लिलाव

लग्नात हुंडा द्यावा लागतो म्हणून बाप मुलीच्या शिक्षणासाठी पैसा खर्च न करता, साठवून ठेवतो. हीच घोडचूक आम्ही करतो.
dowry paid in marriage
dowry paid in marriagesakal
Summary

लग्नात हुंडा द्यावा लागतो म्हणून बाप मुलीच्या शिक्षणासाठी पैसा खर्च न करता, साठवून ठेवतो. हीच घोडचूक आम्ही करतो.

- रूपाली चाकणकर

लग्नात हुंडा द्यावा लागतो म्हणून बाप मुलीच्या शिक्षणासाठी पैसा खर्च न करता, साठवून ठेवतो. हीच घोडचूक आम्ही करतो. मुलीला चांगलं शिक्षण दिलं, आत्मविश्वास दिला, तिच्या कर्तृत्वाला मोकळ्या आकाशात गरुडभरारीच्या पंखाचं बळ दिलं,

तर ती नक्कीच या जुलमी अन्यायाला विरोध करायला पदर कमरेला खोवून उभी राहील. लग्नाच्या नावाखाली बुद्धिहीन माणसांच्या कळपात होणारा तिचा लिलाव जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत अनेक ‘श्रद्धां’साठी केवळ श्रद्धांजली वाहणेच आपल्या हातात राहील...

सकाळी नऊ वाजता कार्यक्रमासाठी बाहेर पडले. गाडीत बसताच माझा क्लासमेट राहुलचा फोन आला. घाबरलेल्या आवाजात म्हणाला, ‘‘रूपाली, तुझी मदत हवी आहे. पहाटे माझ्या आत्याबहिणीचा खून झाला; पण तिच्या सासरचे लोक म्हणतात, ‘चोरट्याने हल्ला केला.

तिला मारहाण केली. तिचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला म्हणून चोरट्यांनी तिचा खून केला आहे.’ पण मला ही सगळी बनवाबनवी वाटतेय, कारण तिला सासरी हुंड्यासाठी प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे तिचा खून घरच्यांनीच केला असेल. तू जरा मला मदत कर...’’ मी हो म्हणून फोन ठेवला. चिखली पोलिस स्टेशनला फोन करून माहिती घेतली.

श्रद्धा नाव होतं तिचं. शांत आणि जराशी बुजरी. पाच वर्षांचा गोंडस मुलगा. लग्नाला सहा-सात वर्षे झाली असतील. सुरुवातीचे नव्या नवलाईचे दिवस आनंदात गेले. हळूहळू घरातल्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली. माहेरी श्रद्धाचे वडील पोलिस खात्यात शिपाई म्हणून कामाला, आई गृहिणी, एक लहान भाऊ, साधे मध्यमवर्गीय कुटुंब.

वडिलांनी आयुष्यभराची कमाई लग्नासाठी खर्च केली. लग्नात सासरच्या लोकांनी सांगितले तसे जेवण दिले. मानपान केला. मुलीला दागिने घातले. एकच आशा होती की, सासरच्या लोकांच्या मनासारखे केले, ते खुश झाले, तर आपल्या लेकीला आयुष्यभर सुखी ठेवतील.

शेवटी ‘वधू’चा बाप ना तो!

लग्नात सगळे मनासारखे करूनही नंतर सासरच्या लोकांची मागणी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी होती. लग्नाचा खर्च, त्यातून कर्जबाजारी झालेला बाप, लग्नानंतरचे वर्षभरातील सणवार आणि त्यासाठी ‘जावयाचा’ मानपान, हे सगळं करता करता वाढलेला कर्जाचा डोंगर...

सासरच्या लोकांनी केलेली मागणी आणि पैशाचा हट्ट लगेच पुरवू शकत नव्हते, म्हणून श्रद्धाचा छळ होत होता. त्यातून तिचा गळा दाबून नवऱ्याने खून केल्याचं सिद्ध झालं. मतांच्या राजकारणासाठी काही पुढारी ‘चोरांना’ साथ देण्यासाठी सामील झाले होते हे त्याहून दुर्दैव.

पोस्टमार्टम रिपोर्ट हा चुकीचा द्यावा, यासाठी हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून बसलेले; पण श्रद्धाची माहेरची माणसं इन कॅमेराच पोस्टमार्टमसाठी आग्रही राहिल्याने न्यायाचं पारड श्रद्धाकडे झुकलं. रिपोर्टमध्ये गळा दाबून खून केल्याचं सिद्ध झालं. सासरच्या लोकांना अटक झाली. आयोगाच्या माध्यमातून पत्रव्यवहार करीत, आरोपीवर कडक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

तिसऱ्या दिवशी माझा जनता दरबार होता. तक्रारदारांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीत एका महिलेला दोघी-तिघींनी आधार देत आत आणले. डोळे रडून सुजलेले. हताश चेहेरा, शून्यात नजर. मी बसायला सांगितलं. दहा-बारा महिला-पुरुष सोबत होते.

त्या गर्दीतून माझी चुलतबहीण जयश्री पुढे येत मला म्हणाली, या श्रद्धाच्या आई. जयश्री सगळ्यांना घेऊन आली होती. त्या माऊली हात जोडून म्हणाल्या, ‘‘आरोपीला कडक शिक्षा करा. माझं लेकरू खूप नाजूक होतं. पाणी अंगावर पडलं तर दचकणारं. या लोकांनी पैशासाठी गळा दाबून मारहाण करून खून केला.

किती वेदना झाल्या असतील तिला...’’ म्हणत त्या रडू लागल्या. रडता रडता निःशब्द आणि सुन्न झाल्या. त्यांच्या समोरच परत एकदा पोलिस आयुक्त, तपास अधिकारी यांना फोन करून तपास व्यवस्थित करून लवकर दोषारोपपत्र सादर करावं व आरोपीवर कडक कारवाई व्हावी, असं सांगितलं.

हे ऐकून ते सर्व जण समाधानाने बाहेर पडले. ती माऊली हात जोडून ‘‘न्याय द्या ताई माझ्या लेकीला,’’ म्हणत बाहेर गेली. पायऱ्या उतरून गेल्यावर माझ्या ऑफिसकडे तोंड करून बराच वेळ हात जोडून उभ्या होत्या. पायरीवर डोकं ठेवून नमस्कार केला. हा प्रसंग मला काचेतून दिसत होता. मी सुन्न झाले..

अशा खुप ‘श्रद्धा’ आहेत, ज्या पैशासाठी बळी गेल्यात. कायदा सुव्यवस्था त्याचं काम करेल, कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षाही होईल; पण माणूस आणि ‘समाज’ आमची भूमिका कायम बघ्याचीच राहणार का? श्रद्धाच्या मारेकऱ्यांचे हात रक्ताने बरबटलेले आहेत. ते जन्मठेपेपर्यंत कायद्याच्या बेड्यात राहतील का?

समाजाचा दोष असो-नसो, तो एक वेगळा लिखाणाचा भाग होईल; पण एक लेक म्हणून मला वारंवार वाटतं, लेकीचा गर्भ म्हणून सुरू झालेला आमचा प्रवास चार पैशाच्या लालसेपोटी किड्या-मुंग्यासारखा, संपवला जातो, या जीवाचे काहीच मोल नाही का?

लग्नात हुंडा द्यावा लागतो म्हणून बाप-मुलीच्या शिक्षणासाठी पैसा खर्च न करता, साठवून ठेवतो... हीच घोडचूक आम्ही करतो... मुलीला चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं, तिला जगण्याचा आत्मविश्वास दिला, तिच्या अस्तित्वाची तिला जाणीव करून दिली,

तिच्या कर्तृत्वाला मोकळ्या आकाशात गरुडभरारी घेण्यासाठी पंखात बळ दिले तर ती नक्कीच या जुलमी अन्यायाला विरोध करायला पदर कमरेला खोवून उभी राहील... लग्नाच्या नावाखाली बुद्धिहीन माणसांच्या कळपात होणारा तिचा लिलाव जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत अशा अनेक ‘श्रद्धा’साठी केवळ श्रद्धांजली वाहणेच हातात राहील...

दुसऱ्यांच्या घरात घडणाऱ्या या घटना आहेत, त्याचं मला काय, असं म्हणत दृष्टी असूनही अंधकाराच्या वाटेवरून चालत आम्ही मौनाचे मुखवटे पांघरून वावरणार असू, तर या घटना आपल्याही दारापर्यंत पोहचायला वेळ लागणार नाही... जागं व्हावं लागेल वेळ जाण्यापूर्वी. अनेक ‘श्रद्धां’च्या वेदनांची किंकाळी थांबविण्यासाठी जागते रहो, जागते रहो, रात्र वैऱ्याची आहे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com