बडबडगीतांतून भाषेशी गट्टी!

बोबडे बोल बोलणाऱ्या बाळांना भाषा शिकण्यासाठी लयबद्ध बडबडगीतं उपयुक्त ठरतात, असा निष्कर्ष यूकेमधील एका संशोधनात काढण्यात आला आहे.
children language
children languagesakal

- ऋचा थत्ते

बोबडे बोल बोलणाऱ्या बाळांना भाषा शिकण्यासाठी लयबद्ध बडबडगीतं उपयुक्त ठरतात, असा निष्कर्ष यूकेमधील एका संशोधनात काढण्यात आला आहे. संगीताचा जर झाडांवर, गायीच्या दुधावर परिणाम होऊ शकतो, आपलाही मूड गाण्यामुळे बदलू शकतो, तर मुलांच्या संवेदनशील मनावर प्रभाव पडणारच.

मध्यंतरी माझी बहीण फोनवर सांगत होती... अगं ताई, ऋग्वेद (वय दहा महिने) अथर्वशीर्ष म्हणताना ‘माम’ शब्द आला की इतका छान हसतो, अगदी एक्साईट होऊन! आधी आम्हाला काहीच कळेना, मग निरीक्षण आणि विचार केल्यावर लक्षात आलं, की ‘मम्मम’ शब्दासारखा हा शब्द त्याला वाटतो आणि आपल्या आवडीची गोष्ट समजून तो छान दाद देतो. लहान मुलं ध्वनीचा असा वेध घेत असतात. त्यातलं साम्य शोधतात. आपल्या पद्धतीने अर्थ लावतात.

‘मम्मम’ शब्दावरून अजून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, बाळाचा शब्दकोश किती वेगळा आहे! जेवण करून फिरायला जाऊया, असं न म्हणता आपण ‘मम्मम करून भूर जाऊया’ असं म्हणतो. यामागे अर्थातच मुलांशी बोलतानाचा आपला सूर वेगळा असतो. त्यांचा निरागसपणा मनाला स्पर्शून तो आपोआप तर उमटतोच; पण त्या बालकाला आपण बोललेलं कळावं यासाठी आपण सावकाश बोलतो.

बाळावरील प्रेमामुळे हे लाडिक शब्द ओठावर येत असतीलच; पण त्याच्या आकलनासाठी, भाषिक वाढीसाठी अशा शब्दांचा वापर फार उपयोगाचा ठरतो. बाळाची दिनचर्या जर तुम्ही पाहिलीत तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत खास त्याची भाषा वापरली जाते. या बाळाशी मारलेल्या गप्पा पाहा...

बाळाशी गप्पा (बाळाचा दिवस)

झाली का बाळाची जो जो? उठी उठी करा... भूर्रर जायचंय ना आपल्याला. चला चला... अजून गाई गाई करायचीय?... अरे लब्बाडा... कुकूक... बुवा कुकूक... दिसला रे दिसला.

चला चला... आता दातुली घासूया. ई करा... आता दुदू पिऊया, मग शंभो करायची... अरे काय झालं रडायला? उगी उगी! वा वा छान छान! अंगा घातला, तीटपण दावली सोनूनी... कसा दिसतोय बघा. वा वा छान छान!

ती बघ चिऊ आली... चला मम्मम करा. एक घास चिऊचा... एक घास काऊचा... एक माऊचा... हा भुभूचा... हात रे... खुड खुड... तो उंदीर पळाला... जय बाप्पा करा जय बाप्पा... आता हा हम्माचा... निपटी शिपटी खाई आणि सोनू जो जो करायला जाई. चांदोबा पण जो जो करणार. आ म्हणूया आणि झोपी जाऊया. अंगाई... जो जो गाई...

हे शब्द आपल्या सर्वांच्याच परिचयाचे असतील. त्यातही आपण नकळत करत असलेली गोष्ट म्हणजे, वर्षाच्या आतील मुलांशी बोलताना शब्दांची पुनरावृत्ती करत असतो. जसं गाई गाई करूया. आजोबांना म्हण - या या! सोनूचा अंगा कसा-छान छान! इथे गाई, या, छान हे शब्द दोनदोनदा म्हटल्यामुळे एकेक शब्द मुलांच्या मनावर बिंबला जातो. तसंच छान म्हणताना अंगठा आणि तर्जनी जुळवून तो हात आत-बाहेर हलवायला मूल शिकतं. त्यामुळे कृती आणि शब्दाचा अर्थ असं समीकरण त्याच्या डोक्यात तयार होतं.

बाळ बसू लागतं, तेव्हा बाळाचं जेवण चालू असतं अशा वेळी हमखास म्हटलं जाणारं गाणं म्हणजे,

इथे इथे बस रे काऊ... बाळ घाली जेऊ

चारा खा, पाणी पी... बाळाच्या डोक्यावरून भूर उडून जा

काऊनंतर चिऊ आणि मोर वगैरेपण बाळाच्या हातावर बसून जेऊन जातात. इथे म्हणजे जवळ, डोक्यावरून भूर असे शब्दांचे अर्थ बाळाला हळूहळू समजू लागतात. बडबडगीतं अगदी छोटी, साधी-सोपी असतात. ज्यात आधी सांगितल्याप्रमाणे शब्द पुन्हा पुन्हा म्हटले जातात आणि इतकंच नाही, तर प्रत्येक शब्द अगदी अर्थपूर्ण असतोच असं नाही. पण ते ध्वनी कानाला गोड वाटतात. या शब्दांमध्ये एक प्रकारची गोलाई असते.

जसं हे बडबडगीत पाहा -

अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं... रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा

तुझ्या कपाळी तीट लावू!

तीट लावू म्हणताना बाळ आपोआप कपाळ पुढे करतं, ऐकून ऐकून एक शब्द एक कृती त्याने आपलीशी केलेली असते.

आपडी थापडी, च्याऊ म्याऊ, ये रे ये रे पावसा... अशी बडबडगीतंही अशीच.

कवितेच्या प्रांतात ‘रला र, टला ट’ हे फार चांगलं मानलं जात नसलं, तरी बडबडगीतांची मात्र तीच गरज असते. यमक बडबडगीतांमध्ये गंमत आणतं. जसं,

खबडक खबडक घोडोबा... घोड्यावर बसले लाडोबा

किंवा

ये ये ताई पाहा पाहा... गंमत नामी किती अहा

बडबडगीतं लयीत, चालीत असतील तर मुलं अजून रमतात.

शांताबाई शेळके एरवी चित्रपटगीतं, नाट्यगीतं लिहिणाऱ्या, संस्कृतवर प्रभुत्व असणाऱ्या थोर कवयित्री! पण लहान मुलांसाठी लिहिताना हे सगळं विसरून स्वतःला कसं लहान मूल व्हावं लागतं, हे त्यांच्या बालगीत, बालकवितांमधून दिसून येतं. एकेका शब्दाचा सखोल विचार करण्याची त्यांची सवय, शब्दांचं विलक्षण आकर्षण! ही गोडी त्यांना अगदी बालपणापासून! तीन वर्षांच्या असताना आईने त्यांना ‘लाल लाल अळी’ दाखवली. शांताबाईंना त्यावेळी त्या लाल रंगापेक्षा ‘ल’ अक्षर आवडलं होतं.

आणि मग काय -

लाल लाल अळी लाल लाल कळी

लाल लाल फूल लाल लाल डूल

लाल लाल फुगा लाल लाल झगा...

असा शब्दांचा खेळच सुरू झाला.

हा प्रसंग वाचताना दरवेळी मला एक बालगीत आठवतं... लाल टांगा घेऊनि आला लाला टांगेवाला

ऐका लाला गातो गाणे ललल ललल ला...

यात गंमत येते ती ‘ल’ अक्षरामुळेच. बालमनाचा विचार करता जी गंमत लाल शब्दात आहे, ती तांबडा शब्दात नाही.

शांताबाईंसारखीच बालगीतं म्हटलं की ग. ह. पाटील, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर यांचीही नावं आठवतातच. लहान मुलांसाठी लिहिताना त्यात निरागस भाव स्वाभाविकपणे उमटला, तर ते मुलांना आपलं वाटतं. असंच पुलंना ‘नाच गं घुमा’च्या धर्तीवर बालगीत लिहून हवं होतं आणि ‘नाच रे मोरा’ या गाण्याची निर्मिती झाली. गदिमांचे हे शब्द आजही बालकांना आपलेसे वाटतात. ‘आता तुझी पाळी वीज देते टाळी’ या ओळीला माझा भाचा बरोब्बर टाळी देतो. शब्दाला सूराची जोड मिळाली आणि ती टाळी बरोब्बर वेळी देणं यात शब्द-अर्थ याबरोबरच लय आणि तालही बाळाला आनंदित करतात.

आईचे अंगाईचे सूर कानी आले आणि तिच्या हाताचा स्पर्श झाला, की बाळ चटकन झोपी जातं. त्याला गाढ आणि शांत झोप लागते. जितकी झोप उत्तम तितकी त्याची प्रकृती आणि प्रगती उत्तम असते. भाषिक विकास होण्यासाठी सोपे शब्द आणि सूरांची जोड मुलांना रमवते, शिकवते, कल्पनाशक्तीलाही चालना देते. बालगीतातून पंचसंवेदनांशी गट्टी होते. शब्द, रंग, गंध, रस, स्पर्श... लाल रंगाची ओळख जशी पाहिली, तशी नादमयता मुलांना आकर्षित करते.

टपटपटप काय बाहेर वाजतंय ते पाहू

चल गं आई चल आई पावसात जाऊ

आकाशी गडगडते म्हातारी का दळते

गडाड गुडुम गडाड गुडुम ऐकत ये राहू...

किंवा

कडाड कुडूम कडाड कुडूम काय खातोस रे..

खाऊ हा तर मुलांच्या अगदी आवडीचा विषय, जसं

एक होती इडली, ती खूप चिडली

किंवा

पापड खाल्ला कर्रम कर्रम... लोणचं खाल्लं चटक मटक

शब्द आणि वस्तू यांचं नातं कळलं की चित्रमयताही हवीहवीशी वाटते. जसं, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

हे गाणं ऐकताना प्रत्येक मूल (थोडं मोठं) आपापलं चॉकलेटच्या बंगल्याचं आपापलं चित्र डोळ्यासमोर आणत राहील हे नक्की.

भाषेचा बालमनावर संस्कार व्हावा यासाठी बडबडगीतं, बालगीतं ही उपयुक्त आहेतच. पण मन शांत राहावं, आनंदी राहावं यासाठी बाळाशी खेळताना, बोलताना एकीकडे बासरी किंवा संतूरची रेकॉर्ड लावून ठेवली, तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होतो. अर्थात रागही तसेच मन प्रसन्न करणारे हवेत. काही सूर बालकांना अस्वस्थ वा कासावीस करू शकतात.

शास्त्रीय संगीत ऐकताना मुलं किंबहुना बाळं सूरात सूर मिसळतात किंवा समेवर टाळी देतात, असेही व्हिडीओ आपण समाजमाध्यमांवर पाहतोच. शिवाय स्तोत्र, नामस्मरण कानावर पडत राहिले तरी ती स्पंदनं फार अनुकूल असतात. रामरक्षेसारखी स्तोत्रं मुलांना कळणार नाहीत, लगेच म्हणता येणार नाहीत हे मान्य; पण कानावर पडत राहिली, की नंतर पटकन पाठ होतील आणि त्या उच्चारांचा, आघातांचा उत्तम परिणाम मनावर होतो.

अगदी ‘राम’ या शब्दातच र म्हणजे अग्निबीज, अ हे सूर्यबीज आणि म हे चंद्रबीज एकवटून ते उच्चारताना, श्रवणाचा शरीरमनावर अनुकूल परिणाम होत असतो. बहुतेक बडबडगीतं, बालगीतं गोडच आहेत. पण निराशाजनक विचार नकळत यातून उमटणार नाहीत याची काळजी घ्यावी.

आता ही गीतं पोहचवायची कशी, ऐकवायची कशी... खरं तर यासाठी आज अनेक मार्ग आहेत; पण एक विचार मांडावासा वाटतो. मोबाईलवर मुलं ॲनिमेशन पाहत राहतील, तर त्यांना आयतं चित्र दिसेल. ते स्वतःचं चित्र डोळ्यासमोर रंगवणार नाहीत. मोबाईलचा विपरीत परिणाम वेगळाच! काळानुसार बालसाहित्याचे भाषा आणि शब्द बदलत जातील, हे नक्कीच.

पण शक्यतो जर नुसते शब्द कानावर पडले, तर कल्पनाशक्तीला नक्कीच चालना मिळेल आणि त्यांचं छोटंसं भावविश्‍व रंगीबेरंगी होऊन जाईल. म्हणून ऐकवणं, हातवारे करणं, चित्र दाखवणं याचा वापर मुलांसाठी जास्तीत जास्त करावा, असं मनापासून सुचवावंसं वाटतं.

हे सगळं लिहिण्यामागे कारणही तसंच खास आहे. एक वर्षाखालील बाळांसाठी लयबद्ध बडबडगीतं भाषा शिकण्यासाठी उपयुक्त ठरते, असा निष्कर्ष यूकेमधील एका संशोधनात काढण्यात आला आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या या पत्रिकेत असंही म्हटलं आहे, की साधं बोलण्यापेक्षा बडबडगीतं ऐकवली, तर त्या लयीमुळे शब्द नक्की कुठे संपतो हे कळायला नक्कीच मदत होते.

ही बातमी वाचून आनंद तर नक्कीच झाला आणि आपल्या मराठी भाषेतील या बडबडगीतांच्या परंपरेचा अभिमानही वाटला. कारण, आपल्या पूर्वसुरींनी हा सगळा विचार करून कशी गोड बालगीतं रचली आहेत. त्याचा आपल्या कित्येक पिढ्यांना उपयोग झाला आहे. आपल्या भाषा-संस्कृतीत मुळातच रुजलेल्या या विज्ञानाला या बातमीने पुष्टी दिली आणि अर्थपूर्णता आली. विज्ञानाचा आधार मिळाला, की आईबाबांची नवीन पिढी आवर्जून दखल घेईल आणि मुलांवर संस्कार करताना ही पारंपरिक दिशा त्यांना नव्याने गवसेल हा विश्‍वास वाटतो.

(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत. लहान मुलांसाठी त्या लेखन व कथा-कविता सादरीकरणही करतात.)

rucha19feb@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com