सैराट, टेक्सास अन् ऐशही...!

गळ्यात कवड्यांच्या माळा... घाटी-घुंगरू, पायात पैंजण, सोन्या-चांदीचे तोडे... शिंगांना मोरपिसांचे झुबके, कपाळावर चंद्रकोरीसारखा गंध...
Sambhaji Gandamale writes about Kolhapur tradition of celebrating buffaloes
Sambhaji Gandamale writes about Kolhapur tradition of celebrating buffaloes sakal
Summary

गळ्यात कवड्यांच्या माळा... घाटी-घुंगरू, पायात पैंजण, सोन्या-चांदीचे तोडे... शिंगांना मोरपिसांचे झुबके, कपाळावर चंद्रकोरीसारखा गंध...

गळ्यात कवड्यांच्या माळा... घाटी-घुंगरू, पायात पैंजण, सोन्या-चांदीचे तोडे... शिंगांना मोरपिसांचे झुबके, कपाळावर चंद्रकोरीसारखा गंध... तेलाच्या मालीशनंतर तुकतुकीत झालेल्या अख्ख्या शरीरावर विविध प्रकारच्या हेअर स्टाइल्स आणि विविधरंगी सजावट... हा सारा डामडौल आणि थाट आहे, कोल्हापुरातील म्हशी आणि रेड्यांचाही. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ही सारी कोल्हापुरी संस्कृती शहरात अवतरते. त्यांचा हा रोड शो साऱ्यांनाच भुरळ घालतो. कोल्हापूरकरांनी दोन दिवसांच्या या म्हशींच्या गौरव सोहळ्याची परंपरा बदलत्या काळातही जपली आहे. गवळी व्यावसायिकांच्याच भाषेत सांगायचं तर, ‘‘दोन दिवसांचाच हा ‘नाद’ असतो; पण त्यासाठी आम्ही वर्षभर आसुसलेलो असतो,’’ असं ही मंडळी आवर्जून सांगतात.

‘‘आता माझं वय पंचाऐंशी. माझ्या जन्माच्या अगोदर चुलत्यांचं निधन झालं. (कै.) श्रीपती गवळी आणि त्यांचा ‘मोहन रेडा’ त्या वेळी प्रसिद्ध होता, त्याला ‘रुस्तुम ए हिंद’ असंही म्हटलं जायचं. समाजाच्या इमारतीत त्यांचा हा सागरदेवाला जातानाचा फोटो लावलेला. पण, इमारतीच्या बांधकामाच्या निमित्ताने हा फोटो घरात आणला आणि या भिंतीवर लावला...’’ ज्येष्ठ गवळी व्यावसायिक नंदू गुरुलिंगा गवळी संवाद साधत असतात आणि अक्षरशः दिवाळी पाडव्याच्या सोहळ्याचे ते दोन दिवस जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहतात. ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली, हे सांगता येत नाही; पण माझं आणि चुलत्यांचं वय विचारात घेता, किमान दीडशे ते दोनशे वर्षांहून अधिक काळाची ही परंपरा कोल्हापूरने जपली असल्याचंही ते आवर्जून सांगतात. वयाच्या पंचाऐंशीतही या माणसाचा आवाज तितकाच खमका आणि मिशीचा पीळही तितकाच रुबाबदार. ‘‘पिढ्यानपिढ्या आम्ही दुधाचा व्यवसाय करतो. आमची चौथी पिढीही आता याच व्यवसायात आहे,’’ असं सांगताना अभिमानाची एक वेगळीच लकेर त्यांच्या चेहऱ्यावर उमटते.

‘‘दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे दोन दिवस हा सोहळा रंगत असला, तरी त्याची सुरुवात दसऱ्यापासूनच होते. एरवी म्हशी, रेड्यांची निगा आम्ही चांगली राखतोच; पण या सोहळ्याच्या निमित्ताने महिनाभर खास आहार त्यांना दिला जातो. कारण कुणाच्या म्हशी किती ताकदीच्या, हे दाखवण्याची सकस ईर्ष्याच जणू यानिमित्ताने असते. पाडव्यादिवशी सकाळी हलगी-घुमक्याच्या तालात प्रत्येक जण आपापल्या म्हशी घेऊन नदीवर जातो. तिथं म्हशींची स्वच्छता केली जाते. पुन्हा त्या वाजत-गाजत आपापल्या घरी येतात. त्यानंतर त्यांना सजवण्याची धांदल सुरू होते. शिंगांची रंगरंगोटी, केशरचना असो, किंवा त्यांच्यासाठीच्या खास अलंकारांनी त्या सजतात. मग त्यांची पूजा केली जाते आणि त्यानंतर साऱ्या गल्लीतून त्यांना पळवलं जातं. सुरुवातीला मालक आणि म्हशी दोघांनीही चालत-पळतच हा सोहळा व्हायचा. पण, अलीकडच्या काळात मोटारसायकलींसह त्या धावतात. हलगी-घुमक्याचा ताल जसा टिपेचा जातो, तशीच या सोहळ्यातील रंगत आणखी वाढत जाते. केवळ गवळी गल्लीतीलच नव्हे, तर साऱ्या कोल्हापुरातल्या सजलेल्या म्हशी सवाद्य मिरवणुकीने या दिवशी शनिवार पेठेतील गवळी गल्लीत येतात आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी सारं कोल्हापूरही लोटतं. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका चालतात. अलीकडच्या काळात आता ‘रोड शो’ अशी त्याची ओळख झाली आहे. सुरुवातीला केवळ गवळी समाजाचा हा सोहळा होता. आता सर्वच समाजांतील म्हैस दूध उत्पादक या सोहळ्यात सहभागी होतात. सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक म्हैस दूध उत्पादकाचा येथे गवळी समाज, म्हैस दूध उत्पादक संघटनेसह परिसरातील मंडळांतर्फे पान-सुपारी आणि श्रीफळ देऊन गौरव केला जातो....’’ एकूणच परंपरेचा हा सगळा इतिहास श्री. गवळी उलगडत असतात. गवळी गल्लीतल्या त्यांच्या घरातच हा सारा संवाद रंगलेला असतो.

‘‘भाऊबिजेदिवशी पुन्हा आम्हाला ओढ लागते ती सागरदेवाच्या दर्शनाची. हाच आमचा सागरमाळ (प्रतिभानगर) परिसरातील देव. तिथं त्याचं छोटं मंदिरही आहे. तुमच्या म्हशी असोत किंवा नसोत, वर्षातून एकदा या दिवशी या देवाला श्रीफळ देण्याची परंपरा आजही कायम आहे. घरातील सारीच जनावरं न घेता काही निवडक म्हशी आणि रेड्यांच्या सवाद्य मिरवणुका पुन्हा या दिवशी दुपारी निघतात. आपापल्या परिसरातून सारी मंडळी सायंकाळी सागरमाळावर पोचतात. तिथं सागरदेवाला प्रदक्षिणा घालून श्रीफळ अर्पण केलं जातं आणि पुन्हा मग म्हशी पळवल्या जातात. अगदी मालक दमेपर्यंत हा सोहळा रंगतो. केवळ शहरातीलच नव्हे, तर आसपासच्या भागातूनही अनेक म्हैस दूध उत्पादक या सोहळ्यात सहभागी होतात आणि आपल्या जनावरांसह स्वतःसाठी वर्षभराची सळसळती ऊर्जा घेऊन ते पुन्हा सवाद्य मिरवणुकीने घरी परततात,’’ असंही श्री. गवळी भारदस्त मिशी पिळतच सांगतात

काय आहे परंपरा?

‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ ही तशी सर्वत्र असणारी परंपरा. वसुबारसच्या निमित्ताने सर्वत्र ती अजूनही कायम आहे. मात्र, जिंदादिली आणि रांगड्या कोल्हापूरने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ती म्हशींच्या या अनोख्या गौरव सोहळ्याने. जनावरांवर प्रेम कसं करावं, याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तो यानिमित्ताने आवर्जून मिळतो. त्यासाठी गवळी व्यावसायिक म्हशींवर हजारो रुपये खर्च करतात. शहरातील जुन्या पेठांत दूध व्यवसाय पिढ्यान्‌पिढ्या जपला गेला आहे. शनिवार पेठ, बुधवार पेठ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, उत्तरेश्‍वर पेठ, शाहूपुरी, बागल चौक आदी परिसरात हे व्यावसायिक आहेत. किमान दोन हजारहून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह अजूनही या व्यवसायावरच आहे. ही कुटुंबं रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक जीव आपल्या या पशुधनावरच लावतात आणि म्हणूनच त्यांच्याशी असलेलं भावविश्व खूप वेगळं आहे. त्यातीलच काही व्यावसायिक आजही म्हशींना घेऊन दूधकट्ट्यावर रोज येतात. ताजं, धारोष्ण दूध ते कोल्हापूरकरांसाठी या दूधकट्ट्यावरच उपलब्ध करून देतात.

नावातच सगळं आहे...

म्हशींची नावं, हीसुद्धा अस्सल कोल्हापुरी परंपरा. एखादी म्हैस वेगाने धावत असेल, तर ती ‘सैराट’ किंवा ‘बुलेट’ अशा नावाने ओळखली जाते. म्हशीचे डोळे घारे व भोरी रंगाची असेल, तर तिचं नाव ‘ऐश्‍वर्या’ अर्थात ‘ऐश’ म्हणून तिचं नामकरण होतं. ‘टेक्‍सास’, ‘गौरी’, ‘बावरी’, ‘पतंग’, ‘उत्तरेश्‍वरची राणी’, ‘सुंदरी’, ‘चंदेरी’, ‘शीला’, ‘गोमटी’, ‘वैजयंती’, नर्गीस, ‘कस्तुरी’, ‘गुलाबी’, ‘शिलंगण’, ‘ऐनक’, ‘सैनक’,

‘बिलवर’ अशी या म्हशींची नावं कौतुकाने ठेवली जातात आणि नावाने मालकाने नुसती हाक जरी मारली, तरी या म्हशी त्यांच्यापाठोपाठ पळत येतात. तीन हाकांत म्हशींना बोलवण्याचं एक वेगळं कसबही इथं आवर्जून पहायला मिळतं. दिवाळी पाडव्याच्या गौरव सोहळ्यात एकापाठोपाठ एक सजलेल्या म्हशींचा रोड शो झाला की, त्यानंतर मालकाच्या इशाऱ्यावर म्हशी कशा पाठोपाठ पळत येतात, दुसरा इशारा करताच त्या जागच्या जागी कशा थांबतात. पेटत्या आगीतूनही त्या कशा झेप घेतात, अशी विविध प्रात्यक्षिकंही पहायला मिळतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने काढणी बांधलेल्या रेड्यांचाही रोड शो यानिमित्ताने होतो.

परंपरा जपत बदलांचा वेध...

गेल्या काही वर्षांत या सोहळ्यालाही आता सामाजिकतेची झालर मिळू लागली आहे. सजवलेल्या म्हशी यानिमित्ताने शहरातील विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. मग ते टोलमुक्तीचं आंदोलन असो, मराठा आरक्षणाचा प्रश्न असो किंवा अगदी घरफाळावाढ, स्वच्छ भारत अभियान... अशा विविध प्रश्नांचा वेध यानिमित्ताने घेतला जातो. हलगी-घुमक्याबरोबरच अत्याधुनिक ध्वनियंत्रणा आणि लेसर शोचा वापर आता होत असला, तरी मूळ परंपरेला कुठेही फाटा दिला जात नाही, हे विशेष. बदलत्या काळात नेटीझन्सनाही या सोहळ्याने भुरळ घातली असून, तो कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी अनेक ठिकाणाहून छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर्स मंडळी आवर्जून येतात.

लाखमोलाच्या स्पर्धाही...

बैलगाडी, घोडागाडी शर्यती साऱ्यांनाच माहिती आहेत, त्यासाठी मोठी बक्षिसंही असतात. पण, कोल्हापुरात म्हशींच्या शर्यतींची परंपराही बदलत्या काळात कायम आहे. अगदी वाढदिवसाच्या निमित्तानेही या शर्यती होतात. अलीकडच्या काळात तर बक्षिसांची रक्कमही कैक लाखांमध्ये ठेवली जाते.

मालकाने हाक मारली की, त्याच्या मोटारसायकलमागून म्हैस धावत जाते. कमीत कमी वेळेत जी म्हैस ठरलेलं अंतर पार करेल ती विजेती. वेगात धावण्यासाठी म्हशीला मारहाण किंवा शारीरिक इजा हा इतर शर्यतींतील प्रकार या शर्यतीत कुठेही पहायला मिळत नाही. विशेष म्हणजे, या शर्यतींची रनिंग कॉमेंट्रीही वैशिष्ट्यपूर्ण असते. १९५८मध्ये ऑलिंपिकवीर कृष्णराव माणगावे मास्तर आणि सहकाऱ्यांनी मंगळवार पेठेतील रेसकोर्स मैदानावर म्हशींची पहिली शर्यत भरवली होती. त्या वेळी अनुक्रमे ७५ रुपये, ५० रुपये, २५ रुपये आणि ढाल अशी बक्षिसं होती, अशी आठवण ज्येष्ठ मंडळी सांगतात.

सागरमाळ, रेड्यांची टक्कर...!

सागरमाळ परिसराला सध्या प्रतिभानगर म्हणून ओळखलं जातं. शहरातील वीरशैव लिंगायत, मराठा-गवळी, यादव-गवळी अशा सर्व समाजांतील म्हैस दूध उत्पादक पूर्वी सागरमाळावर म्हशी, रेडे चरायला न्यायचे. याच माळावर पशुधन पोसलं जायचं आणि त्याच्या कृतज्ञतेपोटी येथे सागरदेवाचं एक छोटं मंदिरही बांधण्यात आलं. रेड्यांच्या टकरीचा प्रतीकात्मक पुतळाही इथं उभारण्यात आला. याच ठिकाणी भाऊबिजेचा म्हशींचा गौरव सोहळा प्रत्येक वर्षी होतो. पण, याच परिसरात सुमारे पंचाहत्तर वर्षांपूर्वी एक गृहनिर्माण संस्था उभी राहिली. या संस्थेला ‘प्रतिभानगर’ असं नाव ठेवलं आणि पुढे हा परिसर प्रतिभानगर म्हणून ओळखला जाऊ लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com