हरवलेत शब्द; शोधायचे कुठे?

शिवारात शेतीकाम करणारी यंत्र आली. शेती बदलली. पेरणी, कोळपणी, कुळवणी बंद झाली. नांगरणी ट्रॅक्टरने सुरू झाली.
Agriculture
AgricultureSakal
Summary

शिवारात शेतीकाम करणारी यंत्र आली. शेती बदलली. पेरणी, कोळपणी, कुळवणी बंद झाली. नांगरणी ट्रॅक्टरने सुरू झाली.

शिवारात शेतीकाम करणारी यंत्र आली. शेती बदलली. पेरणी, कोळपणी, कुळवणी बंद झाली. नांगरणी ट्रॅक्टरने सुरू झाली. बैलं बाजाराच्या दिशेने निघाली. शिवारात, दावणीला बैलं दिसायची बंद झाली. जाताना बैलं एकटी गेली नाहीत, बैलगाडी, कुळव, कोळप, घोडी हेही पूरक साहित्य घेऊन गेली. जोडीला मराठी भाषेतील काही शब्दही गेले.

चौथीच्या वर्गात शिकत होतो. साडेपाच वाजता शाळा सुटल्यावर घराजवळ गेलो, तर घराच्या बाहेर लय गर्दी झालेली. काहीच कळेना. जसजसा जवळ गेलो तसं आजीच्या रडण्याचा आवाज कानावर आला. पोटात धस्स झालं. पळतच गेलो, तर दारात बैलगाडीच्या जवळ आमची गाय पडलेली. गायीच्या कपाळावर कुंकू लावलेलं. आजी जोरात रडत होती.

लोकांनी गायीला उचललं. बैलगाडीत ठेवलं. गाडी चालली. शांतता होती. आजी हंबरडा फोडत म्हणाली, ‘थांबा, माझ्या बाईला शेवटचा घास घालती अजून एकदा.’ असं म्हणत भाकरीचा तुकडा घेऊन ती पळत आली. गाडीत जाऊन गायीच्या मिटलेल्या तोंडात घास भरवू लागली; पण गाय तोंड उघडणार नव्हती. तिनं तुकडा तसाच सोडला आणि जोरजोरात रडू लागली. ते बघून सगळ्या माणसांच्या पोटात कालवलं. गाडी खडाखडा करत निघाली.

तो प्रसंग आजही डोळ्यासमोर उभाय माझ्या.

आमच्या घरातील माझ्या डोळ्यासमोर मेलेलं पहिलं जनावर. या गायीवर आमचा विशेष लोभ. एका पहाटे आजोबांना रानात जाताना रस्त्यावर सोडलेली पाडी सापडली. देखणं जनावर. ते घेऊन आले. त्याच गायीने आम्हाला पाच खोंडं दिलेली. यातील दोन खोंडं शेवटच्या क्षणापर्यंत आमच्यात होती. याच खोंडाच्या जोडीसाठी सगळा मुलुख पालथा घालून जोडीला जोड मिळवली. दोन बैलांची गरज असताना नाद म्हणून चार-चार बैलं दारात होती. बैलं विकू वाटायची नाही ती. सगळ्याच बैलांना घरच्या लोकांचा लळा लागलेला. अगदी दुष्काळ पडला, तरीही ऋण काढून बैलं सांभाळली. बैलाला जोड लागली, की मग शेवटपर्यंत ती जपायची. फायदा-तोटा याचा विचार कधीही केला नाही घरच्यांनी...

सुरत्या, निशाण, अस्मान, चितार ही आठवणीत राहिलेली बैलं. आजारी पडून दावणीला मेली; पण म्हातारी झाली म्हणून विकली नाहीत. दोन-दोन वर्षे तशाच अवस्थेत सांभाळली. ज्याने आपल्या घरातल्या कणगी धान्याने भरल्या, आपल्या रानात हाडाची काडं केली, तरुणपणात राबला, त्याला म्हातारपणी कुठं अटिंग्यावनात सोडायचा? हा आजोबांचा विचार होता. बालपणापासून शाहिरी भेदीक हे लोकसाहित्य ऐकून त्यांच्यात हे विचार आलेले. बैल ज्या दिवशी जाईल, त्या दिवशीच वातावरण खूप भकास वाटत असे. ज्या जागेवर बैल बांधला होता त्या रिकाम्या जागेकडे पाहताना गलबलून येई. शाळेत गेलो तरी करमायचं नाही. सारखा बैल दिसायचा. उदास वाटायचं. घरातील लोकही उदास असायची. त्या रात्री न जेवता झोपायची माणसं.

शाळेच्या पटांगणात खेळत असताना आमची बैलगाडी रस्त्यावर दिसली, तरी ऊर भरून यायचा. अभिमान वाटायचा. पळत गाडीकडे जायचं, उडी मारून बसायचं. परत मागे यायचं. विटा, पलूसचा बाजार असला की मी शाळा चुकवून बाजारला जायचो. तेवढा बैलगाडीचा प्रवास आनंद मिळवून द्यायचा. त्या निवांत पण समृद्ध असलेल्या पावसाची सर आजच्या गतिमान प्रवासाला नाही. उगाच गंमत म्हणून आजोबा बैल पळवायचे. मग गाडी हेलकावे खात जायची. रस्ता धुरळ्याचा. मागे धुरळा उडायचा. मी पुढं आजोबांच्या जवळ बसलेलो असायचो. कधी मजा म्हणून माझ्याही हातात बैलांचे कासरे द्यायचे. मलाही बरं वाटायचं. बघता बघता बाजाराचं गाव यायचं. एका माळावर गावोगावच्या बैलगाड्या सोडल्या जायच्या. तिथून मग खरेदी करायला लोक गावात जात. मी मात्र बैलगाडीत बसून राहत असे. दिवस मावळायला गेला की, मग गाडीवान हळूहळू त्या गाडीतळावर येत. आमचे आजोबाही येत. त्यांच्या हातात भाजीपाला असे. सोबतची बायामाणसंही येत. मग गाडीचा प्रवास गावाच्या दिशेने सुरू होई. गावात यायला रात्र होई.

आज तो सगळा प्रवास आणि आमच्या दावणीला नांदलेली बैलं हे लक्षात आहे. आजोबाच्या पिढीत आलेला पहिला बैल सुरत्या, त्या बैलानंतर आमची दावणीला नेहमीच भरलेली राहिली. करगणी, म्हसवड, वडगाव, मायणी, सांगोला या बैलांच्या बाजारातून आजोबांनी सोन्याच्या किमतीची बैलं आणली. बैलांचे पारंपरिक व्यापारी अनेकदा पत्र पाठवून चांगला बैल आलाय, घेता का म्हणून विचारत. एवढा बैलाचा नाद आमच्या घरी होता.

दिवसमान बदललं. आम्ही तरुण झालो. आजोबा थकत चालले. उसळलेल्या बैलाचा कासरा रोखण्याची ताकद त्यांच्या हातात उरली नाही; पण तरीही त्यांनी एक वासरू आणलं. त्याचदरम्यान परिसरात जिरायत शेती कमी झालेली. बैलांची कामंही आता शेतात राहिली नव्हती. गावात ट्रॅक्टर आलेले. बैलं कमी झालेली, गावाकडे गेलो की जाणवत होतं. एकदा बेंद्राच्या सणाला गेलो, तर अवघी सहा बैलं वाजत निघालेली. आमच्या लहानपणी बेंद्राला किमान सगळ्या रस्त्यावर बैलंच बैलं दिसत; पण अवघी सहा बैलं निघालेली ते चित्र बघून अस्वस्थ होतो. गाववर्तमान खूप बदललं आहे, हे त्या दिवशी जाणवलं. आमच्या पिढीने बेंद्राचा सण बघितला; पण या पिढीला किमान एवढा तरी बघायला मिळतोय. पुढच्या पिढीला बेंदूर अभ्यासक्रमात शिकवायला लागेल. माझा बैल, माझी गाय, मी पाहिलेला बेंदूर हे निबंध लिहिलेले आठवतात मला.

शिवारात पाणी आणि यंत्रयुग एकाच काळात आलं. शेतीकाम करणारी यंत्र आली. शेती बदलली. पेरणी, कोळपणी, कुळवणी बंद झाली. नांगरणी ट्रॅक्टरने सुरू झाली. ती नांगरट बैलांच्या नांगरणीपेक्षा अधिक खोल आणि कमी वेळेत व्हायला लागली. मग नव्या पिढीला बैलं बिनकामाची वाटू लागली. जुनी पिढी बैलाच्या प्रेमात; पण यंत्रयुगाची ताकद उमगलेल्या नव्या पिढीपुढं काही चाललं नाही. बैलं बाजाराच्या दिशेने निघाली. बघता बघता शिवारात, दावणीला बैल दिसायची बंद झाली. अवघ्या पाच-सहा वर्षांत हे घडत गेलं आणि जाताना बैलं एकटी गेली नाहीत, बैलगाडी, कुळव, कोळप, घोडी हेही पूरक साहित्य घेऊन गेली. जोडीला मराठी भाषेतील काही शब्दही गेले. वापरातून गेले आणि जे शब्दकोशात नव्हते. बोलीत होते. गेले आता.

आमच्या घरातील शेवटचा खोंड. हौसेने घेतलेला. दीड वर्षात मोठा बैल झाला; पण एकटा बैल. पैरा करावा तर शिवारात दुसरा बैल नाही. त्याला आत बांधणे आणि बाहेर बांधणे एवढंच काम होतं. पांढराशुभ्र. बघताना तहानभूक हरवावी असा. डिरकायचा लय भारी; पण एवढा ताकदीचा बैल आता परवडणारा नव्हता. एक नादी माणूस आला आणि घेऊन गेला. जाताना बैलांचे कासरे आणि गळ्यातील कंडा देऊन गेला. या खोंडाचे नाव वस्तू ठेवले होते. आज वस्तू आमच्यात नाही. तो कुठं असेल माहिती नाही. त्या माणसाने त्याला विकला की काय माहिती नाही. मात्र वस्तूची आमच्या घरातील शेवटचा बैल म्हणून आठवण आहे. त्याच्या गळ्यातील कंडा आमच्याकडे आहे. बैल विकताना गळ्यातील कंडा आणि कासरा विकत नाहीत. तो विकला तर आपल्या दावणीला पुन्हा बैल येत नाही. म्हणून वस्तूचे कासरे ठेवून घेतलेत; पण अजूनही आमच्या घरापुढे बैलाची डिरकी ऐकायला मिळालेली नाही, त्याच्या गळ्यातील घुंगराचा आवाज ऐकायला मिळालेला नाही. मिळेल का?

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर ते महत्त्वाचे भाष्यकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com