत होता. आम्हा रसिकांवर पंडित बिरजू महाराजांच्या गायनाचं गारूड तर होतंच; पण त्यातही विजय घाटे यांच्या तबल्याचे बोल कानावाटे श्रोत्यांच्या हृदयापर्यंत विरघळून पोचत होते. मी पार भारावून गेलो. त्यांच्या तबल्यानं मला इतकं प्रभावित केलं, की आपणही तबला शिकायचा, या प्रेरणेनं मी मैफलीचा निरोप घेतला आणि तरंगतच घरी पोचलो. दुसऱ्याच दिवशी आनंद गोडसे यांच्याकडच्या वर्गात तबलावादनाचा ‘ओनामा’ केला आणि डग्ग्यावर थाप मारीत  ‘ति  र  की ट’  या आद्य बोलानं माझ्या तबला शिकवणीस प्रारंभ झाला. काही काळानंतर मी घरी सराव वाढवला. यासाठी तबला विकतही आणला आणि रियाज वाढवत नेऊ लागलो.

एरवी तबला ऐकताना त्यावर तबलानवाजांची लीलया फिरणारी बोटं बघून तबलावादन सहज असावं असं वाटत असे; पण स्वतः सराव करताना त्यामागचे श्रम कळायला लागले. पण सरावाला लागणाऱ्या वेळेमुळे पुढे माझा व्यवसायावर परिणाम व्हायला लागला आणि यामुळे सरावात चालढकल होऊ लागली. मी या दोन्हींत तारतम्य राखण्याचा प्रयत्न करत होतो; पण ते साध्य होत नव्हतं. शेवटी अकरा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर मला तबला शिकण्याचा मोह सोडून द्यावा लागला. पुढे मग रसिकत्वाची जवाबदारी स्वीकारत पुढे वसंत व्याख्यानमालेपासून वसंतोत्सव किंवा सवाई गंधर्वपर्यंतच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून माझ्यातल्या रसिकास प्रगल्भ करू लागलो.

रसिक हा उत्तम जाणकार असतोच असं नाही; पण त्यानी केलेली कदर, त्यानं दिलेली दाद कलाकारास उभारी देते, त्याच्या कलेस बहर आणते. कलेचा आस्वाद घेणाऱ्या अशा मंडळींमुळे कलाकारही अभिजात प्रयोगाची मांडणी करतो, नवे आविष्कार समोर आणतो. जेणेकरून रसिकोत्तम लोकांची फळी निर्माण होते आणि रसिकत्व समृद्ध होते.
एक शायर म्हणतो,
हजारों साल नरगिस अपनी बेनुरी पे रोती रही,
सदियों बाद होता हैं चमन में कोई दीदावार पैदा.

- सत्येंद्र राठी, पुणे

---------------------------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: readers participation

फोटो गॅलरी