धावणारी वीज

सुनंदन लेले
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

जमैकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्ट पुन्हा एकदा विश्‍वविक्रम करण्याच्या तयारीत आहे. त्याचं हे यश अपार मेहनतीतून साकारलंय. आईचा सल्ला आणि ज्येष्ठ खेळाडूंनी केलेलं मार्गदर्शन यामुळं बोल्टनं मोठी उंची गाठलीय. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला एक तप होत आलं. कोणत्याही वादविवादापासून बोल्ट लांब असतो. त्याचं लक्ष असतं फक्त खेळावर.

जमैकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्ट पुन्हा एकदा विश्‍वविक्रम करण्याच्या तयारीत आहे. त्याचं हे यश अपार मेहनतीतून साकारलंय. आईचा सल्ला आणि ज्येष्ठ खेळाडूंनी केलेलं मार्गदर्शन यामुळं बोल्टनं मोठी उंची गाठलीय. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला एक तप होत आलं. कोणत्याही वादविवादापासून बोल्ट लांब असतो. त्याचं लक्ष असतं फक्त खेळावर.

आळंदीला गेल्यावर तुम्ही इतरत्र भटकत नाही. पहिल्यांदा तुम्ही जाता ते थेट ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीवर डोकं ठेवायला. अगदी तसंच काहीसं माझं जमैका देशातल्या किंग्जस्टनला गेल्यावर झालं. मला एका क्‍लबवर जायची ओढ लागली होती ज्याचं नाव होतं ‘रेसर्स ट्रॅक क्‍लब’ हो दस्तुरखुद्द उसेन बोल्ट ज्या क्‍लबमध्ये सराव करतो ती जागा म्हणजे रेसर्स ट्रॅक क्‍लब. किंग्जस्टन गावातल्या मोना नावाच्या भागात ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंडीज’ आहे. इथं नव्यानं वसवलेल्या गेलेल्या या क्‍लबचं नाव जगात दुमदुमत आहे, कारण उसेन बोल्ट आणि योहान ब्लेकसारखे एकाहून एक सरस वेगवान धावपटू याच क्‍लबमधून पुढं आले आहेत.

लहानपणापासूनच खेळाची आवड
जमेका देशातल्या त्रिलॉनी नावाच्या अत्यंत साध्यासुध्या गावी वेल्स्ली आणि जेनिफर बोल्ट दांपत्य राहत होते. त्यांना तीन मुलं होती. १९८६ मध्ये २१ ऑगस्टला दांपत्याला बाळ झालं ज्याचं नांव त्यांनी उसेन ठेवलं. त्यांना अजून एक मुलगा साडीकी आणि मुलगी शेरीन. त्रिलॉनी गावच्या शेरवुड कंटेंट भागात वेलस्ली एक छोटेसे किराणा मालाचं दुकान चालवत होते. लहानपणापासून उसेनला शाळा अभ्यासापेक्षा फक्त खेळात रस होता. शेरवूड भागातल्या रस्त्यावर आपल्या मित्रांसोबत फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्यात उसेन दंग असायचा. त्याच्या पायात जणू वीज होती. शाळेतल्या कुणाबरोबरही तो शर्यत लावायचा आणि लांब लांब ढांगा टाकत पळताना अगदी आरामात जिंकायचा. वयाच्या १२ व्या वर्षी आंतरशालेय स्पर्धेत १०० मीटरची शर्यत उसेन बोल्टनं जिंकली होती.

त्रिलॉनी गावाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना उसेनचे भाऊ साडीकी सांगत होते, ‘‘तसं बघायला गेलं तर आम्ही जमेकन लोक मुळात तगडे आहोत. आमच्याकडं मस्त समुद्र आहे, तसंच मोठे मोठे पर्वत आहेत. लहानपणी आम्ही समुद्रकिनारी धावायचो, तसेच पर्वतावर सहजी चढत जायचो, ज्या मुळं आमची अंगकाठी मजबूत होत गेली. लांब लांब ढांगा टाकत पळणं हे प्रत्येक जमेकन मुला-मुलीकरिता अगदी सहजसोपी बाब आहे. त्याचाच फायदा मोठेपणी ॲथलिट्‌सना होतो. ॲनी फ्रेझर प्रीसची आई पोटात सहा महिन्यांचं बाळ असताना गुंड आणि चोरांपासून जीव वाचवायला जोरात पळायची. मग तेच गुण ॲनी फ्रेझर प्रीसमध्ये आले नाहीत तरच नवल मानावं लागेल.’’ साडीकी यांना मी भेटलो तेव्हा जमेकामधल्या खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीचं आणि यशाचं रहस्य सांगत होते.

मॅकनीलसारखा योग्य मार्गदर्शक
बोल्टच्या जडणघडणीत त्याला मिळालेल्या योग्य प्रशिक्षणाचा मोठा भाग आहे. जमेकाकडून ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतलेल्या पॅब्लो मॅकनील नावाच्या चांगल्या धावपटूनं बोल्टला मार्गदर्शन केलं. मॅकनीलचा उसेनवर एका गोष्टीसाठी राग होता तो म्हणजे इतकी नैसर्गिक गुणवत्ता असूनही सरावाकरिता आणि व्यायामासाठी बोल्ट गंभीर नसायचा.  त्याचा कल हास्यविनोद करण्यावरच अधिक असे.

उसेन बोल्टचा भाऊ साडिकी.

बाबार्डोसच्या ब्रिजटाऊन गावाचं क्षेत्रफळ ३८ किलोमीटरचं आहे फक्त. पण किती महान क्रिकेटपटू त्या भागातून जन्माला आले हे बघून थक्क व्हायला होते. तिचं गोष्ट जमेकाच्या किंग्जस्टन गावाची आहे. मर्लिन ओटीपासून ते नव्या जमान्यातील असाफा पॉवेल, उसेन बोल्ट, योहान ब्लेक तसेच आत्ताची स्प्रिंट क्वीन ॲनी फ्रेझर प्रीस याच गावाच्या आहेत. किंग्जस्टनच्या दोन क्‍लबवर मिळून हे सगळे सराव करतात. यांच्यासारख्या चांगल्या खेळांडूबरोबर सराव करायला मिळावा म्हणून परदेशी धावपटू रेसर्स ट्रॅक क्‍लबवर स्वत:ला भरती करतात. या क्‍लबवर नुसतं गेलं तरी खेळासंबंधीची पुरेपूर ऊर्जा जाणवते.

आईचा अमूल्य सल्ला
बोल्ट जसा जसा एक एक शर्यत जिंकत पुढं प्रगती करू लागला तसं त्याच्यावर अपेक्षांचं दडपण वाढू लागलं. लोक त्याच्याकडून फक्त जिंकण्याचीच अपेक्षा करू लागले. या सर्वाचा परिणाम बोल्टवर झाला. तो चिंताक्रांत झाला. कुणाशी बोलेनासा झाला. त्याची आई जेनिफरनं हे बरोबर हेरलं. ती म्हणाली, ‘‘लोकांच्या अपेक्षांकडं बोल्ट कधीच लक्ष द्यायचं नसतं. लोक ना तुमचं आयुष्य घडवत असतात, ना बिघडवत असतात. आपण कष्ट करून, तयारी १०० टक्के करायची. शर्यत मनापासून करायची. मग जो निकाल असेल तो खिलाडूवृत्तीनं स्वीकारायचा. बोल्ट एक लक्षात ठेव, मन चिंतेनं जड असेल तर तुझे पायही जड होतील. जोरात कोण पळू शकतो जो मनानं मोकळा आणि शरीरानं हलका आहे. तेव्हा खेळाशी प्रामाणिक रहा, सर्व काही ठीक होईल.’’ आईचे हे शब्द बोल्ट आजही मनात साठवून पुढं जात आहे.

ग्लेन मिल्सची साथ
बोल्टच्या आयुष्याला खरी कलटणी मिळाली ग्लेन मिल्समुळं. मिल्स स्वत: उत्तम वेगवान धावपटू होता. २००५ पासून ग्लेन मिल्सनं बोल्टला प्रशिक्षण देणं सुरू केलं. या संदर्भात सांगताना साडीकी म्हणाले, ‘‘आम्ही जमेकन लोक मुळातच अंगापिंडानं मजबूत आहोत. शाळेपासूनच बोल्टला वेगानं पळायचा नाद होता. ग्लेन मिल्सनं त्याला शिस्त लावली आणि मग त्याच्यात बदल लक्षणीय होता.’’ ते पुढं म्हणाले, ‘‘ग्लेन मिल्सनं बोल्टनं दिनचर्येला वळण लावलं. तो काय खातो याकडं सर्वांत जास्त लक्ष दिलं. त्याच्या सरावात सुसूत्रता आणली, तसेच दुखापतीपांसून तो दूर राहावा म्हणून त्याच्याकडून कठोर मेहनत करून घेऊन त्याला बळकट बनवलं. त्याचबरोबर त्याच्या खेळाचं आणि दिनक्रमाचं नियोजन खूप काटेकोरप्रकारे केलं. ज्यामुळं दुखापतीतून सावरायला मदत झाली. एका गोष्टीचं वाईट वाटतं ते म्हणजे त्याच्या या शिस्तबद्ध स्वभावामुळं बोल्ट काही प्रमाणात घरच्यांपासून लांब गेला. दुरावला नाही, फक्त लांब गेला असं म्हणणं बरोबर आहे. आज गेली १२ वर्षे तो १०० आणि २०० मीटरच्या शर्यतींवर राज्य करतो आहे. जगज्जेता आहे बोल्ट. मग त्याला ती पातळी राखायला काही त्याग करावा लागणारच,’’ साडीकी मनापासून बोलत होते.  

वादविवादांपासून लांब
इतक्‍या मोठ्या उंचीवर बोल्ट जाऊन बसला आहे की त्याची पातळी गाठणं जवळपास अशक्‍य झालं आहे. एक गोष्ट मानावीच लागेल की, त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला एक तप होत आलं पण कोणत्याही मोठ्या वादविवादापासून बोल्ट लांब आहे. इतर ॲथलिट्‌स उत्तेजक चाचणीत सापडत आहेत, तर कोणी पैशाच्या वादात. बोल्टचं संघ व्यवस्थापन अचूक आहे. ‘‘माझ्या खेळाकरता मला स्वच्छ राहणं भाग आहे. ट्रॅक अँड फिल्ड या माझ्या खेळाला डोपिंगचं ग्रहण लागले नाही पाहिजे हीच माझी मनोकामना आहे. त्याकरिता मी आणि माझी टीम झटत असते. उत्तेजक द्रव्य घेऊन शर्यतीत पळणं माझ्याकरता पाप आहे. उंची गाठणं एक वेळ शक्‍य असतं पण ती टिकवून ठेवणं महा कर्मकठीण. माझ्या कुटुंबामुळं आणि प्रशिक्षक, तसंच सहकाऱ्यांमुळं मला ते शक्‍य झालं आहे. मी सर्वांचा ऋणी आहे. रिओ ऑलिंपिक्‍समध्ये मला माझ्याकडं असलेली तिन्ही सुवर्णपदक राखायची आहेत.
मांडीला झालेली दुखापत बरी झाली आहे. तेव्हा मी रिओकरता सज्ज आहे.’’ लंडनमधील २०० मीटरची शर्यत जिंकल्यावर पत्रकार परिषदेत आणि महान धावपटू मायकेल जॉन्सनबरोबर बोलताना बोल्ट यांनं आपली भूमिका स्पष्ट केली होती.

किंग्स्टनमधल्या ‘रेसर्स ट्रॅक क्‍लब’चा ट्रॅक ः इथंच वेगवान धावपटू उसेन बोल्ट सराव करतो.

लायटनिंग बोल्ट
वीज कोसळावी तसा बोल्ट पळतो म्हणून त्याचं टोपण नाव आहे लायटनिंग बोल्ट. रेसर्स ट्रॅक क्‍लब नंतर किंग्जस्टनच्या नॉरब्रुक टेरेस भागातल्या बोल्टच्या घराजवळ जाऊन आल्यावर वेगळाच उत्साह आला. बोल्टचे शेजारी सांगत होते, की बोल्ट किंग्जस्टनला परत आला की मित्रांकरिता मोठी पार्टी देतो. त्या पार्टीत इतक्‍या मोठ्यांदा म्युझिक लावलं जातं की आम्हाला दचकायला होतं. पार्टी पहाटेपर्यंत चालू असते. पार्टीमुळं इतरांना त्रास आहे हे त्याला समजतं तेव्हा तो आवाज कमी करतो किंवा आम्हालाच पार्टीला सहभागी होण्यासाठी बोलावतो.

क्रिकेटच्या वार्तांकनाकरिता जमेकाला यायला मिळालं ज्याचा फायदा घेऊन बोल्टच्या ट्रॅक क्‍लबला भेट देता आली. ज्या ट्रॅकवर बोल्ट सराव करतो त्या ट्रॅकवर पळायची संधी लाभणं ही खरोखरच आनंदाची पर्वणी होती. बोल्ट कुटुंबाची कहाणी त्याच्या भावाच्या तोंडून ऐकल्यावर आता बोल्टला तीन सुवर्णपदक राखण्याची कामगिरी रिओ ऑलिंपिक्‍समध्ये बघताना वेगळचं वाटणार आहे.

Web Title: Runner electricity