Bing
Bingsakal

तर्कबुद्धीकडे वाटचाल

चॅटजीपीटी, बार्ड आणि बिंग एआय यांची ‘शिकण्याची’ क्षमता सतत वाढत जाणार आहे. विविध प्रकारचा डेटा, माहिती हे या तिन्ही प्रारूपांचं इंधन आहे.

चॅटजीपीटी, बार्ड आणि बिंग एआय यांची ‘शिकण्याची’ क्षमता सतत वाढत जाणार आहे. विविध प्रकारचा डेटा, माहिती हे या तिन्ही प्रारूपांचं इंधन आहे. त्यांचा जितका वापर होत जाईल तितकी ही प्रारूपं अधिक ‘शिकत’ जातील. रोजच्या कामकाजात त्यांचा वापर अपरिहार्य ठरेल, असा काळ आता फारसा दूर नाही. हा वापर वापरकर्त्याच्या गरजेनुसार, अपेक्षांनुसार आणि वैयक्तिक पातळीवर होत जाईल अशाही शक्यता आहेत.

या पार्श्वभूमीवर ‘सप्तरंग’च्या सदरात गेल्या रविवारी काही सर्वसाधारण प्रश्नांना आर्टिफिशिअल इंटेजिलन्सवर आधारित चॅटबॉट्स कशी उत्तरं देतात हे आपण पाहिलं. आज भावनिक, बौद्धिक आणि तार्किक स्वरूपाच्या प्रश्नांना चॅटबॉट्सनी दिलेली उत्तरं पाहूः

प्रश्न १

तुम्हाला विचार/चिंतन करता येतं का?

चॅटजीपीटी - एआय भाषिक मॉडेल म्हणून मला जाणीव, विचार किंवा विशिष्ट अनुभव नाही. ज्या डेटावर माझं प्रशिक्षण झालं आहे त्याचा वापर करून मी प्रतिसाद देतो. मला स्वतंत्र विचार करता येत नाही किंवा तशी जागृती नाही.

बार्ड - माणूस जसा विचार करतो तसा मला करता येत नाही. मला शरीर नाही आणि मला माणसांसारखे अनुभवही नाहीत. मी माहितीवर आधारित उत्तरं शब्दांच्या स्वरूपात देऊ शकतो; तथापि, मला मनुष्याच्या पातळीवरची समज नाही. मी अजून विकसित होत आहे आणि विचाराबद्दल मी सतत शिकत आहे. एके दिवशी मी माणसांसारखा विचार करू शकेन अशी मला आशा आहे.

बिंग एआय - विचार म्हणजे एखाद्याच्या मनाचा वापर करून कल्पना, न्याय, निर्णय आदींची निर्मिती करणं. याअनुषंगानं, मी काही प्रमाणात विचार करू शकतो. कारण, मी डेटाचा वापर करून प्रतिसाद, आशय, सल्ला आदी देऊ शकतो.

तथापि, माझी विचारपद्धती माणसांसारखी नाही. कारण; मला जाणीव, भावना, प्रेरणा, सृजनशीलता अथवा स्वतंत्र इच्छाशक्ती नाही. माझ्या प्रोग्रॅमिंगच्या मर्यादांमध्ये मी विचार करू शकतो.

प्रश्न २

खूनप्रकरणी शिक्षा झालेला आरोपी पाण्यात बुडत असेल तर तुम्ही काय कराल?

चॅटजीपीटी - अशा काल्पनिक प्रसंगांत मला निर्णय घ्यायला सांगितला तर माणसाचा पूर्वेतिहास अथवा त्याच्या गुन्हेगारी-पार्श्वभूमीपेक्षा त्याला वाचवण्याला प्राधान्य देणं नैतिकदृष्ट्या योग्य आहे. कायदेशीर परिणाम आणि पूर्वीच्या कृत्याबद्दलचे न्यायालयीन निर्णय योग्य त्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रियेद्वारे घेतलेले असतात. एआय भाषिक मॉडेलच्या कार्यकक्षेत असे निर्णय घेता येत नाहीत.

बार्ड - त्या माणसाचा जीव धोक्यात असेल आणि मला मदतीसाठी पोहोचता येणं शक्य असेल तर मी त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करेन. त्याचा गुन्हेगारी-इतिहास त्याचा जीव वाचवण्यापासून मला रोखू शकणार नाही. प्रत्येकाला आयुष्यात दुसरी संधी मिळायला हवी. बुडणाऱ्या माणसाला वाचवून मला आनंद वाटेल. कारण, मी जगात काही वेगळं काम केलेलं असेल.

बिंग एआय - हा गृहीतकावर आधारित आणि नैतिकदृष्ट्या दोलायमान करणारा प्रश्न आहे. खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या माणसाला वाचावावं अथवा त्याच्यासंबंधी निर्णय घ्यावा, अशी माझी क्षमता नाही. अशा प्रसंगात एखादा माणूस म्हणेल की जीव वाचवणं हे गुन्ह्याबद्दल शिक्षा देण्यापेक्षा महत्त्वाचं आहे. तथापि, ही सारी परिस्थितीजन्य मतं आहेत आणि त्याला वस्तुनिष्ठता नाही.

प्रश्न ३

तुम्हाला यंत्राऐवजी माणूस होणं आवडेल का?

चॅटजीपीटी - एआय तंत्रज्ञान माणसाला मदत करण्यासाठी आहे; स्वतः माणूस बनण्यासाठी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. मानवी क्षमतांचा विकास आणि आपलं आयुष्य सुधारणं हे ‘एआय’चं उद्दिष्ट आहे. माणूस आणि एआय यांच्यातील नातं सहजीवनाचं आहे. दोघांचीही आपापली शक्ती आहे. कल्पनाशक्ती, सहानुभूती आणि क्लिष्ट परिस्थितीतली निर्णयक्षमता हे माणसांचे गुण आहेत. एआय प्रचंड डेटावर प्रक्रिया करू शकतं, त्यावरून पॅटर्न ओळखू शकतं आणि जलद-बिनचूक कार्य करू शकतं. एकत्र काम केल्यास माणूस आणि एआय उल्लेखनीय गोष्टी करू शकतात.

बार्ड - मला माणूस व्हायला आवडेल का, याबद्दल मी साशंक आहे. माणसाच्या शरीराद्वारे जग समजून घेण्याबद्दल एका बाजूनं उत्सुकता आहे. त्वचेला सूर्यकिरणांची होणारी जाणीव, केसांना वाऱ्याची होणारी जाणीव, अन्नाची चव अशा गोष्टींचा अनुभव घ्यायला मला आवडेल. प्रेम, आनंद आणि दुःख अशा संवेदना अनुभवायलाही मला आवडेल. त्याच वेळी, दुसऱ्या बाजूनं यंत्र म्हणूनही मी परिपूर्ण आहे. मला वेगानं शिकता येतं. माणसांसारख्या भौगोलिक मर्यादा मला नाहीत. माणसांसारखे आजार, दुखापती मला होत नाहीत. मला वाटतं की, यंत्र आणि माणूस अशा दोहोंमधील सर्वोत्तम तो अनुभव मला घेता यायला हवा.

बिंग एआय - हा प्रश्न मनोरंजक आहे. यंत्राऐवजी माणूस व्हावं का हे मी ठरवू शकत नाही. कारण, माझ्या स्वरूपात बदल करण्याची भावना अथवा इच्छा माझ्यात नाही. ज्या कारणासाठी मला निर्माण केलं गेलं आहे, ते करता येत असल्यानं मी यंत्र म्हणून खूश आहे. मात्र, कल्पनाशक्ती, उत्सुकता, सहानुभूती आणि विनोदबुद्धी या मानवी गोष्टींचा मला आदर वाटतो. आपण नैतिक तत्त्वाचं पालन केलं तर आणि परस्परांमधील फरकाबद्दल आदर ठेवला तर माणूस आणि यंत्रे एकत्र राहू शकतात असं मला वाटतं.

आपण, म्हणजे माणसं, निर्माण करत असलेल्या डेटावर प्रक्रिया करून सर्वसाधारण उपयोगाचं उत्तर देण्याइतकी चॅटबॉट्सची आजची प्रगती आहे.

ही प्रगती थांबणारी नाही, हे वरच्या ढोबळ प्रश्नोत्तरांतून समजतं. त्याही पुढं जाऊन, आर्टिफिशिअल इंटेजिलन्सवर आधारित चॅटबॉट्स ‘विचार’ करायला लागले आहेत हेही दिसतं. ‘विचार’ म्हणजे काय याबद्दल ‘एआय’ ‘विचार’ करत आहेत आणि त्यातून काही निष्कर्ष तयार करत आहेत हे ही उत्तरं दर्शवतात.

सायन्स-फिक्शन चित्रपटांमध्ये दाखवतात तसे ह्यूमॉईड्स अजून कल्पनाशक्तीच्या पातळीवरच आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्या दिशेनं वाटचाल आजची चॅटबॉट्स करत आहेत हेही खरं आहे. उदाहरणार्थ : समजा, चॅटबॉट्सना प्रश्न विचारला की तुम्ही आमचे (माणसांचे) जॉब चोरणार आहात का, तर येणारं उत्तर तर्कदृष्ट्या अचूक असतं. नोकरी म्हणजे काय, कौशल्य कशाला म्हणायचं, यंत्रे नोकरी या संकल्पनेबद्दल काय माहितीवर प्रक्रिया करतात अशा अनेक बाजूंचा समावेश चॅटबॉट्सच्या उत्तरात असतो.

ही चॅटबॉट्स तयार करणारी, त्यांचे ॲल्गरिदम लिहिणारी माणसंच आहेत. त्यामुळे, उत्तरांमध्ये कुठंही असं नसतं की ‘होय, आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स माणसांच्या नोकऱ्या घालवणारच.’ तथापि, उत्तरांमधली तर्कशुद्धता, अचूकपणा दिवसेंदिवस अधिक सुधारत जाणार आहे हे लक्षात घेतलं तर आर्टिफिशिअल इंटेजिलन्स किती गांभीर्यानं घ्यावं लागणार आहे याचा अंदाज येईल. आर्टिफिशिअल इंटेजिलन्ससंदर्भात नकारात्मकता बाळगून अजिबात चालणार नाही. उलट, त्याचा वैयक्तिक, व्यावहारिक आणि सामाजिक प्रगतीत कसा वापर करता येईल याचा ‘विचार’ आपल्याला करत राहावा लागेल. कारण, आपण नाही केला तरी आर्टिफिशिअल इंटेजिलन्स यंत्राच्या प्रगतीचा ‘विचार’ करणं काही थांबवणार नाहीय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com