जी. टी. रोड : एक मर्डर, एक कहाणी (भाग -2) (एस.एस. विर्क)

एस.एस. विर्क
Sunday, 9 June 2019

जेव्हा त्यांच्या बोलण्यात रुदरपूरचा उल्लेख आला, तेव्हा या खुनाच्या संदर्भात या गावाचं नाव ऐकल्यासारखं वाटल्यानं मी माझी डायरी काढली. काउंटी पोलिसांचे अधिकारी बॉयर आणि लेकर यांच्या बोलण्यात रुदरपूरचं नाव आल्याचं माझ्याकडं नोंदलेलं होतं. त्यामुळे ते नाव ओळखीचं वाटत होतं.

जेव्हा त्यांच्या बोलण्यात रुदरपूरचा उल्लेख आला, तेव्हा या खुनाच्या संदर्भात या गावाचं नाव ऐकल्यासारखं वाटल्यानं मी माझी डायरी काढली. काउंटी पोलिसांचे अधिकारी बॉयर आणि लेकर यांच्या बोलण्यात रुदरपूरचं नाव आल्याचं माझ्याकडं नोंदलेलं होतं. त्यामुळे ते नाव ओळखीचं वाटत होतं.

कधी ना कधी खुनाला वाचा ही फुटतेच. सध्याच्या काळात, लोकशाही प्रणालीत जिथं कायद्यासमोर सगळे समान असतात, अशा काळात अशी कृत्यं लपून-दडून राहू शकत नाहीत.
मध्ययुगात "बळी तो कान पिळी' ही परिस्थिती सर्वमान्य असायची. कारण, त्या काळातल्या सत्ताधीशांना, बलदंडांना कायदेकानून लागूच नसायचे; पण लोकशाही पद्धतीनं या परिस्थितीत बदल घडवून आणला. लोकशाही व्यवस्थेच्या लेखी हत्या हा गंभीर गुन्हा आहे. याला कदाचित अपवाद असेल तर तो जीव घ्यायला अथवा द्यायला सदैव तयार असणाऱ्या कवी आणि शायरांचाच! अशा जीवघेण्या परिस्थितीलाही हे कवी काही वेळा किती नाजूक, प्रेमभऱ्या वळणावर नेऊन ठेवतात पाहा -
मिर्झा गालिब यांनी लिहिलं होतं ः
की मेरे कत्ल के बाद उसने जफ़ा से तौबा
हाय उस ज़ूद पशेमॉं का पशेमॉं होना
प्रसिद्ध पंजाबी कवयित्री सुखविंदर अमृत म्हणतात ः
तडपती लाश है अब तक, वो कुछ ज़ख्म और दे देता,
मेरे नादान कातिल को, मेरा पैगाम लिख देना
एखाद्या सामान्य, निष्पाप व्यक्तीच्या नाहक हत्येकडं सध्याचा समाजही डोळेझाक करतो, यावर दुःख व्यक्त करताना आणखी एक पंजाबी कवी म्हणतो ः
"बेगुनाह दे कत्ल दा, कितना कु पैंदा मुल है
दो घडी श्रद्धांजली है, दो घडी हडताल है'
""सर, दिल्लीहून गृहमंत्रालयातून फोन आहे,''
- माझ्या सहकाऱ्याच्या शब्दांनी माझी काव्यतंद्री भंगली. सरकारमधल्या वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या अधिकाऱ्यांना माझ्याशी बोलायचं होतं.
मी फोन घेतला. सर्वात आधी गृहसचिव फोनवर होते.

""हॅलो विर्क, काल ब्रिटिश खासदार कीथ वाज़ यांनी माझी भेट घेतली. पंजाबमधल्या एका एनआरआयच्या हत्येच्या तपासाबाबत ते खूप नाराज आहेत. पंजाब पोलिस तपासाबाबत पुरेसे गंभीर नाहीत. असं त्यांचं म्हणणं आहे. खऱ्या गुन्हेगारांना पोलिस पाठीशी घालत आहेत, अशी त्या हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची भावना झाली आहे,'' ते म्हणाले.

""सर, त्यांचा रोख अमरसिंग हत्याप्रकरणाकडं आहे का?'' मी विचारलं.
गृहसचिवांना आश्‍चर्य वाटलेलं दिसलं.
""तुम्हाला कसं माहीत?'' त्यांनी विचारलं.
""सर, खुनाच्या तेवढ्या एकाच प्रकरणाचा अद्याप तपास लागलेला नाही. आम्ही आमच्या बाजूनं सगळे प्रयत्न करतो आहोत. आम्ही त्यांच्या गावातल्या विरोधी गटातल्या काही लोकांना अटक करावी अशी त्या एनआरआय व्यक्तीच्या कुटुंबीयांची इच्छा आहे आणि आम्ही ते करत नसल्यानं ते नाराज आहेत; पण आमच्या मते त्यांना ज्यांचा संशय आहे, त्या लोकांचा खुनाशी काहीच संबंध नाहीये,'' मी म्हणालो.
अमरसिंग हत्याप्रकरणात आम्ही ब्रिटिश काउंटी पोलिसांच्याही संपर्कात आहोत, हेदेखील मी त्यांना सांगितलं.

"या प्रकरणाबद्दल तुम्ही मला माहिती देत राहा', असं सांगून गृहसचिवांनी फोन ठेवला.
काही दिवसांनी मी गृहसचिवांना भेटून त्यांना या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाची माहिती दिली. काउंटी पोलिसांचे दोन अधिकारी आमच्या मदतीसाठी भारतात आल्याचं समजल्यावर त्यांनाही आश्‍चर्य वाटलं. या हत्येच्या तपासात आम्ही कोणत्याही शक्‍यतेकडं दुर्लक्ष करत नसल्याचंही मी त्यांना सांगितलं. ""पण त्या कुटुंबाचा काही लोकांवर संशय असेल तर तुम्ही त्या लोकांना अटक का करत नाही?'' त्यांनी विचारलं.
""सर, त्या लोकांना अटक करणं अवघड नाही; पण जेव्हा खरे गुन्हेगार पकडले जातील तेव्हा काय होईल? एकाच गुन्ह्यात दोन वेगवेगळ्या लोकांना आरोपी म्हणून अटक झाली तर खरे गुन्हेगार त्याचा फायदा घेतील. आम्ही मारेकऱ्यांपर्यंत पोचतो आहोत, लवकरच आम्ही त्यांना गजाआड करू,'' गृहसचिवांना सांगितलं. काहीतरी संदिग्ध, तथ्यहीन राजकीय आरोपांमुळे आमच्या तपासावर परिणाम व्हावा, अशी माझी मुळीच इच्छा नव्हती.
जालंधरच्या आयजींनी आणि डीआयजींनी या हत्येचा छडा लावण्याचा चंगच बांधला होता. दोघंही निष्णात पोलिस अधिकारी होते. योग्य पद्धतीनं या प्रकरणावर जरा अधिक मेहनत केल्यास खुनाचा तपास लागेल असं त्या दोघांनाही वाटत होतं. संपूर्ण गुन्ह्याचा, गुन्हा घडला त्या ठिकाणाचा अभ्यास करून दोघंही भरपूर वेळ काढून एक दिवस "गोकुळ' ढाब्यावर पोचले. ज्या टेबलावर अमरसिंग यांनी जेवण केलं होतं, तिथंच बसून त्यांनी ढाब्याच्या परिसराची पुन्हा नीट पाहणी केली. ज्या ठिकाणी अमरसिंग यांच्यावर हल्ला झाला होता, त्या नळावरच हात धुऊन त्यांनी चहा सांगितला.

"काही वेळानं जवळच्या लामा पिंड गावातले काही लोक आपल्याला भेटायला इथं येणार आहेत', असं सांगत त्यांनी ढाब्याच्या मालकाकडं त्या गावाची चौकशी केली.
""इथं जवळच आहे. लिंक रोडवरून चार किलोमीटरवर आहे,'' ढाब्याच्या मालकानं माहिती पुरवली. ""पण साहेब, त्या गावाची ख्याती काही फार चांगली नाही, गुन्हेगारीसाठी कुख्यात आहे गाव ते. त्या गावात काय काम काढलंत?'' मालकानं चौकशी केली. आपण पोलिस अधिकारी असल्याचे आयजींनी सांगितल्यावर मालक म्हणाला ः ""मला वाटलंच होतं की तुम्ही पोलिसातले असणार म्हणून; माझे वडीलही पंजाब पोलिसात एएसआय होते,'' ढाब्याचा मालक आता जरा मोकळा झाला होता. आयजी, डीआयजीही त्याच्याशी आणखी काही विषयांवर गप्पा मारायला लागले.
""काही दिवसांपूर्वी या भागातल्या एका ढाब्यावर एक खूनही झाला होता,'' आयजींनी विषयाला हात घातला.
""जनाब, याच ढाब्यावर झाला होता तो खून. ज्या माणसाला मारलं तो म्हातारा याच टेबलावर बसला होता. जेवण झाल्यावर बिल देऊन, हात धूत असतानाच पैलवान दिसणाऱ्या काही तरुण मुलांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. ती सगळी पोरं एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आली होती. त्या माणसाला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथून लुधियानाला नेत असताना वाटेतच त्यानं प्राण सोडला. हे सगळं खूप थोड्याच वेळात घडलं. हल्ला करून ती मुलं आली तशी वेगानं नाहीशीही झाली,'' मालकानं माहिती दिली.
""पण, इथून सगळं नीट दिसलं असणार. तुम्ही त्या काळ्या स्कॉर्पिओचा नंबरही पाहिला असणार,'' आयजींनी विचारलं.
""साहेब, आम्ही छोटी माणसं. आम्ही कशाला त्या गुंडांच्या नादी लागू? आम्ही मग पोलिसांना सांगितलं की आम्ही काहीच पाहिलं नाही, आम्हाला काहीच माहीत नाही,'' मालक म्हणाला.
""हां पण, आमचा एक वेटर आहे अशोकी म्हणून, त्यानं त्या गाडीचा नंबर पाहिला होता. त्यानं मला सांगितलाही होता; पण मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं.''
""कुठं आहे तो वेटर?'' आयजींनी विचारलं
""साहेब, तो किरकोळ चोऱ्या करायचा म्हणून मीच त्याला कामावरून काढलं; पण तो इथं जवळच "जुगनू दा ढाबा' आहे तिथं आता काम करतो.''
""आम्हाला त्याला भेटायचंय. तुम्ही कुणाला तरी आमच्या टीमबरोबर द्या, ते जाऊन त्या अशोकीला इथं घेऊन येतील,'' आयजी म्हणाले.
लगेचच काही पोलिस "गोकुळ' ढाब्यावरच्या एका माणसाला घेऊन पोलिसांच्याच एका गाडीतून अशोकीला आणायला गेले. ""साहेब, खरं सांगू का, आत्ता खुनाचा खरा तपास सुरू झाल्यासारखा वाटतोय,'' तो ढाबामालक म्हणाला ः ""आतापर्यंत वरवरचं काहीतरी चाललं होतं.''

अशोकी आल्यावर आयजींनी अगदी मोकळेपणाने हसून त्याचं स्वागत केलं. "अशोकी, त्या गाडीचा नंबर टिपून तू उत्तम काम केलं आहेस. आम्ही त्यासाठी तुला बक्षीस देणार आहोत. काय नंबर होता तो, आठवतंय का तुला?'' आयजींनी विचारलं.
""साहेब, मी त्या नळाजवळच उभा होतो. तितक्‍यात ती काळी स्कॉर्पिओ आली. त्यातल्या लोकांनी हात धूत असलेल्या त्या माणसावर हल्ला केला. तो माणूस खाली पडला. मी त्या गाडीजवळच उभा होतो आणि अगदी व्यवस्थित तो नंबर पाहिला होता. मी मालकांना नंबर सांगितला; पण ते माझ्यावरच ओरडले आणि मला गप्प बसायला सांगितलं. तिथं गल्ल्याजवळच काही हिशेबाच्या वह्या पडल्या होत्या. बाबूजी मलाच ओरडल्यानं मी तो नंबर त्यातल्या एका वहीवर बाहेरच्या बाजूला लिहून ठेवला होता,'' अशोकी म्हणाला.
त्यानं मग सगळ्या वह्या चाळून त्यातल्या एका वहीच्या बाहेरच्या बाजूला लिहून ठेवलेला गाडीचा नंबरही आयजींना दाखवला. आयजींनी अशोकीला तिथल्या तिथं दोन हजार रुपये बक्षिस दिलं. गाडीचा नंबर आता त्यांच्या हातात होता; पण अजून खूप काम बाकी होतं.
हल्लेखोरांनी वापरलेल्या गाडीची नोंदणी हरियानातल्या भिवानी जिल्ह्यात झालेली होता. नंबरवरून गाडीच्या मालकाचा शोध घ्यायचा होता. एक टीम लगेच त्या गाडीमालकाचा शोध घ्यायला पाठवण्यात आली. गाडीचा मालक भिवानीतच सापडला; पण सहा महिन्यांपूर्वीच त्यानं ती काळी स्कॉर्पिओ जिंद जिल्ह्यातल्या एकाला विकली होती. मग जिंदमध्ये चौकशी केली. ती विकत घेणाऱ्यांनीही तीन महिन्यांपूर्वीच ती गाडी फगवाडा जवळच्याच रुदरपूर (रुद्रपूर) गावातल्या एकाला विकली होती. हरियानातली ती गाडी अशी पंजाबमध्ये आली होती. त्या गाडीच्या सध्याच्या मालकाचा तपास आता सुरू होता.

नव्यानं मिळालेल्या या माहितीच्या आधारे सुरू असलेल्या तपासाबद्दल आयजी वेळोवेळी मला माहिती देत होते. जेव्हा त्यांच्या बोलण्यात रुदरपूरचा उल्लेख आला, तेव्हा या खुनाच्या संदर्भात या गावाचं नाव ऐकल्यासारखं वाटल्यानं मी माझी डायरी काढली. काउंटी पोलिसांचे अधिकारी बॉयर आणि लेकर यांच्या बोलण्यात रुदरपूरचं नाव आल्याचं माझ्याकडं नोंदलेलं होतं. त्यामुळे ते नाव ओळखीचं वाटत होतं. अमरसिंग यांची सून प्रीती तिच्या नवऱ्यापासून वेगळी झाल्यावर तिच्या योगेश नावाच्या प्रियकराबरोबर राहत होती. हा योगेश रुदरपूरचा होता. गाडीचा सध्याचा मालक रुदरपूरचा होता, त्यामुळे प्रीती आणि तिचा प्रियकर योगेश यांच्याबरोबर त्याचा काहीतरी संबंध असण्याची शक्‍यता होती. आयजींनी आणि डीआयजींनी गुन्हा घडला त्या जागी जाऊन, वेळ काढून माहिती काढल्यामुळे एका झटक्‍यात सगळाच कट उघडकीस येत होता. मी म्हटल्यानुसार, 72 तासांपेक्षाही कमी वेळात हे शक्‍य झालं होतं. हे सांगताना ते दोघंही खूप खूश होते. आता ते पुढच्या तपासाला लागले होते. कट कसा शिजला? प्रत्यक्ष तो कसा अमलात आला? जे सगळे या गुन्ह्यात सामील होते त्यांना कशी कशी माहिती दिली गेली होती, या सगळ्याविषयी ते आता माहिती घेत होते.

योगेश रुदरपूरच्या एका चांगल्या कुटुंबातला, उच्चशिक्षित, दिसायला रुबाबदार असा तरुण होता. स्टुडंट व्हिसावर लंडनमध्ये शिकत असताना त्याची
प्रीतीबरोबर ओळख झाली. प्रीती त्या वेळी तिचा पती अमनबरोबर राहत नव्हती. अमन तिला मारहाणही करायचा. तिला घटस्फोट हवा होता. तिनं कोर्टात केसही दाखल केली होती; पण अमननं तिला घटस्फोट द्यायला अमरसिंग यांचा विरोध होता. त्यामुळे योगेश आणि ती "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते. प्रीती ही ब्रिटिश नागरिक असल्यानं तिला घटस्फोट मिळून तिच्याबरोबर लग्न झालं तर योगेशच्या दृष्टीनं ती ब्रिटनमध्ये सेटल होण्याची उत्तम संधी होती; पण त्याची ही इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा अमरसिंग हे होते आणि ते जिवंत असेपर्यंत प्रीतीबरोबर लग्न करून सेटल होणं योगेशला शक्‍य वाटत नव्हतं.
अमरसिंग भारतात जात आहेत, हे समजल्यानंतर योगेशनं प्रीतीला रुदरपूरमधल्या त्याच्या भावांची माहिती दिली. ते फगवाडा परिसरातले नावाजलेले पहिलवान होते. रुदरपूरमध्ये त्यांचा एक आखाडाही होता. आपल्या भावाला सांगून अमरसिंग यांना थोडी दमदाटी करण्याची, भीती दाखवण्याची व्यवस्था आपण करू शकतो, असं योगेशनं प्रीतीला सांगितलं; पण अमरसिंग यांना थोडी मारहाण करून भीती दाखवायला गेलेल्या त्याच्या भावांच्या आखाड्यातल्या तरुण पहिलवानांनी हाताबाहेर जात अमरसिंग यांच्यावर हल्ला केला. अंतर्गत जखमांमुळे अमरसिंग यांचा मृत्यू ओढवला. अमरसिंग यांना मारून टाकण्याचा त्यांचा हेतू नव्हता; पण घडलं मात्र तेच.
तपास अधिकाऱ्यांनी योगेशच्या दोन सख्ख्या भावांना, तीन चुलतभावांना आणि हल्ल्यात सहभागी झालेल्या त्यांच्या काही मित्रांना अमरसिंग यांच्या खुनाबद्दल अटक केली. हत्येचा कट, प्रत्यक्ष हल्ला, हल्ला झाल्यानंतर योगेश आणि प्रीतीला झालेले फोन असा प्रचंड तांत्रिक पुरावा त्या सगळ्यांच्या विरुद्ध होता. एकमेकांबरोबर झालेल्या त्यांच्या संभाषणांचं रेकॉर्डिंग आणि कॉल डेटा रेकॉर्ड मिळवण्यात आम्हाला काउंटी पोलिसांचीही बरीच मदत झाली.

गुन्ह्यात वापरलेली ती काळी स्कॉर्पिओही जप्त करण्यात आली. आरोपींना अनेकांनी पाहिलं होतं, त्यांनी खटल्यादरम्यान आरोपींना ओळखलंही. योगेशच्या दोन भावांना न्यायालयानं दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली, आणखी दोघा आरोपींना थोड्या कमी मुदतीच्या शिक्षा झाल्या. प्रीती आणि योगेशवर इंग्लंडमध्ये खटला चालला. खटल्याचा निकाल लागल्यावर आम्ही ब्रिटिश खासदार कीथ वाज़ यांनाही गृहसचिवांमार्फत आमच्या यशस्वी तपासाची आणि या हत्येत कुटुंबातल्याच एका सदस्याचा हात असल्याची माहिती पाठवली. ज्या पद्धतीनं तपास झाला त्याबद्दल काउंटी पोलिसांनीही समाधान व्यक्त केलं.
गुन्हा उघडकीस आला, आरोपी पकडले गेले, त्यांना शिक्षाही झाली; पण त्यात कुणाचा काय फायदा झाला? मला विचाराल तर कुणाचाच काहीच फायदा झाला नाही. अमरसिंग यांच्या हत्येच्या प्रकरणाचा मी जेव्हा विचार करतो, त्या वेळी एका कवीच्या या दोन ओळी मला आठवतात -
कत्ल मुझ को कर के वो तो हो गये मुत्मईन
लेकिन अपने खून की हर बूँद मे जिंदा हूँ मैं
बाकी, खुनाच्या या कहाणीतून काय धडा मिळाला, काय उमगले, याचा विचार वाचकांनीच करावा.

(उत्तरार्ध)
(या लेखाचा इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी हक्क लेखकाकडं आहे.)

(ही कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र, काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: s s virk write in and out crime article in saptarang