गुन्हेगारांपर्यंत पोचवणारे खबरे (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

मी मागं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गुन्ह्याची एक स्वतंत्र कथा असते. तशी गुन्ह्यांच्या तपासाचीही स्वतंत्र कथा असते. त्याचं एक स्वतंत्र तंत्र असतं. गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हेगाराचीच मदत घ्यायची हा त्या तंत्राचा एक भाग. चोराच्याच मदतीनं चोराचा माग काढण्याची ही क्‍लृप्ती ब्रिटिश पोलिस अधिकारी खूपदा वापरायचे, हे मी पूर्वी सांगितलंच. ब्रिटिश पोलिस दलातले हे अधिकारी वेगळ्या, दूरच्या प्रदेशातून आलेले. इथल्या लोकांची भाषा, संस्कृती, रीती-रिवाज प्रयत्नपूर्वक समजून घेणारे. अत्यंत मेहनतीनं त्यांनी त्यांचं असं एक तंत्र विकसित केलं होतं. त्यांनी लिहून ठेवलेल्या तपासांच्या हकीकतींचा अभ्यास करताना मीदेखील अशा मुखबीरांची मदत घेतली. गुन्हेगारीच्या क्षेत्रात वावरणाऱ्या या लोकांमुळे गुन्ह्यांमागच्या "हातां'च्या आणि "मेंदूं'विषयीच्या माझ्या आकलनातही भर पडत गेली. जळगावातल्या बॅंकेत झालेल्या चोरीचा छडा लावण्यासाठी आम्हाला अशाच एका गुन्हेगाराची मदत झाली. कुष्ठरुग्ण असलेल्या शांतारामची त्या तपासापासून मदत सुरू झाली आणि नंतरही सुरू राहिली. माझी जळगावातून बदली झाल्यानंतरचा आणखी एक प्रसंग सांगतो आणि ही गोष्ट पुरी करतो.

आम्ही बॅंकेतल्या त्या चोरीचा शोध लावला तेव्हा माझी बढती जवळ आली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून तुम्हाला फील्डवर काम करण्याची तुलनेनं अधिक संधी असते. एकदा अधीक्षक म्हणून संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आल्यानंतर मग कार्यालयीन कामांनाही तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो. हा मुद्दा लक्षात घेऊन बढतीपूर्वी कामातले अधिकाधिक बारकावे समजून घेण्याचा माझा प्रयत्न असायचा. अशातच मला बदलीचा आदेश मिळाला.

मला पदोन्नती मिळाली. आता माझी नेमणूक झाली होती शेजारच्याच औरंगाबाद जिल्ह्यात. आता मी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक झालो होतो. औरंगाबाद जिल्हा आकारानं खूप मोठा होता. जिल्ह्याच्या काही भागात दरोडे आणि लूटमारीचे प्रकार होत असत. अशा घटनांचा तपास लावणं हेदेखील एक आव्हान असायचं. माझ्याकडं गुन्हे शाखेची आणि काही प्रशासकीय कामांची जबाबदारी होती. जबाबदारी महत्त्वाची असली तरी कामाचं ओझं मात्र वाटायचं नाही. एस. राममूर्ती तेव्हा आमचे जिल्हा पोलिस अधीक्षक होते. खात्यात ते मला तेरा वर्षांनी वरिष्ठ. अत्यंत उमदे, मेहनती आणि कुशल अधिकारी. त्या वेळी ते पोलिस उपमहानिरीक्षक पदावरच्या (डीआयजी) बढतीच्या प्रतीक्षेत होते. जिल्हा पोलिस दलावर त्यांची उत्तम पकड होती. रोज सायंकाळी चार वाजता आम्ही चहापानासाठी भेटायचो. त्या भेटीत कामाबद्दल चर्चा व्हायची. वेगवेगळ्या परिस्थितीत निर्णय घेण्यापासून ते एखाद्या समरप्रसंगाच्या हाताळणीपर्यंत अनेक बाबी आणि मुख्य म्हणजे नेतृत्वगुण मी त्यांच्याकडून शिकलो.

औरंगाबाद हे विभागीय मुख्यालयाचं शहर असल्यानं तिथं भारतीय प्रशासकीय आणि पोलिस सेवेतले इतरही बरेच अधिकारी होते. काहीजण उपविभागीय अधिकारी म्हणून काम करत होते, तर काही प्रशिक्षणार्थी होते. त्यांच्यातल्या काहींशी माझी उत्तम मैत्री झाली. त्या वेळच्या त्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांमध्ये एक होते जयंत उमराणीकर. सन 1973 च्या तुकडीतले अधिकारी. अत्यंत प्रसन्न आणि मैत्रीपूर्ण स्वभावाच्या जयंत यांचं त्या वेळी जिल्हा स्तरावरच्या कामकाजाचं प्रशिक्षण सुरू होतं.
कामाच्या निमित्तानं ते बऱ्याचदा पोलिस अधीक्षक कार्यालयात असायचे. एक दिवस जयंत माझ्या ऑफिसमध्ये बसले असताना शिपायानं खासगी पत्रांचा गठ्ठा असलेली एक फाईल आणून दिली. त्यातलं एक पत्र शांताराम भिकू जैनचं होतं. मी ते लगेचच उघडलं. पत्राच्या सुरवातीच्या "दुआ-सलाम'नंतर "जळगावातून तुमची बदली झाल्यानंतर माझ्याकडं कुणीच लक्ष देत नाही...मी दिलेल्या माहितीकडंही दुर्लक्ष केलं जातं' वगैरे शांतारामनं लिहिलं होतं. पत्र वाचतानाची माझी प्रतिक्रिया पाहून जयंत यांनी उत्सुकतेपोटी, कुणी आणि काय लिहिलंय, अशी चौकशी केली. मग मी त्यांना जळगावमधल्या बॅंकेत झालेल्या चोरीची आणि शांतारामच्या मदतीनं तो गुन्हा आम्ही कसा उघडकीस आणला त्याची सगळी तपशीलवार कथा सांगितली. जवळजवळ तासभर आम्ही बोलत होतो. जयंत खूप प्रश्न विचारत होते आणि मी त्यांना तपशील सांगत होतो. सगळी गोष्ट सांगून झाल्यानंतर तो विषय तिथंच थांबला.
थोड्याच दिवसांत जयंत यांना पदोन्नती मिळाली आणि त्यांची दुसरीकडं बदली झाली. माझीही बदली झाली. औरंगाबादहून मी गेलो वऱ्हाडात यवतमाळला. तो भाग तसा आतला होता. रेल्वे वगैरेही नव्हती. त्यामुळे त्या तीन वर्षांत माझ्या हिंडण्या-फिरण्यावर मर्यादा आल्या. यवतमाळच्या बाहेर क्वचितच जाणं व्हायचं. त्यामुळे जयंत यांच्याशी क्वचितच गाठ पडायची. त्यानंतर जयंत प्रतिनियुक्तीवर दिल्लीत मंत्रिमंडळ सचिवालयात गेले आणि माझी बदली आधी पुणे शहरात आणि नंतर नगरला झाली. काही काळानंतर जयंत नव्या नियुक्तीवर परदेशात गेले, त्यानंतर मात्र बराच काळ त्यांची भेट नव्हती.

पुढं मला पंजाबमध्ये पाठवण्यात आलं. तिथं पहिल्यांदा मला पोस्टिंग मिळालं ते जालंधर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून. नंतर माझी बदली झाली अमृतसरला. त्यानंतर मी केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) रुजू झालो. अमृतसरमधलं कॅनाल रेस्ट हाऊस हे त्या वेळी आमचं हेडक्वार्टर होतं. तिथल्याच एका खोलीत मी काही वर्षं राहतही होतो. सीआरपीएफचे महानिरीक्षक (आयजी) के. पी. एस. गिल हेदेखील तिथंच राहत असत. बाजूच्या अन्य काही खोल्यांमध्ये आमची काही ऑफिसेस, एक नियंत्रणकक्ष वगैरे होतं. सतत कुठली ना कुठली मोहीम सुरू असल्यानं मी शांतता वगैरे विसरूनच गेलो होतो.
एक दिवस आम्हाला एक निरोप मिळाला. इस्लामाबादच्या भारतीय दूतावासातले एक अधिकारी एका रात्रीपुरते अमृतसरमध्ये थांबणार होते. त्यांच्या राहण्याची आणि सुरक्षिततेची व्यवस्था करण्याबाबतचा तो निरोप होता. ते अधिकारी होते जयंत उमराणीकर. "मी अमृतसरमध्येच आहे आणि उमराणीकर माझ्याच बरोबर कॅनाल रेस्ट हाउसमध्ये राहतील,' असा उलट निरोप मी लगेचच दिला.
इतक्‍या वर्षांनंतर जयंतना भेटणं हा खूप सुखद अनुभव होता. आम्ही खूप गप्पा मारल्या. माझ्या-त्यांच्या आठवणींची, अनुभवांची देवाण-घेवाण झाली. महाराष्ट्रातल्या जुन्या दिवसांच्या आठवणी निघाल्या. अचानक त्यांनी विचारलं ः ""तुम्हाला तो शांताराम भिकू जैन आठवतो का?''
चांगला खबरी म्हणून तो माझ्या लक्षात होताच. मग जयंत यांनी मला शांतारामच्या कथेचा पुढचा भाग सांगितला.

औरंगाबादनंतर जयंत जळगावला उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून रुजू झाले. एक दिवस तिथल्या धान्यबाजारात एका व्यापाऱ्याची कापडी पिशवी कापून चोरट्यानं 40 हजार रुपये लांबवले. पिशवी ब्लेडनं व्यवस्थित कापून पैसे पळवण्यात आले होते. चोरीविषयी कळल्यावर सर्व पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पोचले. तिथं जयंतना मी सांगितलेली शांतारामची गोष्ट आठवली. त्यांनी स्थानिक डीबीच्या लोकांना दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकरणात मदत करणाऱ्या, कुष्ठरुग्ण असलेल्या व्यक्तीविषयी विचारलं. त्यांनी लगेचच शांतारामला हजर केलं. "तुझ्याविषयी मला विर्क यांच्याकडून माहिती मिळाली आहे आणि आवश्‍यकता भासली तर तुम्ही शांतारामची मदत घेऊ शकाल' असं त्यांनी मला सांगितलं आहे,' असं जयंत यांनी शांतारामला सांगितल्यावर तो जरा खुलला. "साब, ये भी भुसावल में ही मिलेंगे,' असं सांगत शांतारामनं त्यांना पोलिस पार्टी तयार करायला सांगितली.

आधीच्या सारख्याच दोन पोलिस टीम शांतारामला घेऊन तातडीनं भुसावळला गेल्या. तिथं त्यांनी रेल्वे स्थानक परिसरातले काही लॉज शोधले. अखेरीस एका लॉजमध्ये शांतारामच्या मदतीनं ते दोघं सापडले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडं सगळी रक्कम (40 हजार रुपये) जशीच्या तशी सापडली. काही दागिने आणि त्या व्यापाऱ्याची कागदपत्रंही त्यांच्याकडं सापडली. शांतारामनं पुन्हा एकदा पोलिसांना यश मिळवून दिलं होतं. नव्या पोस्टिंगमध्ये पहिलाच मोठा गुन्हा उघडकीस आणल्याचा जयंतना खूप आनंद झाला होता. केलेल्या मदतीबद्दल आपल्याला काही पारितोषिक आणि प्रमाणपत्र मिळावं, अशी शांतारामची इच्छा होती. जयंत यांनी ती पूर्ण केली. त्या व्यापाऱ्यानंही शांतारामला चांगलंसं इनाम दिलं.

शांतारामची गोष्ट इतक्‍या विस्तारानं सांगायचं कारण म्हणजे, चोरीच्या आणि लूटमारीच्या प्रकारांचा छडा लावण्याच्या काही पारंपरिक पद्धती आहेत. असे प्रकार शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जुने सराईत गुन्हेगार किंवा त्यांच्या टोळ्यांमधले तुमचे खबरे, जे पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोचण्यास मदत करतात; पण हे सहजी घडत नाही. कारण, इथं तुम्ही एकटे नसता, तुमच्याबरोबर तुमच्याच पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची टीमही असावी लागते. त्याशिवाय मग त्या जुन्या ब्रिटिश पोलिस अधिकाऱ्यांनी नोंदवून ठेवलेले गुन्ह्यांच्या तपासाचे तपशीलही असतातच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com