#SaathChal आनंदवारी अथांगवारी (प्रा. इंद्रजित भालेराव)

प्रा. इंद्रजित भालेराव
रविवार, 22 जुलै 2018

"ग्यानबा-तुकाराम'चा गजर करत लाखो वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं निघतात. पावसाच्या आणि भक्तीच्या धारांमध्ये चिंब भिजणारे हे वारकरी आणि भक्तीचा हा सोहळा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आनंदनिधानच. उद्या (सोमवार, ता. 23) आषाढी एकादशीच्या निमित्तानं हा सोहळा कळसाध्याय गाठतो आहे. विठुरायाची ही ओढ नेमकी असते कशी, वारकऱ्यांच्या भावना नक्की असतात कशा, पंढरपूरचं महत्त्व किती, अध्यात्माच्या दृष्टीनं या सगळ्या सोहळ्याचा अर्थ काय या सगळ्या गोष्टींचा वेध.

"ग्यानबा-तुकाराम'चा गजर करत लाखो वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं निघतात. पावसाच्या आणि भक्तीच्या धारांमध्ये चिंब भिजणारे हे वारकरी आणि भक्तीचा हा सोहळा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आनंदनिधानच. उद्या (सोमवार, ता. 23) आषाढी एकादशीच्या निमित्तानं हा सोहळा कळसाध्याय गाठतो आहे. विठुरायाची ही ओढ नेमकी असते कशी, वारकऱ्यांच्या भावना नक्की असतात कशा, पंढरपूरचं महत्त्व किती, अध्यात्माच्या दृष्टीनं या सगळ्या सोहळ्याचा अर्थ काय या सगळ्या गोष्टींचा वेध.

आषाढीला येते। आभाळ भरून
काळीज कोरून। जाते माझे
दिंड्या पताकांचे। गर्जतात भार
आषाढाची धार। कोसळते
उरी उसळतो। भावनांचा लोंढा
पताकिचा झेंडा। ओला होतो
खाली चिखलात। पडते राहुटी
माती जणू उटी। वास येतो
काट्यामधी पाय। चालतात वाटा
मनामधी लाटा। आनंदाच्या
माझ्या मनामधी। उठते काहूर
वाटे हुरहूर। काय करू

आषाढीची वारी जवळ आली, की माझ्या मनाची अवस्था दर वर्षीच अशी होत असते. दूरदूर क्षितिजावर भगव्या पताका फडकताना दिसतात आणि माझ्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी तरळायला लागतात. बहिणी यायच्या आणि आईची भेट घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीकडं निघून जायच्या. आत्या-मावशी यायची आणि आईला भेटून दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन देहूकडं निघून जायची. त्या सगळ्या बायकांची रक्तातल्या नात्यापेक्षाही दिंडीतली नाती जास्त घट्ट होती. त्यांचं नातं जनाई-मुक्ताई आणि रखुमायी यांच्याशी जास्त घट्ट होतं. विठू-रुखुमाईनं अवघा महाराष्ट्र असा नात्यांनी बांधून ठेवलेला आहे. माझ्या या निरपेक्षा खेडवळ बायकांना कोकणा-दखनातली माणसं कधीच माहीत झाली नसती; पण दिंडी सोहळ्यामुळं ती आज त्यांच्या जिवाभावाची झालेली आहेत.

आमचं घराणं महानुभवपंथीय. त्यामुळं घरात वारीची परंपरा नव्हती; पण लग्नानंतर वारकरी कुटुंबात दिलेल्या काही बहिणी वर्षानुवर्षं वारीत नियमित सहभागी होतात. मला कधी वारीत सहभागी होता आलं नाही; पण सहभागी व्हावं असं कायम वाटतं. उठावं आणि नेसत्या कपड्यानिशी निघावं असं वाटतं; पण अजून ते जमलेलं नाही. आता प्रकृतीच्या कारणास्तव ते जमेल असंही वाटत नाही. मात्र, मनाची तल्खली तर थांबत नाही. मग दुधाची तहान ताकावर भागवावी- तसं संतसाहित्यातून आणि नव्या साहित्यातून मी ती तहान भागवतो. प्रसारमाध्यमातल्या वारीच्या वृत्तांतातूनही ती तहान भागवण्याची संधी आजकाल उपलब्ध होते.

छान पाऊस पडायला लागतो. मनात वारी सुरू झालेली असते आणि मी "गाथा-ज्ञानेश्‍वरी' समोर घेऊन बसतो. गो. नी. दांडेकर यांनी संतांवर लिहिलेल्या कादंबऱ्या काढून बसतो. दि. बा. मोकाशी यांची "आनंदओवरी' ही कांदबरी आणि "पालखी' हे पुस्तक कपाटातून बाहेर काढतो. आख्खा सदानंद मोरे उशापायथ्याला ठेवतो. अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे, दि. पु. चित्रे यांच्या कविता गुणगुणत राहतो. यूट्युबवर गुंथर सोंथायमरचा जर्मन भाषेतला वारीवरचा दीर्घ माहितीपट सर्च करतो. मी प्रत्यक्ष वारीत सहभागी नसलो, तरी चोवीस तास माझ्या मनात वारी घुमत असते.
कधीकधी वारीच्या मूडमध्ये लिहिलेल्या कविता वाचून पाहतो. दरवर्षीचं माझ्या मनाचं आणि बाहेरचंही चित्र त्यातून प्रतिबिंबित झालेलं असतं. एका वर्षी मी लिहिलं होतं ः
झाली आषाढीची वारी
कधी येईल पाऊस
दिंड्या परतल्या घरी
कधी येईल पाऊस

त्या वर्षी पाऊसच पडला नव्हता. शेतकरीवर्ग हवालदिल झालेला होता. बरेच शेतकरी वावरं पेरून दिंडीत निघून गेलेले असतात. घरी थांबले, तर रोजच पावसाची चिंता त्याला सतावते. जिवाचा घोर त्याला नीट जेवूही देत नाही आणि नीट झोपूही देत नाही. दिंडीत महिना कसा निघून गेला तेही कळत नाही. परतल्यावर महिना निघून गेलेला असतो. ताण देऊन का होईना पाऊस पडून गेलेला असतो. रान शेवाळलेलं दिसतं. पंढरीचा पांडुरंग शेतात डोलू लागल्यासारखा वाटतो. मनातला आनंद द्विगुणित होतो. मात्र, कधीकधी असं होत नाही. अतिवृष्टीनं रान वाहून गेलेलं असतं, नाही तर अवर्षणानं करपून; पण विठ्ठलाच्या नादानं वारीचे दिवस तरी आनंदात जातात. या वर्षी पावसाच्या बाजून वारी अतिशय आनंदाची आहे.
भूमीवर जळतात
पाण्यामधी पोळतात
अशी माणसेच विठू
तुझ्याकडे पळतात

आळसात आकसून
गुलामीत लोळतात
अशी माणसेच विठू
तुझ्याकडे वळतात

जगरहाटीत जे जे
ठार वेडे ठरतात
तुझ्यासाठी तुझ्याकडे
असे थोडेच येतात

वारीला जाणारी माणसं आणि त्यांच्या तऱ्हा कोणकोणत्या असतात, असा विचार एका वर्षी मी उगाच करत होतो. काही माणसं दुःखानं पोळलेली असतात म्हणून वारीला जातात आणि दुःख विसरतात. काही माणसं हौशी-नवशी-गवशी असतात म्हणून वारीला जातात. अशी माणसं एखाद्या, दुसऱ्या वर्षी जातात आणि थांबतात. मात्र, खास अध्यात्माच्या ओढीनं जातात ती माणसं वर्षानुवर्षं पायी पालखी सोहळ्याला जातात. त्यांची निष्ठा अढळ असते. त्यांचा निश्‍चय अभंग असतो. अशी माणसं आयुष्याच्या शेवटापर्यंत आपली वारी थांबवत नाहीत. त्यांच्या आयुष्याचा शेवट आणि वारीचा शेवट सोबतच असतो. अशीच होती एक माझी आरळची जिजामावशी.

मावशीच्या कपाळावरचा अबीरबुक्का
सात्त्विक करत गेला संसाराला
पंढरपुरात भेटून आली
विठोबाला मावशी
पहाटे पहाटे त्याच दिवशी
निघून गेली वैकुंठाला
नवस फेडल्यासारखी
लोक म्हणतात मावशीनं
काल्याच्या कीर्तनात आयुष्याचा काला केला
किती भाग्यवान बाई

लोकांना वारीचं वेड का लागत असावं याचं रहस्य मला मावशीच्या मरणात सापडलं. नामदेवांनी आपल्या एका अभंगात लिहून ठेवलंय ः
ऐसी चंद्रभागा। ऐसी ही पंढरी
ऐसा विटेवरी। देव कुठे

त्या खेड्यापाड्यातल्या येड्याबागड्यांना असा देव कुठं मिळणार आहे? इतका साधा, इतका सोपा आणि इतका निर्भय, निर्मळ देव दुसरा नाही. इतकं सोपं तीर्थ दुसरं नाही. आचार्य विनोबा भावे यांनी लिहून ठेवलंय, की सगळ्या देवांच्या हातात काही तरी शस्त्र असतं; पण विठ्ठल हा एकमेव असा देव आहे की त्याच्या हातात कोणतंही शस्त्र नाही. तो कुणालाही भीती दाखवत नाही. कमरेवर हात ठेवून सगळ्यांना सांगत असतो की, संसाराचा सागर फार खोल नाही. हे काय माझ्या कमरेइतकंच पाणी याच्यात आहे. या या घाबरू नका. मी तुम्हाला हाताला धरून पलीकडं घेऊन जातो. पोथ्यापुराणांनी सांगितलेला दुस्तर सागरासारखा संसार अथांग नाही. मुळीच घाबरू नका.
म्हणून सगळ्या वारकऱ्यांची दृढ निष्ठा असते, की इंद्रायणीसारखं तीर्थ नाही, पंढरपुरासारखं क्षेत्र नाही आणि विठ्ठलासारखा दुसरा देव तर जगात कुठं सापडणार नाही. म्हणून सगळ्यांची धाव तिकडे असते. त्यांच्या लाडक्‍या नामदेवांनीच सांगून ठेवलंय ः
आधी रचिली पंढरी
मग वैकुंठनगरी ।
जेव्हा नव्हते चराचर
तेव्हा होते पंढरपूर ।
जेव्हा नव्हत्या गोदागंगा
तेव्हा होती चंद्रभागा ।
चंद्रभागेच्या तटी
धन्य पंढरी गोमटी ।
नातीलिया भूमंडळ
पुरे पंढरी मंडळ ।
असे सुदर्शनावरी
म्हणूनी अविनाश पंढरी ।
नामा म्हणे बा श्रीहरी
आम्ही नाचो पंढरपुरी ।

Web Title: SaathChal prof indrajit bhalerao write article in saptarang