Family
Familysakal

सांजवेळ

दिवस मावळतीला निघाला होता. हलकासा पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा जाणवत होता. मधूनच ‘मी पण आहे’ याची जाणीव करून देण्यासाठी वाऱ्याची झुळूक ये-जा करत होती.
Summary

दिवस मावळतीला निघाला होता. हलकासा पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा जाणवत होता. मधूनच ‘मी पण आहे’ याची जाणीव करून देण्यासाठी वाऱ्याची झुळूक ये-जा करत होती.

- रूपाली चाकणकर, rchakankar95@gmail.com

त्याग निरांजनातील वातीसारखा असतो. ती वात स्वतः जळते. इतरांना प्रकाश देते. रमाकाकूंनी हेच केलं. कुटुंबासाठी स्वतः वातीसारख्या जळल्या, इतरांना प्रकाश दिला आणि ज्यावेळेस त्यांची विश्रांतीची वेळ आली तेव्हा मात्र त्याच कुटुंबाने ‘तू आमच्यासाठी काय केलं’, या वाक्याने त्यांच्या आयुष्याला निरर्थक ठरवले.

दिवस मावळतीला निघाला होता. हलकासा पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा जाणवत होता. मधूनच ‘मी पण आहे’ याची जाणीव करून देण्यासाठी वाऱ्याची झुळूक ये-जा करत होती. सूर्य मावळताना त्याच्या तांबूस, लालसर, आल्हाददायक शांत छटा जणू या पृथ्वीतलावरील प्रत्येक निर्मितीला सांगत होत्या की, उगवतीचा प्रवास सुरू असताना कधीतरी मावळतीला जाणार आहोत. त्यावेळी परतीच्या क्षणाला आयुष्याचा हिशोब द्यावा लागेल, त्यासाठी आपल्यालाच आपले गणित मांडता आले पाहिजे.

ज्यात नात्यांच्या सन्मानाचा, आत्मविश्वासाचा, आनंदाचा, सुखाच्या क्षणांचा गुणाकार व्हावा. मत्सर, द्वेष, अहंकाराची वजाबाकी व्हावी. कर्तृत्वाची, आत्मसन्मानाची बेरीज होत जावी. बाकी शून्य उरावी, ती दुःख आणि वेदनेची... मनात हे आयुष्याचे गणित चहाच्या घोटाबरोबर सुरू असतानाच मला रमाकाकूंचा जोरात हाक दिल्याचा आवाज आला. मी वरच्या गॅलरीतून खाली आले. रमाकाकू समोर उभ्या... जवळच राहात. त्यामुळे येता-जाता बोलणं होतं. कार्यक्रमात भेटी-गाठी होत. अतिशय सधन घरातील, ‘हम दो हमारे दो’चे सुखी कुटुंब! मुलांचे शिक्षण, क्लासेस, पतीची नोकरी, पाहुणे, नातेवाईक, सणवार, घरातील सासू-सासरे, नणंद या सगळ्यांची जबाबदारी आनंदाने स्वीकारत छान मजेत आयुष्य जगत होत्या. येता-जाता मी समोर दिसले तरी हात हलवून प्रसन्न मुद्रेने स्मितहास्य करत. त्यांना पाहिले तरी प्रसन्न वाटे... पण आता त्या समोर उभ्या राहिल्यात त्या संपूर्ण कोसळल्यासारख्या. रडविले डोळे. उदास चेहरा. निस्तेज नजर... काय झालं काकू म्हणत त्यांना सोफ्यावर बसवलं.

इतक्या वर्षांच्या अनुभवावरून आता माणसं वाचता येतात. नेहमीप्रमाणे आनंदाच्या क्षणाचं आमंत्रण द्यायला नक्कीच नाही आल्या; पण जे काही घडलं असेल ते पेल्यातील निवळणारे वादळ तर नक्कीच नसेल म्हणून त्या आयुष्याच्या इतक्या अनुभवांच्या शिदोरीला डोईवरून बाजूला करत वेदनेला उत्तर देण्यासाठी आज आल्या असतील, म्हणून प्रश्नांची सरबत्ती न करता त्यांच्या हातात वाफाळलेला चहाचा कप देत मनाला जितका वेळ हवा तितका घेऊ देत शांत बसू दिले.

मग रमाकाकू सांगू लागल्या- कुटुंबासाठी चांगल्या पगाराच्या नोकरीचा त्याग केला, का? आणि कशासाठी? मुलं मोठी होऊन चांगल्या हुद्द्यावर जाऊन म्हातारपणात काठी बनतील या भाबड्या आशेनं की आयुष्याचा जोडीदार उतारवयात सावलीसारखा सोबत राहील या आशेने... मात्र त्या मागची आशा काहीच नव्हती, होते ते फक्त समर्पण!

रमाकाकूंनी त्या अनिश्चित काळात आपल्या पतीची भक्कम साथ केली. स्वतःची नोकरी सोडल्यानंतर कुटुंबासाठी उभ्या राहिल्या.. मुलांना अन्न, कपडेलत्ते तर कधी कमी पडले नाहीतच, कधीही शरीराची कुरकुर न सांगता त्या माऊलीने आपल्या मुलाबाळांच्या पदरात भरभरून प्रेम आणि बहुमोल शिक्षण दिले. मुले एका छताखाली शिकली, खेळली, मोठी झाली. त्यांनी जेवणे सोबत केली. एकत्र खेळले-बागडले. कुणालाच वेगळी खोली नव्हती. यापेक्षाही, आपल्याला वेगळी खोली गरजेची आहे, असे कुणाला कधी वाटलेही नाही. नंतर कुटुंब वाढले. घरात सुना आल्या. मुलांना नोकऱ्या चांगल्या लागल्या.. छोट्या रोपट्याचं वटवृक्ष झाल्यानंतर सावलीत बसण्याचा, आनंद उपभोगण्याची वेळ आली. मात्र आयुष्यभर ज्यांची भक्कम साथ दिली, मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी नोकरी त्यागली व राबराब राबली त्या मुलांनी आणि त्या जोडीदाराने ‘तू आमच्यासाठी काय केलं’, असं म्हणावं, यासारखे मोठे ते दुर्दैव कोणते?

म्हातारपणाची काठी म्हणून ज्यांच्याकडे पाहत होते ती काठी क्षणात मोडली आणि उतारवयात ज्यांच्या सावलीची खरी गरज होती ती सावली क्षणात गायब झाली. सर्रकन सगळे आयुष्य डोळ्यांसमोरून निघून गेले. डोळे पाण्याने भरले... आणि काय माझ्याकडून चूक झाली की, या माझ्याच कुटुंबाने मला विचारावे, तू आमच्यासाठी काय केले? जर मी नोकरी सोडली नसती तर मुलांवर संस्कार करू शकले नसते, घरात लक्ष कमी झाले असते. नोकरी करून आयुष्यभराची पुंजी जमवली असती आणि त्याच पुंजीवर आज जगले असते. कदाचित मुलांची आणि पतीची गरजही नसती भासली; पण पैशांच्या पुंजीवर जगण्यापेक्षा कुटुंबाच्या प्रेमावर जगण्याला मी प्राधान्य दिलं. त्याचेच मला हे फळ भेटले की काय, असा प्रश्न उभा राहिला, म्हणून मी तुझ्याकडे आली आहे. मला न्याय दे! माझं दुःख या निळ्या आभाळापेक्षा मोठं नाही, तर त्या खोल समुद्राच्या तळापर्यंतचं आहे. जे कधीच भरून निघू शकत नाही.

तेव्हा त्यांच्याकडे मी पाहत होते. मला आठवले की, आपल्याला शाळेत असताना पदावली (पॉलिनॉमीयल्) सोडवण्याची उदाहरणे असत. त्यासाठी सूत्र होते ‘कं चे भा गु बे व’! तेच आयुष्याचेही सूत्र आहे. संकटाच्या आणि सुखाच्या अनेक पदांनी गुंफलेली पदावली म्हणजे आयुष्य! आपल्या भोवतीचे अहंकाराचे कंस प्रथम सोडवावे लागतात. कोण कोणा‘चे’ आणि कोण आपले हे ‘चे’, अहंकाराचा कंस काढल्याशिवाय कळत नाही. ते कळले की, चांगल्या-वाईटाचा भागाकार करून नंतर सद्‍गुणांचा गुणाकार करावा लागतो. हाती आलेल्या सद्‍गुणांची बेरीज करताना, हलकेच चुकून, अंगाशी आलेल्या दुर्गुणांची वजाबाकी केली की जीवनाचा मार्ग सुकर होतो; परंतु हे सगळे हाती येण्यास आयुष्याचे गणित सोडवण्याची खूप प्रॅक्टिस करावी लागते. कदाचित आयुष्याचे गणित सोडवताना रमाकाकूंची प्रॅक्टिस खूप झाली असेलही; पण जेव्हा आपलेच अहंकाराच्या कंसाला बिलगुण बसतात तेव्हा मात्र आयुष्याची पदावली चुकल्यासारखे वाटते.

कुटुंब म्हणजे ‘पिवळा पीतांबर’सारखी उघड पुनरुक्ती आहे. कुटुंब असते ते एकत्रच असते. सुटी माणसे होतात.

जगभरात मोठे कुटुंब ही संस्था, ज्यात आडव्या आणि उभ्या दोन्ही शाखांचा विस्तार नांदतो आहे अशा डेरेदार वृक्षासारखी, हळूहळू नामशेष होते आहे. माणसाला सहवासाहून एकांत अधिक आवडू लागला. ‘शेअरिंग’पेक्षा ‘प्रायव्हसी’ जास्त महत्त्वाची वाटू लागली. कुटुंबाचा पाया डळमळायला लागला. आधी एकाच पिढीतली, मग कालांतराने पुढच्या पिढ्यांतलीही मंडळी वेगळी निघायला लागली. झाकली मूठ उघडून सुटी बोटे चोहीकडे पांगावीत आणि सव्वा लाखाचे नुकसान झालेले कुणाच्या ध्यानात येऊ नये, असे काहीसे झाले.

‘तिने घरासाठी किती त्याग केला’ हे वाक्य आपल्या कानावर कायम पडत असते. त्याचा अर्थही लक्षात येतो; पण त्या मागची नेमकी भूमिका साऱ्यांनाच समजते असं नाही. त्याग म्हणजे सोडणे हा शब्दकोशातील अर्थ फारच सपाट आणि गुळगुळीत आहे. त्यात त्यागाचे गांभीर्य नाही. लहानपणी पाऊस पडताना रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात कागदाची होडी करून आम्ही सोडत असू. ते सोडणं म्हणजे त्याग नव्हे.

त्याग दोन प्रकारे केला जातो. खाजगी, कौटुंबिक कारणांसाठी! कुटुंबातील एखादी व्यक्ती स्वतःच्या सुखाचा त्याग करते तो त्याग असतो. मात्र त्या त्यागाशी समाजाचा, देशाचा, ध्येयाचा संबंध असत नाही. शिवाय ज्यांच्यासाठी त्या व्यक्तीने त्याग केला असेल ते कृतज्ञ राहतीलच, याची खात्री नसते.

त्याग निरांजनातील वातीसारखा असतो. ती वात स्वतः जळते. इतरांना प्रकाश देते. रमाकाकूंनी हेच केलं. कुटुंबासाठी स्वतः वातीसारख्या जळल्या, इतरांना प्रकाश दिला आणि ज्यावेळेस त्यांची विश्रांतीची वेळ आली तेव्हा मात्र त्याच कुटुंबाने ‘तू आमच्यासाठी काय केलं’, या वाक्याने त्यांच्या आयुष्याला निरर्थक ठरवले.

आकाशात उंच गेलेला झोका कधीतरी खाली येणार आहे आणि आपल्याही आयुष्याची सांजवेळ होणार आहे, म्हणूनच आयुष्याची सांजवेळ होताना ‘तू आमच्यासाठी काय केलं’ या प्रश्नाने अगतिक होऊन डोळ्यांतून अश्रू वाहण्यापेक्षा, माझ्या माऊलीने थोडंसं सावध व्हावं, आपलं आपल्याला कोणापुढे लाचार न होता सन्मानाने जगता यावं, यासाठीची तुटपुंजी का होईना, स्वतःची कष्टाच्या बटव्यातील थोडी पुंजी शिल्लक असावी... त्यामुळे फार आधार नाही मिळाला तरी जगण्याचा आत्मसन्मान नक्कीच मिळेल... चला जगू या थोडं स्वतःसाठी...

सोडवत बसलो गणित नाही..

विचार केला अन्य.

आयुष्याच्या जमाखर्चात..

बाकी राहिली शून्य.

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com