मातीच्या चुली

महिलांच्या अडचणी समजून घेणे आणि जिल्ह्यातील सर्वच यंत्रणेला सोबत घेऊन शक्य होईल तितके पराकोटीचे प्रयत्न करून त्या तक्रारदार महिलांना दिलासा देण्याचे काम करत होते.
rupali chakankar over Challenges and Solutions to humanTrafficking crime women
rupali chakankar over Challenges and Solutions to humanTrafficking crime womensakal

- रूपाली चाकणकर

चेहरे बदलतात, पेहराव बदलतो, भाषा बदलते, मात्र तिथपासून इथपर्यंत सगळीकडेच प्रश्न तेच. आम्ही कितीही सुधारलो, प्रगती केली, आकाशाला गवसणी घातली तरी ‘नाच गं घुमा’ म्हणत चोहोबाजूंनी प्रश्नांचा फेरा तोच तोच आहे. अलीकडेच एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने काश्‍मीरला गेले होते, तिकडेही तेच.

एप्रिलचा तिसरा आठवडा होता, ‘अनैतिक मानवी तस्करी यातील आव्हाने व उपाययोजना’ यावर माझे नागपूर व विभागात कार्यक्रम चालले होते. त्याचवेळी आमच्या राष्ट्रीय आयोग कार्यालयातून मेल आला. मी नागपूर, वर्धा, भंडाऱ्याच्या दौऱ्यावर होते.

जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महिलांच्या अडचणी समजून घेणे आणि जिल्ह्यातील सर्वच यंत्रणेला सोबत घेऊन शक्य होईल तितके पराकोटीचे प्रयत्न करून त्या तक्रारदार महिलांना दिलासा देण्याचे काम करत होते. काम झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान मिळत होते.

आयोगाच्या माध्यमातून आढावा आणि अनेक विभागांना भेटून तेथील यंत्रणेची माहिती घेत होते. आलेला मेल श्रीनगर येथे मानवी तस्करी जनजागृती कॉन्फरन्सला उपस्थित राहण्याबाबत होता. अचानक चार-पाच दिवसांतले नियोजन करून निघावे लागणार होते. घरात दोन लग्न होती, त्याचीही लगबग सुरू होती. त्यामुळे अचानक श्रीनगर दौरा आणि आल्यानंतर लग्नाची तयारी हे नियोजन करून निघाले.

निसर्गाने भरभरून उधळण केलेल्या काश्‍मीरच्या ‘सौंदर्याला’ डोळ्यात साठवणं हेही एक स्वप्न होतं; पण अचानक अभ्यास दौरा आल्यामुळे एकटीलाच निघावं लागलं होतं. तेही दोन दिवसांसाठी. दोन दिवसांत या भागात जाऊन येतोय, हेही समाधान नसे थोडके. सुंदर असं श्रीनगर, दल सरोवर आणि कॉन्फरन्स असं दोन दिवसांत उरकून निघाले.

त्या भागात मला दिलेली संपर्क अधिकारी गौसिया नावाची चुणचुणीत मुलगी विमानतळापासून विमानतळापर्यंत सोबत होती. तिथल्या सगळ्या परिस्थितीवर उत्तम माहिती ती सांगत होती. काही गोष्टींवर समाधान तर काही गोष्टींवर नाराजी व्यक्त करत होती.

आमच्याकडचा ‘नमकीन चहा’ घ्याच, म्हणत मला तिने तो दिलाही; पण एक घोट घेऊन खारट चहा मला नाही जमणार म्हटल्यावर सुगंधी ‘कावा’ दिला. केशर घातलेला हा ‘कावा’ फार चवदार आणि पौष्टिक होता. प्रचंड कुडकुडणाऱ्या थंडीत तो वाफाळलेला काढा, त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय.

सगळीकडे असलेली प्रचंड सुरक्षा आणि तिथे असलेल्या प्रत्येक पर्यटकाला श्रीनगरची माणसं देत असलेला आदर ‘अतिथी देवो भव:’चा प्रत्यय देत होती. रस्त्याने जाताना कोणतीही माहिती विचारली तरी अदबीने उत्तर देणारी माणसं पाहून ‘पुणेकरांची’ आठवण होत होती. शेवटी मीही पुणेकर म्हणून मनात विचार येत होता, यांच्याकडून आपण शिकावं की यांनीच आमच्या पुणेकरांकडून शिकावं, पण या लोकांचा शांतपणा पाहून हा आपल्या अभ्यासाबाहेरचा विषय म्हणून सोडून दिला.

गौसिया माझ्याशी हिंदीत बोलत असताना मध्येच ड्रायव्हरशी त्यांच्या भाषेत बोलत असे. मी विचारलं, ‘कोणती भाषा?’ म्हणाली ‘कश्‍मिरी.’ समजत तर काही नव्हतं; पण ऐकायला छान वाटत होती. दूधपात्रीच्या भागातून येताना दोन्ही बाजूला दहा-बारा चहाची छोटी-छोटी दुकानं होती म्हणून थांबलो. त्यावेळी जोरात पाऊसही सुरू झाला. एका कापडी स्टॉलमध्ये बसलो. जोरदार वाऱ्यामुळे आत बसूनही पावसाचे पाणी अंगावर येत होतं. थंडी, त्यात पाऊस आणि गरमागरम वाफाळलेला हातातला ‘कावा’.

गतकाळातील आठवणींना झरर्कन डोळ्यांसमोरून घेऊन गेला. आपणही आयुष्यातील प्रत्येक क्षणात ‘सुखाचा’ क्षण शोधत असतो आणि विशेष म्हणजे या छोट्या-छोट्या क्षणांना एकत्र ठेवत आयुष्याचे उबदार ‘घरटं’ विणत असतो. त्याचवेळी अजून दोन कुटुंब तिथे आली, ‘कावा’ करून सगळ्यांना देताना आजोबांची थोडी दमछाक होत होती.

कारण त्यासोबत त्यांना येणाऱ्या ग्राहकांना शेकोटी, कावा, सोबत खाण्यासाठी गरम-गरम ‘मक्की की रोटी’ही देत होते. ही गडबड बघून समोरच्या घरातून दोन मुली येताना दिसल्या. बहुतेक या आजोबांच्या लेकी असाव्यात.

त्या लगेच मदत करू लागल्या. गर्दी अजून वाढत गेली, पण त्या दोघी सफाईदारपणे सगळ्यांशी पाहुणचार करत होत्या, ‘कावा’ पिता पिता गौसिया त्यांच्याशी बोलत होती. एक सातवीत आणि दुसरी नववीत होती. गर्दी जरा कमी झाल्यावर, मी तिला विचारलं, ‘‘शिक्षण कोठे घेता, कितवीपर्यंत कॉलेज आहे, शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं का?’’

खूप उत्साहाने ती बोलत होती. ‘‘हो, खूप शिक्षण घ्यायचंय. इतकं मोठं व्हायचंय की, मी माझ्या बाबांना सांभाळू शकेन. त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट केले आहेत. आई आजारी असते. तिच्यावर उपचार करायचे आहेत. तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे. म्हणजे तिला लवकर बरं वाटेल, म्हणून मी खूप अभ्यास करते.

खूप मोठं व्हायचंय. सगळ्या घराची जबाबदारी घेण्याइतपत... त्यांना कायम वाटतं मुलगा पाहिजे होता. म्हणजे त्याने कमाई केली असती, एवढे हाल नसते झाले... म्हणून मला वाटतं मीच त्यांना सांभाळावं, पण...’’ बोलता बोलता उत्साहाने भारावलेला तिचा चेहरा एकदम पडला.

‘‘काय झालं?’’ मी विचारलं. ती काहीच बोलेना. मी परत विचारलं तेव्हा तिच्या बाबाकडे पाहून म्हणाली, ‘‘संपूर्ण शिक्षण बाबा आम्हा मुलींना देऊ शकणार नाहीत. आमच्याकडे काही भागात लवकर मुलींची लग्न होतात, परिस्थितीमुळे. आमचंही असंच लवकर लग्न लावतील आणि सगळीच उमेद संपेल.’’

माझ्या हातातला रिकामा कप घेऊन पानावलेल्या डोळ्यांनी निघूनही गेली.

तिथपासून इथपर्यंत सगळीकडेच ‘मातीच्या चुली’.

चेहरे बदलतात.. प्रश्न तेच

पेहराव बदलतो... प्रश्न तेच

भाषा बदलते... प्रश्न तेच

आम्ही कितीही सुधारलो, प्रगती केली, आकाशाला गवसणी घातली तरी ‘नाच गं घुमा’ म्हणत चोहोबाजूंनी प्रश्नांचा फेरा तोच तोच आहे... कधी आणि कसे सुटणार आमचे प्रश्न आणि वेदना. आकाशात स्वप्नांची उंच भरारी घेणारे हे गरुड, क्षणात भावनांचे पंख छाटून जमिनीवर कोसळले.

देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळानंतर अनेक दशके आम्ही पुढे चालत आलो, प्रगती केली, तंत्रज्ञान आणि आधुनिकतेची कास धरत सर्वच क्षेत्र काबीज केली; पण अजूनही लखलखणाऱ्या दिव्याखाली अंधार दाटतोय. आजही खूप लढा बाकी आहे कोवळ्या लेकींच्या जगण्याचा. शिक्षणाचा, सुरक्षिततेचा आणि हो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिला ‘माणूस’ म्हणून जगू देण्याचा. चला कोवळ्या जीवांना शिक्षणाबरोबर जगण्याचाही अधिकार देऊ या. बालविवाहाच्या विळख्यातून मुक्त करू या... सुरुवात स्वतःच्या अंगणापासून करू या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com