या व्हॉट्सॲपचं करायचं काय...?

सागर बाबर (sagar@comsenseconsulting.com)
Sunday, 17 January 2021

मी एक तंत्रज्ञानावर आधारित मार्केटिंग कंपनी चालवतो आणि मला वाटतं, नक्की काय बदल झाला आहे व त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात देशभरात सामान्य ग्राहकांमध्ये मोठा गदारोळ झाला आहे. लोक आपली वैयक्तिक माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याची शक्यता असलेला हा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आता वापरावा अथवा नाही, याबद्दल घाबरून चर्चाही करू लागले आहेत. काही जणांनी तर ‘सिग्नल’ सारखे मेसेजिंगचे समांतर व्यासपीठ वापरावे, असा प्रचारही सुरू केला आहे. एलॉन मस्कसारख्या बड्या आसामीनं व ‘पेटीम’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं व्हॉट्सअॅपऐवजी ‘सिग्नल’ वापरावे, असं आवाहन केल्यानं लोकांमधील अस्वस्थता अधिकच वाढली आहे.

मी एक तंत्रज्ञानावर आधारित मार्केटिंग कंपनी चालवतो आणि मला वाटतं, नक्की काय बदल झाला आहे व त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नव्या पॉलिसीचा सखोल अभ्यास केल्यावर फार काही बदललं नसल्याचं मला आढळले. विशेषतः व्हॉट्सअॅपचा वापर खासगी चॅट्स, मेसेजिंग व मित्रांना आणि कुटुंबियांना कॉल्स करणाऱ्या लक्षावधी युजर्सना यामुळे कोणताही फरक पडणार नाही. नवे बदल बिझनेस अकाउंट्सवरील मेसेजिंगवर केंद्रित असून, ती ग्राहकांसाठी ऐच्छिक सेवा आहे. सामान्य माणसाच्या शब्दांत सांगायचं तर, या बदलानुसार कंपनी तुमची माहिती, तुमच्या खरेदीच्या पावत्या शेअर करणे व तुमच्या मागील सर्चच्या आधारे तुम्हाला जाहिराती पाठविणे अशा मार्केटिंगच्या उद्देशांसाठी वापरेल. यामुळे ग्राहकाची माहिती दुसऱ्याच्या हातात पडेल किंवा त्याचा गैरवापर होईल अशी शक्यता कमीच आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डेटाच्या सुरक्षेला महत्त्व 
आम्ही मार्केटिंग तंत्रज्ञान कंपनी आहोत व भविष्यवेधी विश्लेषण आणि डेटा सॅम्पलिंगवर मोठ्या प्रमाणावर काम करतो. त्यामुळे ग्राहकांच्या प्रोफाइलिंगची गरज आणि महत्त्व आम्ही ओळखतो. आम्ही उत्पादनाचा आवाका आणि उत्पन्न वाढीसाठी ग्राहकाच्या माहितीवर हायएण्ड अॅनालिटिक्स वापर करण्याची शिफारस करतो. त्यामुळे फेसबुक आणि व्हॉट्सअप करू पाहत असलेले एकत्रीकरण (इंटिग्रेशन) नैसर्गिक आहे आणि ते आम्हाला काही प्रमाणात मान्यही आहे. मात्र, या दोघांनी ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेला महत्त्व द्यायलाच हवे. त्यामध्ये छोटा छेद गेल्यास त्याचा परिणाम जगातील मोठ्या लोकसंख्येवर होईल आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. 

तुमचा मोबाईल नंबर फेसबुकशी जोडला गेला आहे, या परिस्थितीची कल्पना करा. प्रथमदर्शनी व्हॉट्सअॅप फेसबुकशी जोडण्याचा उद्देश सुरक्षा वाढविणे, स्पॅम कमी करणे व ग्राहकांना चांगली सेवा देणं आहे. हा बदल नव्यानं दाखल झालेले व्हॉट्सअॅप पेमेंट्स यशस्वीरीत्या चालण्यासाठी आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारांची प्रभावीपणे पूर्तता करण्यासाठी अर्थविषयक संस्थांना अधिकाधिक माहितीची गरज पडतेच. 

मात्र, खासगी संदेशांचे ‘एण्ड टू एण्ड एन्क्रिप्ट’ कायम राहणार असून, ते सर्व्हरवर साठवले जाणार नाहीत. फक्त न पाठवले गेलेले (अनडिलिव्हर्ड) संदेश ३० दिवसांसाठी साठवले जातील, जे आताही घडते. यांमुळे व्हॉट्सअॅपचा वापर  चिंतामुक्त ठरतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

फोन क्रमांक सर्वांधिक महत्त्वाचा...
माझ्या दृष्टीने सर्वांत मोठी काळजी फोन क्रमांकांची सुरक्षा हेच आहे. ग्राहकासाठी त्याचा फोन क्रमांक ही मोठी ओळख असते. फोन क्रमांक आधार कार्ड, बँकिंग व नॉन बॅकिंग फायनान्शिअल इन्स्टिट्यूटसारख्या महत्त्वाच्या गोष्टींना जोडलेले असल्याने या ओळखीची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची ठरते. मात्र, भारतीय ग्राहकांना आपल्या डेटा आणि ओळखीची चोरी याबद्दल खूप कमी माहिती असते. आपण आपला फोन क्रमांक व इमेल आयडी कोणत्याही स्टोअरमध्ये, पेट्रोल पंपावर, एखाद्या योजनेच्या फॉर्मवर किंवा कोणी एखादी ऑफर देत असल्यास अगदी सहजच देऊन टाकतो.  

आपल्यापैकी अनेकांना हे माहितीच नसते, की आपण एखादे मेसेजिंग, फोटो एडिटिंग, व्हॉइस रेकॉर्डिंग अॅप वापरताना आपली महत्त्वाची ओळखपत्रे त्यांना सोपवत असतो. त्याचबरोबर ही सेवा वापरकर्त्यासाठी मोफत असल्यास संबंधित कंपनी थर्ड पार्टी जाहिराती किंवा क्रॉस सेलिंग किंवा प्रोमोशनद्वारे पैसा कमावत असते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपण या कंपन्यांच्या अगणित मोफत व सशुल्क सेवा घेताना आपल्या लॉग-इनची माहिती, आयपी अॅड्रेस आणि काहीवेळेस फोन क्रमांकही वापरण्याची मुभा देत असतो. त्याचबरोबर आपला प्राधान्यक्रम कशाला आहे याचा माग कायमच घेतला जातो, आपण ऑनलाइन करीत असलेल्या गोष्टींवरही कायमच लक्ष ठेवले जाते व त्यातून आपली माहिती (डेटा) वेगवेगळ्या माध्यमांतून उघडी पडत असते. 

त्यामुळे व्हॉट्सअॅप सुरू करावे अथवा बंद करावे यांचा विचार करता आपली फोन क्रमांकासारखी अत्यंत महत्त्वाची माहिती सुरक्षित राहील, याची चिंता करणे अधिक योग्य.

माहिती सुरक्षेच्या टिप्स
सर्च इंजिनच्या बाबतीत सावध राहा. मोबाईल फोन, एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा इ-मेलवर अज्ञात स्रोतांपासून आलेल्या लिंक्सवर क्लिक करू नका. तुमच्या संगणकाप्रमाणे मोबाईल फोनवर अॅन्टिव्हायरस वापरणे शहाणपणाचे ठरेल.
गरज नसताना तुमचा फोन क्रमांक कोणालाही देऊ नका. लॉटरी आणि मोफत पर्यटनासारख्या थापांना बळी पडू नका. एखादा तोतया तुमच्या नेटवर्क कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून तुमची माहिती त्याच्या फायद्यासाठी वापरू शकतो, त्यापासून सावध राहा.
तुमचा पासवर्ड कोणाला सांगू नका व ओटीपी क्रमांक कोणालाही देऊ नका. तुमचा मोबाईल फोन कायम तुमच्या हातात किंवा कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही अशा सुरक्षित जागी असेल, याची काळजी घ्या.
तुमचा मोबाईल क्रमांक कोणत्या उद्देशासाठी घेतला जातो आहे याची चौकशी करा. तेथून हवा तेव्हा मोबाईल क्रमांक काढून घेणे शक्य आहे का, याची माहिती घ्या. ऑफर्स आणि प्रोमोशन असलेल्या गोष्टी घेण्यापासून स्वतःला परावृत्त करा.

(लेखक कॉमसेन्स  टेक्नॉलॉजिजचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sagar babar write article about WhatsApp privacy policy

Tags
टॉपिकस
Topic Tags: