दोन कवी, दोन वाटा

डॉ. सहदेव चौगुले-शिंदे
रविवार, 25 डिसेंबर 2016

वाट किंवा रस्ता हा मानवी हालचाल, गती, प्रगती यांचं द्योतक असतो, असं म्हणता येईल. वाटेचा मोह जगभरातल्या असंख्य कवींना आजवर पडला. त्यातून कितीतरी तत्त्वज्ञानपर कविता लिहिल्या गेल्या. रॉबर्ट फ्रॉस्ट आणि कवी अनिल हे त्यांतले दोन ठळक कवी. या विषयावर दोघांनी कविता लिहिल्या. ‘द रोड नॉट टेकन’ ही फ्रॉस्ट यांची, तर ‘दोन वाटा’ ही अनिल यांची कविता साहित्यजगतात प्रसिद्ध आहे. ‘द रोड नॉट टेकन’ला या वर्षी १०० वर्षं पूर्ण झाली, तर ‘दोन वाटा’नंही पन्नाशी ओलांडली आहे. त्यानिमित्तानं या दोन कवितांच्या आशयाची ‘वाट’ धुंडाळण्याचा हा प्रयत्न...
 

वाट किंवा रस्ता हा मानवी हालचाल, गती, प्रगती यांचं द्योतक असतो, असं म्हणता येईल. वाटेचा मोह जगभरातल्या असंख्य कवींना आजवर पडला. त्यातून कितीतरी तत्त्वज्ञानपर कविता लिहिल्या गेल्या. रॉबर्ट फ्रॉस्ट आणि कवी अनिल हे त्यांतले दोन ठळक कवी. या विषयावर दोघांनी कविता लिहिल्या. ‘द रोड नॉट टेकन’ ही फ्रॉस्ट यांची, तर ‘दोन वाटा’ ही अनिल यांची कविता साहित्यजगतात प्रसिद्ध आहे. ‘द रोड नॉट टेकन’ला या वर्षी १०० वर्षं पूर्ण झाली, तर ‘दोन वाटा’नंही पन्नाशी ओलांडली आहे. त्यानिमित्तानं या दोन कवितांच्या आशयाची ‘वाट’ धुंडाळण्याचा हा प्रयत्न...
 

रॉबर्ट फ्रॉस्ट या आधुनिक अमेरिकी कवीच्या ‘द रोड नॉट टेकन’ या कवितेला या वर्षी १०० वर्षं पूर्ण होत आहेत; तसंच कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) यांच्या ‘दोन वाटा’ या कवितेलाही या वर्षी ५६ वर्षं पूर्ण झाली आहेत. शीर्षक आणि आशयाच्या बाबतीत या दोन कवितांमध्ये खूपच साम्य असल्यामुळं त्यांचा तुलनात्मक अभ्यास करावासा वाटला.

फ्रॉस्ट यांचे पहिले दोन काव्यसंग्रह अनुक्रमे १९१३ व १९१४ मध्ये इंग्लडमधील त्यांच्या वास्तव्याच्या काळातच प्रसिद्ध झाले. त्यातला पहिला काव्यसंग्रह बऱ्याच अमेरिकी प्रकाशकांनी नाकारला होता. या दोन्ही काव्यसंग्रहांचं इंग्लंडमध्ये उत्स्फूर्त स्वागत झालं. त्यामुळं फ्रॉस्ट यांचा उत्साह वाढला. सन १९१४ मध्ये पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानं फ्रॉस्ट यांना इंग्लड सोडून मायभूमीला परतावं लागलं. त्यांचा तिसरा काव्यसंग्रह ‘माउंटन इंटर्व्हल’ (१९७६) अमेरिकेत प्रसिद्ध झाला. या काव्यसंग्रहातली अगदी पहिली कविता म्हणजेच ‘द रोड नॉट टेकन’ ही होय. फ्रॉस्ट यांनी अमेरिकेतल्या न्यू इंग्लंड या प्रांतातल्या ग्रामीण जावनाचं वास्तव आपल्या कवितांमधून मांडलं; तसंच त्यांनी माणसाचं निसर्गातलं स्थान, त्याचं संपूर्ण विश्‍वातलं स्थान, त्याचं एकाकीपण आणि एकटेपणा, जीवनातले निर्णय, निवड, वचनबद्धता आदी अस्तित्ववादी प्रश्‍न आपल्या काव्यातून हाताळले. 

फ्रॉस्ट यांच्या ‘द रोड नॉट टेकन’ (१९१६) या कवितेचं आधीचं शीर्षक Tow roads असंच होतं. ही कविता अमेरिकेत आणि पाश्‍चिमात्य जगतात खूपच गाजली व सर्वत्र चर्चिली गेली. फ्रॉस्ट यांच्या हयातीतही या कवितेवर खूप टीका-टिप्पणी झाली, परस्परविरोधी मतं व्यक्त केली गेली. या कवितेची शब्दरचना अशा युक्तीनं करण्यात आलेली आहे किंवा अशा सहजतेनं झालेली आहे, की ज्यामुळं ती विविध अर्थांनी वाचता येते व वाचणाऱ्याचाच गोंधळ उडतो! स्वतः फ्रॉस्ट यांनीच एके ठिकाणी म्हटलं आहे, की ‘It is a tricky poem... very triky.’ पण एक गोष्ट खरी आहे, की रस्त्याबद्दल इतकी सुंदर कविता लिहून फ्रॉस्ट यांनी जगाच्या रस्त्याबद्दलच्या चिंतनालाही एक फाटा फोडला आहे! रस्ता हा कितीतरी अर्थसूचक व बोधसूचक असू शकतो, हे या कवितेनं दाखवून दिलं आहे. 

समीक्षकांनाही ही कविता विविध प्रकारे भावली आहे. कुणी म्हणतं, ही कविता व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल आहे; तर कुणी म्हणतं, ती माणसाला जीवनात कराव्या लागणाऱ्या निर्णयनिवडीसंबंधी आहे. कुणाला तीत कवीनं घेतलेली नैतिक भूमिका जाणवते, तर कुणाला ही कविता जीवनाचं रूपक वाटते. शरदातल्या एका सकाळी कवी फिरत चाललेला असतो. चालता चालता तो अशा ठिकाणी येतो, जिथं त्या रस्त्याला दोन फाटे फुटलेले असतात. कोणत्या फाट्यानं पुढं जावं, याबाबत त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो, त्याच्या मनाची द्विधा अवस्था होते; पण तरीही अशा परिस्थितीत निर्णय हा करावाच लागत असतो. तो चार पावलं मागं सरतो. त्या दोन फाट्यांपैकी एकावर नजर टाकतो. तो फाटा जवळच कुठंतरी झाडाझुडपांत लुप्त झाल्याचं त्याला दिसतं. कवितेची सुरवात अशी आहे : 

Two roads diverged in a yellow woodx
and sorry i could not travel both
and be one traveller...

असे दोन्ही रस्ते एकाच वेळी चालून जाणं त्याला शक्‍य नसतं (कुणालाच शक्‍य नसतं), याचं त्याला वाईट वाटतं. तो रस्ता जवळच कुठंतरी झाडाझुडपांत लुप्त होत असल्यामुळं तो फारसा उपयुक्त नाही, असंही कवितेच्या नायकाला वाटत असतं. म्हणून तो म्हणतो, 

Then took the other as just as fair
and having perhaps the better claim
because it was grassy and wanted wear

हा दुसरा रस्ता त्यानं निवडला खरा; पण दोन्ही रस्ते सारखेच सुंदर आहेत आणि येणाऱ्या- जाणाऱ्यांमुळे ते एकसारखेच झिजलेले आहेत, असंही त्याच्या लक्षात येतं. तो दुसरा रस्ता त्यानं निवडला, कारण तो grassy आहे व कुणीतरी त्यावरून चालून जाणं (निदान त्या सकाळी) आवश्‍यक होतं. त्याच्यावरच्या हिरव्या गवतामुळं तो रस्ता कवीला आकर्षक व आशादायक वाटतो आणि त्यावरून फारसं कुणी चालून गेलेलं नाही म्हणून तो त्याला आव्हानात्मक व साहसाला वाव देणाराही वाटतो. पहिला रस्ता सोडून दिल्यासंदर्भात स्वतःचं सांत्वन करताना त्यानं स्वतःलाच सांगितलेलं असतं, की त्या रस्त्यानं पुढं कधीतरी जाता येईल. त्याच वेळी त्याला हीही जाणीव होते, की एका रस्त्यानं जाताना माणूस आणखी दुसऱ्या रस्त्याकडं नेला जातो आणि सोडून दिलेल्या रस्त्यानं जाण्याची शक्‍यता क्षीण बनते. कवितेच्या शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो :

I shall be telling this with a sigh
somewhere ages and ages hence :
Two roads diverged in a wood, and I
I took the one less travelled by
And that has made all the difference

शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो : ‘इथून पुढं भविष्यात कधीतरी मी सुस्कारा टाकत सांगत असेन, की एका जंगलात एका रस्त्याला दोन फाटे फुटले होते आणि ज्या फाट्यानं किंवा रस्त्यानं फारच कमी लोक गेलेले होते, असा फाटा मी निवडला आणि त्यानेच माझ्या जीवनात सगळा फरक पडला.’ याचाच अर्थ असा, की कवीची निवड योग्य ठरलेली असते. जमावाबरोबर जाण्यात सुरक्षितता असते; पण आपलं वेगळेपण सिद्ध करता येत नाही. अज्ञात, अपरिचित व आव्हानात्मक रस्त्यानं जाण्यात धोका असला, तरी आपली वेगळी ओळख निर्माण करायला संधी असते, हेच फ्रॉस्ट आपल्या कवितेतून सुचवू पाहत आहेत. ‘द रोड नॉट टेकन’ या कवितेच्या दुसऱ्या ओळीतला sorry हा शब्द तो रस्ता चालून जाण्यातली कवीची असमर्थता व्यक्त करतो, तर सोळाव्या ओळीतला sigh हा शब्द त्यानं निवडलेल्या रस्त्यानं त्याला आलेल्या यशाचा, समाधानाचा व त्याच्या जीवनात पडलेल्या फरकाचा निदर्शक आहे.

फ्रॉस्ट यांची ही कविता २० ओळींची असून वाचकांना गोंधळात टाकणारी आहे.

***

कवी अनिल यांची ‘दोन वाटा’ (१९६०) ही कविता फक्त १० ओळींची असून तिला पावसाच्या सरीची गती आहे. सर्व काही सांगून झाल्यानंतरच ती थांबते. कवी अनिल आपल्या कवितेत म्हणतात ः ‘वाटचुकार वासराशिवाय फिरकलेलं कोणी नसतं.’ अशा एका निर्जन ठिकाणी एका रस्त्याला दोन वाटा फुटलेल्या असतात. त्यातली ‘एक जरा सरावलेली’ असते, तर ‘दुसरीवरती ठसे नसतात.’ ही ठसे नसलेली, कुणाचीही चाहूल नसलेली वाट कवीला खूपच प्रभावित व आकर्षित करते. ‘तिने चाहूल नाही म्हणून पाऊल पाऊल ओढून नेले / सोडून दिल्या वाटेकडे फिरून फिरून पाहू दिले.’ पुढं पुढं जात असतानाही सोडून दिलेली वाट, तिची वळणं, उतार, घाट इत्यादी कवीच्या मनात रेंगाळत असतात. सोडून दिलेल्या वाटेबद्दल अनिल यांना वाटणारं आकर्षण हे आंग्ल कवी कीट्‌स यांच्या Heard melodies are sweet, but those unheard are sweeter (ऐकलेलं संगीत मधुर असतं; पण न ऐकलेलं संगीत त्याहूनही मधुर असतं. कारण, ते अद्याप ऐकलेलंच नसतं!) या प्रकारचं व प्रतीचं आहे. कवितेच्या शेवटी अनिल म्हणतात ः ‘तिनेच गेलो असतो तर? ही कदाचित मिटली असती / तसे व्हावयाचे नव्हते! हीच माझी वाट होती!’ या शेवटच्या ओळींमधून अनिल यांचा निर्धार, ठामपणा किंवा एक प्रकारचा नियतिवाद (determinism) जाणवतो. 

दोन्ही कविता रस्त्याचं वास्तव महत्त्व व प्रतीकात्मक महत्त्व अधोरेखित करतात. रस्ता हा मानवी हालचाल, गती, प्रगतीचं द्योतक आहे. जॉन मिल्टन यांच्या प्रतिभेनं ‘पॅरडाईज लॉस्ट’ या महाकाव्याचा शेवट solitary way या शब्दद्वयीनं केलेला आहे. कलात्मक जीवन जगण्याचा निर्णय करण्यासाठी एक प्रकारचं साहस लागतं. कलेवर अढळ निष्ठा असावी लागते. खडतर जीवन जगण्याची व एकटं चालण्याची तयारी ठेवावी लागते आदी गोष्टींचं प्रतिपादन फ्रॉस्ट आणि अनिल हे दोघंही करताना दिसतात.

Web Title: Sahdev Chaugule-Shinde writes about robert frost and Kavi Anil