रिलेशनशिप व्यवस्थापनाची गरज

management
management

  सहजच, गोष्ट निघाली म्हणून गोष्टीत गोष्ट, आपण गीता वाचतो. गीतेचे अध्याय, श्‍लोक, तीन व्यक्ती आणि एक भगवान. कृष्णाने अर्जुनाला त्याचे प्रश्न सुटावे आणि तो युद्धासाठी उद्युक्त व्हावा म्हणून दिलेली उत्तरे. अर्जुनाची त्यात भूमिका होती ती पेचात पडलेल्या मित्राची. त्याला मार्ग दाखवत होता कृष्ण. पण कृष्णाने फक्त अर्जुनालाच गीता सांगितली असे नाही, ती त्यावेळी इतरही लोक जाणून घेत असावे. एक म्हणजे संजय जो त्याच्या दृष्टीकौशल्याने युद्धभूमीचे वर्णन धृतराष्ट्राला सांगत होता आणि एक स्वतः धृतराष्ट्र. तसे पाहावे तर गीतेची सुरुवातच धृतराष्ट्राच्या प्रश्नापासून झालेली आहे. पहिल्या अध्यायाचा पहिला प्रश्न. संजय युद्धभूमीवर एकत्र आलेली माझी मुलं आणि पांडूची मुलं यांनी काय केलं? त्याचा हा प्रश्न फक्त प्रश्न नसून त्याची ही वृत्ती आहे जी त्याच्या आणि पांडूच्या मुलांना युद्धभूमीपर्यंत घेऊन गेली. माझी आणि पांडूची हा त्याचा भेदच कौरव आणि पांडवांच्या मतभेदाचं मूळ कारण असावं. मग पुढे शकुनीसारखे त्याचा गैरफायदा घेत असले, तर वावगं काय त्यात. असो; पण या अजरामर ग्रंथात धृतराष्ट्राचं अस्तित्व फक्त तितकच. संजय, अर्जुन आणि कृष्णाचे श्‍लोक आपल्याला दिसतात.
तात्पर्य हे की, धृतराष्ट्राचा स्वतःच्या मुलांशिवाय दुसरा कोणताही उद्देश नव्हता. माझी आणि माझ्या भावाची मुलं, हा विचार जरी त्याच्या मनात असता, तर कदाचित युद्धभूमीपर्यंत कौरव आणि पांडव पोहोचलेच नसते. ही मानवी वृत्ती आहे. जे माझं तेच सोनं आणि हे माझं फार कमी बाबतीत असतं. खरं सांगायचं तर माझ्याशी संबंधित माझ्या गोष्टी या माझ्या आहेत आणि इतर मग? आणि इथे सुरू होते तफावत. कदाचित इथे बीज रोवतं युद्धाचं.
आता साधंच पाहा ना, घर माझं असतं म्हणून ते स्वछ आणि सुंदर असावं लागतं, कार माझी असते म्हणून तिची काळजी मला घ्यायला लागते, तिला धक्काही मी लागू देऊ शकत नाही किंवा कचरा वा घाण मी तीत करत नाही. का? ते माझं आहे म्हणून. मग या माझ्या या भावनेत मी काय मोडू शकतो किंवा शकते तोही फक्त माझा निर्णय असतो.
धृतराष्ट्राचा स्वभाव जर आपण लक्ष्यात घेतला, तर आपण डोळस भावनेने हे पाहू शकतो की, त्याला दृष्टी नव्हती हे जरी त्याचे भाग्य नसले तरी त्याचे मन पण दृष्टिहीन होते, हे त्याचे दुर्भाग्य होते. मनाचे असे धृतराष्ट्र आजच्या आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आपल्याला दिसतील. माझी मुलं, माझ्या वस्तू आणि असं बरंच काही; पण हा माझेपण इतर नात्यात येऊ पाहत नाही. पांडूची मुलं म्हणण्यापेक्षा धृतराष्ट्राने माझे पुतणे ही भावना जरी ठेवली असती, तर कदाचित जे घडलं ते तसं नसतं.
आपल्या घरी काय आणि कामाच्या ठिकाणी काय, हाच तो दृष्टिकोन आपल्या भावनांच्या आड येतो. यावेळी नुकसान कितीतरी लोकांचे होत असते. कामाच्या ठिकाणी काय आणि नात्यांमध्ये काय. समोरचा माझं हे माझं ते करण्यात इतर व्यक्तीचा आपल्यातला रस पूर्णपणे घालवत असतो. मग माझं माझं करणारा तो चुकीचं करत आहे याची भावना कधी स्पर्शही करत नाही; कारण ती रंध्रांत भिनली असते. आणि मग होत नाही ते व्यवस्थापन, परिस्थिती असो, व्यक्ती असो, ऑफिस वा घर कुठेही. मग या Approach ध्ये चूक काय होते, काय चुकत असत का, काही सहज होत नाही, असं कोणतं व्यवस्थापन आहे ज्याची गणितं इथे चुकताहेत? सरळ आणि सोप्या शब्दात हे चुकलेलं व्यवस्थापन म्हणजे Relationship Management (संबंध व्यवस्थापन). आज कॉर्पोरेटमध्ये काय आणि घरी काय, या रिलेशनशिप व्यवस्थापनाची अतोनात गरज भासते. तेव्हा हे का होत नाहीपेक्षा मी माझा विचार करताना कुठे चुकतो आहे का, याची आधी खात्री करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
धृतराष्ट्राने हे रिलेशनचे व्यवस्थापन आधीच केले असते, तर तो राग, रोष, द्वेष कुरुक्षेत्रापर्यंत कधीच पोचला नसता. आता फक्त एक विश्‍लेषण करून पाहा, या माझा आणि मी मध्ये, मागे काय सुटत आहे. कनेक्‍ट द डॉट्‌स म्हणतात ना ते असेच. आपल्याला आताच्या आपल्या बिंदूपासून मागे वळून पाहिले, तर काय दिसते? एकदा माझा मी सारून मला इतर काही दिसत का? प्रयत्न करून बघण्यात काय वाईट आहे. आपल्यामागे कोणी आपल्याला धृतराष्ट्र तर म्हणणार नाही ना, याची शहानिशा होईल आणि रिलशनशिप व्यवस्थापनाला सुरुवात पण.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com