बालसृष्टि ही फुले !

बालसृष्टि ही फुले !

या बालांनो, या रे या
लवकर भर भर सारे या।
मजा करा रे
मजा करा
आज दिवस तुमचा समजा ।।

कविवर्य भा. रा. तांबे यांच्या वरील कवितेच्या ओळी आठवल्या की बालदिन आला असे समजावे. बालदिन हा बालकांचा उत्सव दिन. आनंद सोहळा. बाळकांचा आनंद दिन. 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा होतो. याच दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस. चाचा नेहरुंना मुले आणि फुले फार आवडायची. ते तासन तास मुलांमध्ये रमून जायचे. तसेच ते दिवसातून काही क्षण निसर्गमय बागेत फिरायचे. मुले ही देवाघरची फुले आणि म्हणूनच या फुलांना फुलविण्यासाठी मुलात मूल बनून पंडितजी रंगून जायचे.

14 नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस पंडितजी मुलांमध्येच साजरा करवायचे. तो दिवस ते संपूर्णपणे बालकांच्या समवेत घालवायचे. मुलांना गोडधोड पदार्थ खायला द्यायचे, सुंदर सुंदर खेळणी द्यायचे. विदेशी मुलांनाही खेळणी पाठवायचे. असे होते मुलांचे लाडके चाचा. त्यांना मुलेही लाडाने "नेहरु चाचा' म्हणून संबोधायची. त्यामुळेच नेहरुजींच्या वाढदिवसदिनी साऱ्या देशभर बालदिन साजरा केला जातो. ही पंडितजींच्या अनोख्या स्मृतीची आठवण आहे.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी माध्यम निर्माण करावे असे विचार पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या मनात वारंवार येत असत. कारण मुले ही स्वतःचा आकार, रंगरुप आणि गंध घेऊन उमलत असतात. मुलांची कल्पना शक्ती प्रचंड असते. त्यांचे प्रत्येकाचे अनुभव विश्व आणि जाणिवा वेगळ्या असतात. त्याचे प्रकटीकरणही वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. या विचारातूनच मुलांसाठी एक मुक्तांगण म्हणजेच बालभवनाची संकल्पना आकाराला आली. 1956 रोजी तुर्कमान गेट, कोटलारोड न्यू दिल्ली येथे एक वास्तू उभारुन "बालभवन" ची स्थापना केली. यासाठी बालभवन सोसायटी निर्माण झाली. त्या सोसायटीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरु. ही पंडितजींची मुलांसाठी कायम स्वरुपी देणगी आहे असे म्हणायला हरकत नाही.

बालभवन म्हणजे छोट्या मुलांचे मुक्तांगण. बिनभिंतीची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासाचे उत्तम माध्यम. बालकांच्या सुप्त कलागुणांचा विकास करणारे एक प्रभावी साधन. ही एक नवीन शैक्षणिक पद्धत. बालकेंद्रित शिक्षण प्रणालीनुसार बालकांचे सर्वांगीण विकास साधणारे उत्तम केंद्र.

जुन्या शिक्षण पद्धतीनुसार चार भिंतीच्या खोलीतील शिक्षण, क्रमिक पाठयपुस्तकांची सक्ती, वेळेचे बंधन, वेळा पत्रकानुसार व तासिकेप्रमाणे विषय शिकविणे या गोष्टींना बालभवन केंद्रात फाटा देण्यात आला आहे. बालभवनात नैसर्गिकरित्या शिक्षकांबद्दल वातावरण निर्मिती केली जाते. मुलांच्या मुक्त कलांगुणांना वाव दिला जातो. स्थावलंबनाचेही शिक्षण दिले जाते. संस्कारात्मक, कलात्मक व चरित्रात्मक शिक्षणावर भर दिला जातो. बालकांना सर्वांगीण विकासाची संधी प्राप्त करुन दिली जाते. अभ्यासेतर कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांना एक नवी दृष्टी, एक नवी दिशा दिली जाते. बालभवन केंद्रात विविध कलेत नैपुण्य प्राप्त केलेले प्रशिक्षक मुलांना विविध कलांचे मार्गदर्शन करतात. या बालभवन केंद्रांत संगीत, हस्तकला, गायन, वादन, चित्रकला, नृत्य, नाट्य, कथाकथन, विणकाम, लोककला, शिल्पकाम, मातीकाम आदी कलांचे शिक्षण देतात. दिल्ली सरकारच्या सौजन्याने गोव्यातही विजयादेवी राणे यांच्या अध्यक्षतेसाठी पणजी, केरी, पर्ये, साखळी, डिचोली, पेडणे, काणकोण, फोंडा, म्हापसा, शिरोडा, मडगाव वगैरे अनेक ठिकाणी बालभवन केंद्रातून मुलांसाठी भरीव कार्य चालू आहे.

असा हा बालसृष्टी फुलवणारा बालदिन आनंददायी असतो. या संदर्भात कवी आ. द. राणे. लिहितात.

मुले ही देवाघरची फुले 
चैतन्याचे घडवित दर्शन
बालसृष्टि ही फुले !
मन निर्मळ - निष्पाप तयांचे
नयन बोलके नित्य जयांचे 
नसे आपपर झात तयांना
सुहास्य वदनी खुले!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com